Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन


नवी दिल्ली, 20 जुलै 2026

तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत.

मान्सून आता आपला सकारात्मक प्रभाव दर्शवू लागत असतानाच संसदेचे पावसाळी अधिवेशन देखील सुरु होत आहे. मान्सून असो किंवा संसदेचे पावसाळी अधिवेशन जर दोन्ही गोष्टी सक्रिय असतील तर त्या अतिशय फलदायी ठरतात.आणि जेव्हा दोन्ही गोष्टी फलदायी असतात तेव्हा त्यातून राष्ट्राच्या हितासाठी आणि सर्व सजीव सृष्टीसाठी अमूल्य योगदान मिळते.  या आशेसह  हा मान्सून असाच सक्रिय राहो आणि पावसाळी अधिवेशन फलदायी ठरो, अशी आपण प्रार्थना करुया.   

मित्रांनो,

गेल्या महिन्यात देशाने अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण यश संपादन केले, ज्यामुळे नागरिकांचे मन अभिमानाने भरुन गेले. ही कामगिरी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि अंतराळ क्षेत्र देखील व्यापून टाकणारी होती. भारतासाठी, हे क्षण अतिशय वैभवाचे आहेत. गेल्या वर्षीच्या पावसाळी अधिवेशनाच्या अगदी आधी एक भारतीय नागरिक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचला होता. आणि  परवाच, एका तरुण भारतीय स्टार्ट-अपने एक असाधारण कामगिरी करून दाखवली. जगात अगदी मोजके देश असे आहेत ज्यांनी अशा प्रकारची क्षमता सिद्ध करुन दाखवली आहे. आपल्या युवा नवोन्मेषकांनी भारताच्या महत्त्वाकांक्षांना अंतराळ क्षेत्रात नवीन उंचीवर नेले असून ही कामगिरी खरोखरच उल्लेखनीय आहे. स्काय रुट स्टार्ट अप मध्ये काम करणाऱ्या टीमचे  सरासरी वय केवळ 28 असल्याचे मला सांगण्यात आले. या तरुण बुद्धिमत्तेनेच हे अद्भुत यश शक्य करून दाखवले आहे. मी एखाद्या 56 वर्षांच्या तरुण माणसाबद्दल बोलत नाही; मी अशा स्टार्टअपबद्दल बोलत आहे, ज्याच्या अवघ्या 28 वर्षांच्या सरासरी वयाच्या टीमने भारताचा तिरंगा अवकाश क्षेत्रात अभिमानाने फडकावला आहे.  त्यांचे अभिनंदन तर आहेच; मात्र अशा गोष्टी भारताला आत्मविश्वासाने परिपूर्ण करतात. त्यामुळे जगात सन्माननीय व विश्वासार्ह भागीदार म्हणून भारताचे स्थान अधिक दृढ होते.

मित्रांनो,

हा काही योगायोग नव्हे, हा एक सामर्थ्यवान संदेश आहे – भारताच्या युवाशक्तीच्या क्षमता आणि आकांक्षांना अंतराळाची देखील मर्यादा नाही – हाच तो संदेश आहे. राष्ट्रासाठी यापेक्षा कोणतीच गोष्ट अधिक प्रेरणादायी असू शकत नाही.

मित्रांनो,

हा परिणाम आहे सुधारणेच्या वेगवान एक्स्प्रेसचा, ज्यामध्ये स्वार होऊन आपले युवक असे धाडसी पाऊल टाकून यश प्राप्त करत आहेत.

मित्रांनो,

अलीकडेच राजस्थान मधील एका भव्य तेलशुद्धीकरण कारखान्याचे लोकार्पण करण्यात आले. काही आठवड्यांपूर्वी, देशाच्या तिसऱ्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उदघाटन झाले. अवघ्या काही दिवसांपूर्वी हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनचे उदघाटन झाले – एक अशी प्रगत सुविधा जी फार कमी देशांकडे उपलब्ध आहे.  मात्र भारताने आपल्या नागरिकांना समर्पित केलेली हायड्रोजन ट्रेन ही सर्वात शक्तिशाली इंजिन असलेली आणि जगातील सर्वात मोठी ट्रेन आहे. राष्ट्राला डोळ्यासमोर ठेवून एका ध्येयासाठी कार्य करणारे भारतातील वैज्ञानिक, अभियंते, नवोन्मेषक, उद्योजक  आणि कामगार या सर्वांच्या प्रयत्नांचे ते फलित आहे. 

मित्रांनो,

जगात सध्या युद्धसदृश परिस्थिती वारंवार निर्माण होत आहे  हे आपल्याला चांगले ठाऊक आहे आणि संपूर्ण जग त्याबद्दल चिंताक्रांत देखील आहे. ऊर्जेसाठी इतर देशांवर अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशांसाठी पश्चिम आशिया मधील संघर्षामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी, खते, रसायने या सर्वांच्या पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होत आहेत. असे असून देखील भारतीय अर्थव्यवस्था  7.7 टक्के दराने विकास करत असून जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था म्हणून कायम आहे. यावरून भारताची ताकद आणि चैतन्य आणि सामर्थ्यासह नवीन उंची गाठण्यासाठीचा दृढनिश्चय दिसून येतो. पावसाळी अधिवेशनाच्या आरंभाबरोबरच देशाने एक गती पकडली असून संसदेतील ऊर्जा त्या गतीला अधिक वेग देऊ शकते. राष्ट्रासमोरील उद्दिष्टे गाठण्यासाठी सकारात्मक भावना जोपासणे अतिशय महत्त्वाचे ठरते. आपल्या सभागृहात पक्षभेद न करता अनेक अनुभवी खासदार आहेत. त्यांचे ज्ञान, अनुभव आणि शहाणपण हे केवळ संसदेलाच नव्हे, तर संपूर्ण राष्ट्रालाही अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच संसदेचे कामकाज चाललेच पाहिजे, अर्थपूर्ण विचारविनिमय झाला पाहिजे आणि देशाला पुढे नेण्यासाठी सामूहिक निर्धाराने कार्य केले पाहिजे. हीच काळाची गरज आहे आणि युवकांची महत्त्वाकांक्षा आहे. देशभक्ती आणि राष्ट्राप्रती असलेल्या निष्ठेने ओतप्रोत भरलेल्या आवाजांना संसदेत योग्य व्यासपीठ मिळावे, जेणेकरून ते आपले विचार प्रभावीपणे मांडून राष्ट्राला योग्य दिशा देऊ शकतील, ही आजची गरज आहे. मला विश्वास आहे की जिथे तथ्ये आणि तर्काचा विजय होतो, तिथे व्यत्ययाला जागा नसते. सशक्त युक्तिवाद आणि ठोस तथ्यांमुळे शांतपणे पण प्रभावीपणे आवाज उठवता येतो. मला आशा आहे की संसदेतील चर्चा, तथ्य आणि तर्कांनी समृद्ध असेल, प्रत्येकाला संधी मिळेल आणि प्रत्येक कल्पनेचा सन्मान केला जाईल. ही आपली संसदेच्या सभागृहामधील भूमिका असायला हवी. मी सर्व खासदारांना अधिवेशनात सक्रिय सहभाग घेण्यासाठी आमंत्रित करतो. आज सकाळी लोकसभा अध्यक्षांनी खासदारांचे समाज माध्यमांद्वारे देखील स्वागत केले. मीही त्यांच्या स्वागताच्या आवाहनात सहभागी होत सर्व खासदारांचे स्वागत करतो.

आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

नमस्कार.

आशिष सांगळे /भक्‍ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

  सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai