Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पारादीप तेलशुध्दीकरण प्रकल्प राष्ट्राला अर्पण करताना पंतप्रधानांनी केलेले भाष

पारादीप तेलशुध्दीकरण प्रकल्प राष्ट्राला अर्पण करताना पंतप्रधानांनी केलेले भाष

पारादीप तेलशुध्दीकरण प्रकल्प राष्ट्राला अर्पण करताना पंतप्रधानांनी केलेले भाष


जय जगन्नाथ! ओदिशाचे राज्यपाल जमीर जी, राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक जी, मंत्रिमंडळातले माझे सहकारी, संसदेतील माझे सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

सरकारी कार्यक्रम तर आम्ही खूप पाहिले आहेत, मात्र असे वातावरण कधी पाहिले नाही. माझी नजर जिथे जाते, सगळीकडे लोकच दिसत आहेत. यावरुन हे सिध्द होते की ओदिशाच्या प्रत्येक नागरिकाला माहित आहे की पारादीप तेलशुध्दीकरण प्रकल्प त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे, ओदिशाच्या विकासासाठी किती महत्त्वाचा आहे. ओदिशाचा प्रत्येक नागरिक हे जाणतो. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो, इतक्या मोठ्या संख्येने विकासाच्या या कामात सहभागी होण्यासाठी तुम्ही येथे आलात.

ओदिशाचे उत्कल मणि पंडित गोपीचंद दास, उत्कल गौरव मधुसूदन दास, सुरेंद्र तसेच महाराष्ट्राचे कृष्ण चंद्र गजपति यांसारख्या महान महापुरुषांना, महान आत्म्यांना मी नमस्कार करतो.

शेकडो वर्षे ओदिशा व्यावसायिक, व्यापारी सागरी मार्गाने दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियाच्या विविध देशांमधील विविध ठिकाणी जावा, बाली, सुमात्रा, बॉरनियो कुठे कुठे गेले होते, याची आठवण म्हणून आज देखील दरवर्षी पवित्र कार्तिक पौर्णिमेच्या शुभप्रसंगी राज्यातल्या काना-कोपऱ्यात बोइत वंदना केली जाते. पारंपारिकरित्या इथली बंदरे जगातील अनेक भागांमधून व्यापार करण्यासाठी कायम गजबजलेली असायची. महाकवी कालिदास यांनी रघुवंशम या काव्यात कलिंगच्या राजाचे महोदधिपती म्हणजे समुद्राचा महाराजा असे वर्णन केले आहे. मी या पारादीप, जगतसिंहपूर जिल्ह्यातील मातीला देखील पवित्र क्षेत्र मानतो. हीच ती धरती आहे जिथे शूद्र मुनि सारलादास यांनी संपूर्ण महाभारताची रचना केली होती आणि संस्कृत व्यतिरिक्त अन्य कोणत्याही भारतीय भाषेत सर्वप्रथम लिहिले गेलेले हे महाभारत होते.

अतिशय नम्रपणे आज मी उत्कल केसरी हरि कृष्ण मेहता आणि उत्कलचे महान सुपुत्र बीजू बाबा यांचे स्मरण करु इच्छितो. हेच ते महापुरुष होते ज्यांनी पारादीपला वाचवण्यासाठी बंदराची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. या जगतसिंहपुर जिल्ह्याच्या मातीमध्ये ओदिशाचे माजी मुख्यमंत्री नबकृष्ण चौधरी, स्वातंत्र्यसैनिक गोक बंधु, मालती देवी आणि सुप्रसिध्द शास्त्रज्ञ प्राण कृष्ण परिजा यांच्यासारखे महापुरुष होऊन गेले, त्यांचे स्मरण करुन मी नतमस्तक होतो, त्यांना वंदन करतो.

बंधू-भगिनींनो, ही माझ्यासाठी विशेष भाग्याची बाब आहे की 35 हजार कोटी रुपये खर्चून तयार झालेल्या या तेलशुध्दीकरण प्रकल्पाचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली आणि आनंदाची गोष्ट ही आहे की याचे भूमिपूजन माझे मार्गदर्शक, माझे प्रेरणा पुरुष, भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केले आहे. ज्या कामाचा वाजपेयी यांनी शुभारंभ केला, ते काम पूर्ण करण्याचे भाग्य लाभणे यापेक्षा मोठा जीवनातील आनंद आणखी काय असू शकतो.

बंधू-भगिनींनो, हा असा प्रकल्प आहे, ज्यामुळे येथील लाखो युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. आणि म्हणूनच पारादीप तेलशुध्दीकरण प्रकल्प एकप्रकारे ओदिशाचा विकासदीप आहे. हा पारादीप तेलशुध्दीकरण प्रकल्प ओदिशाच्या युवकांचा भाग्यदीप आहे. भारतातील कोट्यवधी गरीब महिला, ज्या लाकडांची चूल पेटवून जेवण बनवतात, धुरामुळे मुले आजारी पडतात, स्वत: आजारी पडतात अशा गरीब मातांसाठी एक नवीन आशा जागवणारा हा पारादीप तेलशुध्दीकरण प्रकल्प आहे जिथून गॅस सिलिंडर गरीबाच्या घरापर्यंत पोहोचणार आहेत.

सरकार जेव्हा काम करते तेव्हा किती वेगाने करु शकते याचे उदाहरण तुम्ही पाहिले आहे. आपल्या देशातील अनेक प्रकल्प 40-50 वर्षांपूर्वी कुणाच्या मनात विचार येतो, 10 वर्षानंतर तो कागदावर उतरतो, योजना तयार करण्यात 5-10 वर्षे निघून जातात, मग भूमीपूजन होते आणि ते करता करता अनेक पिढ्या निघून जातात पण ते काम पूर्ण होत नाही. आजकाल मी कुठे कुठे एखाद्या प्रकल्पाचे उद्‌घाटन करायला जातेा, तेव्हा खासकरुन आमचे काँग्रेसचे मित्र लगेच विधान करतात की हा तर आमच्या काळात सुरु झाला होता. बंधू-भगिनींनो, जर माझ्या हातून एखाद्या योजनेचे उद्‌घाटन करण्याची संधी मिळाली तर मला आनंद होणे स्वाभाविक आहे. मात्र देशाचा पंतप्रधान म्हणून मला आनंद होत नाही. मला तेव्हा आनंद झाला असता जर हे काम 15 वर्षांपूर्वी पूर्ण झाले असते अणि येथील लाखो लोकांना रोजगार मिळाला असता.

आपल्याकडील प्रकल्पांना अडथळे, विलंब, कोर्ट-कचेरी, कधी निविदा प्रक्रिया, कधी जन आंदोलन अशा अनेक संकटांमधून जावे लागते आणि त्यामुळे आपल्या प्रकल्पांचा खर्च खूप वाढतो. देशाची प्रगती करण्यासाठी, देशाच्या नागरिकांनी, नोकरशहांनी, उद्योग जगताने, सामान्य नागरिकांनी, धोरणकर्त्यांनी एका अशा संस्कृतीला जन्म देण्याची गरज आहे, ज्यामध्ये प्रकल्प वेळेवर सुरु होतील, निर्धारित वेळेत पुढे जातील आणि निर्धारित वेळेत पूर्ण होतील जेणेकरुन देशाला त्याचा लाभ होईल, वेळेपूर्वी लाभ मिळेल.

बंधू-भगिनींनो, आम्ही यामध्ये कार्य संस्कृती आणण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरुन विलंब झाल्यास देशाचे गंभीर नुकसान होऊ नये. बंधू-भगिनींनो, या तेलशुध्दीकरण प्रकल्पामध्ये 78 कोटी किलो एलपीजी गॅसची निर्मिती होणार आहे. 500 कोटी लीटर पेट्रोलचे उत्पादन होणार आहे. 660 कोटी लीटर डिझेलचे उत्पादन होणार आहे. केरोसिन आणि विमान इंधन मिळून 250 कोटी लीटरचे उत्पादन होणार आहे. 27 लाख क्विंटल सल्फरचे उत्पादन होणार आहे. 120 लाख क्विंटल पेट्रोलियम कोक निर्माण होणार आहे. तुम्ही कल्पना करु शकता कि एवढ्या साऱ्या उत्पादनांमुळे देशाच्या आर्थिक विकासात किती मोठी तेजी येईल.

एक काळ होता, भारताच्या पूर्वेकडील ओदिशाच्या धरतीवर, भारताची सूर्याची किरणं इथे प्रथम पोहोचायची. आता इथून भारताला नवी ऊर्जा प्राप्त होणार आहे. हे सामर्थ्य पारादीपने दाखवले आहे. बंधू-भगिनींनो, यामुळे लाखो नवीन रोजगाराच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. यामधून जो कच्चा माल तयार होईल, त्या कच्च्या मालामुळे छोटे-छोटे प्लॅस्टिकचे अनेक उद्योग सुरु होऊ शकतात. आणि यासाठी कौशल्य विकासाचे काम सरकार करत आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून पैसे देत आहे. स्टार्ट-अप इंडिया, स्टॅन्ड-अप इंडिया यासाठी युवकांना नवीन कल्पनांच्या माध्यमातून काम करण्यासाठी सरकार सवलत देत आहे. पारादीप तेलशुध्दीकरण प्रकल्प याच्या बरोबरीने विकासाचा एक संपूर्ण प्रदीर्घ प्रवास करणार आहे जो ओदिशाचे नशीब पालटण्याचे काम करणार आहे.

बंधू-भगिनींनो, आज आपल्या देशात लाखो गरीब कुटुंब, कोट्यवधी गरीब कुटुंब आहेत ज्यांना जेवण बनवण्यासाठी लाकडाच्या चुलीचा वापर करावा लागतो आणि लाकडाची चूल पेटवल्यामुळे, वैज्ञानिकांच्या मते, जर एक तास या चुलीमुळे होणाऱ्या धूरात जर कोणी राहत असेल तर 400 सिगरेट पिण्याएवढा धूर त्याच्या शरीरात जातो. त्या गरीब माता-भगिनींच्या आरोग्याचे काय होत असेल. या गरीब मातांपर्यंत एलपीजी गॅसचा सिलिंडर पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. लाकडी चुलीपासून, धुरापासून त्यांना मुक्ती मिळावी आणि या पारादीप तेलशुध्दीकरण प्रकल्पात इतक्या मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅसचे उत्पादन होणार आहे कि त्यामुळे हे शक्य होईल.

बंधू-भगिनींनो, आपल्या देशातील शेतकऱ्यांना युरियाची गरज भासते. खतांसाठी युरिया लागते. युरियासाठी ज्या वस्तूंची गरज असते त्यापैकी एक आहे गॅस. जर पुरेशा प्रमाणात गॅस उपलब्ध असेल तर युरियाचे उत्पादन वाढेल. आपल्या देशातील शेतकऱ्याला वेळेवर युरिया मिळू शकेल. आणि म्हणूनच या पारादीप प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या काळात पूर्व भारताच्या विकासासाठी आम्हाला खतांचे कारखाने सुरु करायचे आहेत जेणेकरुन या भागातील शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात युरिया मिळेल. आपल्या देशात आगामी काळात उर्जेच्या या क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही आणखी एक योजना सांगितली आहे. ही गोष्ट खरी आहे की, तेलशुध्दीकरण प्रकल्प आवश्यक आहेत, तेलशुध्दीकरण प्रकल्प वाढायला देखील हवेत. आमचा प्रयत्न आहे कि परदेशांतून आपल्याला जे तेल आयात करावे लागत आहे ते कमी कसे करता येईल. मी सरकारी अधिकाऱ्यांची एक दिवस बैठक बोलावली. मी त्यांना म्हटले की जेव्हा देश स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करेल, 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षं पूर्ण होत ओहत. मी म्हटले की जेव्हा स्वातंत्र्याची 75 वर्षे आपण साजरी करु, तेव्हा परदेशातून आपल्याला जे तेल मागवावे लागत आहे, त्यात तुम्ही 10 टक्के घट करु शकाल का? मी त्यांच्यासमेार आव्हान ठेवले आहे. आणि मला खात्री आहे की आपल्या तेल कंपन्या, आपला पेट्रोलियम विभाग सर्व शक्ती पणाला लावून भारताला स्वयंपूर्ण बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलेल. सध्या आपण जे तेल आयात करतो, ते बहुतांश आखाती देशांमधून येते. मात्र आमचे स्वप्न आहे, आखाती देशांमधील तेल आणि झाडांपासून देखील इंधन मिळवणे. आखाती देशांमधील तेल आणि झाडांपासून मिळणारे तेल आपण एकत्र करायचे आहे. आणि म्हणूनच मी म्हटले कि आपल्या देशातील शेतकरी जो ऊसाची लागवड करतो, त्या ऊसाच्या रसापासून इथेनॉल बनू शकते. जेवढी साखरेची गरज आहे, तेवढी साखर बनवायची आणि अतिरिक्त ऊसापासून इथेनॉल बनवायचे. आणि हे इथेनॉल आपल्या पेट्रोलियम पदार्थांमध्ये मिसळायचे, त्यामुळे आपल्या गाड्या देखील वेगात धावतील आणि पर्यावरणाचे देखील संरक्षण होईल आणि देशात खूप मोठ्या प्रमाणात ऊसावर प्रक्रिया करुन इथेनॉल बनवण्यात येते, त्याचप्रकारे माझे छत्तीसगडचे आदिवासी खूप मोठ्या प्रमाणात जात्रोफाची शेती करत आहेत. आपल्या शेजारी ओदिशामध्येही जात्रोफापासून जे तेल काढले जाते, ते तेल देखील आपल्या पेट्रोलियम पदार्थांच्या गरजेसाठी उपयुक्त ठरू शकते. आपण झाडांपासून इंधन मिळवण्याच्या दिशेने देखील खूप प्रयत्न करत आहेात. तर दुसरीकडे सौर उर्जेवर भर देत आहोत जेणेकरुन भारत उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनेल. भारताने स्वत:च्या पायावर उभे रहावे, जगात कुणावर अवलंबून राहू नये. हा पारादीप तेलशुध्दीकरण प्रकल्प म्हणजे या कामाला बळकटी देण्यासाठी या सरकारने उचललेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे.

बंधू-भगिनींनो, आपल्या देशातील कोणत्याही शेतकरी कुटुंबाला विचारा, 100 एकर जमीन असेल, त्यानंतर जर शेतकऱ्याला विचारलंत की तुम्हाला तीन मुलगे आहेत, काय विचार केला आहे, मुलांना पुढे काय करायचे आहे? त्यावर शेतकरी पिता म्हणतो की एका मुलाला शेती करायला लावेन, आणि दोन मुलांना शहरात पाठवेन, ते आपली मीठ-भाकर कमावतील. तिथे एखादी नोकरी धंदा करतील. म्हणजेच शेतकरी देखील आपल्या तीन मुलांना आता शेती करायला लावू इच्छित नाहीत. शेतकरी देखील आपल्या एका मुलाला शेती देऊन दोन मुलांना अन्य कामात लावू इच्छितो. हे दुसरे काम शेतकऱ्याच्या मुलाला केव्हा मिळेल. शेतकऱ्याचा मुलगा बेरोजगार राहणार का, शेतकऱ्याचा मुलगा कर्जबाजारी बनणार का, जर आपल्या गावातील शेतकऱ्याच्या मुलाला देखील रोजगार उपलब्ध करुन द्यायचा असेल तर आपल्या देशात आपण उद्योगांना प्रोत्साहन द्यायला हवे.

जर हा पारादीप तेलशुध्दीकरण प्रकल्प झाला नसता, ही तीन हजार एकर जमीन जर या कामासाठी वापरण्यात आली नसती, तर लाखो लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या नसत्या. संपूर्ण ओदिशाचे भाग्य बदलण्यासाठी या जमिनीचा वापर झाला नसता. पारादीप तेलशुध्दीकरण प्रकल्पामुळे ही जमीन आज भारताच्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला रोजगार देण्यास कारणीभूत ठरली आहे. आणि म्हणूनच बंधू-भगिनींनो, युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढायला हव्यात. कारण भारत तरुण आहे, जगातील सर्वात तरुण देश भारत आहे.

65 टक्के लोकसंख्या 35 वर्षाखालील वयोगटातील आहे. ज्या देशात इतके तरुण आहेत, त्या देशाची स्वप्ने देखील तरुण असतात आणि त्या देशाचे विचार देखील तरुण असतात. त्या देशाचे संकल्प देखील तरुण असतात आणि देशाला पुढे नेण्यासाठी जी शक्ती लागते ती शक्ती हे तरुण आहेत ज्यामुळे भारताचे भाग्य बदलेल आणि म्हणूनच आम्ही मुद्रा योजनेच्या माध्यमातून युवकांना आपल्या पायांवर उभे राहण्यासाठी, रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या संधी द्यायला हव्यात. आपल्या देशाचा तरुण नोकरी शोधणारा बनू नये, नोकरीसाठी बिचारा इथे तिथे भटकू नये असे आम्हाला वाटते. आपल्या देशाचा तरुण रोजगार निर्माण करणारा व्हावा असे वातावरण आम्हाला हवे आहे. एकाला, दोघांना, पाच जणांना रोजगार पुरवेल अशी ताकद युवकाला मिळायला हवी आणि म्हणूनच मुद्रा योजनेद्वारे खूप मोठ्या प्रमाणात युवकांना अर्थसहाय्य पुरवण्याच्या दिशेने आम्ही पाऊल उचलले आहे.

गेल्या काही दिवसांत आम्ही अंदाजे एक लाख कोटी रुपये दिले आहेत. इतक्या कमी वेळेत देशातील सामान्य कुटुंबातील लोकांना एक लाख कोटी रुपये मुद्रा योजनेतून मिळणे ही काही छोटी गोष्ट नाही. मला आताच धर्मेंद्र सांगत होते की संपूर्ण ओदिशामध्ये गेल्या 60 वर्षात 26 लाख लोकांना गॅस सिलिंडर मिळाला. 60 वर्षात 26 लाख. धमेंद्र प्रधान, मंत्री झाल्यानंतर एका वर्षाच्या आत 11 लाख गरीब कुटुंबांना गॅस सिलिंडर एकट्या ओदिशामध्ये देण्यात आली. काम जलद गतीने कसे होऊ शकते, याचे हे उदाहरण आहे. 60 वर्षात 26 लाख, 1 वर्षात 11 लाख, असे काम केले जाते, हे काम हे सरकार करत आहे आणि म्हणूनच आमचा प्रयत्न आहे की आपल्या देशातील तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात. आतापर्यंत आपल्या देशाच्या अर्थकारणाबाबत तज्ञ मंडळी चर्चा करायची, तेव्हा दोन मुद्दे नेहमी मांडायचे. मोठे मोठे अर्थतज्ञ जे लिहितात, ते म्हणतात की एक सार्वजनिक क्षेत्र, दुसरे खासगी क्षेत्र. मी तिसऱ्या क्षेत्रावर भर देत आहे. अर्थव्यवस्थेमध्ये जर सार्वजनिक क्षेत्राचे महत्व आहे, खासगी क्षेत्राचे महत्व आहे, तर तिसऱ्या महत्वपूर्ण क्षेत्रावर देखील भर देण्याची गरज आहे. ते आहे वैयक्तिक क्षेत्र. एक-एक व्यक्ती स्वत:च्या पायावर उभे राहून पुढे जाईल आणि म्हणूनच एक-एक व्यक्तीला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणे, एक-एक कुटुंबाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणे. अशा प्रकारच्या आर्थिक धोरणांवर भर देत हे सरकार पुढे जात आहे.

बंधू-भगिनींनो, मला आपल्या वैज्ञानिकांचे, आपल्या तरुण पिढीचे आज खास अभिनंदन करायचे आहे आणि ते यासाठी की पारादीप तेलशुध्दीकरण प्रकल्पात “मेक इन इंडिया” चा एक नवीन विक्रम रचल्याबद्दल. या क्षेत्रात जगातील अनेक देश आघाडीवर आहेत, मात्र भारताच्या वैज्ञानिकांनी इंडमॅक्स प्रकल्प उभारला आणि कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञान असलेला, भारताच्या वैज्ञानिकांनी तयार केलेला, भारतात निर्माण झालेला, भारताच्या तंत्रज्ञांनी निर्माण केलेला प्रकल्प आज पारादीप मध्ये उभा राहिला आहे.

जगाला आश्चर्य वाटत आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारे, इतक्या जलद गतीने उत्पादन देणारे, इतकी अचूक प्रक्रिया करणारे, इतक्या सूक्ष्म पध्दतीने प्रत्येक घटकाचे विभाजन करणारे हे तंत्रज्ञान विकसित करुन जगातील सर्व तंत्रज्ञांना, वैमानिकांना भारताने अचंबित केले आहे आणि हे काम या पारादीप तेलशुध्दीकरण प्रकल्पात होत आहे.

संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे एलपीजीच्या उत्पादनात खूप मोठी वाढ होणार आहे. आपल्या अर्थव्यवस्थेला कमी खर्चात अधिक बळकटी देण्याचे कारण बनणार आहे. आणि म्हणूनच, बंधू-भगिनींनो, ते सर्व वैज्ञानिक, सर्व तंत्रज्ञ देखील यासाठी अभिनंदनाला पात्र आहेत. मी धर्मेंद्र प्रधान यांचे, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे, हे काम जलद गतीने 18 महिन्यांमध्ये पूर्णत्वाला नेल्याबद्दल मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो.

बंधू-भगिनींनो, हा पारादीप, एक असा दीप प्रज्वलित झाला आहे जो विकासाच्या नवीन संधी घेऊन आला आहे. शतकांपूर्वी, ओदिशा स्वर्णयुगाचा कालखंड होता आणि आता पारादीपमुळे ओदिशामध्ये पुन्हा एकदा उज्वल भविष्याची सुरुवात होणार आहे. आणि भारत सरकार या कामासाठी जितके करता येईल ते करील, कधी मागे हटणार नाही.

भारत सरकारचे संपूर्ण सहकार्य राहील कारण ओदिशाचे तरुण भारताचे भाग्य बदलणार आहेत. त्यांना संधी मिळायला हवी आणि संधी उपलब्ध करुन देण्याचे काम हे सरकार करत आहे.

माझ्या तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना,

जग जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ!

S.Kane / S.Tupe / M. Desai