Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्मार्ट सिटी अभियान उपक्रमाच्या पुण्यातल्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

स्मार्ट सिटी अभियान उपक्रमाच्या पुण्यातल्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

स्मार्ट सिटी अभियान उपक्रमाच्या पुण्यातल्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण


आपल्या देशात या पूर्वी कोणतं कामच होत नव्हते असे तर नाही, असे पण नाही की, सरकार अर्थसंकल्पातील तरतूदी खर्च करत नव्हते. परंतु असे असतानाही, जगातील अनेक देश आमच्या नंतर स्वतंत्र झाले, ते खूपच कंगाल आर्थिक स्थितीतून आले होते. पण काय कारण असावे, की एवढ्या कमी वेळात, जगातील अनेक देश आमच्या पुढे निघून गेले आणि मी सतत हाच प्रश्न स्वत:ला विचारत राहतो, विचार करत राहतो आणि लोकांशी सल्ला-मसलतही करतो. जुन्या अनुभवांचे थोडेसे पृथ:करणही करतो. हे मंथन कायम सुरु असते आणि मग असा अनुभव आला की, आम्ही जे लोक सरकारांमध्ये बसलो आहोत, सरकारांमध्ये, व्यवस्थांमध्ये, लाखो नोकरदारांची जी फौज आहे, अधिकारी आहेत, कारकून आहेत, आम्ही सर्व ग्रामपंचायत अध्यक्षापासून ते पंतप्रधानांपर्यंत, गावच्या पाटलापासून मंत्रीमंडळ सचिवांपर्यंत आम्ही सर्व भले लाखोंच्या संख्येतही असू, पण आमच्या सर्वांपेक्षा जर अधिक “स्मार्ट” कोण असेल तर तो आहे या देशातील नागरिक! br>

जर का एकदा देशातल्या या सव्वाशे कोटी नागरिकांच्या ताकदीला जागृत केलं गेलं, चांगल्या कामात झोकून दिले गेले तर मग सरकारांची गरजच भासणार नाही. हे जग आपणहून चालायला लागेल, खूप वेगाने चालायला लागेल आणि त्यामुळेच ही “स्मार्ट सिटी संकल्पना” या कामासाठीच फक्त एवढे पैसे दिले जातील, असे नाही. हे खर तर स्वत:चेच एक खूप मोठे जन आंदोलन आहे. निघून गेलेल्या कालच्या आधारावर उज्ज्वल भविष्याचा पाया घालण्याचा हा एक सार्थ प्रयास आहे आणि मला असा अनुभव येतो आहे की, हा प्रयोग सफल होत आहे. जेंव्हा सुरुवातीला आमचे सचिव माझ्याकडे येत असत, वैंकय्या सोबत त्या विभागात डोकेफोड करत असत, तेंव्हा त्यांच्या मनात प्रश्नचिन्ह असायचे की शहरे कसे ठरवणार? आणि आमचा देश असा आहे, की तुम्ही एकाच शहरात रस्त्याच्या या बाजूला काय कराल, तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणारे लोक आंदोलन करत राहतील की इथे का नाही? तर आपल्या देशाने ह्या बाबतीत प्रभुत्व मिळवले आहे आणि अशा स्थितीत, कोणतेही शहर निवडले, तर किती चांगले करु शकू हे माहीत नाही. पण बाकीच्यांना नाराज होण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली असती. br>

आत्ताच वसुंधराजींनी माझे अभिनंदन केले, वैकैय्याजींचे पण अभिनंदन केले की, आपण जयपूर आणि उदयपूरची निवड केली. मी वसुंधराजींना सांगू इच्छितो की, आम्ही निवड केलेली नाही ! तुम्ही आमचे हे जे अभिनंदन केले आहे, ते परत घ्या, पण हे अभिनंदन जयपूरच्या लोकांचे करा, उदयपूरच्या करा ! ते या स्पर्धेत विजयी झाले आहेत. त्यांनी हे मापदंड पूर्ण करण्यासाठीची शक्ती दाखवलीय, अनेक समस्या झेलल्या आहेत. ठराविक वेळेत काम पूर्ण करण्यासाठी धावले आहेत. br>

आज ज्या 20 शहरांसाठी कोणते ना कोणते काम झाले आहे, काही ना काही कामाला प्रारंभ झाला आहे. आणखी खूप कामे, जी कामे वैंकय्याजी मोजत होते, त्यांना खूप मोठी गती मिळत आहे. याचे मूळ कारण आहे, त्या शहराचे नेतृत्व करणारे लोक, तिथल्या महापालिकेत वसलेले कर्मचारी, बंधू-भगिनी आणि त्या शहरातील जागरूक नागरिक या सर्वांचा सामूहिक प्रयास आहे की, इथल्या प्रत्येकाच्या मनात इच्छा जागृत झाली आहे की, या वेळी हिंदुस्थानात आमचं शहरही एक नंबरी व्हायला हवे! br>

देशात आम्ही मागास आहोत, गरीब आहोत, याची स्पर्धा घेतली गेली. मागे पडण्यासाठी कोणते मार्ग होते, ते शोधले जात होते. हे सरकार आहे, जी पुढे जाण्याची स्पर्धा घेत आहे, पुढे जाण्याचे मार्ग शोधते आहे. br>

आज या मंचावरुन मी काही “मिडिया हाऊस” चे (माध्यमांचे) ही अभिनंदन करु इच्छितो. अनेक वृत्तपत्रांनी या कामाला अभियान स्वरुपात हाती घेतले. त्यांनी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या शहरातल्या नागरीकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. दबाव निर्माण केला आणि मग हे घडले. आता म्हैसूरने स्वच्छतेत क्रमांक पटकावला, तर बंगलोर मध्ये खूप मोठे वादळ उठले की हे काय झाले बुवा ? बंगलोर मागे का राहीले? आता आणखी जोर लावूया, बंगलोरला पुढे घेऊन जावूया. हे असे एक वातावरण निर्मित होतेय. आम्हाला हीच गोष्ट आणखी पुढे न्यायची आहे. आपल्यात एक स्पर्धात्मक वातावरण असावे आणि ते लोक सहभागातून असावे. br>

आज आत्ता एका मंचाचा शुभारंभ केला गेला. पुणे कसे घडावे, त्याबाबत दिल्लीकर इतका नाही विचार करु शकत, जेवढा पुणेकर करतील. भुवनेश्वर कसे बनावे, भुवनेश्वरच्या कोणत्या गल्लीत काय काम व्हावे?, पदपथ कुठे असावा ?, सायकलीसाठी कुठे मार्ग असावा ?, तलाव कुठे असावा ?, कांरजे कुठे असावे?, रुग्णालय कुठे असावे?, पार्किंग कुठे असावे ? हे भुवनेश्वर बाबतचे निर्णय दिल्लीत नाही होऊ शकत ! पण जर का वेब वर जोधपूरहून काही कल्पना आली, तर भुवनेश्वरवाले पण पाहतील मित्रांनो! या जोधपूर वाल्यांनी काही नवा विचार केलाय, चला आपण पण आपल्या भुवनेश्वर मध्ये काही तरी नवे पाहूया, कसे होवू शकेल ते पाहूया. एका खूप मोठ्या विकासात सहभागाचा मार्ग आणि तो ही “टॅलंट पूल” चा एक प्रयास. आणि मी असे मानतो की, येणाऱ्या दिवसात हे एका खूप मोठ्या परिवर्तनाचे कारण बनणार आहे. br>

स्वच्छता, आपल्या देशात, सर्वात आवडता विषय बनला आहे. एक काळ असा होता की, जेंव्हा सरकारची ती योजना लोकप्रिय व्हायची, ज्या मध्ये सरकारी तिजोरीतून काही मिळत असे. कुणाच्या तरी खिशात काही तरी जात होते, कुणाच्या तरी पोटात काही जात होते, कुणाच्या तरी गावात काहीतरी येत होते. तेंव्हा कुठे लोक मानत असत की, ही कुठलीतरी चांगली योजना आणलीय. br>

पण यात पहिल्यांदाच बदल घडून आला आहे की, ज्यात पंतप्रधान काहीच देत नव्हते. जास्तीत जास्त काय तर सल्ला देत आहेत आणि सांगताहेत. बंधूनो आपण सर्वांनी स्वच्छ रहायला हवे, स्वच्छता ठेवली पाहिजे, घरापासून शहरापर्यंत सर्व शहर स्वच्छ राहीले पाहिजे. सरकार काहीही न देवो, पण जनता म्हणते आहे. घेतलेले सर्व आढावे पहा, माध्यमातल्या लोकांनी जितक्या पाहण्या केल्या, त्या प्रत्येकात प्रथम क्रमांकावर जर कोणती योजना लोकांना लोकप्रिय वाटत असेल, तर ती स्वच्छता वाटतेय. याचा अर्थ असा की, आतापर्यंत हिंदुस्थानात विचार केला जायचा की, लोकांना काही मिळेल, तरच लोकांना ते पसंत पडते. br>

असा विचार निर्माण करुन, आम्ही आपल्या देशातल्या सामर्थ्यशाली लोकांबाबत अन्याय केला आहे. हे असे लोक नाही आहेत, माझ्या देशवासियांनो, जे काही मिळण्याच्या शोधात असतात ते तर सांगतात की, आम्हाला संधी द्या, आम्हाला काही करायचे आहे. आणि हे करण्याची इच्छा आहे. ही स्वच्छता मोहीम त्या इच्छेचे प्रतिबिंब आहे. जे सर्वसामान्य व्यक्तीला वाटते आहे की नाही आता खूप झाले. आता बदल आणायचा आहे. br>

एक काळ होता आमच्या देशात. तुम्ही जुनी वर्तमानपत्रे पाहिलीत, अनेक लेख वाचलेत, पृथ:करणे पाहिलीत, शहरीकरणाला एक मोठे संकट समजले जायचे, मानले जायचे. या वेळी हे जे शहरीकरण होत आहे, कसे होईल, काय होईल या विषयी चर्चा होत आहे. माझे विचार वेगळे आहेत. आपण याला संकट न समजता, संधी समजले पाहिजे. जर का हे संकट मानले, तर त्याकडे पाहण्याची पद्धत अशीच असेल, अरे पहा तिथे काही लोक रहायला लागलेत, आता काय करणार? पाणी कसे पोहोचणार? वीज कशी पोहोचवणार ? काय करणार बरे, या मुलांसाठी शाळेचे काय करायचे ? नुसती डोकेदुखी. या ऐवजी जर का आपण याला एक संधी मानली की 2016 मध्ये आमचे पुणे असे आहे, 2025 मधली ही शक्यता आहे. अरे, आपण या बाजूने पुढे जाऊ शकतो, त्या बाजूने पुढे जाऊ शकतो, आकाशात असे जाऊ शकतो, अशी गती आणू शकतो, पाणी, सांडपाणी यात एवढे जाईल. ही व्यवस्था या बाबत आतापासूनच जर विचार सुरु झाला, तर त्याचे संधी मध्ये परिवर्तन होईल. यासाठीच आपण या शहरीकरणाचे, नागरीकरणाचे रुपांतर एका संधीत करायला पाहिजे. br>

आपण मानले किंवा नाही मानले, तरी शहरांमध्ये अशी एक ताकद असते की जिच्याकडे आमच्या आर्थिक क्षेत्रातले लोक एका वेगळ्या रुपात, वेगळ्या व्याख्येने बघतात. त्याला विकास क्षेत्र (ग्रोथ सेक्टर) म्हणतात. मी त्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतो. मी म्हणतो की, जर गरीबी पचवण्याची सर्वात मोठी कोणात असेल तर ती शहरांमध्ये असते. शहर गरीबी पचवून टाकते आणि याच कारणांमुळे जिथे अधिक गरीबी असते, तिथून निघून लोक शहरांकडे येतात, कारण त्यांना एक आशा असते की, त्या शहरात त्यांना काही ना काही काम तर मिळेलच. संध्याकाळी खाणे खावून झोपू शकेन, आई-वडिलांना 50-100 रुपये पाठवू शकेन, एवढे तरी मी कमावू शकेन, असा विश्वास मनात ठेवून तो शहरात येतो आणि काहीच दिवसात, मग तो गाडी स्वच्छ करत असेल, किंवा सायकलीत हवा भरत असेल, काहीही करत असेल. पण तो मार्ग शोधून काढतो. हे असे शक्य होते, कारण शहरात गरीबीला पचवण्याची ताकद असते. आता ही आपली जबाबदारी आहे की, आपण शहरांना ती ताकद देवूया, शहरांना असे सामर्थ्य देवूया की, ते सर्वाधिक गरीबी पचवू शकतील, लवकरात लवकर गरीबी पचवू शकतील आणि त्या गरीबीला पचवून जी ताकद, जी ऊर्जा निर्माण होईल, त्यामुळे विकासाचे नवे मार्ग निर्माण होतील. या दिशेने आपल्याला विचार करायचा आहे. br>

हे शक्य आहे, हे काम अवघड नाही. प्रत्येक शहराला इमारती, रस्त्यांचा आकार यावरुन मापता येत नाही. प्रत्येक शहराचे स्वत:चे असे सौंदर्य असते. प्रत्येक शहराचा आपला एक आत्मा असतो, प्रत्येक शहराची स्वत:ची ओळख असते. आम्ही जेंव्हा “स्मार्ट सिटी” बाबत बोलतो, तेंव्हा त्या शहराची ओळख, त्याच्या आत्म्याला यांना विशेष रुपाने बळ देण्यासाठी आम्ही जनता-जनार्दनाकडून मते मागवली आहे. जसे जयपूरने आपल्या “स्मार्ट सिटी” ची कल्पना केली आहे, त्यात त्यांनी एक विचार हा देखील मांडला आहे की, आम्हाला रात्रकालीन वारसा सहल (नाईट टाईम हेरीटीज वॉक) हा नवा उपक्रम सुरु करायचा आहे. याचाच अर्थ असा की, काय फक्त बंद घरांसमोरच ही वारसा सहल थोडीच होणार आहे ? रात्रीच्या वेळी पर्यटक येतील, तेंव्हा वीजेची विशेष व्यवस्था व्हायला हवी. त्यांचा वेळ चांगला जावा , यासाठीही काही व्यवस्था असेल म्हणजेच शहरात रात्रीचाही जय-जयकार सुरु होईल, तेव्हा ते जयपूर म्हणून संबोधले जाईल. br>

प्रत्येक शहर आजही, जर का बनारस धार्मिक कारणांमुळे परिचित असेल, परंतु जिला बनारस साडी माहिती नाही अशी एकही महिला हिंदुस्थानात नसेल. प्रत्येक शहराची आपली खास ओळख असते. त्यामुळे 21व्या शतकात आपण त्या ओळखीला नवीन ऊर्जा कशी देऊ शकतो, आधुनिक रंग-रुपाने कसे सजवू शकतो म्हणजे आत्मा तसाच राहिला पाहिजे, पण कायापालट होवून एक सुरेख ओळख निर्माण व्हावी. मी “स्मार्ट सिटी” यासाठी म्हटले की हा केवळ इमारतींचा खेळ नाही. बदललेल्या जीवनाला गतीमान व्यवस्था हवी आहे, कमीत कमी अपव्यय हवा आहे. br>

आज तंत्रज्ञानाचा, एक व्यक्ती आपल्या स्मार्ट मोबाईल फोन वरुन तंत्रज्ञानाचा वापर करते. परंतु हे तंत्रज्ञान सार्वजनिक सेवेचे माध्यम कसे बनेल? आम्ही आत्ता चंद्राबाबूजींना ऐकले. त्यांनी डिजिटल जगाचा सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कश्या प्रकारे वापर केला आहे. आज पुण्याच्या योजनांचा शुभारंभ झाला आहे, त्यामध्ये डिजिटल जगाचा उपयोग लोकांच्या सुखासाठी कसा केला जाईल, यासाठीच्या गोष्टींचा प्रारंभ झाला आहे. br>

संपूर्ण देशात एलईडी बल्बची मोहीम सुरु आहे. आपल्या देशात जर कोणी सरकार हे सांगत असेल की, आम्ही येणा-या काळात एक लाख कोटी रुपये ऊर्जा क्षेत्रात, वीजेच्या उत्पादनात गुंतवणार आहोत. 20 हजार मेगावॅट वीजेचे उत्पादन करणार आहोत आणि लोकांना वीज पुरवणार आहोत. तर मी सांगतो पहा.. तीन दिवस वर्तमानपत्रात ठळक बातमी आली होती. व्वा मोदीजी व्वा ! एक लाख करोड रुपये, 20 हजार मेगावॅट वीज, वा..वा.. असे होते ना ? पण जी एलईडी बल्बची मोहीम सुरु आहे ना, जेव्हा हे संपूर्ण चक्र पूर्ण होईल, तेव्हा माझ्या देशवासियांनो तुम्ही खूष व्हाल. 20 हजार मेगावॅट वीजेची बचत होईल. एक लाख कोटी रुपये वाचतील आणि हे माझ्या देशातल्या गरीबांचे पैसे वाचणार आहेत. br>

हा कोणता उपाय आहे, मार्ग आहे? सौर ऊर्जा अभियान ! आज पुणे शहरात या आधीच सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत आणि त्यासाठी त्यांनी खूप मोठे उद्दिष्ट ठेवले आहे. छतावरील सौर ऊर्जा, आपल्या घरावर, छतांवर वीज निर्मिती झाली, ती घरासाठी उपयोगात येईल आणि जी अतिरिक्त वीज असेल, ती सरकार खरेदी करेल. तुम्हीच पाहा, वीजेचे संकट कसे सोडवता येईल, यामध्ये कसा बदल घडवून आणता येईल, परिवर्तन कसे आणता येईल? जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे तुकड्या-तुकड्यात पाहतो, तेव्हा बदल घडून येत नाही. बदल सर्वंकष असायला हवा, एकमेकांशी जोडलेला असायला हवा आणि त्यातून साध्यही व्हायला हवे. br>

आपण स्वच्छता म्हटले, तर पुन्हा प्रश्न उपास्थित होतो की, आज जमीन किती महाग झाली आहे? स्वच्छता केली तर केर-कचरा टाकणार कुठे? कचरा टाकायच्या जागा कुठे असतील? अश्या जागा शोधायच्या असतील, तर आता शहरे एवढी वाढत चालली आहे के किती दूर जाणार? वाहतुकीवर किती खर्च होणार? परंतु आमचा हा प्रयत्न आहे की, कचऱ्यातून संपत्तीकडे. कच-यातून संपत्ती निर्मित करणे. देशात पहिल्यांदाच शहरातून जो केर-कचरा निघेल. त्यातून कंपोस्ट खत केले जाईल आणि पहिल्यांदाच शेतकरी असे कंपोस्ट खत खरेदी करतील. त्यासाठी जसे युरीयावर अनुदान दिले जात होते, तसे आता भारत सरकारने कंपोस्ट खतावरही अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. याचे कारण हे जे रासायनिक खत आहे, ज्यामुळे शेतक-यांची जमीन बरबाद होते आहे, आमची धरती माता नष्ट पावतेय, ते वाचवण्याचे कामही होईल, शहरात साफ-सफाईचे कामही होईल आणि कंपोस्ट खत तयार होऊन विकल्यानंतर दोघेही जिंकलेले असतील. त्या नगरपालिकेलाही काही पैसे मिळतील, त्या महानगरपालिकेलाही काही पैसे मिळतील. br>

घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन… आज पाण्याचे संकट आहे. कधी-कधी आमच्या प्रसार माध्यमातही लोक गोष्ट कुठून कुठे नेवून ठेवतात की तुम्ही क्रिकेटही खेळू शकत नाही. जिथे स्टेडीअम असतील, जिथे कुठेही क्रिकेटचे सामने होत असतील. क्रिकेटचा सामना असो वा नसो, त्यांना 365 दिवस मैदानावर पाणी शिंपडावेच लागते. परंतु देशाने असे मानलंय, की सामना रद्द झाला, तर पाणी शिंपडणे बंद होईल. असेच मानले देशाने ! धन्य आहे ! मैदानांना 365 दिवस पाणी द्यावेच लागते, तेव्हाच तर हिरवळ राहते, नाहीतर त्या स्टेडियम मध्ये दोन वर्षानंतर खेळ होणे शक्यच होणार नाही. पण आत्ता माहित नाही, ते कुठुन काय आणतात. नव-नवे, मोठ-मोठे तत्वज्ञान आणतात आणि याच कारणामुळे महाराष्ट्राचे बरेच नुकसानही झाले आहे. पण घन कचऱ्याबरोबर सांडपाणी व्यवस्थापन, आपले हे जे सांडपाणी आहे, त्याचे आपण प्रमाणीकरण शुद्धीकरण करुन, त्या पाण्याचा वापर बागांमध्ये, शेतांमध्ये, अश्या प्रकारच्या कामांमध्ये त्याचा उपयोग केला, तर भविष्यात आपण चांगल्या रितीने पाणी संकटावर मात करु शकतो. आणि त्यासाठी लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींकडे पहायला हवे,की आपल्या देशातल्या लोकांना आंतरराष्ट्रीय मानकानुसार असलेले पाणी मिळावे यासाठी आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही का? का नाही पोहोचत? आपण प्रयत्न तर करु या, सुरुवात तर करु या. एक लिटर, पाच लिटर, सात लिटर पाणी….. वाढवत जाऊ या. br>

आम्हाला प्रत्येक व्यक्तिला, प्रत्येक कुटुंबाला घर द्यायचे आहे. शहरातल्या झोपडपट्ट्या पुण्याने सामोरे मांडल्या. झोपडपट्ट्या गृहनिर्माण योजनेत परावर्तित करुन, त्यातल्या लोकांना घरे देण्याची योजना सामोरी मांडलीय. आपण पहाल की जीवनच बदलून जाते. गरीब माणूस जो झोपडपट्टीत राहतो, तेव्हा त्याचे विचार वेगळे असतात, पण जर का त्याच्या डोक्यावर छप्पर आले, रहायला घर मिळाले, तर तोही विचार करायला लागतो की, इथे पडदे लावले तर चांगलेच होईल, पण नाहीतर जुनी साडी लावून तरी पडदा तयार करु या. ही खिडकी ठीक नाही. त्याचा मेंदू काम करायला लागतो. झोपडीत राहात असतो तेव्हा त्याला पायपुसण्याची गरज वाटत नव्हती, पण आता वाटते की, आता ताडपत्रीचा छोटासा तुकडा तरी ठेवू या… जेव्हा कोणी घरात येईल तेव्हा पाय पुसुन येईल. त्याला वाटते की चला पैसे वाचवू या, सतरंजी आणू या म्हणजे पाहुणे आले की, बसण्यासाठी उपयोगात येईल. br>

घर मिळते तेव्हा केवळ चार भिंतीच मिळत नाहीत, केवळ छतच मिळत नाही, तर जगण्याचा नवा विचार मिळतो. एक अभिव्यक्ती निर्माण होते आणि अंतिमतः प्रगतीची मोठी शक्ती कोणती असेल, तर ते योजनेत नाही, तर ते असते, सव्वाशे कोटी लोकांची अभिव्यक्ती, जी गतीमानता आणते, लक्ष्य पूर्ततेचे कारण बनते आणि देश एका विशालतेकडे आणि भव्यतेच्या दिशेने आगेकूच करत आपला डंका वाजवतो. br>

आणि यासाठीच हे स्पर्धेचे युग आहे. मी सर्व शहरांना आमंत्रित करतो. हे आव्हान आहे. देशातल्या सर्व शहरांनी आणि केवळ त्या शहरातल्या नगरपालिका / महानगरपालिका किंवा त्यातील कर्मचा-यांनी नाही, तर त्या शहरातल्या नागरिकांनी हे आव्हान स्वीकारावे. मग ती स्वच्छतेची स्पर्धा असो, अथवा स्मार्ट सिटी स्पर्धेतला प्रवेश असो, शहराला ‘स्मार्ट’ करायलाच हवे….. हे लोक सहभागातून होईल, लोक संकल्पातून होईल. जेव्हा मी सांगितले की, माय जिओव्ही डॉट वर आपण आपल्या सूचना पाठवा, तुम्ही हैराण व्हाल की 25 लाखाहून अधिक लोकांनी गांभीर्याने सूचना पाठवल्या. ज्या सरकारला विचारात घ्याव्या लागतील, अश्या 25 लाख लोकांनी योगदान दिले. जेवढा लोक सहभाग वाढतो…. मी मध्यंतरी ‘मन की बात’ मध्ये एक गोष्ट सांगितली होती की, आपली रेल्वे स्थानके आपल्या गावांची ओळख का बनू नयेत? इंग्रजांनी जेव्हा इथली रेल्वे स्थानके तयार केली, तेव्हा त्यांच्या डोक्यात ‘पिझ्झा हाऊस’ सारखे काहीतरी होते. अमेरिकेत तुम्ही कोणत्याही कोनाकोपऱ्यात जा, एकाच प्रकारची ‘पिझ्झा हाऊस’ असतात तशीच आपली रेल्वे स्थानकही एकाच तऱ्हेची आहेत. तुम्ही उजवीकडे गेलात तर अमूक येईल, डावीकडे तमूक. एकदम ठराविक ! पण भारत असा नाही. भारत विविधतेने नटलेला आहे. त्याला नुतनीकरण हवे आहे. मी म्हटले की ठीक आहे, भिंती तोडण्याची गरज नाही, पण रंग-रुप बदलूनही शहराची ओळख निर्माण करु शकता ना आणि मी एवढा हैराण झालो की महिन्याभरातच त्या गावातील, शहरातील जे कलाकार होते, शाळेतील मुले होती, शाळेतील चित्रकलेचे शिक्षक होते, ते सर्व लोक रेल्वे स्थानकांवर पोहोचले. जे-जे त्यांच्या जवळ होते, ते रंगाचे काम करायला लागले आणि भिंती इतक्या सुंदर रंगवल्या. छोट्या-छोट्या रेल्वे स्थानकांनी आपली ओळख निर्माण केली आणि शहराची ओळखही त्याच्याशी जोडली गेली. br>

आज देशातल्या लोकांना बदल हवा आहे. त्यांना या बदलात सहभागी व्हायचे आहे, त्याच्याशी जोडले जायचे आहे. या ‘स्मार्ट सिटी’चे सर्वात मोठे वैशिष्ट्य हेच आहे. काही लोकांना ‘स्मार्ट’ शब्द ऐकला की खूप त्रास होतो आहे. कोणी असे काहीतरी करत आहे ज्याचा कधी विचार केला नव्हता. पण हे असे नाही आहे बरे ! माझी ‘स्मार्ट’ची कल्पना एकदम साधी – सोपी आहे बरं….. लोकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळावे. सोसायटीतल्या पहिल्या घराला तर मिळेल पण शेवटच्या घराला मिळणार नाही, असे होता कामा नये. पण असे घडते ना, की एका भागात पाणी येते, जे सुरुवातीला असतात त्यांना पाणी मिळते, पण जे मागे असतात, त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचतच नाही. वीज सर्वांना मिळाली पाहिजे, समान पद्धतीने मिळाली पाहिजे. जनसामान्यांच्या सोयी सुविधांच्या आवश्यकतेला आधुनिक चौकटीत परिपूर्ण करायचे आहे, त्याचा हा प्रयत्न आहे आणि मी जसे सांगितले की हे आर्थिक घडामोडीचे एक केंद्र बनावे, विकास पर्यावरण स्नेही असावे, हरीत असावे. गरीबी पचवण्याची शक्ती जेवढी अधिक वाढेल, तेवढा शहराचा विकास योग्य दिशेने असेल. शहर जेवढी गरीबी पचवू शकेल, तेवढी अर्थव्यवस्था आपणहून पुढे जाईल. घरात आलेल्या पाहुण्यांना तोच खाऊ घालू शकतो, जो दोन्ही वेळा सुखाने जेवत असेल, नाहीतर पाहुण्यांना कसे खायला घालणार? आणि या साठीही शहरेही आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य असायला हवीत, त्यांच्यात अशी शक्ती असायला हवी की, बाहेरुन जे गरीब आमच्याकडे येत राहतात, ती गरीबी सांभाळण्याची, ती पचवण्याची, त्या गरीबीला गरीबीतून बाहेर काढण्याची ताकद त्या शहरात असली पाहिजे. तर मग एक नवा बदल, नव्या पद्धतीचा बदल, लोक सहभागातून बदल….. त्याच दिशेने प्रयत्न सुरु आहेत. br>

मी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, काय-काय काम झाले आहे, त्याचा आढावा घेतला. मी खरोखरच एवढा खूष झालो की लोकांवर विश्वास ठेवून काही करतो तेव्हा त्याची किती ताकद असते त्याचे हे उदाहरण आहे. ही ‘स्मार्ट सिटी’ याच्याशी एवढे लोक जोडले गेले आहेत, चर्चा करत आहेत. सर्व स्थापत्यशास्त्र वाले तुम्ही जेव्हा त्यांना सांगता की असे काम आहे, तेव्हा तो विचारतो की साहेब, निविदा केव्हा निघणार आहेत? आज त्या निविदेचा पत्ता नसला तरी तो सांगेल की आम्ही पण स्पर्धेत येवू, आम्ही पण करु….. पूर्ण वातावरणच बदलले आहे. मी आज पुन्हा एकदा वैंकेय्या नायडूजींचे, त्याच्या संपूर्ण चमूचे खूप-खूप अभिनंदन करतो. पुणे शहराचे खूप अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. परंतु पुणेवासियांनी लक्षात ठेवावे की, आपण कदाचित दीड गुण कमी मिळाल्यामुळे दुस-या क्रमांकावर आले आहात. केवळ दीड गुणांनी तुम्ही मागे पडलात. जर तुम्हाला दीड गुण जास्त, मिळाले असते, तर भुवनेश्वरच्या जागी तुम्ही असता ! तुम्हीच पाहा किती छान स्पर्धा चाललीय ते ! मी जेव्हा पुढच्या वेळी पुण्यात येईन, तेव्हा मला असे हवे आहे की पुढच्या वेळी कोणतीही स्पर्धा असेल, आमचे पुणे ‘नंबर वन’ व्हायला हवे ! हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे, ही लोकमान्य टिळकांची ठेव आहे आणि त्यामुळे त्याच रुबाबात आपल्याला पुण्याला पुढे घेऊन जायचे आहे आणि मी देशातल्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही पण निर्णय घ्या की, पुण्यापेक्षा मागे राहाता कामा नये. पाहा, किती मजा येईल….. br>

खूप-खूप धन्यवाद. br>

J.Patankar/S.Tupe