Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण यासाठी बेलारूसबरोबर केलेल्या सामंजस्य कराराला मान्यता


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण यासाठी बेलारूसबरोबर केलेल्या सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली. बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को भारत भेटीवर आले होते त्यावेळी उभय देशांमध्ये यासंबंधीचा सहकार्य करार 12 सप्टेंबर, 2017 रोजी करण्यात आला होता.
या सामंजस्य करारानुसार भारत आणि बेलारूस यांच्यामध्ये व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यात येणार आहे.

बेलारूसमध्ये मोठ्या प्रमाणावर विशेषतः अवजड उद्योग असून उत्पादनही तितक्याच मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे मनुष्यबळ विकास चांगला झाला आहे. त्याचबरोबर कौशल्य विकासही होत आहे. याचा लाभ भारताला करून घेवून ‘मेक इन इंडिया’ आणि ‘‘स्किल इंडिया’’ या अभियानाला अधिक बळकटी आणता येणार आहे. या करारामुळे बेलारूसचे तंत्रज्ञान, कौशल्य आणि उत्पादन क्षेत्रामध्ये मनुष्य बळाचा वापर प्रभावीपणाने करण्याचे ज्ञान भारताला मिळणार आहे.

भारत आणि बेलारूसमध्ये पुढील क्षेत्रात सहकार्य करण्यात येणार आहे.

नवनवीन तंत्रज्ञान बेलारूस पुरवणार आहे. दूरस्थ शिक्षण, ई-शिक्षण,प्रशिक्षण, उद्योगांचे जाळे तयार करणे.

बांधकाम, विद्युत-ऊर्जा निर्मिती आणि वितरण, उत्पादन उद्योग, व्यापार, स्वयंचलित वाहन व्यवसाय, घरगुती वापराच्या यंत्रांची दुरूस्ती यासारख्या विविध क्षेत्रात भारतीयांचे कौशल्य विकसित करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण सेवा बेलारूस देणार आहे. त्याचबरोबर वाहतूक, दूरसंचार, उपाहारगृह या क्षेत्रांनाही भारतात भरपूर मागणी आहे.

प्रशिक्षण देणे, व्यावसायिक शिक्षण देणे, प्रशिक्षण व्यवस्थापक, शिक्षक, प्रशिक्षक तयार करण्याचं काम बेलारूस भारतीयांसाठी करणार आहे.

व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण तसेच कौशल्य विकासाबरोबरच नियोजन, व्यवस्थापन यांच्यामध्ये चांगली सुधारणा होण्यासाठी सल्ला सेवाही देण्यात येणार आहे.

मुख्य प्रभावः-

– बेलारूसच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे एकूण भारताच्या कौशल्य विकसन प्रणालीत कमालीची सुधारणा होईल.

– नवसंकल्पनांचे प्रकल्प राबवणे शक्य होईल. आणि व्यावसायिक प्रशिक्षण तसेच कौशल्य विकसनामुळे संशोधनातून विकास साध्य होईल.

निधीची उपलब्धता आणि प्रत्येक प्रकल्पाची आवश्यकता लक्षात घेवून या सहकार्य कराराची अंमलबजावणी करताना निधी खर्च करण्यात येणार आहे.

N.Sapre/S.Bedekar/Anagha