Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्टार्ट अप इंडिया उद्या पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ


नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “स्टार्ट अप इंडिया” मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. देशातल्या युवावर्गात उद्योजकतेच्या प्रेरणेला सन्मानित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून आणि परदेशातून अनेक आघाडीच्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान एका वास्तविक प्रदर्शनाला भेट देतील आणि “स्टार्ट अप” उद्योजकांशी संवाद साधतील. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करण्याबरोबरच पंतप्रधान स्टार्ट अप कृती आराखडयाचेही प्रकाशन करतील.

पंतप्रधानांचे घटनास्थळी आगमन झाल्यानंतर स्टार्ट अप उद्योजकतेबाबत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विषयाशी संबंधित विविध मुद्दयांबाबत गट चर्चेचाही समावेश आहे. “फेस टू फेस विथ पॉलिसी मेकर्स” या नावाचे प्रश्नोत्तरांचे एक अभिनव सत्रही आयोजित करण्यात आले आहे. स्टार्ट-अप साठी सरकारतर्फे निर्माण केल्या जाणाऱ्या परिपूर्ण यंत्रणेबाबतच्या प्रश्नांना महत्त्वपूर्ण सरकारी मंत्रालयाचे आणि विभागांचे सचिव उत्तरे देतील. स्टार्ट अपच्या विकासासाठी परिपूर्ण यंत्रणा निर्माण करण्याच्या कामी सरकारची वचनबध्दता दृढ करणे, हा यामागचा उद्देश आहे.

या कार्यक्रमात श्री मासायोशी सन (सॉफ्टबँकेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी) आणि श्री ॲडम न्यूमन (वी वर्कचे संस्थापक) यांच्यासारखे जागतिक नेते आणि उपक्रम भांडवलदारांसोबत चर्चात्मक संवादाचाही समावेश आहे.

हा कार्यक्रम आयआयटी, आयआयएम, एनआयटी, आयआयआयटी, केंद्रीय विद्यालये आणि देशातील 350 पेक्षा जास्त जिल्हयांमधील युवा गटांमध्ये थेट प्रसारित केला जाणार आहे.

M. Pange/S.Tupe/M.Desai