पीएम्इंडिया
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समावेशक जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीयता बळकटीकरण या विषयावरील ब्रिक्स सत्र 12 सप्टेंबर 2026 रोजी पार पडले. यादरम्यान पंतप्रधानांनी आपल्या भाषणात काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.
ग्लोबल साऊथ मधील देश जागतिक संकटांचा सर्वाधिक सामना करत आहेत. मात्र, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्यांना पुरेसे स्थान मिळत नाही. त्यामुळे विशेषाधिकारांच्या पिरॅमिडचे रूपांतर भागीदारीच्या व्यासपीठात करण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
आजच्या वास्तवाचे प्रतिबिंब जागतिक प्रशासनात दिसून यायला हवे. विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसारख्या संस्थांमध्ये ग्लोबल साऊथ मधील देशांना अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
ग्लोबल साऊथ मधील देश केवळ नियमांचे पालन करणारे न राहता, नियम ठरवण्यात भूमिका बजावणारे व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ब्रिक्सच्या माध्यमातून या देशांमधील तरुण राजनयिक आणि धोरणकर्त्यांना वाटाघाटीचे कौशल्य, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि कायदेशीर ज्ञान देता येईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
जागतिक व्यापारात समुद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे, अर्थात सीफेरर्सचे, मोठे योगदान आहे. मात्र, संकटाच्या काळात त्यांना अनेकदा पुरेसे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे सीफेरर्ससाठी आपत्कालीन मदत जाळे निर्माण करण्याचा प्रस्ताव पंतप्रधानांनी मांडला.
आपले भविष्य एकमेकांशी जोडलेले आहे. त्यामुळे हे भविष्य घडवण्याचा अधिकारही सर्वांना समान मिळायला हवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आपला आवाज ऐकला जावा आणि त्याचा प्रत्यक्ष परिणामही दिसून यावा. विशेषाधिकारांऐवजी भागीदारीला महत्त्व मिळायला हवे, असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या सत्राच्या शेवटी नवी दिल्ली ब्रिक्स नेत्यांची घोषणा स्वीकारण्यात आली. ब्रिक्सचे पुढचे सहकार्य कोणत्या दिशेने न्यावे, हे या घोषणेत ठरवण्यात आले आहे. यात सर्व देशांची समान प्राधान्ये, त्यांची वचनबद्धता आणि पुढची दिशा निश्चित करण्यात आली आहे. ही घोषणाही परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
***
हर्षल अकुडे/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]