Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 28 फेब्रुवारी रोजी गुजरात दौऱ्यावर


नवी दिल्‍ली, 27 फेब्रुवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी 2026 रोजी गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. दुपारी सुमारे 3:45 वाजता ते साणंद येथे मायक्रॉन सेमिकंडक्टर टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सेमिकंडक्टर असेंब्ली, टेस्ट अँड पॅकेजिंग (एटीएमपी) सुविधेचे  उद्घाटन करतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.

या उद्घाटनामुळे भारताच्या सेमिकंडक्टर उत्पादन प्रवासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला जात आहे. साणंद येथील एटीएमपी संयंत्रातून  ‘मेड-इन-इंडिया’ सेमिकंडक्टर मेमरी मॉड्यूल्सचे व्यावसायिक उत्पादन आणि निर्यात सुरू होत आहे. या घडामोडीमुळे जागतिक सेमिकंडक्टर मूल्यसाखळीत भारताची स्थिती अधिक मजबूत होणार आहे.

या सुविधेचा  भूमिपूजन समारंभ सप्टेंबर 2023 मध्ये पार पडला होता. इंडिया सेमिकंडक्टर मिशन (आयएसएम) अंतर्गत मंजूर झालेला हा पहिला प्रस्ताव होता. सुमारे 22,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या प्रकल्पाचे बांधकाम मंजुरीनंतर तत्काळ सुरू करण्यात आले, ज्यातून देशातील धोरणात्मक सेमिकंडक्टर गुंतवणुकींना गती देण्याबाबत सरकारची बांधिलकी अधोरेखित होते.

पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर साणंद येथील या प्रकल्पात सुमारे 5,00,000 चौरस फूट क्षेत्रफळ इतकी क्लीनरूम स्पेस असेल, जे जगातील सर्वात मोठ्या उंचीवरील फ्लोअर क्लीनरूमपैकी एक ठरेल. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उच्च-कार्यक्षमता संगणनात झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे वाढणाऱ्या मेमरी आणि स्टोरेज सोल्यूशन्सच्या जागतिक मागणीची पूर्तता करण्यासाठी ही सुविधा डिझाइन करण्यात आली आहे.

साणंद एटीएमपी प्रकल्पात मायक्रॉनच्या जागतिक उत्पादन जाळ्यातून प्रगत डायनॅमिक रँडम अ‍ॅक्सेस मेमरी (डीआरएएम) आणि नॅन्ड सेमिकंडक्टर वेफर्सचे रूपांतर तयार मेमरी आणि स्टोरेज उत्पादनांमध्ये केले जाईल, जे जागतिक बाजारपेठांमधील ग्राहकांना पुरवले जाईल.

या प्रकल्पाची स्थापना आणि कार्यान्वयनामुळे सेमिकंडक्टर उत्पादनासाठी भारत एक विश्वासार्ह आणि स्पर्धात्मक केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे अधोरेखित होते. तसेच, देशात सक्षम आणि आत्मनिर्भर तंत्रज्ञान परिसंस्था उभारण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाशीही हे सुसंगत आहे.

 

* * *

सुषमा काणे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai