Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रपती भवन संग्रहालयाच्या दुसऱ्‍या टप्प्याच्या उद्‌घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

राष्ट्रपती भवन संग्रहालयाच्या दुसऱ्‍या टप्प्याच्या उद्‌घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


देशासाठी उपस्थित सर्व वरिष्ठ मान्यवर,

राष्ट्रपती महोदयांच्या कार्यकाळाला आज चार वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल मी आदरणीय राष्ट्रपती महोदयांना मनापासून खूप-खूप शुभेच्छा देत आहे, त्यांचे अभिनंदन करत आहे, त्यांना शुभेच्छा देत आहे. तुमच्या चार वर्षांच्या कार्यकाळात मला पंतप्रधान म्हणून जास्तीत जास्त काळ तुमच्या सोबत काम करण्याचे भाग्य मला लाभले आहे. मी दिल्लीच्या विश्वात नवीन होतो. हे सर्व वातावरण माझ्यासाठी नवीन होते. अशा वेळी राष्ट्रपती महोदयांनी एका पालकाप्रमाणे, एका मार्गदर्शकाप्रमाणे अनेक विषयांबाबत मला बोटाला धरून शिकविले. असे भाग्य फार कमी लोकांना लाभते, जे मला लाभले आहे.

आज या ठिकाणी अनेक ग्रंथांचे लोकार्पण झाले आहे. मी पुस्तकांबाबत बोलत नाही ग्रंथांबाबत बोलत आहे. मी ग्रंथ यासाठी सांगत आहे कारण यामध्ये त्या गोष्टी समाविष्ट आहेत ज्या कल्पनेच्या चौकटीतून नव्हे तर इतिहासाच्या गवाक्षातून निघालेल्या आहेत आणि ज्या गोष्टी इतिहासाच्या गवाक्षातून निघतात त्या भावी पिढीच्या मनमंदिरावर एक अमीट ठसा उमटवून जातात आणि त्या अर्थाने हे जे प्रकाशन आहे हे प्रकाशन इतिहासाचा एक भाग बनणार आहे. मी या कामासाठी राष्ट्रपती महोदयांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन करतो. आताच संग्रहालय पाहण्याचे भाग्य लाभले. श्रीयुत घोष यांचा उत्साह इतका होता की जर ओमिता ने अडवले नसते तर कदाचित आम्ही रात्री अकरा वाजता येथे आलो असतो आणि तुमच्या मधील ज्या कोणाला हे संग्रहालय पाहायला वेळ मिळेल त्यांना मी आग्रहाने सांगेन की तुम्ही त्यासाठी संपूर्ण दिवस बाजूला काढून या. इतकी माहिती आहे, इतकी विविधता आहे आणि इतिहासाला पुनरुज्जीवित करण्याचा एक अद्‌भूत प्रयत्न आहे. हे असे संग्रहालय आहे जिथे इतिहास, कला, कल्पनाशक्ती आणि तंत्रज्ञान या चारही घटकांचे एकीकरण आहे आणि जो कोणी या संग्रहालयाच्या संपर्कात येईल तो या चारही माध्यमातून इतिहासाचा अनुभव प्राप्त करू शकेल. केवळ इतिहासाचीच माहिती मिळवेल असे नाही तर काही क्षणासाठी आपण त्या काळाचाच एक भाग बनल्याचा अनुभव त्याला येईल. या अर्थाने मला असे वाटते की ज्या शास्त्रीय पध्दतीने, ज्या संशोधनाच्या साथीने आणि ज्या कलात्मक रुपात याचे सादरीकरण करण्यात आले आहे त्याबद्दल श्रीयुत घोष आणि त्यांच्या पूर्ण टीमचे मी अभिनंदन करत आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहे.

राष्ट्रपती महोदयांनी भारताच्या एकूण वाटचालीत मोठे योगदान दिले आहे. त्यांची सार्वजनिक जीवनातील कारकीर्द प्रदीर्घ आहे. पण चार वर्षांच्या अल्प कालावधीत तुम्ही राष्ट्रपती भवनालाही खूप काही दिले आहे. एका प्रकारे राष्ट्रपती भवन सामान्य मानव, इतिहास आणि भारताचे सर्वोच्च स्थान या सर्वांचा मिलन बिंदू बनवले आहे आणि या परिसराच्या संदर्भातील एक अतिशय मोठे योगदान असल्याचे मला वाटते

आणि सर्वात मोठी आनंदाची बाब म्हणजे माझी राजकीय पार्श्वभूमी वेगळी आहे. राष्ट्रपती महोदयांची राजकीय पार्श्वभूमी वेगळी आहे. पण लोकशाही मध्ये भिन्न विचारांच्या प्रभावांखाली असलेल्या व्यक्ती देखील कशा प्रकारे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात हे राष्ट्रपती महोदयांसोबत राहून राहून प्रत्येक क्षणाला आम्ही शिकू शकतो.

भारत सरकारच्या जितक्या योजना आहेत, काही राज्ये अशी असतील ज्यांना भारत सरकारच्या सर्व योजना लागू करण्यामध्ये आणि केल्या असल्या तर त्याबद्दल बोलण्यामध्ये काही आढेवेढे किंवा संकोच असू शकतो. पण मी आज अभिमानाने सांगेन की भारत सरकारच्या जितक्या योजना आहेत, हा राष्ट्रपती भवनाचा परिसर….. हे देखील एक लहानसे गाव आहे. दहा हजारपेक्षा जास्त लोक येथे राहतात. या गावाच्या रुपात या सर्व योजनांना येथे लागू करण्याचा प्रयत्न झाला आहे. मग त्यामध्ये अपारंपरिक ऊर्जा योजनेचा विषय असो, जल संधारणाचा विषय असो, पर्यावरणाशी संबंधित काही नवीन योजना असोत प्रत्येक गोष्टीला लागू केले आहे. डिजिटल इंडिया, तर येथे डिजिटल राष्ट्रपती भवन. एका प्रकारे भारत सरकारच्या सर्व योजनांना लघुआवृत्तीच्या रूपात या ठिकाणी लागू करण्याचा प्रयत्न राष्ट्रपती महोदयांनी केला आहे. दुसऱ्‍या व्यक्तीच्या पक्षाचे सरकार आहे, तरीदेखील त्या सरकारचे कार्यक्रम राष्ट्रपती भवनाचे कार्यक्रम बनले पाहिजेत. ही उंची आदरणीय प्रणवदाच दाखवू शकतात आणि त्यासाठी मी त्यांना मनापासून वंदन करतो, अभिनंदन करतो. माझा ठाम विश्वास आहे आणि इतिहास जीवनात एखाद्या वनौषधीप्रमाणे उपयोगी ठरतो. जे इतिहासाला विसरतात ते एका प्रकारे जीवनातील रस, त्याचा कस हरवून बसतात. मंदिरात ज्या मूर्ती असतात त्यांना दगडांनीच अलंकृत केले जाते. मात्र वर्षानुवर्षे अनेक लोकांच्या भक्तीमुळे त्या देवांचे रूप धारण करतात. ऐतिहासिक स्थानांवर असलेला प्रत्येक दगड, या प्रत्येक दगडाचा देखील स्वतःचा एक इतिहास असतो. या प्रत्येक दगडामध्ये उलटून गेलेल्या काळातील घटना ओरडून-ओरडून सांगून पुढे येणाऱ्‍या काळात वाटचाल करण्यासाठी मार्ग दाखवण्याचे सामर्थ्य असते. मात्र, गरज असते ती त्या दगडाचा आवाज ऐकण्याची क्षमता विकसित करण्याची. या संग्रहालयाच्या माध्यमातून दगडांना बोलण्याचे सामर्थ्य प्रदान करण्यात आले आहे. आपण त्यातून ऐकण्याचे सामर्थ्य मिळवले पाहिजे आणि भावी पिढीला काही देण्यासाठी मिळवण्यासाठी एक नवा अर्थ प्राप्त केला पाहिजे. मी पुन्हा एकदा या प्रयत्नाबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो. आदरणीय राष्ट्रपती महोदयांना पुन्हा एकदा त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असताना आणि पुढील वर्षासाठी आम्हाला सर्वांना चांगले मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षा करत दिलेल्या प्रेरणेबद्दल आभार. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.

B.Gokhale/S.Patil/AK