पीएम्इंडिया
व्यासपीठावरील सर्व मान्यवर व विशाल संख्येने जमलेल्या माझ्या बंधु आणि भगिनिंनो,
आज 11 ऑक्टोबर, जयप्रकाश नारायणजी यांची जयंती आणि सुदैवाने मला आज जयप्रकाश नारायणजी यांच्या जयंतीदिनी मुंबईत बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमीपूजन करण्याचे भाग्य लाभले. हा सुयोग यासाठी आहे की, भारतीय संविधानाचे जन्मदाते बाबासाहेब आंबेडकर आणि भारताच्या संविधानाच्या दुरुपयोग करुन, देशाच्या लोकशाहीला धोका निर्माण करण्याचे पाप ज्यावेळी या देशात झाले तेंव्हा संविधानाचा आत्मा जिवंत ठेवण्यासाठी, संविधान भावना वाचवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला लोकशाहीमार्गाने अधिकार दिले होते ते परत मिळवण्यासाठी जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणी विरोधात लढा दिला आणि देश आणीबाणीपासून मुक्त झाला. आणि त्या अर्थाने मी हा सुयोग अतिशय महत्त्वाचा असल्याचे मानतो.
आज या ठिकाणी काही योजनांचा शुभारंभ करण्याची संधी मला मिळाली आहे. जगातील कोणताही समृद्ध देश पाहा, एक बाब लक्षात येते ती म्हणजे त्या देशाचा बंदर विभाग अतिशय सक्रिय असतो. समुद्रकिनाऱ्यावरील देश असेल आणि त्या देशाचा बंदर विभाग सक्रिय असेल. तुम्ही पाहिले असेल की त्या देशाची अर्थव्यवस्था आणि बंदरांची सक्रियता हातात हात घालून चालते. भारतालाही जगाच्या आर्थिक विश्वात आपले स्थान निर्माण करण्यासाठी आपला बंदर विभाग अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे, त्याचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे, त्याचा विकास करण्याची आवश्यकता आहे, आधुनिकीकरणाची आवश्यकता आहे. मी आज अभिमानाने सांगतो की आमच्या नितीनजींनी पंधरा महिन्याच्या अल्पकाळात जी कामे मागच्या दहा वर्षात झाली नव्हती, अशा अनेक कामांबाबत पुढाकार घेऊन बंदर विभागाला नवीन ताकद दिली आहे, नवी ऊर्जा दिली आहे आणि नवी गती दिली आहे.
परकीय थेट गुंतवणुकीची चर्चा होत आहे. मी पाहत आहे की, सिंगापूरसोबतच्या आठ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे मुंबई व पूर्ण देशाला बंदर विभागाची एक अशी भेट मिळणार आहे ज्यामुळे या भागातील लोकांना केवळ रोजगारच मिळेल असे नाही तर जागतिक व्यापारात आमची प्रतिष्ठा वाढेल. मेक इन इंडियाबद्दल मी जेंव्हा बोलतो तेंव्हा जे लोक या देशात उत्पादननिर्मितीसाठी येतील त्यांना जगभरात आपले उत्पादन पोहचवण्यासाठी चांगल्या बंदरांची आवश्यकता भासेल. आम्ही ज्या वेगाने काम करत आहोत त्यामुळे मेक इन इंडिया अंतर्गत जेंव्हा देशात उत्पादन परंपरा निर्माण होईल आणि उत्पादने जागतिक बाजारात पोहचतील तेंव्हा आमचा बंदर विकास मागे असता कामा नये आणि त्यासाठी एकीकडे मेक इन इंडिया आणि दुसऱ्या बाजूला जागतिक व्यापारात आपले स्थान निर्माण करण्यासाठी आमच्या बंदर विभागाला अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशात बंदरांचा विकास करण्याचा कमी-अधिक प्रमाणात बऱ्याच जणांनी विचार केला आहे. परंतु, आज फक्त बंदर विकास एवढ्यानेच काम भागणार नाही. आज आवश्यकता आहे ती बंदराभिमुख विकास आणि बंदराभिमुख विकासाच्या आधारावर आमच्या बंदरांसोबत जास्तीत जास्त पायाभूत सुविधांची जोडणी झाली पाहिजे, रस्ते असतील, विमानतळ असतील, शीतगृहांचे जाळे असेल, गोदामांचे जाळे असेल या कामासाठी आम्ही देशातील सर्व समुद्रकिनारे जोडणारा सागरमाला प्रकल्प पुढे नेत आहोत. अटल बिहारी वाजपेयींनी या सागरमाला प्रकल्पाची सुरूवात केली होती. पण, ते सरकार गेले, त्यानंतर जे सरकार आले त्यांच्या प्राथमिकता वेगळ्या होत्या म्हणून हा विचार तिथेच थांबला. आमचे सरकार आल्यानंतर अटलजींच्या या विचारांना मूर्त रुप देण्याचा प्रयत्न आहे जो सागरी राज्ये आहेत, त्यांच्या भागीदारीने, कारण आम्ही सहकार्य, स्पर्धात्मक संघराज्यप्रणालीवर जोर देत आहोत. समुद्रकिनारा असलेल्या राज्यांचे सहकार्य असेल, समुद्रकिनारा असलेल्या राज्यांमध्ये स्पर्धा झाली पाहिजे, कोणी चांगले बंदर विकसित केले आहे, कोण बंदरविकास कामात आघाडीवर आहे. केंद्र सरकार व राज्य मिळून बंदरांचा विकास कसा करता येईल, यादृष्टीने आम्ही काम करत आहोत आणि आज ज्या कामाचे भूमीपूजन झाले आहे, आमची ताकद एकाच जागी मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यामुळे अतिरिक्त खर्च होतो तो कमी होईल, नफ्याचे प्रमाण वाढेल, विस्ताराची संधीही मिळेल. मजूरांना चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी सुविधा पुरवण्यात येतील. गरीबांच्या भल्यासाठी विकासाचा हा मार्ग प्रशस्त करण्याच्या दिशेने आज नितीनजींच्या नेतृत्वात आम्ही पोहचत आहोत, आम्ही जगात आपले स्थान निर्माण करत आहोत.
भारत इराणमध्ये छब्बर बंदर विकासकामात भागीदारी करत आहे. कारण आम्ही जाणतो की, आगामी काळात दोन क्षेत्रांचा प्रभाव असणार आहे- एक म्हणजे सागरी आणि दुसरा अंतराळ तंत्रज्ञानाचा. 21 व्या शतकात ही दोन क्षेत्रे फार प्रभावशाली असणार आहेत. यामुळे अंतराळ असो वा समुद्र असो भारत काळासोबत वेगाने आगेकूच करु इच्छितो.
आमच्या नितीनजींजवळ रस्तेही आहेत. महाराष्ट्राने त्यांचे काम पूर्वीही पाहिले आहे. त्यांचा गतीवर विश्वास आहे. मागच्या काळातील सरकारे प्रतिदिन किती किलोमीटर रस्ते तयार करत असत, आज मी या बाबींवर चर्चा करणार नाही. या विषयात ज्यांना रस आहे, जे जाणकार आहेत त्यांनी शोधून काढले पाहिजे की आम्ही प्रतिदिन किती किलोमीटर रस्ते निर्माण करत आहोत. आज मी मोठ्या अभिमानाने आणि आनंदाने सांगतो की, नितीनजींनी ज्याप्रकारे वेग प्राप्त केला आहे, त्यानूसार आज प्रतिदिन सरासरी 15 किलोमीटर या वेगाने रस्ते निर्माण होत आहेत. या वेगाला आणखी चालना देण्याची गरज आहे कारण विकासासाठी पायाभूत सुविधांवर जोर देण्याची फार आवश्यकता आहे. जेंव्हा रस्ते तयार होतात, असं नाही की पैसे आहेत म्हणून रस्ते तयार होत आहेत. जेंव्हा रस्ते तयार होतात, तेंव्हा पैसा येणे सुरू होते. ही रस्त्यांची ताकद आहे.
मी श्री देवेंद्रजींना शुभेच्छा देतो. कारण आपल्या देशात कमीत कमी एक मेट्रो रेल्वेचे काम करायचे असेल तर त्यासाठीच्या विकास आराखड्यासाठी दीड ते दोन वर्ष लागतात. परंतु, त्यांनी चार महिन्याच्या आतच विकास आराखडा तयार केला. ज्यांना या क्षेत्राविषयी ज्ञान आहे, त्यांच्या लक्षात येईल की चार महिन्यांत एवढे मोठे काम कागदावर उतरवणे, हे आमच्या देशाच्या स्वभावातच नाही, आमच्या व्यवस्थेतच नाही. आणि याविषयी कोणालाही वाईट वाटत नाही. सर्वांना वाटते, होय एवढा वेळ तर लागणारच. परंतु, या सर्व सवयींना मूठमाती देत देवेंद्रजींनी ज्या वेगाने मेट्रोच्या या कामावर जोर दिला आहे, ही बदलत्या शहरी जीवनाची अपरिहार्यता आहे. जर आम्ही पर्यावरणपूरक विकासाचा विचार करतो तर सार्वजनिक वाहतूक यातील फार मोठा घटक आहे. ज्याप्रकारे आमची शहरे विस्तारत आहेत, या वाढलेल्या शहरांकडे लोक कधीच संकटरुपाने पाहत नाहीत. वाढलेल्या शहरांना मी संधीच्या रुपात पाहतो. नागरी विकास हे ओझे नाही, तर ही संधी आहे. म्हणून आमच्या सर्व योजना ही संधी लक्षात ठेवून राबवल्या पाहिजेत.
आज देशातील 50 शहरांमध्ये मेट्रोचे जाळे निर्माण करण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करत आहोत. आम्ही रेल्वेत 100 टक्के थेट परकीय गुंतवणूकीचे दरवाजे खुले केले आहेत आणि त्याचे फलित असे की, आज देशभरातून, जगभरातून लोक भारतात रेल्वेक्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी तयार होत आहेत. सुमारे 400 स्थानके शहरांच्या अगदी मध्यवर्ती जागी आहेत, मोठ्या प्रमाणात जमीन आहे, पण त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मशिवाय काहीही नाही. तिकीट खिडकी आहे, विश्रामगृह आहे, प्लॅटफॉर्म आहे. ही स्थानके बहुमजली स्थानके होऊ शकत नाहीत का? अत्याधुनिक असे 100 मजली रेल्वे स्थानक होऊ शकत नाही का? शहराच्या मध्यवर्ती भागातील जमीन किती मौल्यवान आहे, पण या जमिनीचा काहीही उपयोग होत नाही. आम्ही निर्णय घेतला आहे, जी 400 रेल्वेस्थानके शहराच्या मध्यवर्ती आहेत, त्याठिकाणी अनेकप्रकारची विकासकामे करणार. खालून रेल्वे जाईल, वरच्या भागात विकासकामे होतील. या दिशेने आम्ही काम करत आहोत.
हे जे मेट्रोचं काम आहे, त्यासाठी हजारो कोटींचा खर्च येतो, पण लोकांसाठी सुविधा निर्माण होते. आज तर तंत्रज्ञान आहे, दररोज आधुनिक तंत्रज्ञान मिळत आहे. त्यामुळे वेग वाढवण्याचीही संधीही मिळत आहे आणि मी या कामासाठी श्री देवेंद्रजींना शुभेच्छा देतो.
आमच्या सुरेश प्रभूंनी रेल्वेचे खरोखरच उत्तम काम करुन दाखवले आहे. पूर्वी रेल्वेचा विस्तार, रुळांचे रुपांतर, डिझेल इंजिनचे रुपांतर विद्युत इंजिनात होणे असे होते. या सर्व बाबींमध्ये एक उदासिनता होती. आज वेग आहे आणि त्याचे निकालही दिसून येत आहेत. आगामी काळात, आणि मी जेंव्हा रेल्वेबाबत बोलतो, तेंव्हा मला बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण होते. बाबासाहेब आंबेडकरांनी रेल्वे जाळ्याचे सामाजिक मूल्यांकन केले आणि म्हटले होते की, समाजात जी स्पृश्य-अस्पृश्यता, उच्च-नीच भावना आहे, एकमेकांपासून अंतर राखण्याचा जो स्वभाव आहे, त्याला तोडण्याचे काम रेल्वे करील, असे बाबासाहेब आंबेडकरांनी रेल्वेचे मूल्यमापन केले होते.
मला वाटते की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, ज्यात बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक एकतेची संधी आहे, असे वाटत होते, त्यालाही चरितार्थाचे साधन बनवू शकतो. मला खासकरुन देवेंद्रजींचे या कामासाठीही अभिनंदन करावयाचे आहे.
आमच्या देशात शेतकऱ्यांसाठी सिंचनाची जी व्यवस्था झाली पाहिजे होती, ती झाली नाही. शेतकरी पावसावर अवलंबून आहे. जर पाऊस झाला नाही बिचारा शेतकरी नष्ट होतो आणि दुष्काळ त्याच्यासाठी काळ बनून येतो जो शेतकऱ्याचे जगणे अवघड करून टाकतो. दुष्काळाप्रती संवेदना व्यक्त करणे, शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करणे, किंवा दिल्लीला जाऊन केंद्र सरकारजवळ मागणी करणे, वा या मुद्याचे राजकारण करणे, या सर्वांतून बाहेर पडून देवेंद्रजींनी या समस्यांवर उपाय शोधण्याचे काम केले आहे ते अभिनंदनीय आहे. आज ते मला सांगत होते की, सुमारे 6200 गावांमध्ये जलसिंचनाचे एक लाखापेक्षाही जास्त छोटे-छोटे प्रकल्प तयार केले आहेत आणि त्यामुळे पाणीसाठा निर्माण झाला आहे. पाण्याची पातळी वाढली आहे आणि त्या परिसरातील शेतकरी रब्बीचे पीक घेतील अशी परिस्थिती आता आहे. यासाठी खर्चही फार आला नाही. मला सांगण्यात आले की 1400 कोटी रुपयांमध्ये एवढे मोठे काम झाले आहे, आणि यातील गंमत अशी की, यापैकी 300 कोटी रुपये लोकसहभागातून उभे राहिले आहेत. मी त्या लोकसहभागात सहभागी गावच्या लोकांचे लाख-लाख अभिनंदन करतो. तुम्ही देशाला एक दिशा दाखवली.
जलसिंचन, संकटांचा सामना करण्यासाठीचे सर्वात मोठे शस्त्र आहे. मी गुजरातमध्ये होतो, त्याठिकाणी तर वाळवंट आहे, पावसाळा फार कमी आहे. मग जलसिंचनाची चळवळ राबवली. आम्ही दहा वर्षे सतत ही चळवळ चालवली. लाखो छोटी-छोटी धरणं बांधली, यामुळे आमच्या शेतकऱ्याला संकटांतून वाचण्याची शक्ती मिळाली. मी आणखी दोन गोष्टी सुचवेन. देवेंद्रजी काही नवीन विचार करण्यासही सुरुवात करावी. एक तर आमच्याकडे अल्पभूधारक शेतकरी आहे, मोठ मोठे शेतकरी नाहीत. छोटे शेतकरी आहेत, मात्र जमिनीच्या विभाजनासाठी दोन्ही शेतांच्या मध्ये मोठा बांध घालतात. एक मीटर जमीन त्याची वाया जाते आणि एक मीटर जमीन बाजूच्या शेतकऱ्याची वाया जाते. अशाप्रकारे लाखो एकर जमीन बांध घालण्यासाठी वाया जाते. अशाठिकाणी जिथे बांध घातले आहेत, त्याठिकाणी झाडे लावून, त्याठिकाणी लाकूड उत्पादनावर जोर देता येतो. शेतकऱ्याला जेंव्हा 15 वर्ष, 20 वर्षानंतर जेंव्हा झाडे मोठी होतील, तेंव्हा त्याला दरवर्षी एक झाड तोडण्याची परवानगी दिली तर त्याला दोन-पाच लाख रुपये लाकडापासून सहज मिळतील. त्याला कधी इकडे-तिकडे पाहायची गरज पडणार नाही, फक्त आपल्या शेताच्या बांधावर, सीमेवर लक्ष दिले तर हे साध्य होईल. दुसरा उपाय म्हणजे, दोन शेजारी शेतकऱ्यांनी मिळून जर सौर पॅनेल लावले तर वीज निर्माण होईल. सरकार ही वीज खरेदी करेल. शेतकऱ्याचे शेतकामही होईल, शेतात वीज येईल, जी शेतकऱ्यांच्या उपयोगी पडेल. आणखी एक काम आहे, ज्यावर आमच्या महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भात लक्ष देण्याची आवश्यकता आहे, ते म्हणजे मधमाशा पालन व्यवसाय. शेतकऱ्यांना शेतातच प्रशिक्षण दिले पाहिजे. आज मधासाठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध आहे. मध खराब होत नाही. कितीही वर्ष ठेवला तरी खराब होत नाही. शेतकऱ्यांना अतिरिक्त कमाईसाठी आम्ही त्याला प्रेरित केले पाहिजे. याच प्रकारे सेंद्रीय शेती. शहरांजवळ गांडूळ पालन, महिलांचे गट तयार करुन छोटे-छोटे खड्डे करुन शहरातील कचरा त्यात टाकला जाईल, गांडूळ पालन करा, व्हर्मी कंपोस्ट सेंद्रीय खत निर्माण करतात, शेतकऱ्याची जमीन जी रासायनिक खतांमुळे आणि औषध फवारणीमुळे नापीक होते, तिला वाचवता येईल. आम्ही अनेक उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत करु शकतो. मी पाहत आहे की, देवेंद्रजी ज्याप्रकारे संशोधक वृत्तीने, कर्मशील व्यक्तीच्या रुपाने या सर्व बाबींचा पुढाकार घेऊन काम करत आहेत, आगामी काळात महाराष्ट्रातील कृषी व्यवस्थेत अमुलाग्र परिवर्तन घडवून देशाला एक नवी दिशा देतील, असा मला विश्वास आहे. या कामांसाठी मी त्यांचे सहृदय अभिनंदन करतो.
आज एक महत्वाचे कार्य करण्याचे भाग्य मला मिळाले, एक प्रकारे मला वाटते, हे काम असे आहे ज्याचे भाग्य आम्हाला मिळाले. आणखी कोणाच्या नशिबात हे पवित्र कार्य लिहिले नाही. ही इंदू मिलची जागा मी पंतप्रधान झाल्यानंतर आली का? पूर्वीपासूनच होती, पण हे पवित्र काम करण्याचे भाग्य आमच्याच नशिबी लिहिले होते म्हणून आज इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक प्रेरणास्थान निर्माण होत आहे. ही चैत्य भूमी..देशात नवी चेतना जागृत करणार आहे. तुम्ही पाहा पंच-तीर्थ निर्माण…पंच तीर्थ निर्माण…आगामी काळात हे पंच-तीर्थ ज्यांचा लोकशाही मुल्यांवर विश्वास आहे, ज्यांची सामाजिक न्यायावर श्रद्धा आहे, ज्यांचा देशाची अखंडता व एकतेप्रती विश्वास आहे, त्यांचे तीर्थक्षेत्र होईल. अशा पंच-तीर्थाचे भाग्य आम्हाला लाभले. तुम्ही पाहा, मध्य प्रदेशातील महू, एवढी सरकारे येऊन गेली पण कोणाचे लक्ष तिकडे गेले नाही. जेंव्हा मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले तेंव्हा त्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक झाले. आज बाबासाहेबांच्या प्रती श्रद्धा असलेल्यांसाठी ते तीर्थक्षेत्र बनले आहे. त्याच प्रकारे दिल्लीतील ज्या जागी बाबासाहेब आंबेडकर राहत होते ती अलीपूर रस्त्यावरील जागा, 25 वर्षांपासून हे लालफितीच्या कारभारात अडकले होते. बाबासाहेबांप्रती श्रद्धा असलेले लोक याचा पाठपुरावा करत राहिले. अटलजींच्या सरकारने या कामी पुढाकार घेतला. पण, पुढच्या सरकारने हे काम दाबून ठेवले. आम्ही आल्यानंतर हे काम हाती घेतले, काही दिवसांपूर्वीच मला अलीपूर रस्त्यावरील त्या घराचे भव्य स्मारक निर्माण करण्याच्या कामाचे भूमीपूजन करण्याचे भाग्य लाभले. सुमारे 300 कोटी रुपये खर्चाने हे स्मारक निर्माण होत आहे. दिल्लीत जे लोक येतील, ते इतर ठिकाणांप्रमाणेच याही ठिकाणाला भेट देतील. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान किती मोठे आहे ते त्यांच्या लक्षात येईल.
बाबासाहेब आंबेडकरांचे आई-वडिल रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे गावात राहत होते. आमच्या एका खासदाराने ते गाव आदर्श गावासाठी निवडले आहे, महाराष्ट्र सरकारही या कामी त्यांना मदत करत आहे. ज्याठिकाणी बाबासाहेबांचे आई-वडिल राहत होते ते ठिकाणही एका तीर्थक्षेत्राच्या रुपाने उदयास येणार आहे. आज हे इंदू मिलमध्ये होणारे स्मारक आणि पाचवे लंडनमध्ये ज्याठिकाणी बाबासाहेब आंबेडकर राहत होते ते ठिकाण. आपल्या देशातून कोणी जेंव्हा लंडनला जाईल त्याच्यासाठी हे प्रेरणास्थान असेल. जगभरातील लोक भारताच्या आर्थिक विचारांना समजण्यासाठी लंडनमध्ये बाबासाहेब राहत असलेल्या ठिकाणी जाऊन, अभ्यास करून, भारताविषयी जाणून घेतील.
हे पंच-तीर्थ निर्माण फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाच्या काळातच झाले आहे, हे तुम्हा सर्वांना माहित आहे. मला याचे राजकारण करायचे नाही. परंतु, माझ्या मनातील जी खदखद, दुःख आहे ते सांगितल्याशिवाय मी राहणार नाही. काय कारण आहे की, बाबासाहेब आंबेडकरांचा संसदेत, ज्या महापुरुषाने राज्यघटना दिली त्या महापुरुषाचे तैलचित्र संसदेत लावण्यास काही सरकारे सहमत नव्हती. भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याचे सरकार आल्यानंतर देशाच्या संसदेत बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र लावण्यात आले.
भारतरत्न, आम्हाला माहित आहे इतरांना कधी मिळाला, परंतु, बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यासाठी सरकारच्या नाकी नऊ आले आणि तोही ते लोक सत्तेत असताना मिळाला नाही. म्हणून मी म्हणतो की, देशात ज्यापद्धतीने सरंजामवादी विचारसरणीचे लोक आहेत, ते एका दलिताच्या मुलाचा स्वीकार करण्यास कधी तयार होणार नाहीत. मी आज, याठिकाणी लोक मोठ्या संख्येने जमलेले आहेत, ज्यांनी आपले आयुष्य बाबासाहेबांच्या विचारासाठी खर्ची घातले आहे, मी त्यांनाही आज सांगू इच्छितो, माझे सांगणे त्यांना कडवट वाटेल पण मी हे सांगण्याचे धाडस करतो. जर आम्ही दूरदृष्टीच्या अभावामुळे बाबासाहेब आंबेडकरांना फक्त दलितांपुरतेच मर्यादीत ठेवणार असू तर यापेक्षा बाबासाहेबांचा मोठा अपमान दुसरा कोणता असणार नाही, तो अन्याय ठरेल. बाबासाहेब फक्त देशाचेच नाही तर समस्त विश्वातील दलित, पिडीत, शोषित, वंचितांच्या प्रेरणेचे नाव बाबासाहेब आंबेडकर आहे. जग मार्टीन ल्युथर किंग यांना ओळखते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांना ओळखत नाही, हे आमचे दुर्दैव आहे. म्हणून आपली जबाबदारी आहे की, जगाला कळले पाहिजे, बाबासाहेब कोणत्या परिस्थितीत जन्मले, वाढले, एवढा अत्याचार सहन करून, अपमान सहन करून, कोणत्याही व्यक्तीच्या मनात ओतप्रोत विष भरले असते. एवढा अपमान सहन करूनही कटुता निर्माण होऊ दिली नाही, ते केवळ बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून. आयुष्याच्या प्रत्येक क्षणी अपमान सहन केला. प्रत्येकवेळी बाबासाहेबांना संकटांना सामोरे जावे लागले. परंतु, जेंव्हा स्वतःला निर्णय घेण्याची संधी मिळाली, तेंव्हा कटुतेचे नामोनिशान नव्हते, सुडाची भावना नव्हती, मी कोणाला काही सांगत आहे हा भाव नव्हता. यापेक्षा महापुरुष कोण असू शकेल. म्हणून बंधू-भगिनिंनो लोकांची बाबासाहेबांप्रती श्रद्धा आहे.
मी तर कधी कधी विचार करतो की, बाबासाहेब आंबेडकर नसते तर मोदी कोठून आला असता? आमच्यासारख्या सर्वसामान्यांना कोण विचारतो? बाबासाहेब आंबेडकरांमुळे हे शक्य झाले आहे म्हणून मी म्हणतो की, आम्ही जे करत आहोत हे ऋण फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. या महापुरुषाने जे केले आहे…म्हणून आम्हा सर्वांची ही जबाबदारी आहे की, बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितले आहे, त्यापासून जर आम्ही मागे सरलो तर हा बाबासाहेबांवर फार मोठा अन्याय होईल. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितले, शिक्षण घ्या. दलित असो, शोषित असो, वंचित असो, गरीब असो शिक्षण त्याचा प्रमुख धर्म असला पाहिजे. बाबासाहेबांनी हे आम्हाला सांगितले. बाबासाहेबांनी आम्हाला संघटित होण्यास सांगितले.
आज मला आनंद होत आहे की, नितीनजी सांगत होते, दलित समाजासाठी वेगवेगळ्या दिशेने काम करणारे सर्वजण आज एकत्र आले आहेत. बाबासाहेबांना सर्वात मोठी आदरांजली हीच आहे की आज आम्ही संघटित झाले पाहिजे, आम्ही एक झाले पाहिजे आणि अन्यायाविरोधात संघर्षाची वेळ येईल त्यासाठी आम्हाला तयार असले पाहिजे. हाच बाबासाहेबांनी आम्हाला संदेश दिला आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येने बंधु-भगिनींनो आज इंदू मिल परिसरात बाबासाहेबांचे स्मारक होत आहे. माझी एक इच्छा आहे, माझा याबाबत अभ्यास नाही, पण ज्यादिवशी मी जमीन दिली होती त्यादिवशी मी म्हटले होते. आज वास्तुतज्ज्ञांची भेट घेतली, त्यावेळीही मी म्हटले. मी म्हटले मुंबई वा महाराष्ट्रात आलेला व्यक्ती आयुष्याच्या कटकटीने त्रस्त असेल, निराश असेल तर याठिकाणी अशी जागा असली पाहिजे की तो तासभर जरी त्याठिकाणी बसला, शांतीची अनुभूती त्याला मिळेल. असे स्थान निर्माण झाले पाहिजे म्हणून मी म्हटले ज्याठिकाणी स्मारक होईल, त्यासोबतच ही मोठी जमीन आहे, त्याठिकाणी घनदाट वनक्षेत्र निर्माण करता येईल. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले पाहिजे, सर्व परिसर हिरवागार दिसला पाहिजे की एक शांतीभूमी 60 फूट जागेत निर्माण होईल आणि हे शक्य आहे. मी देवेंद्रजींना आग्रह करेन, हे स्मारक फक्त माती-दगड-चूना एवढेच सिमीत राहता कामा नये. ते तर भव्य झालेच पाहिजे, जगासाठी ते एक आश्चर्य बनले पाहिजे. पण याला लोकसहभागाची जोड देता येईल का? महाराष्ट्रात 40 हजार गावं आहेत. प्रत्येक गावातून लोक येतील आणि त्यांना सांगितले पाहिजे येताना एक रोपटे घेऊन या, याठिकाणी प्रत्येक गाव वृक्षारोपण करेल, त्याच्या संवर्धनासाठी गावाकडून एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये जमा करुन एक वृक्ष लावण्यात येईल आणि 11 हजार रुपयांची देणगी द्यावी. तुम्ही पाहा, किती मोठ्या लोकसहभागातून हे काम होईल. प्रत्येक गावाला वाटेल की चैत्यभूमी, इंदू मिलच्या जागेवर जे स्मारक होत आहे, बाबासाहेब आंबेडकरांप्रती आपल्या गावची श्रद्धा आहे, आमचेही एक झाड त्याठिकाणी असले पाहिजे.
दुसरे म्हणजे, देशातील प्रत्येक राज्यातून एक वृक्ष मागवावा, त्याचेही रोपण करावे तसेच जगातील सर्व देशांमधून एक वृक्ष मागवण्यात यावा आणि हे विश्व महापुरुष होते, त्यांच्यासाठी हे वृक्षारोपण असे त्यावर लिहिले जावे. पूर्ण विश्व इंदू मिलच्या या हिरवळीसोबत जोडले जाईल. आम्ही जर नवकल्पना साकारून जनसामान्यांना जोडण्याच्या विचाराने स्मारक निर्माण करु, देशात कोणत्याही महापुरुषाचे असे स्मारक बनले नसेल ज्याठिकाणी 40 हजार गावं सरळ जोडली जातील. असे आतापर्यंत कधी झाले नसेल. हे होऊ शकते आणि महिनाभर, दर आठवड्याला गावची लोक येतील, राहतील चैत्यभूमीला भेट देतील, इंदू मिलला भेट देतील, ज्याठिकाणी आराखडा आहे त्याठिकाणी वृक्षारोपण करण्यात येईल. जे वृक्षारोपण करण्याचे निश्चित केले आहे, तेच लावावे. तुम्ही पाहा परिवर्तन कसे घडून येईल. हे एक प्रेरणास्थळ निर्माण झाले पाहिजे म्हणून मी म्हटले, आम्ही पंचतीर्थ निर्माण करत आहोत. ही पंचतीर्थ लोकशाहीवर श्रद्धा असणाऱ्यांसाठी, राज्यघटनेचा स्वीकार केलेल्यांसाठी, सामाजिक एकतेसाठी झटणाऱ्या लोकांसाठी तीर्थक्षेत्र बनतील.
बंधू-भगिनींनो, आमच्याविरोधात खोटा प्रचार करणारी, अफवा पसरवणारी, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी एक टोळी सदैव कार्यरत आहे. कारण त्यांना सहन होत नाही, हे लोक सत्तेत कसे काय आले. त्यांना मी सांगू इच्छितो की, आज देशातील ज्या राज्यांमध्ये दलितांची संख्या अधिक आहे, ओबीसी लोकसंख्या आहे, त्यातील बहुतेक राज्ये अशी आहेत त्याठिकाणच्या जनतेने भारतीय जनता पक्षाचे सरकार निवडून दिले आहे. महाराष्ट्र असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, छत्तीसगड असेल, ओदिशा असेल आमचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे, आमचे झारखंड असेल. याचा अर्थ असा की, बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वांशी जोडून काम करणारे आम्ही आहोत. समाजातील दलित, शोषित, पिडीतांनी आम्हाला स्वीकारले आहे, याचा हा ठळक पुरावा आहे.
दुसरे, ज्यावेळी आम्ही सत्तेवर येतो, जेंव्हा निवडणुका होतात, जेंव्हा सरकारे येतात, तेंव्हा एक खोटा प्रचार केला जातो- भाजपची मंडळी आरक्षण संपवतील. अटलबिहारी वाजपेयींचे सरकार होते त्यावेळी असाच भ्रम निर्माण केला होता. अटलजींच्या सरकारमधील लोक सांगून सांगून थकले, परंतु हा खोटा प्रचार करणारी टोळी काही आपले तोंड बंद करत नव्हती. पुन्हा जेंव्हा आम्ही राज्यांमध्ये निवडून येतो, तेंव्हा राज्यांमध्ये यांचे सुरू होते- आरक्षण संपवणार, आरक्षण संपवणार, आरक्षण संपवणार. मग दिल्लीत आमचे सरकार आले. पुन्हा एकदा मोठे वादळ उभे राहिले. बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला दिले आहे, त्यामुळे देशाला एक शक्ती मिळाली आहे आणि त्या शक्तीला कोणी रोखू शकत नाही. माझ्या बंधू-भगिनिंनो कोणी रोखू शकत नाही. म्हणून अशाप्रकारचा संभ्रम निर्माण करणाऱी मंडळी आज राजकीय लाभ उठवू शकली नाहीत. पण, समाजात वैमनस्य निर्माण करण्याचे काम हीच मंडळी करतात, खोटे बोलतात, समाजात संभ्रम निर्माण करतात. मी गरीबीचा अनुभव घेतला आहे. या दुखण्याचा अनुभव घेतला आहे. मला माहित आहे, या अवस्थेत जगणाऱ्यांसाठी अजून बरेच काही करायचे बाकी आहे. हा देश दलित, पिडीत, शोषित, वंचित, गरीब यांना मागे ठेवून आगेकूच करुच शकत नाही. माझे सरकार, मला जेंव्हा संसदेत नेता निवडण्यात आले, तोपर्यंत मी पंतप्रधान होणे बाकी होते. तेंव्हा मी भाषण केले की, माझे सरकार गरीबांप्रती समर्पित सरकार असेल, गरीबांच्या कल्याणासाठी आम्ही जगू. देशात गरीबाला गरीबीपासून मुक्ती हवी आहे, गरीबीपासून मुक्तीचे मार्ग वेगवेगळे असतील, आमचा मार्ग पूर्ण देशाला माहित आहे. म्हणून बंधू-भगिनिंनो हा अपप्रचार बंद झाला पाहिजे. हा खोटारडेपणा बंद झाला पाहिजे. समाजाला साशंक, भयभयीत करण्याचा खेळ बंद झाला पाहिजे, यावर राजकारण चालत नाही. या मिळून-मिसळून वाटचाल करुया. दलित, पिडीत, शोषित, वंचित, गरीब गावचा झाला पाहिजे, त्यांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होणार नाही. आणि म्हणून माझ्या बंधू-भगिनिंनो हा मंत्र घेऊन, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालण्याचा निश्चय करुन देश चालत आहे. राज्यांमध्ये ज्याठिकाणी आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली, आम्ही पूर्ण मन लावून करत आहोत. दिल्लीत सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे, पूर्ण तन-मन लावून काम करत आहोत. परिवर्तन घडवून आणणारच, हा विश्वास मी तुम्हाला देऊ इच्छितो. माझ्यासोबत म्हणा- मी म्हणेन बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही म्हणा- अमर रहे, अमर रहे,
बाबा साहेब आंबेडकर, अमर रहे, अमर रहे
बाबासाहेब आंबेडकर, अमर रहे, अमर रहे
बाबासाहेब आंबेडकर, अमर रहे, अमर रहे
26 नोव्हेंबर भारतीय राज्यघटनेसाठी अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण दिवस आहे. म्हणून भारत सरकार 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा करणार आहे. देशातील प्रत्येक मुलाला शाळा-महाविद्यालयात राज्यघटना काय आहे? कशी निर्माण झाली? का निर्माण झाली? हे सांगण्याची नियमित व्यवस्था झाली पाहिजे. म्हणून आमच्या सरकारने 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. खूप-खूप धन्यवाद
S.Thakur/N. Sapre
I am happy to be here on this day, the birth anniversary of LoknayakJP: PM @narendramodi in Mumbai https://t.co/PcRSP0WrBU
— PMO India (@PMOIndia) October 11, 2015
A vibrant port sector is very important for a nation blessed with long coastlines: PM @narendramodi https://t.co/PcRSP0WrBU
— PMO India (@PMOIndia) October 11, 2015
Our @nitin_gadkari ji, in 15 months has done what was not done in ten years. He's given new strength & speed to port sector: PM in Mumbai
— PMO India (@PMOIndia) October 11, 2015
Now port development is not enough. That is why port led development is the key. Ports must have great connectivity: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2015
2 sectors are going to be important in this century- coastal sector and space. Be it space & sea, we need to be moving at a quick pace: PM
— PMO India (@PMOIndia) October 11, 2015
Suresh Prabhujihas done wonderful work in the Railway Ministry: PM @narendramodi in Mumbai @sureshpprabhu @RailMinIndia
— PMO India (@PMOIndia) October 11, 2015
We know who got the Bharat Ratnawhen. But they did not give the Bharat Ratnato Dr.BabasahebAmbedkar: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2015
BabasahebAmbedkaris an inspiration not just for one community but for the entire world: PM @narendramodi https://t.co/PcRSP0WrBU
— PMO India (@PMOIndia) October 11, 2015
Dr.BabasahebAmbedkarfaced so many challenges but there was no bitterness in him. He is a MahaPurush: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2015
26th November will be marked as Constitution Day. People must know about our constitution, how it was made: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2015
A historic moment & a dream come true! Laying foundation stone of Dr. Ambedkar Memorial at Indu Mills Compound. pic.twitter.com/Jtr4sctume
— Narendra Modi (@narendramodi) October 11, 2015