पीएम्इंडिया
भारतीय रेल्वे व्यापक तंत्रज्ञान आणि पायाभूत अद्ययावतीकरणाच्या माध्यमातून आधुनिकीकरणाच्या मार्गावर
संशोधनात्मक उद्यमशीलतेला चालना आणि स्टार्ट-अप उपक्रमाला पाठिंबा
अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर : उच्च दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणारी सर्वोत्कृष्ट दर्जाची संस्था बनणार
अद्ययावत तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून वाहतूक क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने कुशल मनुष्यबळ आणि क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने वडोदरा येथे पहिले राष्ट्रीय रेल्वे आणि वाहतूक विद्यापीठ उभारण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या परिवर्तनीय उपक्रमाला मंजुरी दिली आहे.पंतप्रधानांच्या प्रेरणेतून ही नाविन्यपूर्ण संकल्पना आली असून नवीन भारताच्या दिशेने रेल्वे आणि वाहतूक क्षेत्राचे परिवर्तन घडवून आणण्यात महत्वपूर्ण ठरेल.
यूजीसी नियमन 2016 नुसार अभिमत विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाची स्थापना केली जाईल. एप्रिल 2018 पर्यंत सर्व मंजुऱ्या मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या आणि जुलै 2018 मध्ये पहिला शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु करण्याच्या दिशेने सरकार प्रयत्नशील आहे.
कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अन्वये बिगर नफा तत्वावर रेल्वे मंत्रालय कंपनी निर्माण करणार असून या प्रस्तावित विद्यापीठाची ती व्यवस्थापन कंपनी असेल. ही कंपनी विद्यापीठाला आर्थिक आणि पायाभूत साहाय्य पुरवेल तसेच कुलपती आणि प्रति-कुलपती यांची नियुक्ती करेल. व्यावसायिक आणि शिक्षण तज्ज्ञांचा समावेश असलेले व्यवस्थापन मंडळ व्यवस्थापन कंपनीपेक्षा स्वतंत्र असेल आणि त्याला सर्व शैक्षणिक आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडण्याची स्वायत्तता असेल.
वडोदरा येथील भारतीय रेल्वेच्या राष्ट्रीय अकादमीची सध्याची जमीन आणि पायाभूत सुविधा यांचा वापर करून त्यात योग्य सुधारणा करून विद्यापीठासाठी त्याचे आधुनिकीकरण केले जाईल. यामध्ये तीन हजार पूर्णवेळ विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. या नवीन विद्यापीठासाठी रेल्वे मंत्रालय संपूर्ण निधी देईल.
हे विद्यापीठ भारतीय रेल्वेला आधुनिकीकरणाच्या मार्गावर घेऊन जाईल आणि उत्पादकता वाढवून तसेच ‘मेक इन इंडिया ‘ला प्रोत्साहन देऊन वाहतूक क्षेत्रात भारताला जगाचे नेतृत्व करण्यासाठी सहाय्यक ठरेल. विद्यापीठ कुशल मनुष्यबळ निर्माण करेल आणि भारतीय रेल्वेमध्ये उत्तम सुरक्षा, गती आणि सेवा प्रदान करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करेल. हे विद्यापीठ स्टार्ट-अप इंडिया आणि स्कील इंडियाला समर्थन देईल आणि उद्यमशीलता वाढवण्याबरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करेल. यामुळे रेल्वे आणि वाहतूक क्षेत्रात परिवर्तन होईल आणि प्रवासी आणि मालवाहतुक गतिमान होईल.
A.Sharma/S.Tupe/S.Kane/Anagha