Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत 3 नव्या एम्सच्या उभारणीला मान्यता


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, नागपूर (महाराष्ट्र), मंगलागिरी (आंध्र प्रदेश) आणि कल्याणी (पश्चिम बंगाल) या तीन ठिकाणी प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभारायला मान्यता देण्यात आली. यासाठी 4,949 कोटी रुपये लागणार आहेत.

महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्था म्हणून नव्या एम्स स्थापन केल्या जातील. गुणवत्तापूर्ण वैद्यक शिक्षण, परिचारिका शिक्षण आणि जनतेला आरोग्य सुविधा या ठिकाणी दिल्या जातील. प्रस्तावित संस्थांमध्ये 960 खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय असेल. या व्यतिरिक्त तिथे प्रशिक्षण विभाग, प्रशासकीय विभाग, आयुष विभाग, सभागृह, परिचारिका महाविद्यालय, रात्रनिवारा, वसतीगृह आणि निवासी सुविधा असतील.

मलकानगिरी एम्ससाठी 1,618 कोटी, नागपूर एम्ससाठी 1,577 कोटी आणि कल्याण एम्ससाठी 1,754 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

नव्या एम्सच्या उभारणीमुळे प्रादेशिक असंतुलन दूर व्हायला मदत होईल तसेच या भागातल्या नागरिकांना विश्वासार्ह आणि परवडण्याजोगी आरोग्य सुविधा उपलब्ध होईल. तसेच गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणाची सुविधा निर्माण होऊन या भागातील वैद्यक व्यावसायिकांची कमतरता दूर व्हायला मदत होईल.

विदर्भासह इतर दोन्ही ठिकाणच्या आणि लगतच्या क्षेत्रातल्या मोठ्या लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे.

प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत 6 नव्या एम्स कार्यरत झाल्या असून रायबरेली एम्सचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

पूर्वपिठीका:-

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 2014-15 च्या अर्थसंकल्पीय भाषणात या नव्या एम्सची घोषणा केली होती. त्यानुसार ही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आंध्रप्रदेश पुनर्रचना कायदा 2014 अंतर्गत देण्यात आलेल्या आश्वासनाचीही पूर्तता होणार आहे.

S. Kulkarni/S.Tupe