Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीर प्रश्नावर संसदेमध्ये केलेले निवेदन. दि. 12 ऑगस्ट 2016.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीर प्रश्नावर संसदेमध्ये केलेले निवेदन. दि. 12 ऑगस्ट 2016.


सर्व सहकाऱ्यांनी एका स्वरामध्ये आणि एकच भावना व्यक्त केली, ही खूप मोठी, महत्वाची, आनंदाची गोष्ट आहे.

आज, ज्यावेळी आपण जम्मू-काश्मीरविषयी बोलतो, त्यावेळी आपल्याला जम्मू-काश्मीर राज्याच्या चार भागांविषयी बोलले पाहिजे: जम्मू, काश्मीर खोरे, लद्दाख आणि पाक-व्याप्त काश्मीर.

मी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आभारी आहे, त्यांनी जम्मू आणि काश्मीर राज्यातील सद्यस्थितीबद्दल आपल्याला वाटणारी चिंता व्यक्त केली आहे. लोकशाहीद्वारे गेल्या सहा दशकांपासून पोषित असलेल्या समृद्ध परंपरेमुळे आपल्या देशाची एकता आणि अखंडता हीच सर्वात मोठी ताकद आहे. काही मुद्यांबाबत आपल्यामध्ये थोडे मतभेद होऊ शकतात परंतु ज्यावेळी देशाची अखंडता आणि संपूर्णता यांचा विषय उपस्थित होतो, त्यावेळी आपण एकजूट होत असतो.

जम्मू आणि काश्मीरमध्ये अलिकडेच घडलेल्या घटनांमुळे प्रत्येक भारतीयाप्रमाणे माझ्याही हृदयाला खूप खोलवर वेदना झाल्या आहेत. हे पाहून मला खूप दुःख होतय की, मुले आपला अभ्यास करू शकत नाहीत, सफरचंदाचं आलेलं पीक बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकत नाही, दुकानदारांचा रोजचा व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यांना उत्पन्न मिळत नाहीए आणि सरकारी कार्यालये लोकहिताची कामे करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत सर्वात जास्त प्रभाव समाजातील गरीब घटकावर होतो.

आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांचे अस्तित्व लोकांमुळेच तर असतं. ते आमची ताकद आहेत, ऊर्जेचा स्रोत आहेत; वास्तविक जनतेची शक्ती आमच्या सार्वजनिक जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. कोणीही मारले गेले, मग तो नागरिक असो अथवा सुरक्षा दलाचा जवान, दुःख आपल्या सगळयांनाच होतं असतं. त्यांच्या कुटुंबियांविषयी मला सहानुभूती आहे. जखमी झालेल्या लोकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत आणि त्याचबरोबर खोऱ्यांमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करू इच्छित आहोत, जेणेकरून इथल्या लोकांना सुरळीत जीवन जगता येईल, आपली दैनंदिन रोजगार मिळेल, कमाई मिळेल, ते आपल्या मुलांना शिकवू शकतील आणि रात्रीच्यावेळी स्वस्थपणे झोपू शकतील.

आपण काश्मीरच्या प्रश्नावर घटनेच्या मूलभूत सिध्दातानुरूप कायमस्वरूपी आणि शांतीपूर्ण उपाय करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही मुक्त विचार करणारे म्हणजेच सर्वांच्या विचारांचे स्वागत करणारे आणि आमचे दरवाजे नेहमीच मुक्त आहेत. आम्ही संपूर्ण जम्मू आणि काश्मीर राज्याच्या प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहोत. या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी आम्ही श्री. अटल बिहारी वाजपेयीजी यांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करत आहोत.

जम्मू आणि काश्मीर म्हणजे भारताचा ‘मुकूट’ असं बऱ्याचदा म्हटलं जातं. वास्तविक जम्मू आणि काश्मीर राज्य म्हणजे सर्व पंथ समभावचं, प्राचीन परंपरेचे प्रतीक आहे. इथे हिंदू, शीख, बौद्ध आणि मुसलमान वर्षानुवर्षे एकत्रित वास्तव्य करत आहेत. आमच्यामध्ये विविधता असूनही आम्ही सगळे ‘भारतीय’म्हणून एकच आहोत, या विश्वासाचे प्रतीक आमच्या पूर्वजांच्या काळापासून जम्मू अणि काश्मीर राज्याच्या रूपाने आपल्यासमोर आहे. जम्मू आणि काश्मीर केवळ आमचा भौगोलिक अखंडतेचा मुद्दा नाही. तर आमच्या राष्ट्रीयतेची व्याख्या आहे. सुरक्षा दलाने अनेक प्रकारे त्रास सहन केला आहे. त्यांच्यावर सुनियोजित हल्लेही झाले, इतके होवूनही सुरक्षा दलांनी अतिशय संयम दाखवला आहे. मोठ्या संख्येने सुरक्षा दलांचे जवान जखमी झाल्याच्या नोंदी आहेत. आम्ही ही वस्तुस्थिती नाकारू शकत नाही.

काही असामाजिक घटकांनी अपप्रचार केला असला तरीही काश्मिरात दिशाभूल करून अशांती निर्माण करणाऱ्यांची आणि युवकांना चिथावणाऱ्यांची टक्केवारी खूपच कमी आहे. प्रत्येक काश्मिरीला शांतता आाणि स्वस्थता हवी आहे. आणि त्यांचा लोकशाहीवर विश्वासही आहे. म्हणूनच, पाठोपाठ झालेल्या निवडणुकांनंतर, निवडणुकांमध्ये काही फुटीरतावादी घटकांनी धमक्या दिलेल्या असतानाही काश्मिरातील जनतेने लोकशाहीतील या प्रत्येक पवित्र पर्वाच्यावेळी भारताच्या लोकशाही व्यवस्थेवर आपला विश्वास, आस्था व्यक्त केली. एवढंच नाही तर सध्या तिथं असलेल्या अशांत स्थितीच्या आधी काही दिवसच मुख्यमंत्री महबूबाजी यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. यावरूनच लक्षात येतं की, काही घटकांकडून दिशाभूल केली जात आहे.

काही भागामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी काही प्रतिबंध लावण्यात आले आहेत. कायदा व्यवस्था राखण्यासाठी हा कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे. नाहीतर शांतीप्रिय समाजाच्या जनजीवनावर प्रतिकूल प्रभाव पडू शकतो. वास्तविक, सर्वसामान्य नागरिकांना या प्रतिबंधामुळे फार त्रास होत नाही. मात्र फुटीरतावादी गटांनी सातत्याने पुकारलेल्या बंदमुळेच त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

या काळात अमरनाथ यात्रेचे आयोजन यशस्वीपणे होत आहे. त्याचबरोबर लद्दाखमध्ये सौरऊर्जेवरही राज्य सरकार विशेष योजना करत आहे. एनईईटी, सीईटी, तसेच यूपीएससी या प्रशासकीय सेवा परीक्षांचे संचालन अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं गेलं आहे. इतकचं नाही तर सगळया आवश्यक त्या वस्तू सामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आगामी काळ पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा आहे. त्याचबरोबर सफरचंदाचा हंगाम आहे. सफरचंदाचे पीक सर्वसामान्य काश्मिरी जनतेच्या उत्पन्नाचे महत्वाचे साधन आहे. काही फुटीरतावादी घटक या वेळेचा फायदा उठवून काश्मिरातील शांती आणि शांतताप्रिय जनतेला विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

काश्मीरमधील अशांततेचे मूळ सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादामध्ये आहे. या दहशतवादाला प्रामुख्याने शेजारी देशाकडून प्रोत्साहन मिळत आहे. या दहशतवादामुळे काश्मीरमध्ये जनजीवन विस्कळीत आहे. ज्यावेळेपासून काश्मीरमध्ये दहशतवादाला 1989 -1990 प्रारंभ झाला आहे, त्यावेळेपासून आत्तापर्यंत सुरक्षा दलाच्या कार्यवाहीमध्ये —

$ 34 हजारांपेक्षा जास्त एके 47 रायफल जप्त केल्या.

$ पाच हजारापेक्षा जास्त हातबॉम्ब प्रक्षेपक जप्त केले.

$ जवळपास 90 लाइट मशीन गन्स जप्त केल्या.

$ 12 हजारांपेक्षा जास्त पिस्तूल आणि रिवॉल्व्हर जप्त केले.

$ तीन अँटीटँक आणि 4 अँटी एअर क्राफ्ट जप्त केले.

$ 350 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र प्रक्षेपक सापडले.

$ आर.डी.एक्स.सहीत 63 हजार किलो स्फोटके, एक लाखापेक्षाही जास्त हातबॉम्ब आदि जप्त केले आहेत.

या काळात पाच हजारांपेक्षा जास्त परदेशी दहशतवादी मारले गेले. ही संख्या पाच बटालियन इतकी आहे.

इतका शस्त्रसाठी जप्त झाला. इतके विदेशी दहशतवादी खोऱ्यात हिंसाचार करण्यासाठी आले. तरीही पाकिस्तान खोटे बोलत राहिले. संपूर्ण जग कधीच त्याच्या खोट्या प्रचाराचा स्वीकार करणार नाही.

आपल्याच देशातल्या नागरिकांवर लढावू विमानानं बॉम्बचा वर्षाव करत आहे, याचे विस्मरण पाकिस्तानला होत आहे. आता मात्र वेळ आली आहे. पाकिस्तानला संपूर्ण जगासमोर बलूचिस्तानमध्ये आणि पाक-व्याप्त काश्मीरच्या लोकांवर होणारे अत्याचारांचे उत्तर द्यावे लागणार आहे.

आम्ही लोकांच्या मूलभूत अधिकारांबाबत पूर्णतः कटिबद्ध आहोत. दहशतवादाविरूद्धही आमचे कायदे जितके मानवतापूर्ण आहेत, तेवढे संपूर्ण विश्वात आणि इतर कोणत्याही लोकशाहीमध्ये नाहीत. आमच्या सरकारांनी आणि आमच्या सुरक्षा दलांनी या घटनांशी दोन हात करताना कमालीचा संयम दाखवला आहे.

भारत, दहशतवादाचा सामना संपूर्ण शक्ती आणि संकल्पानिशी करेल. ही आमची राष्ट्रीय जबाबदारी आहे. भारत, कायद्याचे नियम पाळण्यास बांधिल आहे. मात्र याला भारताची दुर्बलता समजणे म्हणजे विरोधी शक्तींची मोठीच चूक ठरेल. भारत दहशतवाद समाप्त करण्यासाठी संकल्प-बद्ध आहे. आमच्यासाठी ‘मिन्स अँड एंडस्’ म्हणजेच ‘साधन आणि साध्य’ दोन्हीही महत्वपूर्ण आहे. आणि या दोन्हींच्या अंमलबजावणीसाठी आम्ही सक्षम आहोत.

एक वास्तव म्हणजे काश्मीर खोऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना काश्मीर खोऱ्यातील आपल्या पूर्वजांच्या घरातून विस्थापित केलं गेलं. एखाद्या विशिष्ट समुदायाच्याविरोधात अशा प्रकारे केलेली जबरदस्ती आणि अन्याय हा पाकिस्तानात प्रशिक्षित झालेले, पाकिस्तानव्दारे हत्यारे पुरवलेल्या दहशतवाद्यांनी आणि त्यांना मदत करणाऱ्यांनी केलेला हा प्रकार आहे. काश्मिरी भावनेवर विश्वास ठेवणारे असे कृत्य कदापि करणार नाहीत.

जम्मू आणि काश्मीरच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या काही दिवसांतच राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार 80 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचे एक विकासाचे ‘पॅकेज’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या पॅकेजअंतर्गत फक्त रस्ते, विद्युत पुरवठा आणि व्यवसायाचे प्रकल्प आहेत असे नाही. तर जम्मू आणि काश्मीरच्या प्रत्येक क्षेत्राचा आणि राज्यातल्या प्रत्येक वर्गाच्या संपूर्ण विकासाकडे लक्ष देण्यात आले आहे. मुलांना शिक्षणाची चांगली सुविधा, युवकांना रोजगार, आधुनिक वैद्यकीय सुविधा, राज्यामध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुविधा, राज्यामध्ये फळांच्या उत्पादनासाठी विशेष सुविधा; या गोष्टींचा पॅकेजमध्ये समावेश आहे.

रोजगाराच्या संधी ताबडतोब उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. यामध्ये दहा हजार ‘विशेष पोलीस अधिकारी’(एसपीओ), जवळपास बाराशे निमलष्करी आणि पाच आय आर बटालियनमध्ये मिळून जवळपास चार हजार पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. या व्यतिरिक्त ‘उडान’ आणि ‘हिमायत’ योजनांमध्ये जवळपास 1लाख 25 हजार लोकांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे, यामुळे बेरोजगोरांना योग्य, चांगला रोजगार मिळू शकणार आहे.

श्रीमती महबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील पीडीपी आणि बीजेपीचे सरकार राज्याच्या समस्या दूर करण्यासाठी चांगला प्रयत्न करत आहे. सरकारने गेल्या एक महिन्यामध्ये, स्थिती तितकीशी चांगली नसतानाही उद्‌भवलेली परिस्थिती अतिशय काळजीपूर्वक हाताळली आहे. संपूर्ण देश आज त्यांच्या पाठीशी उभा आहे.

मी पुन्हा एकदा ही गोष्ट सांगू इच्छितो की, केंद्र आणि राज्य सरकार लोकांच्या सर्व योग्य तक्रारी दूर करण्यासाठी आणि प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध आहे. हिंसा, दहशतवाद आणि भारतविरोधी अन्य कारवाया सक्तीने निपटून काढल्या जातील. प्रत्येक व्यक्तिच्या योग्य तक्रारी ऐकून घेतल्या जातील आणि त्यांच्या अडचणी दूर केल्या जातील.

मी, या गोष्टीवर पुन्हा भर देऊ इच्छितो की, दहशतवाद आणि विध्वंसाचे उत्तर आपण सर्व राजकीय पक्षांनी आणि देशवासियांनी मिळून द्यावे लागेल. आज ज्यावेळी दहशतवाद संपूर्ण जगभरात वाढतोय, अशावेळी आपण शेजारी राष्ट्राकडून घेरले गेलो आहोत. आपल्याला ही लढाई एकजूट होऊन लढली पाहिजे. याविषयी सर्व राजकीय पक्षांनी रचनात्मक सहकार्य करावे, अशी अपेक्षा सरकारची आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपले मतभेद विसरून राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. माझा पूर्ण विश्वास आहे की, राज्य सरकारने सातत्याने, मनापासून केलेल्या कार्यामुळे आणि आपल्या सर्वांच्या पूर्ण सहकार्यामुळे आपण लवकरच जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा जनजीवन सामान्य करू शकणार आहेत.

काश्मीरमध्ये आत्तापर्यंत आम्ही उचलेली प्रमुख पावले आणि आमचे जे धोरण आहे, त्याचा इथे पुनरूच्चार करू इच्छितोः

1. कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षा कायम ठेवणे, कोणत्याही सरकारची जबाबदारी असते. दहशतवादी कारवायांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

2. आजच्या युगात लोकशाही परंपरेला अनुकूल अशा, नागरी समाजाशी आणि नागरिकांच्या व्यवहाराशी सांगड घालत प्रोत्साहन देण्यात येणार.

3. लोकशाही परंपरेला अनुकूल अशा राजकीय प्रक्रियेला आदराने प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करणार.

4. काश्मीरच्या नवयुवकांनाही राज्याच्या आर्थिक कार्यक्रमांमध्ये समाविष्ट करून घेण्याच्या प्रक्रियेला वेग आणणार.

5. ज्या राज्यांमध्ये जम्मू- काश्मीरचे लोक वास्तव्य करीत आहेत, मग ते हिंदू असो, मुसलमान असो, अथवा बौद्ध असो अथवा इतर कोणत्याही धर्माचे असो; त्या राज्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे. आणि जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांशी त्यांनी संपर्क साधावा यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपली आणि भारताच्या इतर प्रदेशांची होणाऱ्या प्रगतीची माहिती पोहोचवली पाहिजे.

6. परराष्ट्र मंत्रालयाने पाकव्याप्त काश्मिरातील रहिवासी जे जगभरात वेगवेगळया देशांमध्ये वास्तव्य करीत आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून आणि त्यांच्याकडून पाकव्याप्त काश्मिरातील दयनीय अवस्थेची माहिती घ्यावी आणि जागतिक संघटनांना त्याची माहिती द्यावी.

या बैठकीमध्ये आपण महत्वपूर्ण सूचना आणि विचार मांडल्याबद्दल मी, आपणा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. सरकारला मदत केल्याबद्दल मी, आपल्या सगळयांना धन्यवाद देतो. भारताच्या भौगोलिक अखंडतेविषयी कदापि तडजोड केली जाऊ शकत नाही, या राष्ट्रीय भावनेविषयी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत. घटनेच्या चैकटीत राहून आम्ही सर्व वर्गांच्या तक्रारी दूर करण्यासाठी सिद्ध आहोत.

धन्यवाद !

BG/SB/AK