पीएम्इंडिया
महामहिम, पंतप्रधान न्युमेन झुआन फुक
सन्माननीय अतिथी,
झिन चाओ
मी आणि माझ्या प्रतिनिधीमंडळातल्या सदस्यांचे स्नेहपूर्ण स्वागत केल्याबद्दल व्हिएतनाम सरकार आणि नेतृत्वाचे मी आभार मानतो.
मित्रहो,
व्हिएतनाम-भारत यांच्यातले, तसंच दोन्ही समाजातल्या संबंधांची जोपासना करण्यासाठी माझी ही व्हिएतनाम भेट आहे. या दोन देशात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध फार पूर्वीपासून आहेत याची मुळं अगदी दोन हजार वर्षापासून आहेत. हे सांस्कृतिक बंध अनेक मार्गांनी प्रतिबिंबित होत असतात. लगतच्या दशकात आपल्या जनतेची प्रगती आणि भरभराटीसाठीच्या आपल्या आकांक्षेने या संबंधाना आकार दिला आहे. इतर विकसनशील राष्ट्रांना आपले ज्ञान, अनुभव देऊ करण्यावर भारताचा विश्वास आहे. गेल्या चार दशकांपासून व्हिएतनामबरोबर असलेले यशस्वी बहुआयामी द्विपक्षीय संबंध हे याचे उत्तम उदाहरण. कू लाँग डेल्टा राईस रिसर्च इन्स्टिट्यूट हे या सहकार्याचे ठळक उदाहरण. मेकाँग डेल्टा इथे भारताने कृषी तज्ञ पाठवून तसेच या संस्थेच्या विविध विषय शाखा प्रमुखांना प्रशिक्षण देऊन या संस्था उभारणीसाठी भारताने मदत केली. सध्या व्हिएतनाम हा देश जगातला तिसरा मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. मोठा तांदूळ उत्पादक आणि निर्यातदार देश म्हणून व्हिएतनाम पुढे येत असल्याच्या या वाटचालीत भारताचीही भागीदारी आहे याचा आम्हाला आनंद आहे.
मित्रहो,
दोन भागीदार म्हणून आपण आपल्या समन्वयाचा, संयुक्त लाभ घेत, समोर ठाकणाऱ्या प्रादेशिक आव्हानांचा मुकाबला करायला हवा तसेच नवनव्या संधींचा शोध घ्यायला हवा. उभय देशातल्या संबंधांना सर्वंकष धोरणात्मक भागीदारी हा आयाम देण्याचा निर्णय घेण्याबद्दल आम्हाला आनंदच आहे. उभय देशात राजनैतिक संबंध स्थापित झाल्याचा 45 वा वर्धापनदिन आणि धोरणात्मक भागीदारीचा दहावा वर्धापनदिन पुढच्या वर्षी येत आहे. येत्या काही महिन्यातच आपण संयुक्तपणे हा महत्वाचा टप्पा साजरा करु.
मित्रहो,
भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील मजबूत भागीदारी आपल्याला जनतेची तसेच प्रदेशाची भरभराट, विकास, शांतता आणि स्थैर्याकडे नेईल असा मला विश्वास आहे. ॲक्ट इस्ट अर्थात पूर्वेकडे पहा या भारताच्या धोरणाचा व्हिएतनाम हा मजबूत स्तंभ आहे. परस्परांवरचा प्रगाढ विश्वास, तसेच विविध प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांबाबत मत एकाभिमुखता यावर आपले द्विपक्षीय संबंध आधारलेले आहेत.
महामहिम, स्त्री-पुरुषहो,
व्हिएतनामचे पंतप्रधान न्युमेन झुआन फुक तसेच उपस्थित समुदायाच्या आरोग्य आणि आनंदासाठी.
व्हिएतनामचे नेतृत्व आणि जनतेच्या प्रगती आणि भरभराटीसाठी, भारत आणि व्हिएतनामच्या चिरकालीन मैत्रीसाठी.
माझ्यासमवेत आपणही सहभागी व्हा यासाठी तुम्हाला निमंत्रण द्यायला मला आनंद होत आहे.
B.Gokhle/N.Chitle/V.Deokar