Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वडोदरा येथे हरनी विमानतळाच्या एकात्मिक टर्मिनलचे उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी केलेले भाषण

वडोदरा येथे हरनी विमानतळाच्या एकात्मिक टर्मिनलचे उद्घाटनानंतर  पंतप्रधानांनी केलेले भाषण


मंचावर उपस्थित गुजरातचे राज्यपाल श्रीयुत ओम प्रकाश कोहली , गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी , उपमुख्यमंत्री नितीन भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्रीयुत अशोक गणपति राजू , जयंत सिन्हा, इथल्या खासदार श्रीमती रंजनबेन , या विभागातील आमदार मनिषाबेन , राज्य सरकारमधील मंत्री राजेंद्रजी , विभागाचे सचिव आर. एन.चौबे , भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ . गुरुप्रसाद महापात्र , उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो,

२०१४ च्या मे महिन्यात पंतप्रधान म्हणून तुम्ही सर्वांनी माझ्यावर कामाची जबाबदारी सोपवली होती. तेव्हा थोड्याच कालावधीत आम्ही दोन महत्वपूर्ण कामे केली. त्यापैकी एक काम असे होते ज्यासाठी गुजरात पाच दशके प्रतीक्षा करत होता, संघर्ष करत होता आणि अडचणींचा सामना करत होता. ते होते,सरदार सरोवर धरणाची उंची वाढवण्याचे काम .

सत्तेत आल्यानंतर , सुरुवातीच्या दिवसांतच आम्ही जे पहिले काम केले, त्यामध्ये एक होते सरदार पटेल यांच्या नावे बनलेल्या सरदार सरोवर योजनेची उंची वाढवण्याच्या कामाला मंजुरी देणे , आणि मी गुजरात सरकारचे अभिनंदन करतो कारण ज्या वेगाने ते हे काम पुढे नेत आहेत , मला विश्वास आहे कि मुदतीपूर्वीच गुजरात सरकार हे काम पूर्ण करून दाखवेल.

दुसरे, हे विमानतळ बांधण्याचे काम. याचे काम देखील २०१४ च्या जून-जुलै मध्ये सुरु करण्यात आले आणि आज भारतातील जी प्रसिद्ध विमानतळ मानली जातात त्यामधील एक विमानतळ वडोदराचेही मानले जाईल.

सध्या भारत सरकार स्थापत्य क्षेत्रात जे काही काम करत आहे, त्यामध्ये एका गोष्टीवर भर दिला जात आहे की, पर्यावरणाला अनुकूल असावे आणि पर्यावरण व्यवस्थेचा विचार केलेला असावा. मला आनंद होत आहे कि भारतात नवीन सरकार आल्यानंतर दोन विमानतळ अशा प्रकारच्या हरित आंदोलनाचा भाग बनले आहेत. एका विमानतळाचे उदघाटन केरळमधील कोच्ची इथे करण्यात आले आणि दुसरे आज वडोदरा विमानतळ, जे राष्ट्राला समर्पित केले जात आहे.

हे टर्मिनल कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्यावर आधारित,ऊर्जेची बचत करणारे आणि पर्यावरणाला अनुकूल आहे. जेव्हा अशा प्रकारच्या प्रतिष्ठित इमारती तयार होतात , तेव्हा सामान्य जनतेचा उत्साह देखील अशा प्रकारचे काम पाहून वाढतो. सुरुवातीला या गोष्टी जास्त महाग असतात मात्र एकदा सरकारने हस्तक्षेप केला आणि सुरुवात केली तर सामान्य नागरिकांसाठी देखील त्या आर्थिकदृष्ट्या कमी किंमतींत तयार होतात.

एक काळ होता जेव्हा कोळशावर चालणाऱ्या विजेच्या कारखान्याच्या आजूबाजूला कोळशाच्या राखेचे ढीग असायचे. विजेच्या कारखान्यापेक्षा जास्त ढीग कोळशाच्या राखेचा असायचा. आणि कोळशाची राख उचलण्यासाठी पैसे द्यावे लागायचे . आजूबाजूला राहणारे लोक ओरडत असायचे कि बाबांनो , हे हटवा , आम्ही मारून जाऊ . या टर्मिनलच्या इमारतीत ज्या विटांचा वापर झाला आहे त्या कोळशाच्या राखेपासून बनलेल्या विटा आहेत. यामुळे मजबुती देखील मिळते आणि जो कचरा उचलण्यासाठी खर्च करावा लागत होता त्याचाच उपयोग इथे करण्यात आला आहे आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यात आले आहे.

भारतात हवाई क्षेत्र खूप वेगाने प्रगती करत आहे. त्याचा विकास खूप जलद आहे. आता मध्यमवर्गीय कुटुंबाची विमानप्रवास करण्याची इच्छा असते, त्याला रेल्वेने प्रवास करणे आवडत नाही. नातेवाईक विचारतील, अरे रेल्वेने आलास? त्यामुळे त्यांना वाटते कि नको, आपण विमानातून जायला हवे. हे आता आपल्या देशात प्रतिष्ठेचे बनले आहे

एक अंदाज आहे कि भारतातील विमानतळांवर पाच वर्षात अशी परिस्थिती असेल कि अमेरिकेची जेवढी लोकसंख्या आहे तेवढे लोक आपल्या देशात वर्षभरात विमानतळांवर असतील. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता कि हवाई क्षेत्र किती विकसित होणार आहे . भारत बहुधा नजीकच्या काळात जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनेल जो विमानतळ परिचालनाची मानके पूर्ण केलेला असेल . यामुळे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत , यामुळे आर्थिक घडामोडी आणि व्यापाराला गती मिळणार आहे.

देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रथमच या सरकारने स्वतंत्रपणे हवाई धोरण आखले. आपल्या देशात विमाने उडत होती, विमानतळ बनत होते , विमानांची खरेदी-विक्री होत होती , मात्र देशाचे हवाई धोरण आखले नव्हते आणि म्हणूनच पाच वर्षात ते कुठे न्यायचे आहे, दहा वर्षात किती मजल मारायची आहे , देशाच्या सामान्य नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काय करायचे आहे ? याबाबत कोणताही दृष्टिकोन नव्हता.

चालत होते , ते चालत होते , धावत होते ते धावत होते , थांबायचे तर थांबायचे , असे सर्व होते.

हा देश खूप विशाल आहे . ८० किंवा १०० विमानतळांसह आपण देश चालवण्याबाबत विचार करत असू तर आपण देशाच्या विकास प्रवासात अडथळे निर्माण करत आहोत. टायर-२ , टायर-३ श्रेणीच्या शहरांमध्येही तेवढीच क्षमता असते जेवढी वरच्या श्रेणीतील शहरांमध्ये असते. जर त्यांना हवाई क्षेत्राचा लाभ मिळाला तर देशाच्या विकास प्रवासाचे नवे आयाम खुले होतील. आणि म्हणूनच त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ५०० किलोमीटरच्या हिशोबाने २५०० रुपये असे तिकीट आहे जेणेकरून कुठे दूर नागालंडला जायचे असेल किंवा कुणाला अरुणाचलला जायचे आहे किंवा कुणाला मिझोरमला जायचे आहे , कुणाला अंदमान-निकोबार जायचे आहे, लक्षद्वीप जायचे आहे , कुणाला कच्छला जायचे आहे , कुणाला भावनगर , जुनागढ जायचे आहे .. अशी क्षेत्रे आहेत जिथे आज वाहतूक नाही , जिथे जुन्या काळापासून धावपट्टी बनून तयार आहे .तर खूप मोठ्या प्रमाणावर विस्ताराचे काम सुरु आहे. आणि हे खासगी-सार्वजनिक भागीदारीच्या मॉडेलवर काम होणार आहे.

आज जग जशा प्रकारचे आहे त्यामध्ये संपर्काला खूप महत्व आहे. प्रत्यक्ष जोडणी देखील हवी , डिजिटल जोडणी देखील हवी . जर हायवे हवा तर आय-वे देखील हवा. माहितीची लाट देखील गरजेची आहे. त्याच प्रकारे हवाई वाहतुकीची देखील तेवढीच आवश्यकता आहे. पर्यटन क्षेत्रात आज हवाई सेवेची खूप मोठी गरज आहे.

भारतात पर्यटनाची प्रगती वेगाने होत आहे. .अपार क्षमता आहेत. जर आपण लोकांना ठिकठिकाणी जाण्याची सुविधा दिली तर ते दोन-तीन दिवस जास्त राहतात. जास्त राहिले आणि जास्त खर्च केला तर तिथल्या अर्थव्यवस्थेला खूप बळ मिळते. तर या दृष्टीने हवाई वाहतुकीद्वारे बहु -आयामी आर्थिक संधी निर्माण होतात. त्या गोष्टी ध्यानात घेऊन हवाई क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारने केला आहे.

वडोदरावासीयांना हि नवीन भेट आज मिळत आहे. मला विश्वास आहे कि वडोदराची स्वतःची एक ओळख तर आहेच, त्या ओळखीला चार चाँद लावण्याचे काम हि व्यवस्था करेल.

वडोदरा एक सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते , मात्र त्याचबरोबर वडोदरा शैक्षणिक केंद्र देखील आहे. तांत्रिक शिक्षणात वडोदराने आपले एक स्थान निर्माण केले आहे. वडोदरा आणि विद्यानगर यांनी त्या दिशेने खूप काम केले आहे . या गोष्टी लक्षात घेऊन भारत सरकारने एक खूप महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्याचा परिणाम येणाऱ्या संपूर्ण शतकावर राहणार आहे. शंभर वर्षे ज्याचा प्रभाव जाणवेल असा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो निर्णय आहे ,वडोदरा येथे देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ स्थापन होणार आहे.

संपूर्ण जग रेल्वेच्या क्षेत्रात जर १०० क्रमांकावर पोहोचत आहे तर भारत १०व्या क्रमांकावर आहे. आज देखील आपले डबे, त्यांचा वेग , तो झेंडा दाखवणारा ते सर्व तसेच आहे. जग बदलले आहे . खूप अभिनव प्रयोग झाले आहेत . जुनी रेल्वे आहे मात्र तिला आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांद्वारे भारताच्या गरजांनुसार बदलता येऊ शकते. त्या कामाला प्राधान्य देण्यासाठी भारत सरकारने , भारतीय रेल्वेने वडोदराची निवड केली आहे.

या वर्षी रेल्वे विद्यापीठ , जे भारतातील पहिले असे विद्यापीठ आहे , ते तुमच्या वडोदरा शहरात बनणार आहे. त्यावरून तुम्ही कल्पना करू शकता कि किती मोठे योगदान वडोदरा देशासाठी देणार आहे.

आज मला तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली . मी तुम्हा सर्वांचा खूप-खूप आभारी आहे , एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात, मला आशिर्वाद दिलेत.

PIB/ B. Gokhale/S.Kane