Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

श्री साईबाबा समाधीच्या शताब्दीपूर्ती समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


व्यासपीठावर उपस्थित राज्यपाल श्री विद्यासागर रावजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, सुभाष भामरे जी, साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सुरेश हावरेजी, महाराष्ट्रातील सर्व मंत्री, संसदेतील माझे सहकारी, राज्य विधानसभेतील आमदार आणि आज इथे मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या बंधूभगिनींनो, तुम्हा सगळ्यांना, संपूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण देशाला देशातील तमाम जनतेला विजयादशमीच्या अनेक अनेक शुभेच्छा !

आपले सणउत्सव आपल्या लोकांसोबत साजरे करता यावेत, अशी आपल्या सगळ्यांचीच अशी इच्छा असते. आपला प्रत्येक उत्सव देशातल्या जनतेसोबत साजरा करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. आणि याच भावनेतून आज इथे तुमच्यासोबत हा उत्सव साजरा करण्याचे भाग्य मला मिळाले आहे.

आज दसऱ्याच्या या पवित्र दिवशी तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येने मला आशीर्वाद देण्यासाठी जमले आहात. मला दिसतयं की कुठे बसायला जागाच उरलेली नाही, तुमच्यापैकी अर्धे जण तर बाहेर उन्हात उभे आहेत. मी तुमच्या सगळ्यांचा आणि तुमचे हे प्रेम, स्नेह, आपलेपण, हेच माझे सामर्थ्य आहे, माझी ताकद आहे. तुमच्या या प्रेमामुळेच मला एक नवी ऊर्जा, नवी ताकद मिळते.

मित्रांनो, दसऱ्यासोबतच आज शिर्डीच्या या पवित्र भूमीत आपण आणखी एका पवित्र क्षणाचे साक्षीदार बनलो आहोत. साईबाबांच्या समाधीच्या शताब्दी महोत्सवाची सांगता आज होते आहे. थोड्यावेळापूर्वीच मला साईबाबांचे दर्शन करण्याची, त्यांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली. जेव्हाही मी पूज्य साईबाबांचे दर्शन करतो, त्यांचे स्मरण करतो, तेव्हा त्यांच्या कोट्यवधी भक्तांप्रमाणे, माझ्याही मनात जनसेवेची, लोकसेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याची भावना जागृत होते, या भूमीवर मनाला एक नवी उभारी मिळते, कामाचा उत्साह येतो.

बंधू आणि भागिंनीनो, साईबाबांचे मंत्र, त्यांची शिकवण आपल्याला शिर्डीच्या कणाकणात बघायला मिळते. लोकसेवा, त्याग आणि तपस्येचा विषय जेव्हाही कोणत्या चर्चेत निघतो, तेव्हा प्रत्येकजण शिर्डीचे उदाहरण देतो. हे शिर्डी गाव आमच्या तात्या पाटील यांचं गाव आहे, दादा कोते पाटील यांचं गाव आहे. ही माधवराव देशपांडे, माल्सापती यांच्यासारख्या महापुरुषांची धरती आहे. काशीराम शिपि आणि आप्पा जागले यांनी साईबाबांची त्यांच्या अखेरच्या दिवसापर्यंत सेवा केली. कोंडाजी, गवाजी आणि तुकाराम यांचे नाव आणि कार्य कोण विसरू शकेल? या पवित्र भूमीवरच्या महान सुपुत्रांना मी आज वंदन करतो आहे.

बंधूभगिनींनो, साईबाबांचा मंत्र आहेसबका मलिक एक है!” साईंचे हे चार शब्द जणू काही सर्व समाजाला एकत्र करण्याचे सूत्रवाक्य बनले आहे. साई समाजाचे होते आणि समाज साईबाबांचा. साईबाबांनी समाजाची सेवा करण्याचे काही मार्ग सांगितले होते आणि मला आज हे पाहून अतिशय आनंद होतो आहे, की श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ  त्याच मार्गाने जात सातत्याने समाजाची सेवा करते आहे.

शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला सशक्त करण्याचे काम असो, अथवा मग अध्यात्माच्या मार्गाने समाजाच्या विचारात परिवर्तन घडवून आणायचे असो, समाजात समरसता आणि सह्भावना जागृत करायची असेल, अशा सर्व कार्यांसाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत.

आजही या भूमीवरून आस्था, अध्यात्म आणि विकासाशी संबंधित अनेक प्रकल्पांचा शुभारंभ झाला आहे. आणि त्यासाठी मी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करतो. गरिबांच्या कल्याणासाठी इतकी मोठी योजना सुरु करण्याच्या दृष्टीने यापेक्षा अधिक चांगली कुठलीच जागा असू शकत नाही. साईबाबांच्या चरणाशी बसून गरिबांसाठी काम करण्याइतकी धन्यता आणखी कुठे मिळू शकेल?

आणि म्हणूनच, महाराष्ट्र सरकार अभिनंदनास पात्र आहेत. साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी बनणाऱ्या नव्या परिसराच्या भूमिपूजन समारंभात उपस्थित राहण्यात मला विशेष आनंद होत आहे. आजच इथे साईबाबा इंग्लिश मिडीयम शाळा, कन्या विद्यालय आणि महाविद्यालयाची पायाभरणी होत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की साईबाबांच्या जीवनतून प्रेरणा घेत त्यांचे दर्शन घेऊन सुरु होणाऱ्या यासाई नॉलेज पार्कमध्येविद्यार्थ्यांना साईबाबांची शिकवण सहजतेने आत्मसात करता येईल.

मित्रांनो, आज इथे दहा मेगावॉटच्या एका सौर प्रकल्पाचेही काम सुरु झाले आहे. यामुळे साई संस्थानाच्या उर्जा स्त्रोतात वाढ होईल. आणि स्वच्छ उर्जेच्या क्षेत्रात संस्थानाचे मोठे योगदान राहील. एकप्रकारे, साई विश्वस्त मंडळाकडून, आज दसऱ्यानिमित्त, साईभक्तांना मिळालेली ही एक मोठी भेटच आहे.

मित्रांनो, नवरात्रीपासून ते दिवाळीपर्यतच्या सणासुदीच्या काळात देशातला प्रत्येक व्यक्ती घर, गाडी, दागिने अशा सामानाची खरेदी करतो. ज्याची जेवढी शक्ती असेल, तो त्यानुसार पैसे वाचवतो आणि आपल्या कुटुंबासाठी काहीतरी भेटवस्तू खरेदी करतो. मला याचा खूप आनंद आहे की दसऱ्याच्या या पवित्र, मंगल दिवशी  मला महाराष्ट्रातील अडीच लाख बंधूभगिनींना आपले स्वतःचे घर देण्याची संधी मिळते आहे.

हे माझे बंधूभगिनी ज्यांच्यासाठी, स्वतःचे घर नेहमीच एक स्वप्न राहिले आहे. अशा माझ्या या विशाल कुटुंबांतील सर्व सदस्यांचा एकत्रित गृहप्रवेश करवणे ही माझ्यादृष्टीने माझ्या गरीब बंधूभगिनींची सर्वात मोठी सेवा आहे. या सेवेपेक्षा मोठी पूजा कोणती असू शकेल?

तुम्हा सर्वांना, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत, तयार झालेल्या या नव्या घरांमध्ये गृहप्रवेश करण्याच्या, आयुष्याच्या एका महत्वाच्या क्षणासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. ही नवी घरे तुमच्या स्वतःच्या स्वप्नांचे प्रतीक तर आहेतच, सोबतच ते तुमच्या आशा आकांक्षांना नवे पंख देणार आहेत. तुमचे आयुष्य, तुमच्या मुलांचे आयुष्य एका सार्थक बदलाच्या मार्गावरून पुढे जात आहे. गरीबीवर विजय मिळवण्याच्या लढाईत, हे सर्वात महत्वाचे पहिले पाउल आहे.

मित्रांनो, ‘आपलं स्वतःचं घरआयुष्य जगण्यास सोपं बनवतं. आणि गरिबीशी लढण्याचा नवा उत्साह देते. घरामुळे एक सन्मानाचा भाव निर्माण होतो. आणि हेच लक्षात घेऊन, आम्ही 2022 पर्यत, जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत, तेव्हा देशातल्या प्रत्येक बेघर कुटुंबाला त्याचे स्वतःचे घर देण्याचे उद्दिष्ट घेऊन आम्ही काम करतो आहोत.

मला अत्यंत आनंद आहे की हे उद्दिष्ट गाठण्याचा जवळपास अर्धा रस्ता आम्ही इतक्या कमी वेळात पार केला आहे. बंधू आणि भगिनिनो, गरीब असो वा मध्यमवर्ग, गेल्या चार वर्षांपासून त्यांना झोपड्या किंवा भाड्याच्या घरातून, त्यांच्या स्वतःच्या घरात प्रवेश देण्यासाठी सरकार अतिशय गांभीर्याने प्रयत्न करत आहे. याआधीही असे प्रयत्न अनेकदा झाले आहेत, मात्र दुर्दैवाने अशा प्रयत्नांचा उद्देश गरिबांना सक्षम करणे हा नव्हे, तर केवळ एका कुटुंबाच्या  नावाचा प्रचार करणे हाच होता.

केवळ आपली मतपेढी तयार करणे हेच त्यांचे लक्ष्य होते. एक चांगले घर असावे, त्यात शौचालय असावे, वीज असावी, पाण्याची सोय असावी,गैसची व्यवस्था असावी, असा समग्र विचार याआधी कधीच केला गेला नाही. एखाद्या योजनेच्या मूळाशी राजकीय स्वार्थ असेल, असे आता केंद्र सरकारमध्ये कधीच घडत नाही. राजकीय स्वार्थाऐवजी आता फक्त आणि फक्त गरिबांच्या कल्याणाचाच विचार केला जातो. त्यातून त्यांचे जीवन अधिक सोपे करण्याची प्रेरणा मिळते. अशा प्रेरणेतून कामाची गती कशी वाढते याचे प्रत्यक्ष उदाहरण सरकारच्या कामातून आज देशभरातील जनतेला दिसते आहे.

मित्रांनो, या आधी जी सरकारे होती त्या सरकारने आपल्या शेवटच्या चार वर्षात संपूर्ण देशात केवळ 25 लाख घरे बनवली होती. चार वर्षात 25 लाख.. किती? जरा बोला ना, काय झालं? चार वर्षात किती घरे बनविली होती? 25 लाख फक्त! मात्र गेल्या चार वर्षात, जेव्हापासून आमचे सरकार सत्तेत आले आहे, आम्ही देशभरात 1 कोटी 25 लाख घरे बांधली आहेत. त्यांनी चार वर्षात 25 लाख घरे बांधली आणि आम्ही तेवढ्याच कालावधीत 1 कोटी 25 लाख घरे बांधली आहेत.

म्हणजे जर तेच सरकार असतं, तर इतकी घरे बनवायला, २० वर्षे लागली असती. आणि तुम्हाला तुमचे घर मिळण्यासाठी २० वर्षे थांबावं लागलं असतं. वेगाने काम करणारे सरकार, गरिबांना तितक्याच वेगाने त्यांचे हक्क आणि लाभ कसे देते याचे हे उदाहरण आहे. आणि तुम्ही बघा, सगळं तर तेच आहे. तीच साधने, तेच स्त्रोत, काम करणारी माणसेही तीच, मात्र गरिबांची सेवा करण्याच्या भावनेतून ज्यावेळी काम केलं जातं, त्यावेळी अशाच वेगाने आपल्याला त्या कामाची फळे मिळतात.

बंधूभगिनिंनो, आधीच्या सरकारमध्ये एक घर बनवायला जवळपास 18 महिने लागत असत, दीड वर्ष लागत असे. या सरकारमध्ये एका वर्षाच्या आत, म्हणजे जवळपास 12 महिन्यांपेक्षाही कमी वेळेत घर बांधून पूर्ण होते. घर बांधण्याचा वेळ तर वाचला आहेच, पण त्यासोबत आम्ही घराचं क्षेत्रफळ देखील वाढवलं आहे. त्यासोबतच घर बनवण्यासाठी मिळणारी सरकारी मदतीची रक्कमही 70 हजार रुपयांवरुन 1 लाख 20 हजार रुपयांपर्यत वाढवली आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, याचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. लाभार्थ्यांची निवडही वस्तूनिष्ठ आणि पारदर्शक पद्धतीने होते आहे. इतकेच नाही, तर हे घर उत्तम दर्जाचे असेल, टिकावू असेल, त्यात शौचालयासहित सर्व सुविधा असतील याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत, आज इथे घर मिळालेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. आणि आज मला इथे वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्या लाभार्थी भगिनींच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, यामुळे मला किती समाधान मिळाले, याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही. जेव्हा मी कोणत्याही गरीब कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद बघतो, तेव्हा माझे जीवन, मी करत असलेले काम सफल झाले, असे मला वाटते. नव्याने काम करण्याची र्जा मला त्यातून मिळते. आज इथल्या या सगळ्या बहिणींनी मला जे आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आमचा संकल्प इथे सांगतो, की तुमच्या सेवेसाठी आम्ही आमच्या आयुष्यातला कण कण वेचू.

बंधू आणि भगिनींनो, देशातल्या प्रत्येक घरात शौचालयाची सुविधा देण्याच्या अभियानाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्राने तर याबाबतीत अतिशय प्रशंसनीय कार्य केलं आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून काम करत महाराष्ट्राला हागणदारीमुक्त राज्य म्हणून घोषित केलं आहे. यासाठी राज्यातल्या 11 कोटी नागरिकांचे मी अभिनंदन करतो. यामुळे महाराष्ट्रातील गावे आणि गल्ल्या तर स्वच्छ होतीलच, शिवाय हागवणीसारख्या आजारांपासून गरिबांच्या मुलांचे संरक्षण होईल. शेतकऱ्याची मुले सुरक्षित राहतील.

मित्रांनो, जेव्हा गरिबांच्या आयुष्याची आणि आरोग्याची चर्चा होते,तेव्हा सध्या तर संपूर्ण जगात आयुष्मान भारत म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची चर्चा सुरु आहे. या अंतर्गत, दरवर्षी देशातील सुमारे 50 कोटी नागरिकांना गंभीर आजारांमध्ये मोफत उपचार मिळणार आहेत.

महाराष्ट्रातील लाखो परिवारांपर्यतही या योजनेचा लाभ पोहोचणार आहे. अद्याप तर ही योजना सुरु होऊन एक महिनाही नाही झाला, मात्र देशभरातल्या रुग्णालयांमध्ये जवळपास 1 लाख रुग्णांनी आतापर्यत या योजनेचे लाभ घेतले आहेत. या योजनेमुळे कुठल्यातरी गरीबाच्या मूत्रपिंडाच्या विकारावर उपचार झालेत, तर कुठल्या गरीबाच्या ट्युमरची शस्त्रक्रिया झाली. कोणाचे 50 हजार रुपयांचा उपचारांचा खर्च दिला गेला तर कोणाचा तीन लाख रुपयांचा.

मित्रांनो, या योजनेअंतर्गत, आतापर्यत विम्याच्या रकमेचे जे दावे करण्यात आले आहेत, ते सरासरी प्रत्येक व्यक्तीमागे 20 हजार रुपये इतके आहेत. तुम्ही जरा विचार करा, हजारो रुपयांची ही रक्कम गरिबाला आपल्या खिशातून भरावी लागली असती. तो कदाचित एवढी रक्कम खर्चही करू शकला नसता, आणि म्हणूनच तो रुग्णालयात जाणे टाळत असे. आता मात्र सरकारने अशा गरिबांना आधार दिला आहे, त्यांना सांगितलं आहे की पैशांची चिंता करु नका. आधी आपले उपचार पूर्ण करा.

मित्रांनो, आयुष्मान भारत योजनेमुळे देशात आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांचे जाळे वाढत चालले आहे. विशेषतः द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये हजारो नवी रुग्णालये सुरु होण्याची शक्यता वाढली आहे. ह्या रूग्णालयांमुळे देशातल्या युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत.

बंधूभगिनीनो, समाजातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावी, सर्वांचे आयुष्य सुलभ आणि सरळ असावे हेच लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून सरकार काम करत आहे. मला असे कळले आहे, की महाराष्ट्रातील काही भागात पावसाची कृपा कमी झाली, म्हणावा तसा पा पडलेला नाही. मी आज इथे तुम्हाला आश्वस्त करतो, की प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लवकरात लवकर मदत मिळेल. याशिवाय, महाराष्ट्र सरकार जी पावले उचलेल, त्यात केंद्र सरकार, खांद्याला खांदा लावून पूर्ण सहकार्याने सोबत उभे राहील.

बंधूभगिनींनो, पाण्याच्या या संकटातून देशातल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठीच सरकार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे काम करत आहे. या अंतर्गत, महाराष्ट्रातही अनेक मोठ्या प्रकल्पांचे काम सुरु आहे. महाराष्ट्र सरकारनेही आपल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत पाणीटंचाईवर मात करण्याचा अभूतपूर्व प्रयत्न केला आहे. या अभियानामुळे राज्यातली १६ हजार गावे दुष्काळमुक्त झालीत आणि सुमारे, हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे काम वेगाने सुरु आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे.

महाराष्ट्रातील जनतेने, सिंचन तलावांमधला गाळ काढण्याचे अभियानही यशस्वीपणे राबवले आहे, यासाठी मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो. सिंचन तलावातून 9 कोटी घनमीटर इतका गाळ काढणे सोपे काम नाही. मात्र तुम्ही सगळ्यांनी लोकसमुदायातून हे काम यशस्वी करून दाखवत संपूर्ण देशालाच नवा मार्ग दाखवला आहे. मला असं सांगण्यात आलं की जर हे काम कुठल्या कंत्राटदाराला दिलं असतं तर सहा कोटी रुपयांपेक्षाही अधिक खर्च आला असता. मात्र हेच काम तुम्ही सामुदायिक परिश्रमातून यशस्वीपणे करुन दाखवले.

मित्रांनो, जर पीक अधिक असेल तरी त्याचा योग्य भाव शेतकऱ्याला मिळावा, यासाठी देखील आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहोत. आमच्याच सरकारने शेतकऱ्यांची किमान हमीभावाची कित्येक वर्षांची जुनी मागणी पूर्ण केली आहे. सरकारने ऊसासहित सर्व खरीप आणि रब्बीच्या 21 पिकांच्या किमान हमीभावात खर्चाच्या तुलनेत 50 टक्क्यांपर्यतचा हमीभाव निश्चित केला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे, देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे.

मित्रांनो, आमचे सरकार शेतीसोबतच पर्यटनालाही प्रोत्साहन देत आहे. महाराष्ट्रात शिर्डीसारख्या जनतेचे श्रद्धास्थान असलेली धार्मिक स्थळे आहेत, तर दुसरीकडे अजिंठावेरूळ सारखी ऐतिहासिक वारसास्थळेही आहेत, जिथे जगभरातील पर्यटक येतात. लोकांच्या श्रद्धा, ध्यात्म आणि इतिहासाला युवकांच्या रोजगाराशी जोडण्याचे एक मोठे अभियान आमच्या सरकारने सुरु केले आहे.

देशातील पर्यटन केंद्रांना एकमेकांशी जोडले जात आहे. तिथे पर्यटकांसाठी सुविधा निर्माण केल्या जात आहेत.इथे शिर्डीला या शताब्दी सोहळ्याचे उद्घाटन करायला जेव्हा राष्ट्रपती महोदय आले होते, तेव्हा त्यांनी या विमानतळाची भेट पर्यटकांना दिली होती. मला असं सांगण्यात आलं आहे की इथून सध्या जी विमानसेवा सुरु आहे, त्यात येत्या काळात आणखी वाढ होणार आहे जेणेकरुन देशातला आणि जगातला प्रत्येक  साईभक्त इथे येऊन साईबाबांचे दर्शन करु शकेल.

बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्राच्या या भूमीने नेहमी देशाला सामाजिक समरसतेचा वस्तूपाठ घालून दिला आहे. छत्रपती शिवाजी असो, बाबासाहेब डॉ आंबेडकर असोत किंवा मग पूज्य महात्मा फुले असोत, या सगळ्यांनी या भूमीत अशी मूल्ये रुजवलीत, जी समता आणि एकतेलाच सामाजिक शक्ती मानतात. आपल्या या संत पुरुषांचे मार्गदर्शक विचार आपण कायम लक्षात ठेवायला हवे. स्वार्थासाठी समाजात भेदभाव निर्माण करणाऱ्या , समाजाला तोडणाऱ्या शक्तींपासून आपण सावध राहायला हवं, अशा सर्व शक्तींना आपण पराजित केलं पाहिजे. तोडणे खूप सोपे असते, मात्र जोडणे तेवढेच अवघड! आपल्याला जोडण्याची ताकद एकत्र आणून सक्षम बनवायची आहे.

 ‘सबका साथसबका विकासआणिएक भारतश्रेष्ठ भारतहा संकल्प आपल्याला आज विजयादशमीच्या निमित्ताने करायचा आहे. आणि म्हणूनच मी आज इथे तुम्हा सगळ्यांना आग्रह करतोय की तुम्ही हा संकल्प मनात घेऊन पुढे वाटचाल करा, आणि याच संदेशाच्या मार्गाने आपल्याला पुढे जायचे आहे. साईबाबांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, त्या मार्गावरुन आपल्याला वाटचाल करतो आहे. मला आज याचा खूप आनंद होतो आहे.

मित्रांनो, आज मी या पवित्र स्थानावरुन शताब्दी सोहळ्याची सांगता करतो आहे. या 31 ऑक्टोबरला तुम्हा सर्वांचे हे राज्यातले सरकार, चार वर्षे पूर्ण करणार आहे. मी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे आधीच अभिनंदन करतो. तुम्ही असेच संपूर्ण ताकदीनिशी राज्यातल्या जनतेची सेवा करत रहा. तुम्हाला इथल्या जनतेचे भरपूर आशीर्वाद मिळत राहोत, अशीच माझी इच्छा आहे.

याच विश्वासाने, आज इथे दसऱ्याच्या दिवशी ज्यांना स्वतःची घरे मिळाली आहेत, अशा सर्व कुटुंबांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन! हे नवे घर तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होण्याचे माध्यम बनो, ह्या घरात राहतांना तुम्ही आणि तुमचे कुटुंबपुढे जावो, प्रगती करो, तुमची मुलं खूप यशस्वी होवोत, याच सदिच्छेसह मी माझे हे भाषण संपवतो. या पवित्र दिवशी तुम्ही मला इथे बोलावलेत, त्याबद्दल मी श्री साई विश्वस्त मंडळाचेही आभार मानतो. येणारा प्रत्येक तुमच्या आयुष्यात खूप खूप सुखसमृद्धी आणि आनंद घेऊन येवो.

 याच शुभेच्छांसह, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार!!

धन्यवाद !

                                                                        ****

B. Gokhale/ R.Aghor