पीएम्इंडिया

कसे आहात आपण सर्वजण ? मजेत आहात ना ?
व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री विजयभाई,उप मुख्यमंत्री नितीनभाई,माजी मुख्यमंत्री आनंदीबेन,राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य,केंद्रीय मंत्रिमंडळाचे माझे सहकारी,संसद सदस्य, महापौर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बंधू- भगिनी,
न्यारीची बाबच न्यारी आणि अजी करे राजी. 2001 मधे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर थोड्याच दिवसात राजकोटहून, संदेश आला की अजी धरण पूर्ण भरले आहे,आता तुम्हाला यावे लागेल. मला आठवते आहे,मुख्यमंत्री म्हणून माझ्या कारकिर्दीला सुरवात झाली होती, भूकंपानंतर कच्छच्या स्थितीची पाहणी करायला निघालो होतो,10 -15 दिवसात अजी धरण भरल्याचे वृत्त आले, राजकोटच्या जनतेला इतका आनंद झाला होता, त्यांनी सांगितले की आपल्याला यावे लागेल आणि खास त्या दिवशी अजी धरणावर येऊन जल पूजा करण्याचे भाग्य मला लाभले.त्या दिवशी मी पाहिले की अजी कसे राजी करते आणि विजय भाईंनी आता सांगितले की 40 वर्षात 11 वेळाच हे धरण भरले आहे.पाणी म्हणजे काय,त्याचे महत्व काय असते, हे गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छच्या लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही.
पूर्वी,राजकोटमध्ये, रस्त्यावर पाहिले तर प्रत्येकाच्या घराच्या बाहेर एक कोयंडा असायचा. त्याखाली नळ असायचा, खाली उतरून पाणी भरायचे.जिथे जाल तिथे पाणी हा चर्चेचा विषय असायचा.त्या काळात मी संघाच्या कामासाठी प्रवास करत असे आणि प्रवासासाठी आधी पाहायला लागायचे की कोणत्या दिवशी गेलो तर पाणी मिळेल. रेल्वेमधून पाणी आणल्याचे वृत्त संपूर्ण हिंदुस्तानमध्ये मोठी बातमी ठरली होती,राजकोटमध्ये पिण्याचे पाणी रेल्वेमधून आणावे लागले.हे हलाखीचे दिवस आपण पाहिले आहेत.सामान्यतः टँकर वाढवा आणि पाणी पोहोचवा अशी सरकारची वृत्ती असते.लोकांनाही सवय होते, ठीक आहे पुढच्या आठवड्यात टँकर येईल तेव्हा पाहता येईल. टँकर येईल आणि पाणी मिळेल अशी सवय लोकांनाही लागते. काही भागातून हात पंपासाठी मागणी येत असे आणि ही मागणी पूर्ण होणे म्हणजे मोठी बाब मानली जायची.
बंधू-भगिनींनो,आपण गुजरातला कोठून कुठे नेले.कुठे टँकर, कुठे हात पंप आणि मारुती गाडी जाऊ शकेल एवढी मोठी वाहिनी घालून धो-धो पाणी आणून धरण भरणे कुठे.बंधू-भगिनींनो, दृष्टे सरकार असेल,जनकल्याणासाठी समर्पित असेल, सर्वसामान्य जनतेचे आयुष्य सुखकर करण्याचा निर्धार असेल तर कसा उत्तम परिणाम दिसतो याचा अंदाज आपण बांधू शकता.गुजरातमध्ये आता 15 -17 वर्षाची युवा पिढी असेल त्याच्या नंतरच्या पिढीला माहीतही नसेल की पूर्वी गुजरातचे जीवन कसे होते.विजेसाठी वाट पाहायला लागायची.वीज कधी येईल, रात्री जेवण्याच्या वेळी वीज असेल की नाही,शेतकऱ्यांना,शेतात पंप चालवायचा असेल तर रात्रभर जागावे लागे, वीजप्रवाह आल्याचे कळल्यावर पंप सुरु करून शेताला पाणी द्यावे लागे.तो काळ विसरण्याचे कारण नाही.कोठून कुठवर आलो, किती परिश्रमाने आलो,उत्तम निर्धाराने स्वतःला वाहून घेऊन इथवर आलो याचा अंदाज तेव्हाच येतो की किती कठीण परिस्थितीत आपल्या आई-वडिलांनी आयुष्य काढले.
कोणते कारण असेल की जे कच्छ, काठियावाडी सोडून हिंदुस्तानच्या वेगवेगळ्या भागात झोपड्यांमध्ये आयुष्य घालवायला भाग पाडत असे. 50 बिघा जमिनीचा मालक असेल, मुलीचे लग्न करायचे असेल आणि जमीन गहाण ठेवून पैसे हवे असतील तर जमीन घ्यायला कोणी तयार नसे. मुलीच्या लग्नाला 5000 -25000 रुपये हवे असतील तर घेऊन जा, तुझी जमीन घेऊन मला काही उपयोग नाही असे म्हणत असे.50 बिघा जमिनीचा मालक,मुलीच्या लग्नाला, जमीन गहाण ठेवून पाच हजार,पन्नास हजार रुपये घेऊ शकत नव्हता कारण जमिनीला मोल नव्हते आणि ही काही फार लांबची गोष्ट नव्हे,20 वर्षांपूर्वी गुजराथमध्ये ही स्थिती होती.कोणामुळे होती या तपशिलात मी जात नाही. मात्र जेव्हापासून गुजरातच्या जनतेने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली,मग केशूभाई यांचे नेतृत्व असो, आनंदीबेन पटेल यांचे नेतृत्व असो, विजयभाई रूपाणी यांचे नेतृत्व असो,किंवा आपला सेवक या नात्याने मला सेवा करण्याची मिळालेली संधी असो; या संपूर्ण कालखंडात गुजरातचे गाव,गुजरातचा शेतकरी, गुजरातची वीज,गुजरातचे रस्ते, या सर्वासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आणि परिणामी,आम्ही आज नजरेला नजर देऊन आपल्याशी संवाद साधू शकतो.आमच्या मनात उपकाराचा भाव नाही आणि असूही शकत नाही. आमच्या मनात कर्तव्य पूर्तीचा भाव आहे आणि त्यामुळेच आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते कारण आपणा सर्वांचे आशीर्वाद अखंड आमच्या पाठीशी आहेत.
विजयभाई आताच आपल्याला सांगत होते की इतका मोठा परदेश दौरा करून आल्यावर लगेच कामाला सुरवात केली.ज्या देशातली जनता, ज्या राज्यातली जनता,ज्या राजकोटची जनता माझ्यावर स्नेहाची पखरण करते तर थकण्याचे कारणच नाही.मला आठवते आहे,राजकोटमध्ये मी सौनी योजनेची सुरवात केली होती आणि पॉवर प्रेझेंटेशन करताना मी सगळ्यांना सांगीतले होते की माझे हे स्वप्न आहे.
मला आठवते आहे, किती प्रश्न उपस्थित केले गेले होते.हे शक्यच नाही, निवडणूक आली आहे म्हणून मोदी हे सर्व सांगत आहेत.राजकीय पक्ष तर संधी सोडत नाहीत पण वर्तमानपत्रातूनही प्रश्न उपस्थित केले गेले की हे अशक्यच आहे.इतके पैसे येणार कोठून, एवढ्या जल वाहिन्या कोठून येणार ? 2040 येईपर्यंतही काही होणार नाही.शंका-कुशंकेचे वातावरण निर्माण झाले होते, त्यावेळी आत्मविश्वासाने मी गुजरातच्या जनतेला हे काम होणारच, ठरलेल्या वेळेतच होणार ही हमी दिली.जास्तीत जास्त मेहेनत करू पण पाणी पोहोचवणारच हा संकल्प आम्ही केला होता. अर्थसंकल्पातून अनेक गोष्टीसाठी पैसे खर्च करण्याची आवश्यकता असते पण हे माहित होते की एकदा गुजरातच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचले,सौराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचले, कच्छच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचले की ही धरती,जगभरातून पैसे घेऊन येईल,गुजरात विकासाचे नवे शिखर गाठेल, हे पूर्णपणे माहित होते आणि त्याचाच हा परिणाम आहे. वेळेआधीच नव्हे तर केवळ सात महिन्यातच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात अजी धरण पूर्णपणे रिकामे झाले होते.अजून पावसाने जोर पकडला नाही,आता फक्त जमीन ओली झाली आहे आणि धरणात पाणी येत आहे.विज्ञान तंत्रज्ञानाची क्षमता पहा,470 किलोमीटर दुरून पाणी येत आहे. 65 मजली उंच इमारतीवरच्या टाकीवरून पाणी येईल तेवढ्या उंचीवरून, नर्मदा धरणातून इथे पाणी येत आहे.हे विज्ञानाचे वैशिष्ट्य आहे. 65 मजली उंच इमारती एवढ्या उंचीवर पाणी नेले आहे तेव्हा तुमच्या घरात नळाला पाणी येत आहे.
बंधू-भगिनींनो, पैसे तर खर्च होणारच.पैसे जनतेसाठी आहेत आणि जनतेसाठीच खर्च होणार पण पैसे गमावता कामा नयेत, त्याचा सदुपयोग झाला पाहिजे.पाण्याची ही संपूर्ण योजना म्हणजे पैशाच्या उत्तम उपयोगाचे उदाहरण आहे.सरदार सरोवर धरणाचे संपूर्ण काम 10 दिवसापूर्वीच पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धरणाचे दरवाजे बंद केले. आनंदीबेन आल्या धरणाच्या दरवाज्याचे काम पूर्ण झाले,तरीही अडचणी येतच राहिल्या.कोणी किती त्रास दिला हे कधी ना कधी नर्मदेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा लोकांसमोर येईल की इतक्या लोकांनी गुजरातचा हक्क मिळवण्याबाबत उदासीनता दाखवली.इतके खराब काम केले आणि आपल्या जनतेला दुःखी ठेवले.
बंधू-भगिनींनो , पाणी तर आले आहे पण त्याच्या बरोबरच जबाबदारीही येते आणि मी राजकोट आणि सौराष्ट्रच्या लोकांना, कच्छच्या लोकांना विनंती करू इच्छितो की किती संकटाना तोंड देऊन आपण त्यावर मत केली आहे याची आठवण त्यांनी ठेवावी आणि हे पाणी नव्हे तर परिस आहे. त्याच्या स्पर्शाने समृद्धी येणार आहे.हा परमात्म्याचा प्रसाद आहे.ज्या प्रमाणे ईश्वराचा प्रसाद खाली पडला तर आपण ईश्वराची माफी मागून दाणे -दाणे वेचून घेतो, हे पाणी हेही परमात्म्याचा प्रसाद आहे आणि ते गमावण्याचा आपल्याला अधिकार नाही.पाणी काटकसरीने वापरले पाहिजे आणि पाणी आले आहे तर त्याचा योग्य वापर करावा असे सांगण्याचा मला हक्क आहे.म्हणूनच कच्छ, सौराष्ट्र आणि गुजरातच्या जनतेला मी पाणी बचतीची विनंती करतो.
आपल्यापैकी बरेच जण माहुडीला दर्शनाला गेले असतील.प्रामुख्याने जैन समुदायाचे लोक मोठ्या प्रमाणावर दर्शनाला जातात.बुद्धीसागरजी महाराजांची लिखित वचने तिथे उपलब्ध आहेत.90 वर्षांपूर्वी बुद्धीसागरजी महाराज होते.90 वर्षांपूर्वी बुद्धीसागरजी जैन मुनी यांनी हे लिहून ठेवले आहे.त्यांनी म्हटले आहे, आजही त्यांनी हाती लिहिलेले लिखाण उपलब्ध आहे, त्यांनी म्हटले होते एक दिवस असा येईल की पाणी दुकानात विकले जाईल.90 वर्षांपूर्वी या महान व्यक्तीने म्हटले होते की पाणी दुकानात विकले जाईल.आज बिस्लेरीची बाटली आपण दुकानातून खरेदी करतो आणि पाणी पितो.आता राजकोट स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे, पिण्याच्या पाण्याची समृद्धी आली आहे तर सांडपाणी व्यवस्थापन हे कामही राजकोटसाठी समोर ठाकले आहे. गटारात जाणाऱ्या पाण्यावर पुनःप्रक्रिया करून राजकोटमधल्या कारखान्यात इतर वापरासाठी, बाग-बगीच्यांसाठी, बांधकामांसाठी या पाण्याचा वापर करण्याबाबत गांभीर्याने विचार करावा लागेल. पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या गुणवत्तेबाबत आपल्याला समस्या येणार नाही.राजकोटच्या विकासाबरोबरच अजी आणि न्यारी कधी तहानलेले ठेवणार नाही असे काम आम्ही निर्माण केले आहे.म्हणूनच बंधू-भगिनींनो,गुजरातच्या, सौराष्ट्रच्या, कच्छच्या शेतकऱ्यांचे मला विशेषकरून आभार मानायचे आहेत. मी मुख्यमंत्री असतांना कच्छच्या शेतकऱ्यांना सांगितले, त्यांनी ते मानले आणि संपूर्ण कच्छला ठिबक सिंचनाच्या दिशेने नेले, संपूर्ण बनासकाठाला ठिबक सिंचनाच्या दिशेने नेले, सूक्ष्म सिंचनाकडे नेले आणि त्यामुळे संपूर्ण शेतीचा चेहेरामोहराच बदलला.
बंधू-भगिनींनो, प्रत्येक शेतात ठिबक सिंचनाद्वारे पाणी पोहोचवणे,आपली पिके ठिबक सिंचनावर घेणे,कमी पाण्यात जास्त उत्पादन घेणे ही विज्ञानासाठी नवीन गोष्ट नाही.राजकोट मधील अभियांत्रिकी क्षेत्र इतके मजबूत आहे की शेतकऱ्यांसाठी,ठिबक सिंचनाचा प्रत्येक थेंब कसा उपयोगात आणता येईल,कसा सहज उपयोगात आणता येईल असे उपकरण बनवण्याची स्पर्धा ठेवायला हवी असे आग्रही प्रतिपादन मी करेन.शेतकऱ्यांना उपयुक्त अशी साधने बनवण्याची क्षमता राजकोट मधील अभियांत्रिकी उद्योगात आहे,अशी साधने त्यांनी तयार करावी आणि केवळ गुजरातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थान आणि जगभरातल्या विकसित देशांसाठीही ते मैलाचा दगड ठरावे..
बंधू -भगिनींनो,
युवा विद्यार्थ्यांना भेटण्याची संधी मला मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.बऱ्याच लोकांसाठी, हॅकेथॉन हा शब्द नवा आहे पण हे सर्व जाणून घेण्याजोगे आहे.सरकारी सेवेत असलेले अधिकारी, अनेक वर्षे काम करतात, नेते निवडून येतात,पण त्यांची एक धारणा असते की आम्हाला सर्व येते. ईश्वराने जेवढी बुद्धी दिली आहे तेवढी आमच्या कडे आहे.प्रत्येक समस्येवरचा तोडगा आम्हाला माहित आहे.याआधी अशीच धारणा होती.मी आल्यावर त्यात बदल केला.
आपल्यापेक्षा जास्त बुद्धी, सव्वाशे कोटी देशवासियांकडे आहे, आपल्या युवा पिढीकडे तर त्यापेक्षा जास्त बुद्धी आहे.आजच्या युवा पिढीला सांगितले की ही समस्या आहे त्यावर उपाय शोधा.काही दिवसांपूर्वी मी भारत सरकारच्या वेगवेगळ्या विभागांना विचारले की आपल्याकडे अशी कोणती कामे आहेत ज्यावर काही उपाय सापडत नाही?करण्यासाठी अडचणी येतात,मोठे परिश्रम करावे लागतात, बरेच दिवस लागतात,खूप खर्च येतो,आपल्या अडचणींची यादी मला द्या. सुरवातीला कोण मान्य करेल की आमच्याकडून हे काम होत नाही म्हणून? मात्र मी पाठपुरावा केला.आधी सांगत होते की साहेब आमच्या विभागात सर्व सुरळीत सुरु आहे, मी सांगितले की थोडासा त्रास असला तरी सांगा, शोधा आणि सांगा. पाचशे अशा बाबी निघाल्या की या विभागांना वाटत होते की यावर वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणे गरजेचे आहे.मी एक हॅकेथॉन केले.देशभरातल्या अभियांत्रिकी विद्यालयांना सांगितले की हे पाचशे प्रश्न आहेत तुम्ही गट तयार करा,संगणकाची मदत घ्या,दिवस रात्र चर्चा करा, चिंतन करा,42000 युवक याच्याशी जोडले गेले. पन्नास तास, अहोरात्र जागून काम केले आणि पाचशे प्रश्नांच्या निराकरणासाठी नवी नवी समीकरणे घेऊन आले आणि मी मोठ्या अभिमानाने सांगतो की या युवकांनी जे तोडगे दिले होते त्यापैकी मोठ्या तोडग्यांचा या विभागांनी स्वीकार केला त्यावर अंमलबजावणी सुरु केली.
राजकोट महापालिकेनेही स्मार्ट सिटीसाठी राजकोट मध्ये काय करायला हवे, लोक सहभाग कसा वाढवायला हवा?रहदारीचा प्रश्न कसा सोडवायला हवा, कर भरणा कशा पद्धतीने करायला हवा,त्यासाठी व्यवस्था कशी हवी, गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी काय करायला हवे, वायफायचा काळ आहे,वायफाय द्वारे, डिजिटल इंडिया द्वारे राजकोटला कशा प्रकारे डिजिटलाईज करायला हवे, अशी शंभर छोटी -मोठी कामे त्यांनी काढली आहेत,त्यासाठी संपूर्ण गुजरातमधल्या महाविद्यालयांना, संपूर्ण सौराष्ट्र मधल्या महाविद्यालयांना निमंत्रण पाठवले आहे. आपणही त्यासाठी नोंदणी करा आणि या शंभर प्रश्नांची उकल मला करायची आहे असे ठरवून त्यावर चिंतन करा आणि स्पर्धेत सहभागी व्हा.29जुलैला होणाऱ्या या हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी हजारो युवक उत्सुक आहेत. राजकोटमध्ये कशा पद्धतीने बदल घडवायचा आहे, राजकोटच्या व्यवस्था कशा आधुनिक बनवायच्या आहेत यासाठी महाविद्यालयात शिकणारी आमची युवा पिढी काम करणार आहे.त्यांच्या उत्साहाला सलाम.मी आपले अभिनंदन करतो हे हॅकेथॉन लोकसहभागाचे उत्तम उदाहरण आहे असा मला विश्वास आहे.प्रत्येकजण त्यासाठी मदत करेल, प्रत्येकजण त्यासाठी प्रोत्साहित करेल आणि आमची नवी पिढी, महाविद्यालयात शिकणारी पिढी, मोबाईल फोनद्वारे जगाशी जोडली गेलेली पिढी, संगणकावर जगभरातले गेम खेळणारी पिढी,राजकोटचे भाग्य बदलण्यासाठी या हॅकेथॉनमध्ये सहभागी होईल असा मला विश्वास आहे.
बंधू-भगिनींनो, अजी धरणात पाणी पाहिल्यानंतर आज कोणाला आनंद होणार नाही?या आनंदाच्या अनुभूतीबरोबरच हिरवेगार सौराष्ट्र पाहिल्यावर मन किती आनंदित होईल,मी पुन्हा एकदा राज्य सरकारचे आभार मानतो की जी सौनी योजना शंका-कुशंकांनी घेरली गेली होती ती योजना आज यशस्वी होऊन आपल्यासमोर उभी आहे. हे पाणी मिळवण्यासाठी हात आखडता घेणारी व्यक्तीही या पाण्याचा लाभ घेणार आहे आणि नर्मदेचे हे पाणी, हे पवित्र जल, परमात्म्याचा प्रसाद म्हणून आलेले हे पाणी, आपले भाग्यही बदलेल या शुभेच्छेबरोबरच आपणा सर्वांचे खूप-खूप आभार.
धन्यवाद.
B.Gokhale/N.Chitale/Anagha