Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मृदा आरोग्य पत्रिका आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना यांचा पंतप्रधानांनी घेतला आढावा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शेतकऱ्यांसाठी असलेल्या दोन महत्वूपर्ण योजनांचा आढावा घेतला. यामध्ये मृदा आरोग्य पत्रिका आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना यांचा समावेश आहे.

देशभरातील 16 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी मृदा आरोग्य पत्रिका वितरणाचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. उर्वरित राज्ये या आठवडयातच हे काम पूर्ण करणार असल्याची माहिती यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली.

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मृदा आरोग्‍य पत्रिकांवर त्यांच्या स्थानिक भाषेतच संपूर्ण तपशील नोंदवलेला असावा. प्रादेशिक भाषेत माहिती दिल्यास, त्यांना ती वाचण्यात कोणतीही अडचण येणार नाही, शेतकऱ्यांना माहिती सहजतेने समजू शकेल. यावर पंतप्रधानांनी या आढावा बैठकीत भर दिला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मृदा आरोग्य तपासणीसाठी करणे शक्य आहे. “स्टार्ट अप” मधून यासाठी सहजपणे हाताळता येणारे छोटेसे यंत्र तयार करुन घेऊन मृदा आरोग्य तपासणी वरचेवर करता येऊ शकते, असे यावेळी पंतप्रधान म्हणाले.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला. 2016 चा खरीप हंगाम आणि 2016-17 चा रब्बी हंगाम मिळून 7,700 कोटींपेक्षा जास्त रुपये नुकसान भरपाई, विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात आली. या विमा योजनेचा 90 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेतला, अशी माहिती यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली.

पीक विमा योजनेअंतर्गंत नुकसान भरपाई देताना यावेळी स्मार्ट फोन्स, रिमोट सेन्सिंग, उपग्रहामार्फत माहिती मिळवणे आणि ड्रोन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना विनाविलंब नुकसान भरपाई मिळू शकली, अशी माहिती यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

या बैठकीला कृषी मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, निती आयोग आणि पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

*****

N.Sapre/S.Bedekar/Anagha