Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बेल्जियम, अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे वक्तव्य


बेल्जियम, अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य पुढीलप्रमाणे-

30 मार्च रोजी बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिचेल यांची भेट घेण्यासाठी मी ब्रसेल्समध्ये असेन. युरोपीयन संघ नेतृत्वाबरोबर आयोजित 13 व्या भारत-युरोपीयन संघ संमेलनातही मी सहभागी असेन.

बेल्जियमच्या जनतेचे धैर्य आणि धिरोदात्तपणा यांना सलाम करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत. ब्रसेल्सवर झालेल्या भयंकर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांच्यासोबत, खांद्याला खांदा भिडवून उभे आहोत आणि या हल्ल्यांमध्ये आपल्या प्रियजनांना गमावणाऱ्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.

बेल्जियमबरोबरच्या आमच्या नात्याची मुळे खोलवर रुजलेली आहेत आणि कसोटीच्या काळातही ती दृढ राहिली आहेत. युरोपियन संघांमधला बेल्जियम हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. युरोपीयन संघातील या महत्त्वपूर्ण सदस्य देशाबरोबर व्यापार, गुंतवणूक आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील भागिदारी वाढविणे, हा तेथील पंतप्रधानांबरोबर माझ्या भेटीमागचा मुख्य उद्देश आहे.

पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांच्याबरोबर मी भारत-बेल्जियम एरिस अर्थात आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ऑब्जझर्व्हेशनल सायन्सेस, ही दुर्बिण रिमोटच्या साहाय्याने सक्रीय करेन.

युरोपीयन संघ हा आमचा मोठा व्यापारी भागिदार असून तो भारताच्या निर्यातीचेही सर्वात मोठे केंद्र आहे. या संमेलनामुळे विविध क्षेत्रात आमची बहुआयामी भागीदारी वृद्धिंगत होईल.

ब्रसेल्समध्ये मी युरोपीयन संसदेच्या सदस्यांची, इंडोलॉजीस्टची, बेल्जियमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची तसेच बेल्जियममध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांचीही भेट घेणार आहे. बेल्जियममधील हीरे व्यापारी संघटनेच्या संचालक मंडळ सदस्यांशीही मी संवाद साधणार आहे.

त्याच संध्याकाळी मी भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या समारंभात उपस्थितांशी संवाद साधणार आहे.

बेल्जियमनंतर, 31 मार्च रोजी, चौथ्या अणु सुरक्षा संमेलनात सहभागी होण्यासाठी मी वॉशिंग्टन डी सी मध्ये दाखल होईन. त्या ठिकाणी काही देश आणि जागतिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित असतील.

“आण्विक दहशतवादामुळे अणु सुरक्षेला निर्माण झालेला धोका” या महत्त्वपूर्ण मुद्दयावर या संमेलनात प्रामुख्याने चर्चा होईल. बिगर-राज्य सदस्यांना अणु साधनांपर्यंत पोहोचता येऊ नये, याची खातरजमा करण्याबाबत तसेच जागतिक अणु सुरक्षा संरचनेच्या सुदृढीकरणासाठीच्या उपाययोजना आणि मार्गांबाबत, सहभागी नेते चर्चा करतील.

या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सहभागी देशांशी द्विपक्षीय सहकार्य वृद्धींगत करण्यासंदर्भात मी जागतिक नेत्यांची भेट घेणार आहे.

LIGO प्रकल्पाशी संबंधित वैज्ञानिकांशीही मी संवाद साधणार आहे.

राजे सलमान बीन अब्दुलजीज अल सौद यांच्या निमंत्रणानुसार 2 आणि 3 एप्रिल रोजी मी सौदी अरेबियाला भेट देणार आहे.

सौदी अरेबियासोबतचे भारताचे संबंध विशेष आहेत. दोन्ही देशांतील नागरिकांच्या परस्पर संबंधांनी हे नातेसंबंध दृढ केले आहेत. द्विपक्षीय नातेसंबंधांचा विस्तार आणि दृढीकरण करण्यासाठी सौदी नेतृत्वाबरोबर काम करावे, असा माझा विचार आहे. प्रादेशिक स्थितीबाबतच्या चर्चेचा मुद्दाही विचाराधीन आहे.

आमचे आर्थिक बंधही विस्तारत आहेत. सौदी अरेबिया हा भारताचा चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापार भागिदार आहे आणि भारताचा सर्वात मोठा कच्चे तेल निर्यातदारही आहे.

राजे सलमान बीन अब्दुलजीज अल सौद यांच्यासोबत आयोजित बैठकीबरोबरच राजघराण्यातील इतर महत्त्वपूर्ण सदस्यांशी होणारा संवादही महत्त्वाचा आहे.

भारताच्या विकसित होणाऱ्या प्राधान्यक्रमांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण सौदी उद्योगांशी आम्हाला भागिदारी हवी आहे. रियाध येथे आयोजित उद्योगविषयक कार्यक्रमाचाही तोच मुख्य हेतू आहे.

मी मासमाक किल्ला, एल ॲण्ड टी कामगारांचे निवासी संकुल तसेच रियाध येथील टीसीएस ऑल वूमेन आयटी आणि आयटीईस केंद्रालाही भेट देणार आहे.

M.Pange / S.Tupe / M. Desai