Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त जमशेदपूर मधील पंचायती राज संमेलनातून देशभरातील पंचायतींना उद्देशून पंतप्रधानांनी केलेले भाषण

राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त जमशेदपूर मधील पंचायती राज संमेलनातून देशभरातील पंचायतींना उद्देशून पंतप्रधानांनी केलेले भाषण

राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त जमशेदपूर मधील पंचायती राज संमेलनातून देशभरातील पंचायतींना उद्देशून पंतप्रधानांनी केलेले भाषण


विशाल संख्येने आलेले झारखंडचे माझे बंधू आणि भगिनी, देशभरातील पंचायतींमधून आलेले सर्व पंचायतींचे प्रतिनिधी आणि आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशभरातील लाखो पंचायतींमध्ये बसून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या त्या सर्व गावकऱ्यांना आज पंचायत राज दिनानिमित्त माझ्या खूप-खूप शुभेच्छा.

साधारणपणे पंचायत राज दिन दिल्लीमध्ये विज्ञान भवनात होत असे. काही प्रतिनिधी यायचे, मान-सन्मान अशी परंपरा चालत होती. आम्ही आल्यावर एक प्रयत्न केला की, देश खूप मोठा आहे. दिल्लीच देश आहे, या भ्रमातून बाहेर यायला हवे. आणि म्हणूनच आमचा प्रयत्न राहिला आहे की, भारत सरकारला दिल्लीतून बाहेर काढून भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घेऊन जायचे. आणि म्हणूनच भारताचे अनेक कार्यक्रम आता आम्ही दिल्लीच्या बाहेर जनता-जनार्दनांमध्ये घेऊन जाण्याचा एक निरंतर प्रयत्न करत आहोत.

जेव्हा देशातील शेतकऱ्यांसाठी मृदा आरोग्य कार्डाचा शुभारंभ करायचा होता, तेव्हा आम्ही राजस्थानची निवड केली, जिथे पाण्याची टंचाई असते, जिथे शेतकऱ्यांना खूप साऱ्या संकटांना सामोरे जावे लागते. जेव्हा आम्ही ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा प्रारंभ केला, तेव्हा आम्ही हरियाणाच्या धरतीतून केला होता. कारण हरियाणा हे देशातील मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी असलेले राज्य होते. एक खूप मोठा चिंतेचा विषय होता आणि त्या एका कार्यक्रमाचा परिणाम असा झाला की, हरियाणाने वर्षभराच्या आतच लिंग गुणोत्तरात आमूलाग्र बदल घडवून आणला. मुले आणि मुलींची संख्या समान करण्याच्या दिशेने ते जलद गतीने यशस्वीपणे पुढे जात आहेत. आम्हाला जेव्हा सामान्य माणसाला सुरक्षा पुरवणाऱ्या जीवन योजनांचे एक नवीन संस्करण सामान्य नागरिकांसाठी आणायचे होते, तेव्हा आम्ही ज्या राज्यांमध्ये सर्वात जास्त गरिबी आहे, त्यापैकी एक पश्चिम बंगालमध्ये आम्ही त्या कार्यक्रमाचा प्रारंभ केला. आणि मला आनंद आहे की, ग्राम उदय से भारत उदय, पंचायत राज व्यवस्था, गावात वसलेल्या भारता प्रति भारत सरकार आणि भारताची कटिबद्धता, यानिमित्ताने झारखंडच्या भगवान बिरसा मुंडा यांच्या धरतीची आम्ही निवड केली. आणि आज या धरतीतून देशातल्या गावकऱ्यांशी संवाद साधण्याचे सौभाग्य मला लाभले आहे.

महात्मा गांधी म्हणायचे की, भारत गावांमध्ये वसलेला आहे. मात्र आपण पाहतो आहोत की स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष लोटल्यानंतर गाव आणि शहरांमधील दरी वाढतच चालली आहे. ज्या सुविधा शहरांमध्ये आहेत, गावांना अशा सुविधांचा हक्क नाहीये का? जर शहरांना वीज मिळते, मग गावातल्या घरांपर्यंत वीज पोहोचायला हवी की नको ? जर शहरात चांगले रस्ते आहेत, मग गावातल्या लोकांनाही येण्या जाण्यास उपयोगी पडतील असे रस्ते मिळायला हवेत की नकोत मिळायला? आणि या गोष्टींसदर्भात यावेळचा अर्थसंकल्प तुम्ही पाहिला असेल, संपूर्ण देशभरात वाहवा होत आहे की, स्वातंत्र्यानंतर कीत्येक वर्षांनी पहिल्यांदा गावांमधला माणूस मनापासून म्हणू शकेल की हा माझा अर्थसंकल्प आहे, माझ्यासाठी अर्थसंकल्प आहे, गावासाठीचा अर्थसंकल्प आहे, शेतकऱ्यांसाठीचा अर्थसंकल्प आहे. असा विश्वास या अर्थसंकल्पातून निर्माण झाला आहे.

बंधू-भगिनींनो, 14 एप्रिल ते 24 एप्रिल या पंचायत राज दिनापर्यंत, “ग्राम उदय से भारतोदय” देशातील लाखो गावांमध्ये 10 दिवसांचे एक मोठे अभियान राबवण्यात आले. 14 एप्रिल रोजी या अभियानाचा प्रारंभ मी भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार श्री. बाबासाहेब यांच्या जन्मगावी मध्यप्रदेशातील महू येथून केला होता. लाखोंच्या संख्येने मध्यप्रदेशातील नागरिक यामध्ये सहभागी झाले होते आणि 14 एप्रिलला सुरु झालेले हे अभियान संपूर्ण देशात वेगवेगळ्या विषयांवर भर देत, योजनांचा शुभारंभ करत, नवे संकल्प करत, जनजागृतीची नवी शिखरं पार करत संपूर्ण देशात सुरु होते. आणि हा कार्यक्रम इतका व्यापक झाला आणि मी चौधरी विरेंद्र सिंह आणि त्यांच्या विभागातील सर्व लोकांचे, राज्य सरकारांचे मनापासून अभिनंदन करु इच्छितो की एवढ्या तळपत्या उन्हात देखील, एवढ्या उष्म्यात देखील सरकारचे मोठे-मोठे अधिकारी गावांमध्ये गेले. राजकीय नेते गावांमध्ये गेले, गावांमध्ये कार्यक्रमांचा भडिमार होत राहिला आणि गावाला पुढे नेण्याचे एक वातावरण गावामध्ये निर्माण झाले आणि स्वकर्तृत्वावर, आपल्याकडे जी उपलब्ध साधनसंपत्ती आहे, त्या साधनसंपत्तीच्या आधारे गावाला पुढे नेण्याचा संकल्प आज भारतभर दिसून येत आहे.

आपण पाहतो की, काही गावे कल्पनेच्या पलीकडे, कधी तर शहरांपेक्षा उत्तम व्यवस्था बनवण्यात यशस्वी झाली आहेत. जर गावातील पंचायत व्यवस्थेमध्ये बसलेल्या प्रतिनिधींनी हा संकल्प केला की गावातल्या लोकांनी पाच वर्षांसाठी माझ्यावर विश्वास ठेवला आहे, या पाच वर्षांमध्ये मी गावाला असे काही देऊन जाऊ की येणाऱ्या पिढ्या देखील आठवण काढतील की अमूक-अमूक वर्षात तमूक पंचायतीचे प्रधान होते, अमूक पंचायतीचे सदस्य होते, यांनी आमच्या गावात हे चांगले काम करुन दाखवले. प्रत्येकाच्या मनात, सर्व लोकप्रतिनिधींच्या मनात हा संकल्प असायला हवा की मी माझ्या कार्यकाळात, ज्या लोकांचा मी प्रतिनिधी आहे, त्या क्षेत्राच्या काळामध्ये गावाला पुढे जाण्यासाठी एक मजबूत पाया म्हणून काम करेल, एक योग्य दिशेचे काम करेल, एक योग्य गती मिळवून देईन, असा संकल्प प्रत्येकाचा असायला हवा.

या “ग्राम उदय से भारतोदय प्रवासाबाबत जगभरातील लोक अचंबित झाले आहेत. आज आपल्या देशात या पंचायतींमध्ये सुमारे 30 लाख निवडून आलेले प्रतिनिधी बसलेले आहेत. आणि त्यामध्ये 40 टक्के महिला बसल्या आहेत. काही राज्यांनी झारखंड सारख्या राज्यांनी 50 टक्के केले आहे, काही राज्यांमध्ये 33 टक्के आहे. त्यामुळे सरासरी मी सांगतो, सुमारे 40 टक्के संख्या महिलांची आहे. ही महिलांची संख्या, आता बराच काळ लोटला आहे. मी आज या पंचायत राज दिनानिमित्त या लाखो माझ्या महिला प्रतिनिधींना आवाहन करु इच्छितो. हात जोडून विनंती करु इच्छितो की माझ्या माता-भगिनींनो, तुमच्या गावाने तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. आणि तुम्ही एक आई आहात, तुम्ही एक महिला आहात. तुम्ही तुमच्या पंचायतीमध्ये काही विषयांसंदर्भात नेतृत्व करुन परिवर्तन घडवून आणू शकता का? जर 40 टक्के महिला पंचायतीमध्ये जाऊन निर्णय घेत आहेत, निर्णयात भागीदार बनत आहेत, मग आपण हे निश्चित करु शकतो की आपण ज्या गावात बसलेलो आहोत, आता आपल्या गावात एकही माता किंवा बहीण किंवा मुलगी यांना उघड्यावर शौचाला जावे लागणार नाही. आम्ही शौचालये बांधूनच दाखवू. भारत सरकार, राज्य सरकारच्या शौचालय बांधण्याच्या योजना, आम्ही स्वत: वेळ काढून जाऊ आणि लागू करुन दाखवू आणि मी अशी अनेक गावे पाहिली आहेत. एखादी वृद्ध आई देखील संकल्प करते की मी आता गावात कुणालाही उघड्यावर शौचाला जायची वेळ येईल अशी स्थिती राहू देणार नाही, तेव्हा अशा गावात प्रत्येक घरामध्ये शौचालय बांधली गेली. आज देखील माझ्या माता-भगिनींना उघड्यावर शौचाला जावे लागणे यापेक्षा मोठी लाजिरवाणी गोष्ट दुसरी नाही. आणि म्हणूनच मी लाखोंच्या संख्येने निवडून आलेल्या माझ्या माता-भगिनींना विनंती करतो की तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या.

मला त्यांना दुसरी गोष्ट सांगायची आहे की सरकारकडून निधी मिळतो, शाळांमध्ये मुलांसाठी मध्यान्ह भोजन दिले जाते. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही चौकशी करा की, सरकारच्या पैशाचा उपयोग चांगले मध्यान्ह भोजन तयार करुन त्या लहान-लहान मुलांच्या पोटात जाते की नाही. लहान मुले तर ईश्वराचे रुप असतात. आपल्या गावातील मुले कुपोषित असतील आणि लोकप्रतिनिधी एक महिला असेल तर ही गोष्ट मी कधीही खपवून घेणार नाही. मी यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी एक लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्या कर्तव्याचे पालन करीन हा संकल्प 40 टक्के माता भगिनींनी करायला हवा. एक तृतीयांश गावांमध्ये प्रधान महिला आहेत. आपण हा संकल्प करु शकत नाही. जेणेकरुन आपल्या गावात गरीबातील गरीब मूल कुपोषणाची शिकार होणार नाही ज्यासाठी आपल्याला चिंता करावी लागेल.

माझ्या माता-भगिनींकडून मी आणखी एका कामाची अपेक्षा करतो. आपल्या गावांमध्ये दरवर्षी दारिद्रय रेषेखाली जगणाऱ्या पाच महिला किंवा दहा महिला असतील ज्यांची दरवर्षी प्रसूती होत असेल. या गरोदरपणाच्या कालावधीत मी लोकप्रतिनिधी या नात्याने, गावातील दारिद्रय रेषेखाली जगणाऱ्या तीन महिन्यांची गरोदर किंवा पाच महिन्यांची असेल, तर गावामध्ये जनजागृती करुन नऊ महिन्यांपर्यंत तिला चांगला आहार मिळेल, चांगले पौष्टिक जेवण मिळेल यासाठी गाव एकत्रितपणे एवढी जबाबदारी पार पाडू शकेल का? मी यासाठी म्हणत नाहीये की प्रश्न निधीचा आहे. मुद्दा निधीचा नसतो, ती एक लोक चळवळ बनते. आपल्या माता, कधी प्रसूतीच्या वेळी आईचा मृत्यू होतो, कधी नवजात शिशुचा मृत्यू होतो, कधी आई आणि मूल दोन्ही दगावतात. 21 व्या शतकातील भारतामध्ये आपल्या गावच्या माता आणि जेव्हा एका प्रसूती दरम्यान जी आई मरते गावामध्ये, तिचे वय काय असेल, 25 वर्ष, 27 वर्षाची ती मुलगी जी आई बनणार असते, कीती स्वप्ने पाहिली असतील तिने लग्नाच्या वेळी. कीतीतरी स्वप्ने उराशी बाळगून त्या कुटुंबामध्ये ती सून म्हणून आली असेल. आणि पहिल्याच बाळंतपणात जर ती मृत्यूला शरण गेली असेल तर ते कुटुंब कीती उद्‌ध्वस्त होत असेल. त्या कुटुंबाची स्थिती काय होत असेल. जो तरुण या वयात आपली पत्नी गमावतो, त्याची मन:स्थिती कशी असेल, इतकं मोठं दु:ख, वेदना, माझ्या 40 टक्के माता भगिनी जर गावामध्ये लोकप्रतिनिधी असतील आणि त्या गावात प्रसूतीमुळे आईचा मृत्यू होत असेल, बाळाचा मृत्यू होत असेल, मूलाचा, मूलीचा मृत्यू होत असेल तर हे आपण रोखायला हवे. आपण जागृती करायला हवी की आता अशा गरीब माता-भगिनींची प्रसूती असेल, तर त्यांनी अशा कार्यकर्त्यांशी भेट घालनू द्यावी. त्यांची देखभाल करावी आणि जवळच्या दवाखान्यात तिची प्रसूती होईल यासाठी आपण तिला प्रेरित करा. जर रुग्णालयात तिची प्रसूती झाली तर तिचे प्राण वाचण्याची शक्यता वाढते. माझ्या माता-भगिनींनो, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही पंचायतीमध्ये बसता आणि यासाठी तुम्ही कीती शिकलेल्या आहात कीती शिकलेल्या नाहीत हे महत्त्वाचे नाही. ज्या निष्ठेने तुम्ही तुमचे कुटुंब संभाळता, तीच शक्ती त्या गावातील गरीब महिलांच्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी सामर्थ्यवान असते, एवढा अनुभव पुरेसा असतो आणि तो घेऊन तुम्ही मार्गक्रमण करु शकता.

मी लोकप्रतिनिधींना देखील विनंती करु इच्छितो. आज ती स्थिती नाही. पूर्वीच्या काळी गावात जे कोणी एखादे सुखी कुटुंब असायचे ते पंचायतीचे प्रधान असायचे. कोणीही सरकारी अधिकारी आला, गावात कुणी पाहुणे आले तर त्यांच्याच घरी बैठक व्हायची, चहा-पाणी व्हायचे, कधी जेवण असायचे. महिन्याला 15-20 पाहुणे साधारणपणे असायचे आणि त्यांची आर्थिक स्थिती जर चांगली असेल तर लोकांचे स्वागत वगैरे केले जायचे आणि गावकरी देखील म्हणायचे की यांच्यावर जबाबदारी सोपवूया. मात्र ते दिवस होते, जेंव्हा गावांकडे आपला स्वत:चा निधी नव्हता. गावाला आपल्या परीने गुजराण करावी लागत होती. सरकारकडून खूप कमी मदत मिळायची. आज काळ बदलला आहे. आज तर लाखो रुपये दरवर्षी गावांना मिळतात आणि पंचायत प्रधानांच्या निवडणुकांमध्ये देखील जी एवढी स्पर्धा निर्माण झाली आहे, त्यामागचे मूळ कारण देखील हा मोठ्या प्रमाणात मिळणारा निधी हे आहे. मात्र मला वाटते, लोकप्रतिनिधींनी या निधीचा पाच वर्षांसाठी योग्य वापर केला तर ते आपल्या गावात सर्वोत्तम परिणाम आणू शकतात.

गेल्या साठ वर्षात, ज्या गोष्टी आपल्या गावात होऊ शकल्या नाहीत, त्या गोष्टी तुम्ही पाच वर्षांच्या आत एवढ्याच निधीतून करु शकता आणि यासाठी आपली पंचायत व्यवस्था आपण बळकट करायला हवी. नियमितपणे पंचायतीची बैठक व्हावी आणि हा माझा विश्वास आहे की, देशाचे भाग्य बदलण्यासाठी जेवढे महत्त्व दिल्लीच्या मोठ्यातील मोठ्या संसदेचे आहे, तेवढेच महत्त्व माझ्या गावातल्या या संसदेचे आहे आणि यासाठी ग्रामसभेवर भर देण्याची गरज आहे. आज जेव्हा ग्रामसभा भरते, तेव्हा सरासरी कीती संख्या असते? एक म्हणण्यासाठी, कागदावर लिहिण्यासाठी ग्रामसभा असते. अरे, ग्रामसभेची तारीख आधीपासून ठरवलेली असेल, त्या दिवशी ग्रामोत्सवाचे वातावरण असेल, सकाळी प्रभात फेरी निघेल, मुले देखील गावामध्ये जागृती आणतील, लहान-मोठे उत्सवाचे वातावरण असेल आणि नंतर संध्याकाळी ग्रामसभा असेल. आज ग्रामसभेत 5%-10%-15% लोक येतात, महिला तर खूपच कमी येतात. कधी-कधी तर लोकप्रतिनिधी देखील फिरकत नाहीत. आपण संकल्प करु शकतो का की आपण अशी ग्रामसभा करु, ज्यामध्ये कधीही गावाच्या लोकसंख्येच्या 30 टक्के लोक गैरहजर राहणार नाहीत, असा संकल्प करुन आपण लोकांना आणण्याचा प्रयत्न करु शकतो आणि बघा, ग्रामसभेमध्ये ठरवा, हे करायचे आहे, असे करायचे आहे, संपूर्ण गाव तुमची मदत करेल. जर स्वच्छतेचे अभियान चालवायचे असेल, तर गाव सर्वात उत्तम स्वच्छतेचे उदाहरण देऊ शकतो. आज देखील अनेक गावे आहेत, ज्यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने स्वच्छतेचे अभियान राबवले आहे आणि गावामध्ये जो कचरा एकत्र होतो, तो गावाच्या बाहेर टाकला जातो, त्यात गांडूळ सोडले जातात आणि चांगल्या प्रकारचे खत मिळते, ते खत विकले जाते, गावातलेच शेतकरी घेऊन जातात. गावात स्वच्छता देखील राहते आणि शेताला चांगले खत देखील मिळते. हे पैशांमुळे होत नाही तर ग्रामपंचायतीचे प्रधान, गावातील निवडून आलेले प्रतिनिधी, गावातील शिक्षक, गावातील दोन-चार आज्ञाधारक लोक हे जेव्हा सर्व मिळून ठरवतात, तेव्हाच बदलाला सुरुवात होते. गावाने स्वच्छते संदर्भात थोडी जरी पावले उचलली, तरी ते आर्थिक दृष्ट्या लाभदायक असते. असे उत्तम खत गावाच्या स्वच्छतेतून निर्माण होते ज्यामुळे आपल्या शेतांची स्थिती सुधारु शकते.

मी ग्रामपंचायतीच्या माझ्या प्रधानांना विनंती करु इच्छितो. इथे आपण इतक्या मोठ्या संख्येने प्रतिनिधी बसलो आहोत. आपल्या सर्वांची इच्छा असते गावात रोड बनावा, गावात पंचायतीचे कार्यान्वय असावे, ही सर्वांची इच्छा असते. मात्र गावात शिक्षक असावा, गावात शाळा असावी. सरकारी निधी खर्च होतो, मात्र तरीही जर माझ्या गावातील मुलांनी महिना-दोन महिने शाळेत गेल्यानंतर पुन्हा जाणे बंद केले, तर याची चिंता पंचायतच्या लोकांना वाटते की नाही वाटत? जर आपल्याला चिंता वाटत नसेल तर आपण गावाचे प्रमुख नाही. जर आज एक मुलगा, त्याची शाळा सुटली, तर याचा अर्थ हाच होतो की भविष्यात आपण आपल्या गावात असा एक तरुण तयार करत आहोत, ज्याच्या भविष्यात अंधार लिहिला आहे. जर तो मुलगा शाळेत गेला, दर आठवड्याला आपण थोडी माहिती घेतली, चौकशी केली. एखादा मुलगा जर शाळेत जात नसेल, तर गावच्या प्रधानाशी किंवा त्याच्या आई-वडीलांशी बोलले की हे बघा, गुरुजी आले होते. म्हणत होते की, फलाण्याचा मुलगा शाळेत येत नाहीये, काय झाले, आजारी तर नाही ना? एवढंसं जरी गावच्या प्रधानांनी विचारले, पंचायतच्या सदस्यांनी विचारले, तर गावामध्ये मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी आई-वडील देखील जागरुक होतील. तो शिक्षक देखील जर उदासीन असेल, त्याला जर रस नसेल, मात्र जर गावातील पंचायतीचे लोक जागरुक असतील, गाव जागरुक असतील, गाव जागरुक असेल तर तो शिक्षक देखील आपले सर्वस्व पणाला लावून शिकण्यावर लक्ष केंद्रीत करेल आणि तुमच्या गावातील मुलांचे आयुष्य बदलून टाकेल आणि म्हणूनच आपण पंचायतीचे प्रधान या नात्याने, आपण केवळ रस्ता बनला की नाही बनला, निधी आला की नाही आला, एवढ्यावरच मर्यादित न राहता लोकांच्या सुविधेकडे लक्ष द्यायला हवे.

आपल्याकडे पल्स पोलिओचा डोस पाजला जातो. कीती लोकप्रतिनिधी आहेत जे आठवडाभर आधी पल्स पोलिओची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतात आणि ठरवतात की आपल्या गावातील कोणतेही मूल लसीकरणापासून वंचित राहणार नाही. पोलिओच्या डोसापासून वंचित राहणार नाही. आपण पाच वर्षे, आपल्या कार्यकाळादरम्यान शंभर टक्के लसीकरण करु शकलो, पोलिओचा डोस पोहोचवू शकलो, तर आपले सौभाग्य असेल की आपल्या गावात असा कोणताही मुलगा नसेल, अशी कोणतीही मुलगी नसेल जिला कधी लकवा होईल, ती आयुष्यभर दिव्यांग म्हणून राहण्यासाठी प्रवृत्त होईल आणि संपूर्ण गावं आयुष्यभर तिच्याकडे सहानभूतीने पाहत राहील. आपली इच्छा आहे की, आपले गाव निरोगी रहावे, तर आपली मुले देखील निरोगी रहायला हवी, आपली मुले निरोगी ठेवायची असतील, तर आपल्याला ज्या सरकारच्या योजना आहेत, पंचायतीचे निवडून आलेले प्रतिनिधी या नात्याने त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला सजग रहावे लागेल. आपल्याला स्वत:ला नेतृत्व करायला लागेल.

इंद्रधनुष योजना जेवढी जुनी मुले लसीकरणापासून वंचित राहिली आहेत, त्या मुलांना आता या आरोग्य योजनेत सामावून घेणारे हे मोठे अभियान आहे. कोट्यवधी मुले अद्याप अशी आहेत, जी काही ना काही कारणामुळे याचा लाभ घेऊ शकली नाहीत, किंवा आपण त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवू शकलेलो नाहीत. मी पंचायतीमध्ये निवडून आलो आहे. माझ्या गावात माझा संकल्प असायला हवा की, आता कोणत्याही मुलाला अपंग होण्याच्या, दिव्यांग होण्याच्या, त्याच्या शरीराच्या कोणत्याही भागाला लकवा होईल अशी परिस्थिती मी येऊ देणार नाही हा माझा संकल्प असायला हवा. जर एका पाठोपाठ एक, पंचायतमध्ये निवडून आलेल्या माझ्या प्रतिनिधींनी माझ्या गावातील जीवन बदलण्याचा निश्चय केला.

आपल्याला माहितच आहे पावसावर आपली शेती अवलंबून आहे. जर गावात शेतकरी चिंताग्रस्त असेल, तर गावातले इतर उद्योग देखील बंद पडतात. लोहाराची कमाई देखील बंद होते; सुताराची देखील कमी होते, चांभाराची देखील कमी होते. प्रत्येकाला त्रास होतो, गावाचे संपूर्ण अर्थकारण संपुष्टात येते. शेती देखील, आपण प्रत्येक थेंब, अधिक पीक, अशी गावे असू शकत नाहीत का, जी संकल्प करतील की, आमच्या गावात जितके शेतकरी आहेत, त्यांची जेवढी जमीन आहे, हजार एकर असेल, दोन हजार एकर असेल, जेवढी जमीन असेल. आपण संपूर्ण गावाने निश्चित करावे की, आपल्या गावातील एकही शेतकरी आता असा नसेल, ज्याने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाचा वापर केला नसेल. आपण पाणी वाचवू, आपण आधुनिक शेती करु, आपण मृदा आरोग्य कार्ड घेऊ, आपण पशुपालन करु, आपण मधासाठी मधमाश्यांचा वापर करु, जिथे मत्स्य उद्योग असतील तिथे मत्स्यपालन करु. आपण प्रयत्न करु की, आपला शेतकरी या ज्या योजना आहेत, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे कसा येईल.

तुम्ही पाहिले असेल की, ज्या गावाचा प्रधान सक्रिय असतो, ज्या गावाचे निवडून आलेले प्रतिनिधी सक्रिय असतात, तेव्हा सरकारलाही, सरकारी अधिकाऱ्यांनाही, त्या गावामध्ये काम करण्यात आनंद मिळतो, कारण त्यांनाही आपली उद्दिष्टे पूर्ण करायची असतात, आपले लक्ष्य गाठायचे असते. सरकार त्यांच्याकडून हिशोब मागत असते, म्हणून ते देखील काय करतात की, जी गावे जागरुक आहेत, चांगले काम करु शकतात, त्या गावांकडेच जातात आणि सांगतात की, हे पहा, ही योजना आली आहे, तुम्ही अंमलबजावणी करा.

त्यामुळे होते काय की, एखाद्या विभागात ज्या 12-15 खूप सक्रिय पंचायती आहेत त्यांना सर्व फायदे मिळतात आणि ज्या निष्क्रीय पंचायती आहेत, तिथे अधिकाऱ्यांची जायची इच्छा नसते, सरकारची जायची इच्छा नसते, आणि पैसे एकाच बाजूला जातात. माझ्या बंधू-भगिनींनो, ही परिस्थिती चांगली नाही. तुम्ही स्वत: जागरुक व्हा, तुम्ही सक्रिय व्हा, तुम्ही नेतृत्व करा. जर तुम्ही सक्रिय झालात, तुम्ही नेतृत्व केलेत, तर मला नाही वाटत की, अधिकाऱ्यांची दुसरीकडे जाण्याची इच्छा होईल. त्यांची खात्री होईल की, इथली 20 गावे माझ्याकडे आहेत, वीसही गावे इतकी चांगली आहेत की सर्व योजना लागू होतील. त्या सर्व योजना त्या वीस गावांमध्ये जातील. आज निधीची कमतरता नाहीये, माझ्या बंधू-भगिनींनो. योजनांची कमतरता नाही, दूरदृष्टीचा अभाव नाही, आवश्यकता आहे, ती धरतीवर राहत असलेल्या, माझ्या गावाचे कल्याण करणाऱ्या पंचायत राज व्यवस्थेशी जोडलेल्या माझ्या पंचायतच्या बंधू-भगिनींनी यासाठी समर्पित वृत्तीने काम करण्याची.

आपण संकल्प करु शकतो का, की सरकारच्या योजनांच्या माध्यमातून गावाच्या यशाचे मोजमाप केले जाते, मात्र पाच वर्षांसाठी गाव पाच कार्यक्रम हाती घेऊ शकते. एका वर्षासाठी एक कार्यक्रम. जसे समजा एखाद्या गावाने ठरवले की आम्ही असे गाव बनवू, जे हरित गाव असेल. या वर्षी आम्ही गावात इतकी झाडे लावू आणि तेवढी झाडे लावून संपूर्ण गावाला हिरवेगार बनवू, हा संकल्प करु शकतो? दुसऱ्या वर्षी दुसरा संकल्प करु की, आम्ही असे गाव बनवू जिथून पावसाचा एकही थेंब आम्ही बाहेर जाऊ देणार नाही. आम्ही पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्याचा प्रयत्न करु, आम्ही पाणी साठवण्यासाठी सर्वस्व पणाला लावून काम करु. आपण हे निश्चित करु शकतो की, आपल्या गावातील एकही शेतकरी असा राहणार नाही, ज्याचे मृदा आरोग्य कार्ड नसेल. आपल्या गावात असा एकही शेतकरी नसेल, ज्याच्या शेतात सिंचन किंवा ठिबक सिंचन नसेल. असे मी शेतकरी स्नेही गाव बनवू शकतो का? मी अशा गावाचा विचार करु शकतो का जिथे एकाही मुलाने शाळा सोडली नसेल? मी असे गाव बनवू शकतो, जिथे माझा एकही मुलगा कोणत्याही लसीकरणापासून वंचित राहणार नाही, बाहेर राहणार नाही, हा मी संकल्प करु शकतो का? जर मी ही योजना बनवली की माझ्या गावात डिजिटल भारताची जी चळवळ सुरु होणार आहे, माझ्या गावापर्यंत फायबरचे जे जाळे येणार आहे, मी माझ्या गावात आतापासून हे तंत्रज्ञान वापरणाऱ्या युवकांचा गट तयार करुन माझ्या गावाला देखील ई-ग्राम बनवण्याच्या दिशेने मी काम करु शकतो का? मी संकल्प करु शकतो का की माझ्या गावात एकाही बालकाचा जन्मामुळे किंवा जन्मानंतर लगेच मृत्यू होणार नाही, त्याची देखील मी काळजी घेईल. मी हा निश्चय करु शकतो की, माझे गाव हे बाल-मित्र गाव असेल, माझे गाव बालिका-मित्र गाव असेल, माझे गाव हुंडा-मुक्त गाव असेल. गावात अशा प्रकारचे सामाजिक संकल्प घेण्याचे वातावरण निर्माण केले, दरवर्षी गावाचा वाढदिवस साजरा करणे, आपण ठरवावे की, आपल्या गावाचा अमुक वाढदिवस आहे आणि त्यावेळी गावातील जेवढे लोक शहरांमध्ये गेले आहेत, ते खास त्या गावात यायला हवेत, संपूर्ण दिवस उत्सव चालायला हवा. गावाने एक वर्षाचा संकल्प करावा की, एक वर्षाच्या आत आपल्याला गावाला कुठे न्यायचे आहे. पंचायत राज व्यवस्था एक चौकट आहे. पंचायत राज व्यवस्था एक संविधानात्मक व्यवस्था आहे. मात्र जोपर्यंत लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य एकत्रितपणे लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी संकल्‍प करुन प्राण पणाला लावणार नाहीत, तोवर परिणाम दिसून येणार नाही.

बंधू-भगिनींनो, गावाची अर्थव्यवस्था सुदृढ बनवायची आहे. गावाच्या अर्थकारणाला बळकटी येईल, तेव्हाच देशाच्या अर्थकारणाला बळकटी येईल. जोपर्यंत गावातील गरीबाची क्रयशक्ती वाढत नाही, देशाच्या अर्थव्यवस्थेत ताकद येत नाही आणि म्हणूनच आमचा प्रयत्न आहे की, गावातील सामान्य माणसाचे उत्पन्न कसे वाढेल? गावातील सामान्य व्यक्तीची क्रयशक्ती कशी वाढेल? आपल्या पै-पैचा वापर, मनरेगाच्या योजना चालू आहेत, लाखो रुपये-कोट्यवधी रुपये येतात, अब्जावधी रुपये जातात, मात्र जर आपण ठरवले की, आमच्या गावात मनरेगाचे पैसे तर येतील, लोकांना काम देखील मिळेल, मात्र त्यातून आम्ही संपत्ती निर्माण करु. पाणी साठवण्याची व्यवस्था करु, तलाव आहेत, ते खोल करु, पाणी जास्त मिळेल, याची व्यवस्था करु, झाडे लावायची आहेत, तर त्यामध्ये पैसे गुंतवू. तुम्ही पहाल, पैशाचा योग्य उपयोग देखील आपल्या गावातील जीवन बदलू शकते.

आणि म्हणूनच माझ्या पंचायतच्या बंधू-भगिनींनो, आज ज्यांना पुरस्कार मिळाला आहे. ज्यांनी काही चांगले करण्याचा प्रयत्न केला आहे, त्या सर्वांचे पुरस्कार मिळवणाऱ्या राज्यांचे, गावांचे आणि त्या अधिकारी किंवा प्रतिनिधींचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो की, त्यांनी आज देशासमोर एका उत्तम कार्याचे उदाहरण ठेवून भारत सरकारकडून सन्मान मिळवला आहे. मात्र मी आशा करतो की, जे उत्तम काम करुन सन्मान मिळवणारे लोक आहेत, त्यांनी तिथेच थांबू नये, आणखी नवीन गोष्टींचा विचार करावा, नवीन काम करावे आणि देशासमोर, जगासमोर एक उत्तम उदाहरण प्रस्तुत करावे.

तशाच प्रकारे, गावाच्या इतर कामांबरोबरच आपल्याला गावाच्या आर्थिक बाबींकडे देखील पहायला हवे. थोडी चौकशीची आवश्यकता आहे. मी जेव्हा सरकारमध्ये आलो, तेव्हा मी विचारले, 18 हजार गावे अशी आहेत, जिथे विजेचे खांब देखील पोहोचलेले नाहीत, विजेची तार देखील पोहोचली नाही. पुढल्या वर्षी स्वातंत्र्याला 70 वर्षे पूर्ण होतील. 18 हजार गावांमध्ये जर विजेची तार पोहोचली नाही, म्हणजे ते 18 व्या शतकात अंधारात जगत आहेत. आम्ही विडा उचलला आहे की त्या 18 हजार गावांमध्ये वीज पोहचवायची आहे. एक हजार दिवसांत हे काम करण्याचे मी ठरवले आहे. मी त्यांच्यामागे आहे, भारत सरकार त्याच्या मागे लागले आहे.

राज्य सरकारांनाही पळवत आहोत. काम होत आहे, मात्र कधी-कधी बातम्या येतात, घोषणा होते की, अमुक गावात वीज पोहोचली आणि एखादा पत्रकार तिथे पोहोचतो, तेव्हा समजते की तिथे आता कुठे खांब पोहोचले आहेत. माझे गावकऱ्यांना सांगणे आहे की, तुम्ही जागरुक रहा. तुम्ही पहा की, कोणी चुकीची माहिती तर देत नाही ना. जर तुम्ही जागरुक राहिलात तर मला इतकी चिंता करण्याची गरज पडणार नाही. माझ्या चिंतेतला थोडा हिस्सा माझे गावातील सहकारी उचलू शकत नाहीत का? माझे गावातील प्रतिनिधी उचलू शकत नाहीत का? माझे गावातील प्रतिनिधी उचलू शकत नाहीत का? मी देशाच्या प्रतिनिधींना आवाहन करतो की, या खांद्याला खांदा भिडवून, जी स्वप्ने आपण पाहिली आहेत, ती स्वप्ने आपण पूर्ण करु या.

बंधू-भगिनींनो, गावांमध्ये आजही आपली गरीब आई लाकडाची चूल पेटवून जेवण बनवते. आणि तुम्ही हे ऐकून हैराण व्हाल, वैज्ञानिकांचे मत आहे की जेव्हा एक आई लाकडाची चूल पेटवून स्वयंपाक करते, तेव्हा तिच्या शरीरात 400 सिगरेटींएवढा धूर जातो. जर माझ्या आईच्या शरीरात 400 सिगारेटचा धूर गेला, तर त्या आईच्या तब्येतीचे काय होत असेल, त्या मुलांच्या तब्येतीचे काय होत असेल स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनंतर 21व्या शतकामध्ये जेवण बनवण्यासाठी आपण आपल्या गरीब मातांना मरु द्यायचे? बंधू-भगिनींनो, आता हे चालणार नाही. त्यांना लाकडाच्या चुलीपासून होणाऱ्या धुरापासून, 400 सिगरेटच्या संकटापासून मुक्ती द्यावीच लागेल आणि म्हणूनच आम्ही विडा उचलला आहे, आगामी तीन वर्षांत पाच कोटी कुटुंबांना गॅसचे सिलिंडर द्यायचे आहेत. तुमच्या गावातही दिले जातील. तुम्ही स्वत: गावांमध्ये पहा की, सरकारने जे काम हाती घेतले आहे, त्याचा लाभ पोहोचत आहे की नाही. योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे की नाही पोहोचत. या गरीबांची मदत करणे, तुम्ही बघाल की त्यांच्या आयुष्यात बदल होणे सुरु होईल. गावाच्या बाजूकडील जंगले वाचतील. लाकूड कापले जाते, जंगल कापले जाते, ते वाचेल. आपण पर्यावरणाचे देखील संरक्षण करु, मातांच्या आरोग्याचीही काळजी करु, मुलांच्या भविष्याची देखील चिंता करु आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो की, आपण एका भागीदारीसह, सहकार्यासह, खांद्याला खांदा लावून, देशाचा सर्वोच्च नेता का असेना, गावाच्या सर्वोच्च नेत्याहून कुणीही मोठे नसते. माझ्यासाठी गावाचा नेता खूप मोठा आहे, कारण जर त्यांची इच्छा असेल, तर तो आपल्या नेतृत्वाने, आपल्या मार्गदर्शनाने गावातील जीवन बदलवू शकतो आणि एकदा का भारतातील गावे बदलायला लागली, तर हा देश बदलायला वेळ लाणार नाही.

बंधू-भगिनींनो, ज्या सुविधा शहरात आहेत, त्या सुविधा गावांना देखील मिळायला हव्यात. आम्ही आताच ई-नाम नावाची योजना सुरु केली आहे. ही ई-नाम योजना शेतकऱ्यांचे खूप मोठे कल्याण करील. अजून ती प्राथमिक अवस्थेत आहे. आता काही त्रुटी देखील असतील, सुधारणा करत करत चांगली बनवण्याच्या दिशेने जाऊ देखील, मात्र ई-नाम योजना, राष्ट्रीय कृषी बाजारपेठ, आता शेतकरी आपल्या मोबाईल फोनवरुन ठरवू शकतो की, त्याला आपले धान्य कुठे विकायचे आहे. आपले पीक कुठे विकायचे आहे? जिथे जास्त पैसे मिळतील, तिथे विकेल. यासाठी आपल्यामध्ये जागरुकता हवी, या गोष्टींचा लाभ उठवण्यासाठी आपल्याकडे व्यवस्था असायला हवी, जर आपण त्या गोष्टी केल्या, तर तुम्ही बघाल की याचे परिणाम दिसू लागतील.

आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, विशेषत: माझे गावातील प्रिय बंधू-भगिनींनो, आमचा प्रयत्न आहे, आज शहरांमध्ये डिजिटल नेटवर्क आहे, जेवढे महत्त्व ‘हायवेज’चे आहे, तेवढेच महत्त्व ‘आय-वेज’चे आहे. इन्फॉरमेशन वेज, गावातील लोकांना देखील ती संपूर्ण माहिती हवी. म्हणूनच ऑप्टिकल फायबर नेटवर्क गावा-गावात पोहोचवायचे आहे. जी गावे जागृत होती, शेतांमधून ती पाईप टाकण्यासाठी सुविधा देतील. एवढ्या वेगाने काम होईल की, तुमच्या गावाला देखील आधुनिक जगाशी जोडणे सोपे जाईल. गावांनी स्वत: जागरुकता दाखवायला हवी, योजनांची कमतरता नाही, निधीची कमतरता नाही. निर्धारित वेळेत काम करण्याच्या निर्धाराची कमतरता नाही, गरज आहे ती चारही बाजूने सहकार्याची गरज आहे. सक्रियतेची गरज आहे योग्य दिशेने एकत्रितपणे चालण्याची. एकदा का गावाने सुरुवात केली की देशही करु लागेल.

याच विश्वासाने, आज पंचायत राज दिनी 10 दिवसांचे महाअभियान, प्रथमच देशातील अडीच लाख गावांमध्ये एवढे मोठे अभियान राबवण्यात आले. संपूर्ण सरकारची ताकद यामध्ये लागली. एक प्रकारे कार्यक्रमाचा समारोप, मात्र विचारांची सुरुवात होत आहे. संकल्पाची सुरुवात होत आहे. आपण सर्वांनी 10 दिवस ग्रामोदयचे स्वरुप समजून घेतले आहे. आता खऱ्या अर्थाने सुरुवात आहे, आगामी आमच्या कार्यकाळादरम्यान, जितकी वर्षे माझ्याकडे आहेत, पुढल्या वर्षीपर्यंत पंचायतचे प्रधान म्हणून पंचायतचा सदस्य म्हणून, एक-एक मिनटाचा उपयोग, एक-एक पैशाचा उपयोग, एकेका क्षणाचा उपयोग मी माझ्या गावाच्या ग्रामोदयसाठी सर्वोत्तम ग्रामोदयाची कल्पना करुन करेन. तेव्हाच भारतोदयचे माझे स्वप्न पूर्ण होईल. या कामासाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना निमंत्रण देतो, तुमच्या सहकार्याची अपेक्षा करतो.

मला झारखंड सरकारचे देखील अभिनंदन करायचे आहे. रघुबीर दास यांचे अभिनंदन करतो, तुम्ही मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये मोठ-मोठ्या उद्योगांसाठी एक खिडकी प्रणालीची चर्चा, तर ऐकली असेल, उद्योगांसाठी एक खिडकी प्रणालीबाबत प्रत्येक सरकार बोलते. मात्र रघुबीर दास जे आहेत, शेतकऱ्यांसाठी अविरत झटणारे सरकार, ते म्हणतात की, आम्ही शेतकऱ्यांसाठी एक खिडकी सुरु करु. आज शेतकऱ्यांसाठी एक खिडकीची जी योजना सुरु केली आहे, त्यांच्या कल्पकतेसाठी, त्यांच्या या योजनाबद्ध उपक्रमासाठी मी रघुबीर दास यांचे आणि झारखंडच्या सरकारचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो. त्यांना खूप-खूप शुभेच्छा देतो.

एवढा मोठा कार्यक्रम, मी पाहतोय, आज 40-45 अंश सेल्सिअस तापमान आहे, मात्र जेव्हा मी आलो, तेव्हा संपूर्ण स्टेडियम खचाखच भरलेले होते. एवढा अभूतपूर्व उत्साह, जोश, एवढा मोठा यशस्वी कार्यक्रम केल्याबद्दल मी श्रीयुत रघुबीर दास आणि सरकारचे आणि झारखंडच्या जनतेचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो आणि देशभरात इंटरनेटच्या माध्यमातून, दूरचित्रवाणीच्या माध्यमातून, ग्रामसभेमध्ये जे लोक बसले आहेत. त्यांच्या शेतकरी बंधूंना, ग्रामसभेतील बंधूंना, त्या ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींना पुन्हा एकदा धन्यवाद देतो, अभिनंद करतो आणि मी पुन्हा एकदा विनंती करतो की, ग्रामोदयाचा विडा उचला, ग्रामोदयाचा संकल्प करुन चालत रहा. आजपासून आपण सुरुवात करु, आता थांबायचे नाहीये, थकायचे नाहीये. अविरत चालत रहायचे, गावांची स्वप्ने पूर्ण करायची आहेत. महात्मा गांधी यांची 2019 मध्ये दीडशेवी जयंती आहे, तोपर्यंत गांधीजींच्या स्वप्नातील गाव निर्माण करुन दाखवू असा निर्धार करुन चला, या एका अपेक्षेवर तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा,

धन्यवाद!

S. Kane/B. Gokhale