Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेले भाषण

स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी लाल किल्ल्यावरुन केलेले भाषण


माझ्या प्रिय देशबांधवानो,

स्वातंत्र्य दिनाच्या या पवित्र प्रसंगी, सव्वाशे कोटी भारतीय आणि देशविदेशात असलेल्या माझ्या सर्व बंधु भगिनींना मी लाल किल्ल्यावरुन अनेक शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, स्वातंत्र्याचे हे पर्व सत्तरावे वर्ष, एक संकल्प, हे राष्ट्राला एका नव्या उंचीवर नेण्याचे “संकल्पपर्व” आहे. आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेतो आहोत, त्यामागे लक्षावधी स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आहे, त्याग तपस्येची गाथा आहे. भर तारुण्यात स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर जाणाऱ्या वीरांचे स्मरण होते आहे. महात्मा गांधी, सरदार पटेल, पंडित नेहरु, यांच्यासारख्या अगणित महापुरुषांनी , देशाच्या स्वातंत्र्यासाठी अविरत संघर्ष केला आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्याला स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली.

भारत एक चिरपुरातन राष्ट्र आहे. हजारो वर्षांचा आपला इतिहास आहे, हजारो वर्षाची सांस्कृतिक वारसा आहे. वेदांपासून ते विवेकानंदापर्यंत, उपनिषदांपासून ते उपग्रहांपर्यंत, सुदर्शन चक्रधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंत, महाभारतातील भीमापासून ते भीमराव आंबेडकरांपर्यंत एक दीर्घ असा आमचा इतिहासाचा प्रवास आहे, वारसा आहे. आम्ही अनेक चढउतार पाहिले आहेत, अनेक पिढयांचा संघर्ष आहे, मानवजातीला महामूल्ये देण्यासाठी तपस्या केली आहे. भारताच वय केवळ सत्तर वर्षे नाही. मात्र पारतंत्र्यानंतर, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतर एका नव्या व्यवस्थेअंतर्गत आपण देशाला प्रगतीप्रथावर नेण्यासाठी जे कार्य केले, तो प्रवास सत्तर वर्षांचा आहे. सरदार वल्लभभाई पटेलांनी देशाला एक केले. आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, की आपण देशाला “श्रेष्ठ” बनवावे. “एक भारत, श्रेष्ठ भारत” बनवण्याचा आपण निरंतर प्रयत्न केला पाहिजे.

बंधु भगिनींनो, स्वराज्य सहज मिळत नाही. ब्रिटीशांचे अत्याचार अनन्वित होते, मात्र, भारतीयांचा स्वातंत्र्याचा निश्चयही, दृढ होता. प्रत्येक भारतीय स्वातंत्र्य युध्दातला शिपाई होता. देशाला स्वातंत्र्य मिळावे, ही आकांक्षा प्रत्येकाच्या मनात होती. कदाचित, प्रत्येकाला बलिदान देण्याची, तुरुंगवास भोगण्याची संधी मिळाली नसेल, मात्र प्रत्येक भारतीय संकल्पबध्द होता. महात्मा गांधींचे नेतृत्व होते, सशस्त्र क्रांतीची प्रेरणा होती. या सगळया प्रयत्नानंतर स्वातंत्र्य मिळावे, ही आकांक्षा प्रत्येकाच्या मनात होती. मात्र स्वराज्याला, सुराज्यात परिवर्तीत करणे, हा सव्वाशे कोटी जनतेचा संकल्प आहे. जर, स्वराज्य बलिदानाशिवाय मिळाले नाही, तर सुराज्यही त्यागाशिवाय, पुरुषार्थाशिवाय, पराक्रमाशिवाय, समर्पणाशिवाय, शिस्तीशिवाय शक्य होणार नाही आणि म्‍हणूनच, सव्वाशे कोटी भारतीयाने आपापली जबाबदारी ओळखून त्यासाठी दृढसंकल्प होऊन कार्य करणे गरजेचे आहे. पंचायत असो किंवा संसद, ग्रामप्रधान असो, किंवा पंतप्रधान, प्रत्येकाला प्रत्येक लोकशाही संस्थेला आपापली जबाबदारी पार पाडावीच लागेल. तेव्हाच भारत, सुराज्याचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करु शकेल. हे खरे आहे, देशासमोर अडचणी अनेक आहे. मात्र, हे विसरता कामा नये, की जेवढया अडचणी आहेत, त्यापेक्षा अधिक सामर्थ्यही आहे. लाखो समस्या असतील तर सव्वाशे कोटी मेंदूही आहेत जे, या समस्या दूर करण्यासाठी समर्थ आहेत.

मित्रांनो, एक काळ असा होता, जेव्हा सरकारांवर “आक्षेप” असायचे आजचे सरकार हे जनतेच्या आक्षेपांच्या नाही तर अपेक्षांच्या ओझ्याखाली आहे, आणि जेव्हा “अपेक्षा” असतात, तेव्हा त्याच्यामागे एक संकेत असतो. की जिथे आशा असते, विश्वास असतो, तिथेच, अपेक्षांचा जन्म होतो. या अपेक्षाच संकल्प पूर्ण करण्यासाठी, सुराज्याकडे जाण्याच्या प्रवासाला गतिमान करतात, नवी चेतना निर्माण करतात. आणि म्हणूनच, माझ्या सुराज्याचा प्रवास नित्य निरंतर सुरु राहतो.

माझ्या देशबांधवांनो, सुराज्याच्या या प्रवासात, जेव्हा आज मी लाल किल्ल्यावरुन तुमच्यासमोर भाषण करतो आहे, तेव्हा सरकारच्या कार्याचे मूल्यमापन, त्याची चर्चा होणे अगदी स्वाभाविक आहे. सरकारच्या दोन वर्षातल्या कार्यांची माहिती सांगायची झाल्यास, मीही अनेक गोष्टी येथे मांडू शकतो. अनेक उपक्रम, अनेक कामं आम्ही केलीत. जर मी त्यांचे वर्णन करत राहिलो, तर कदाचित मला आठवडाभर या लाल किल्ल्याच्या प्राचीवरुन बोलत बसावे लागेल. आणि म्हणूनच, मी तो मोह टाळून आज कार्याची नाही, तर या सरकारच्या कार्यसंस्कृतीकडे तुमचे लक्ष वेधू इच्दितो. कार्याचा लेखाजोखा करणे सोपे असते. मात्र जोपर्यंत कोणी सखोल अभ्यास करत नाही, तोपर्यंत सर्वसामान्यांसाठी कार्यसंस्कृती समजून घेणे अवघड असते. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधूभगिनींनो, मी आज येथे केवळ धोरणांची नाही तर “नियत” आणि निर्णयांची चर्चा करणार आहे. फक्त दिशा नाही तर व्यापक दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. फक्त रुपरेखा नाही तर रुपांतरणाचा संकल्प आहे. ही लोक आकांक्षा, लोकशाही आणि लोक समर्थनाची त्रिवेणीधारा आहे. ही मती आहे तशीच सहमती आहे. ही गती आहे तसेच प्रगतीची जाणीवही आहे. म्हणूनच, माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी जेव्हा सुराज्याची चर्चा करतो, तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा आहे की देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या आुष्यात परिवर्तन! सुराज्याचा अर्थ आहे, सरकारची सर्वसामान्य माणसाविषयी संवेदनशीलता, जबाबदारीची जाणीव आणि सर्वमसामान्याप्रति समर्पित असल्याची भावना आणि तेव्हाच सुप्रशासनावर भर देता येतो. प्रत्येकाच्या जबाबदारीविषयी जागरुक असावे लागते. जबाबदारी आणि उत्तरदायित्व हे सुराज्याच्या मूळाशी असावे लागते. आणि तिथूनच सुराज्यासाठी आवश्यक रस मिळू शकतो. सरकार, प्रशासन संवेदनशील असायला हवे. मला आठतवे, एक काळ असाही होता, जेव्हा लोकांना दवाखान्यात उपचारासाठी ताटकळत बसावे लागे, “एम्स”मध्ये लोक उपचारासाठी येत, तेव्हा तीन तीन दिवस वाट पाहिल्यावर त्यांची तपासणी केव्हा होणार हे ठरत असे. आज आम्ही ही व्यवस्था बदलली आहे. ऑनलाईन नोंदणी सुरु केली आहे. डॉक्टरांची वेळीही आता ऑनलाईन मिळू शकते. निश्चित वेळी रुग्‍ण आला, तर त्याची तपासणी लगेचच केली जाते. एवढेच नाही, तर त्याच्या वैद्यकीय चाचण्यांचे रिपोर्टही त्याला ऑनलाईन मिळू शकतात. आरोग्याच्या क्षेत्रात, ही पध्दत एक संस्कृती म्हणून आम्हाला देशभरात रुजवायची आहे. आज देशातल्या 40 मोठमोठया रुग्णालयात आम्ही ही व्यवस्था लागू केली आहे. मात्र, या व्यवस्थेचा मूलमंत्र आहे, शासन जबाबदार असले पाहिजे, शासन उत्तरदायी असले पाहिजे. असे असेल तरच देशात बदल शक्य होईल.

बदल कसे घडू शकतात ? तंत्रज्ञान तर आहेच, आता रेल्वे तिकिटाचेच उदाहरण घ्या. देशातल्या सर्वसामान्य गोरगरिब जनतेचा रेल्वे तिकीटांशी संबंध येतो. आधी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन, एका मिनिटाला 2000 तिकीट आरक्षित करता येत असत. त्यालाही खूप वेळ लागत असेल. आज मात्र एका मिनिटात 15,000 रेल्वेतिकीट मिळणे शक्य झाले आहे. सर्वसामान्य माणसाच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, सरकार कसे काम करते, सर्वसामान्य जनतेप्रति जबाबदार असायला हवे, याचेच हे उदाहरण. देशात एक मोठा वर्ग आहे. जो मध्यमवर्ग देशात एक मोठा वर्ग आहे. जो मध्यमवर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग म्हणून ओळखला जातो. हा वर्ग पोलिसांपेक्षाही, प्राप्तीकर विभागाला जास्त घाबरतो. ही स्थिती मला बदलायची आहे आणि मी त्यासाठी काम करतो आहे. मात्र एक काळ असा होता, जेव्हा सर्वसामान्य माणूस अतिशय काळजीपूर्वक कर भरत असे. चार पैसे जास्तच देत असे. मात्र, जेव्हा परतावा मिळण्याची वेळ येईल, तेव्हा त्याला कठोर परिश्रम करावे लागत, शिफारस करावी लागे, त्यानंतरही त्याचे स्वत:चे, हक्काचे पैसे त्याला पर मिळण्यासाठी चार पाच महिने लागत त्यातही टाळाटाळ होत असे आम्ही आता परताव्यासाठी ऑनलाईन व्यवस्था सुरु केली त्यामुळे अगदी दोन-तीन आठवडयात परतावे मिळायला सुरुवात झाली. आज जे माझे भाषण ऐकत असतील, त्यांना हे जाणवेल की त्यांचे परतावे लवकर मिळायला सुरुवात झाली आहे. जबाबदार उत्तरदायी सरकारचे हे उदाहरण आहे.

सरकार पारदर्शी असण्याचेही विशेष महत्व आहे. तुम्हाला माहितच असेल सर्वसामान्य माणसे आता देश-विदेशात जातात. पूर्वी 50 ते 60 लाख लोक पारपत्रासाठी अर्ज करत असत. आता 2 कोटी लोक हे अर्ज करतात. करतात. बंधू-भगिनींनो, आधी शिफारस नसेल, तर पारपत्र मिळतांना. पाच-सहा महिने केवळ तपासणीच सुरु राहत असे. पण, आता अर्ज केल्यानंतर एक-दोन आठवड्यात पारपत्र मिळते. आज मी अभिमानाने सांगू शकतो, की केवळ वर्ष 2015-16 एवढ्या काळात आम्ही 1.75 कोटी पारपत्र देण्याचे काम आम्ही केले.

सुराज्यात, शासन तत्पर, कार्यक्षमही असायला हवे. आधी एखाद्या कंपनीला, आपल्या देशात एखादा कारखाना किंवा कंपनी सुरु करायची असेल, तर त्याला अर्ज करावा लागे. केवळ नोंदणी करण्याचा प्रश्न होता. त्याला देशासाठीच काहीतरी करायचे असे. मात्र, त्यातही सहा सहा महिने निघून जात. मात्र, आज तेच प्रशासन, तेच नोकरशहा आणि तीच यंत्रणा असूनही, नोंदणीचे काम 24 तासांत पूर्ण होते. गेल्या जुलै महिन्यात, 900 पेक्षा अधिक नोंदणीचे काम पूर्ण झाले. बंधू-भगिनींनो, सुराज्यासाठी, सुशासन गरजेचे आहे आणि त्या सुशासनासाठी आम्ही काही पावले उचललीत.

गेल्या वर्षी याच लाल किल्ल्यावरुन मी घोषणा केली होती, की तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या पदांसाठी, आता मुलाखती घेतल्या जाणार नाहीत. आम्ही गेल्या वर्षात अशी 9 हजार पदे शोधली आहेत. आता या नऊ हजार पदांवरच्या नियुक्त्यांसाठी, माझ्या देशातल्या युवकाला मुलाखत द्यावी लागणार नाही, शिफारस आणावी लागणार नाही, खर्च करावा लागणार नाही, निष्पक्ष पद्धतीने त्याची नियुक्ती होऊ शकेल. यासाठी आम्ही हा निर्णय लागू केला आहे.

बंधू-भगिनींनो, एक काळ असा होता, जेव्हा सरकार काही योजना जाहीर करत असे, की आम्ही अमुक तमुक करु, तर सर्वसामान्य लोकांचे समाधान होत असे की, काहीतरी करणार आहेत. नंतर, लोक म्हणू लागले की, योजनेचा आराखडा दाखवा, तो दाखवेपर्यंत लोकांचे समाधान होत नसे. त्यानंतर, एक काळ असा आला, की जनता म्हणायची, योजनेसाठीचा निधी दाखवा, निधी मंजूर झाला की, लोक समाधानी होत. मात्र, आता 70 वर्षानंतर लोक केवळ, योजना जाहीर करण्याने, त्याचा आराखडा दिल्याने किंवा निधी मंजूर केल्याने समाधानी होत नाही, त्यांना त्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी असते. ती योजना राबवल्यावरच त्यांचा विश्वास बसतो. आज योजनेची अंमलबजावणी करतांना आपण त्याची गती कमी करु शकत नाही. आपल्याला कामांची गती वाढवावीच लागेल. आपल्या देशात गाम्रीण भागातले रस्ते, प्रत्येक गावकऱ्याची अपेक्षा असते, की गावात पक्के रस्ते असावेत. हे खूप मोठे काम आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना त्यांनी हे काम सुरु केले. नंतरच्या सरकारनेही ते काम पुढे सुरु ठेवले. मात्र, आम्ही त्या कामाला वेग देण्याचा प्रयत्न केला. आधी दररोज 70 ते 75 किलोमीटर रस्त्यांचे बांधकाम होत असे. आम्ही त्याची गती वाढवून आता दररोज 100 किलोमीटर कामापर्यंत नेली आहे. ही गतीच, आगामी काळात सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षा पूर्ण करेल.

आपल्या देशात ऊर्जानिर्मिती, त्यातही शाश्वत / नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर आमचा भर आहे. एक काळ होता, जेव्हा आपल्या देशात गेल्या अनेक वर्षांपासून पवन ऊर्जेवर काम सुरु होते. आमच्या कार्यकाळात, आम्ही एका वर्षात ही गती 40 टक्क्यांनी वाढवली आहे. सौरऊर्जा, आज संपूर्ण जगात ज्याच्यावर काम सुरु आहे. आम्हीही सौरऊर्जा निर्मितीत 116 ते 118 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. हा बदल नाही, ही मोठी झेप आहे. आम्ही या गतीने, कामाचे मोजमाप करतो आहोत. आपल्या देशात, ऊर्जानिर्मिती होत होती, मात्र, ऊर्जा वितरण पारेषणाची म्हणावी तेवढी सोय नव्हती. आमचे सरकार येण्यापूर्वी, एका वर्षात 30 ते 35 हजार किलोमीटर ऊर्जापारेषण वाहिनी टाकली जायची. आज, आमचे सरकार आल्यावर आम्ही एका वर्षात जवळपास 50 हजार किलोमीटर पर्यंत ऊर्जापारेषण वाहिनी टाकण्यापर्यंत गती वाढवली आहे. गेल्या 10 वर्षातली रेल्वे रुळ टाकण्याची, म्हणजे रेल्वे रुळ कार्यरत करण्याची गती पाहिली तर, गेल्या दहा वर्षात 1500 किलोमीटर लांबपर्यंत रेल्वेरुळ टाकण्याचे काम झाले. मात्र, गेल्या दोन वर्षात, हे काम 3500 किलोमीटर पर्यंत पूर्ण झाले आहे. हीच गती आम्ही पुढे नेतो आहे.

बंधू-भगिनींनो, आज आधार कार्डाला सरकारच्या योजनांशी जोडून थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून आम्ही योजना, अनुदाने लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यातली गळती पूर्णपणे थांबवली आहे. आधीच्या सरकारने आधार कार्डाला सरकारी योजनांशी जोडण्याचे काम सुरु केल्यावर, सुमारे 4000 नागरिकांना जोडले होते. मात्र, आज मी समाधानाने सांगू शकतो, आम्ही गेल्या दोन वर्षात 70 हजार नागरिकांना आधार संलग्न योजनांशी जोडण्याचे काम पूर्ण केले आहे.आणि इतरांना जोडण्याचे कामही सुरु आहे. आज मध्यमवर्गात कार घरी असेल, तर प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. मात्र, एक काळ असा होता, जेव्हा घरी स्वयंपाकाचा गॅस असेल, तर ते प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे. देशात 60 वर्षात 14 कोटी लोकांना स्वयंपाकाच्या गॅस जोडण्या दिल्या गेल्या होत्या. आम्ही सत्तेत आल्यावर केवळ 60 आठवड्यांत, 4 कोटी लोकांना, गॅस जोडण्या दिल्या, हे सांगतांना मला अतिशय आनंद होत आहे. हाच वेग सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवणार आहे.

आम्ही अनावश्यक कायद्यांचा गुंताही कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. या कायद्यांचे ओझे, त्रास सरकारला होतो, न्याय पालिकेला होतो आणि सर्वसामान्यांनाही होतो. आम्ही असे 1700 अनावश्यक, कालबाह्य कायदे शोधून काढले. त्यापैकी 1,175 कायदे संसदेच्या माध्यमातून रद्दही केले. इतर कायदे रद्द करण्याचे कामही सुरुच आहे.

बंधू-भगिनींनो, देशात एक नकारात्मक वातावरण तयार झाले होते. कुठलेही काम असेल, तर ते होणार की नाही, केव्हा होणार याबद्दल लोकांच्या मनात नकारात्मक निराशेची भावना असायची. नकारात्मकतेचे, निराशेचे वातावरण वाढत चालले होते. हे वातावरण बदलायचे होते. देशात सकारात्मक ऊर्जा भरणे गरजेचे होते. आम्ही जन धन योजना सुरु केली. ही योजना, प्रत्यक्षात राबवणे एक प्रकारे अशक्यच काम होते. इतक्या वर्षांपासून बँका होत्या, सरकारे होती, बँकांचे राष्ट्रीयीकरणही झाले होते. मात्र, सर्वसामान्य माणूस, गरीब माणूस बँकांशी जोडला गेला नव्हता. अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात येऊ शकला नव्हता. मात्र, जनधन योजनेच्या माध्यमातून 21 कोटी नागरिकांना या अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहाशी जोझे शक्य झाले. याचे श्रेय सरकारचे नाही, तर सव्वाशे कोटी जनतेचे आहे, ज्यांनी जनधन योजनेला प्रतिसाद देत, अशक्य काम शक्य करुन दाखवले, त्यासाठी मी या भारतीयांचे आभार मानतो.

आज देशातल्या गावागावात नारी गौरवाची मोहीम सुरु आहे. त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे, स्त्रियांना उघड्यावर शौचाला जाण्याच्या अतिशय अपमानास्पद असहायतेपासून मुक्त करणे. पहिल्यांदा जेव्हा मला लाल किल्ल्यावरुन तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती, तेव्हाच मी या भावना तुमच्यामुळे व्यक्त केल्या होत्या. हे काम करण्यासाठी आम्ही गावागावात शौचालये बांधण्याचे काम हाती घेतले. आणि आज मी अतिशय अभिमानाने सांगू शकतो, की इतक्या कमी काळात, 2 कोटी शौचालये बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. जवळपास सत्तर हजार गावांमधली उघड्यावर शौचाला जाण्याची विवंचना संपली आहे. स्त्रियांना मुक्ती मिळाली आहे. सर्वसामान्यांचे आयुष्य बदलते आहे. याच लाल किल्ल्यावरुन भाषण देतांना मी सांगितले होते, की गेल्या कित्येक वर्षात ज्या गावात वीज पोहोचलेली नाही. तिथे आम्ही वीज पोहोचवू, 1000 दिवसांत, देशातल्या 18 हजार गावांमधे वीज पोहोचवण्याचा संकल्प आम्ही केला. आणि मी आनंदाने सांगू इच्छितो, की हा संकल्प करुन, अर्धे दिवसही झाले नसतांना जवळपास 10 हजार गावांमधे वीज पोहोचली आहे. आणि मला सांगितले गेले, की त्यातली अनेक गावे अशी आहेत, जे आज इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदा स्वातंत्र्याचा हा उत्सव घरबसल्या बघू शकत आहेत. मी त्या गावांनाही इथून विशेष शुभेच्छा देतो. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, दिल्लीपासून केवळ तीन तासांच्या अंतरावर हाथरस जवळ एक छोटे खेडे आहे – नगराफतेला नावाचे दिल्लीहून केवळ तीन तासात, या गावी पोहोचू शकतो, मात्र, त्याच गावात, वीज पोहोचण्यासाठी सत्तर वर्षे जावी लागली. आणि म्हणूनच, आम्ही कुठल्या कार्य संस्कृतीवर भर देतो आहोत, हे सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे.

बंधू-भगिनींनो, शास्त्रज्ञांनी, ऊर्जाबचतीसाठी एलईडी बल्बचा शोध लावला. मात्र, एक एलईडी बल्ब साडे तीनशे रुपयांना मिळतो. खरं तर, एलईडी बल्बच्या वापरामुळे, सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडू शकतो. पर्यावरणालाही लाभ मिळू शकतो. मात्र, त्याची किंमत जासत असल्याने सर्वसामान्य माणसे, ते विकत घेत नसत. अशावेळी, जनहिताच्या दृष्टीने सरकारने हस्तक्षेप करुन एलईडीच्या वापराला प्रोत्साहन द्यायला हवे होते. मात्र, आधीच्या सरकारने ते केले नाही. आम्ही, त्यात हस्तक्षेप केला आणि 350 रुपये किमतीला मिळणारा बल्ब आम्ही जनतेला केवळ 50 रुपयांत दिला. किमतीतला फरक बघा. मी हे विचारु इच्छित की, मधले पैसे कुठे जात होते. मात्र, आम्ही तो नागरिकांना स्वस्तात उपलब्ध करुन दिला. आज आपल्या देशात लोकानुनयाचे राजकारण चालते. जर आम्ही कंपन्यांना बल्बमागे 300 रुपये अनुदान देऊन, मग गरीबांना ते स्वस्त दरात उपलब्ध करुन दिले असते, तर आमचे खूप कौतूक झाले असते. मात्र, आम्ही कमी दरात 13 कोटी बल्ब वाटले. 77 कोटी बल्ब वाटण्याचा आमचा संकल्प आहे आणि मी आज सर्व देशबांधवांना आवाहन करतो, त्यांनीही आपल्या घरात एलईडी बल्ब लावावेत. त्यामुळे त्यांचे वीजबील कमी होईल. वर्षाकाठी 500 रुपयांची बचत होईल. आणि देशाच्या उर्जेचीही बचत होईल. जर 77 कोटी बल्ब लावले गेले, तर 20 हजार मेगावॅट वीज वाचू शकेल. म्हणजेच देशाचे सव्वा लाख कोटी रुपये वाचू शकतील. त्यामुळे, मी देशातल्या जनतेला पुन्हा एकदा आवाहन करतो, की त्यांनी देशासाठी आणि स्वत:साठीही, ऊर्जा बचत करणारे एलईडी बल्ब लावावेत. या माध्यमातून, आपण तापमान वाढीशी लढू शकतो. पर्यावरणासाठी काम करु शकतो. आणि सर्वसामान्य माणूसही छोटे काम करुन यासाठी योगदान देऊ शकतो.

बंधू-भगिनींनो, आपल्याला कल्पना असेलच, की, पेट्रोलियम उत्पादनांसाठी, आपण इतर देशांवर अवलंबून आहोत. आणि त्यासाठी आपण दीर्घकालासाठी करार केले आहेत. कतारसोबत आपण 2024 पर्यंतचा करार केला आहे, की आपल्याला दीर्घकाळ ऊर्जा मिळेल. मात्र, याचा, आपल्या अर्थव्यवस्थेवर ताण पडतो. आपल्याला हे दर परवडणारे नव्हते. परराष्ट्रधोरणाचे लाभ कसे मिळतात ते बघा, मी जेव्हा, कतारला गेलो होतो, तेव्हा मी या कराराविषयी तिथल्या सरकारशी चर्चा केली. खरंतर, त्यांनी निश्चित केलेले दर पाळणे, हे त्या करारानुसार, 2024 पर्यंत आपल्यावर बंधनकारक होतो. मात्र, आम्ही चर्चा केल्यावर, त्यांनी या दरात बदल करण्याची तयारी दर्शवली. आणि नव्याने दर निश्चित झाले, ज्यामुळे देशाच्या तिजोरीतल्या 20 हजार कोटी रुपयांची बचत झाली. चाबाहार बंदर, जे आपल्या देशाला मध्य आशियाशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. अनेक सरकारांसोबत या बंदरनिर्मितीविषयी चर्चा सुरु होती. मात्र, हे अशक्य काम आम्ही शक्य करुन दाखवले. आज भारत, अफगाणिस्तान आणि इराण हे तीन देश चाबाहार बंदराच्या निर्मितीसाठी एकत्रितपणे, ‘नवकर’ योजना राबवणार आहे, ही एक मोठी उपलब्धी आहे.

एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगू इच्छितो, जी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी निगडित आहे. ती आहे, महागाई! हे खरं आहे, की आधीच्या सरकारच्या काळात महागाई दर 10 टक्क्यांच्या वर पोहोचला होता. मात्र, आम्ही निरंतर प्रयत्न करुन, उपाययोजना करुन हा दर 6 टक्क्यांच्या वर जाऊ दिला नाही. एवढेच, नाही तर आम्ही आता रिझर्व्ह बँकेसोबत एक करारही केला आहे, की
महागाई दर 4 टक्क्यांपेक्षा कमी अधिक 2 टक्क्यांच्यावर जाऊ दिला जाणार नाही यासाठी प्रयत्न करावेत. महागाई आणि विकास दराचा समतोल राखण्यासाठी जी चर्चा होत असते त्याच्या पलिकडे जाऊन देश हिताच्या दृष्टीने काम करावे. मात्र यानंतरही गेल्या दोन वर्षात देशात मोठा दुष्काळ पडला. भाजीपाल्याच्या किंमतीवर दुष्काळाचा तत्काळ परिणाम होतो. भाजीपाल्याची आवक कमी झाली तर त्याचाही परिणाम होतो. यामुळे काही अडचणी नक्कीच आल्या. दोन वर्षातल्या दुष्काळामुळे डाळींचे उत्पादन घटले हाही चिंतेचा विषय आहे. मात्र बंधु-भगिनींनो, ज्या प्रकारे आधी महागाई वाढत होती त्याच गतीने आताही वाढली असती. तर माझ्या देशातल्या गरीब जनतेचे काय हाल झाले असते ? ही महागाई वाढ आटोक्यात ठेवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आहेत. मात्र तरीही या सरकारकडून जनतेच्या खूप अपेक्षाही आहेत. नागरिकांच्या अपेक्षा असणे स्वाभाविक आहे मात्र मी या दिशेने प्रयत्न करण्यात कुठलीही कसूर करणार नाही. असे आश्वासन देतो. जितका प्रयत्न मी करु शकेन तेवढा करेन मात्र गरीबाचे ताट महाग होऊ देणार नाही.

माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, देश गुरु गोविंद सिंगाची 350 वी जयंती साजरी करण्याची तयारी करतो आहे. देशासाठी बलिदान देण्याची गाथा, शीख गुरुंची परंपरा हा देश कसे करु शकतो. पण गुरु गोविंद सिंगानी हे खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले होते, ज्या हातांनी कधी सेवा केली नसेल, ज्या हातांनी कधी कुठले काम केले नसेल, जे हात श्रम करुन मजबूत झाले नसतील ज्या हातांमध्ये कष्ट करता-करता घट्टे पडले नसतील त्या हातांना मी पवित्र हात कसे समजू शकतो. आज आपण जेव्हा गुरु गोविंद सिंगाची 350 वी जयंती साजरी करतो आहोत तेव्हा मला माझ्या शेतकऱ्यांची आठवण येते आहे. त्यांच्यापेक्षा अधिक पवित्र हात कोणाचे असू शकतील ? त्यांच्यापेक्षा अधिक पवित्र हृदय कोणाचे असू शकेल? त्यांच्यापेक्षा अधिक पवित्र हेतू कोणाचा असू शकेल ? दोन वर्ष दुष्काळ पडूनही या बळीराजाने देशाचे अन्न भांडार भरलेले राहावे यासाठी जे निरंतर प्रयत्न केले आहेत. त्यासाठी मी शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो.

दुष्काळाची स्थिती बदलली आहे यावर्षी उत्तम पाऊस पडतो आहे काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे संकटेही आली आहे. ज्या राज्यांमध्ये, ज्या नागरिकांना अतिवृष्टीमुळे संकटे झेलावी लागली त्यांच्यासोबत भारत सरकार खंबीरपणे उभे आहे. मात्र माझ्या शेतकरी बांधवांचे मी विशेष अभिनंदन करतो. कारण जेव्हा आमच्या देशात डाळींची कमतरता होती तेव्हा आमचा शेतकरी दुसरी पिके घेत होता. मात्र आज भारतातल्या सर्वसामान्य जनतेला आवश्यक असलेली डाळ महाग झाली असतांना मी समाधानाने सांगू इच्छितो की यंदा माझ्या शेतकरी बांधवांनी डाळींची पेरणी दिडपटीने वाढवली आहे. डाळींच्या कमतरतेचे संकट दूर करण्यासाठी माझा शेतकरी बांधव पुढे सरसावला आहे. आम्ही डाळींचा हमीभाव निश्चित केला आहे. डाळींचे उत्पादन घेणाऱ्यांसाठी बोनसही सुरु केला आहे. डाळींची खरेदी करण्यासाठी एक व्यवस्थाही उभारली आहे. आणि म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांना डाळ घेण्यासाठी प्रोत्साहन देतो आहोत. ज्याचा लाभ त्यांनाही मिळेल.

बंधू-भगिनींनो, मी जेव्हा कार्य संस्कृतीबद्दल बोलतो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट आहे की आम्ही तुकडया तुकडयांमध्ये गोष्टींकडे बघत नाही आम्ही सर्वसमावेशक आणि एकात्मिक दृष्टीने गोष्टींकडे पाहतो. केवळ शेतीचेच उदाहरण घेतले तर या क्षेत्रात आम्ही अशी कार्य संस्कृती विकसित केली आहे, ज्याची एक पूर्ण साखळी मोठा परिणाम साधू शकते.

आम्ही सगळयात आधी लक्ष केंद्रीत केले ते या भूमातेची प्रकृती सुधारण्यासाठी, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, मृदा आरोग्य कार्ड, मृदा पोषण, सूक्ष्म पोषण अशा विषयांकडे लक्ष दिले आणि शेतकऱ्याला समजावले की तुझ्या जमिनीत अमूक कमतरता आहे किंवा तमूक गुणवत्ता आहे तुझी जमिन अमूक पिकासाठी योग्य आहे किंवा नाही याचे मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनीही हळूहळू मृदा आरोग्य कार्डानुसार आपल्या योजना बनवायला सुरुवात केली. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्यानुसार पिकाचा आराखडा बनवला त्यांनी मला सांगितले की, त्यांचा खर्च जवळपास 25 टक्क्यांनी कमी झाला आहे. आणि उत्पादनात 30 टक्क्यांपर्यंत वाढ दिसते आहे. सध्या ही संख्या कमी आहे, मात्र हळूहळू शेतकऱ्यांना माहिती मिळेल तशी ही संख्याही वाढेल शेतकऱ्याजवळ जमिन आहे आणि जर त्याला पाणी मिळाले तर हा शेतकरी मातीतून सोने पिकवू शकतो, हे लक्षात घेऊन आम्ही पाणी व्यवस्थापनावर भर दिला. जलसिंचन आणि जलसंरक्षणावर भर दिला. पाण्याचा एक-एक थेंब शेतकऱ्यांच्या कामी कसा येईल यासाठी आम्ही पर ड्रॉप-मोर क्रॉप आणि सूक्ष्म सिंचनासारख्या योजना राबवायला सुरुवात केली. 90 पेक्षा अधिक सिंचन प्रकल्पांचे काम अर्धवट स्थितीत बंद झाले होते. आम्ही निश्चिय केला की या योजनांना पूर्ण करु शेतजमिनींना सिंचनाचा लाभ मिळावा या दिशेने काम सुरु केले. शेतकऱ्यांना उत्पादनासाठी येणारा खर्च कमी व्हावा याचेही प्रयत्न आम्ही करतो आहोत. शेतकऱ्याला विजेची गरज असते. मात्र ती त्याला महाग पडते. यावर उपाय म्हणून आम्ही शेतकऱ्यांना सौर पंप देण्याचे काम सुरु केले. सौर पंप मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना केव्हाही शेतात वीज वापरता येते. आतापर्यंत 77 हजार सौर पंप वाटण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.

बंधु-भगिनींनो, मी देशाच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. शेतकऱ्यांना जमिन, पाणी, सौर पंप यासोबत चांगल्या बियाणांचीही गरज असते. भारतातल्या हवेला आणि निसर्गाला अनुकूल अशा 131 बियाणांचे नवे वाण तयार केले आहे. जे प्रति हेक्टर उत्पादन वाढविण्यासाठी सक्षम आहेत या बियाणांच्या गुणवत्तेतही शास्त्रज्ञांनी वाढ केली आहे.

शेतकऱ्याला युरिया हवे, खत हवे. एक काळ असा होता जेव्हा खत मिळविण्यासाठी काळाबाजार चालत असे खत वितरण करतांना पोलिस लाठीमारही करत असत. एक काळ असा होता जेव्हा शेतकऱ्याला खत न मिळाल्यामुळे त्याच्या डोळयासमोर त्याचे उभे पीक नष्ट होत असे मात्र आज ही परिस्थिती बदलली आहे. खताची कमतरता इतिहासजमा झाली आहे. आज आपण सर्वाधिक खत उत्पादन करण्यात यशस्वी झालो आहोत आणि यामुळे शेतकऱ्याला गरजेनुसार आणि वेळेवर खत मिळू शकते.

त्याचप्रमाणे आम्ही कृषी विमा योजना तयार केली आहे. प्रधानमंत्री कृषी विमा योजना शेतकऱ्याच्या जमिनीपासून त्याच्या पीकापर्यंत सगळयांचे संरक्षण या योजनेनुसार कमीत कमी हप्ते भरुन शेतकऱ्यांना आपल्या पिकाची हमी घेता येईल. आम्ही कृषी उत्पादनातले 15 लाख टन धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी नवी गोदामेही बांधली आहेत.

आपल्या देशातल्या शेतकऱ्याचे कल्याण करण्यासाठी त्याच्या उत्पादनांना बाजारपेठ आणि योग्य भाव मिळणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी आम्ही अन्नप्रक्रिया उद्योगावर भर दिला आहे. या क्षेत्रात 100 टक्के थेट विदेशी गुंतवणूकीला आम्ही परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे कृषीसंलग्न उद्योगांना लाभ मिळेल. मला विश्वास आहे की शेतकऱ्याचे उत्पन्न 2022 पर्यंत दुपटीने वाढविण्याचे आमचे स्वप्न आम्ही यातून पूर्ण करु शकू. यासाठीच आम्ही ही सगळी पावले उचलली आहे.

बंधू-भगिनींनो, आपल्या देशात एक परंपरा निर्माण झाली आहे सरकारने आपली ओळख निर्माण करण्यासाठी बरेच काही केले आहे. आणि आपल्या देशाच्या स्वभावानुसार सरकारने एखादे लोक अनुनयाचे काम केले त्यासाठी सरकारी तिजोरी रिकामी केली तर त्या सरकारचे कौतुक होते. त्याची ओळख निर्माण होते हीच परंपरा तयार झाली आहे.

बंधू-भगिनींनो, मी स्वत:ला या मोहापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलो आहे आणि त्यामुळेच अमुलाग्र परिवर्तन, पारदर्शकतेनुसार परिवर्तन करत आम्ही रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म असा मंत्र घेऊन वाटचाल करतो आहोत.

सरकारची ओळख निर्माण करण्यापेक्षा माझ्या हिंदुस्थानची ओळख कशी निर्माण होईल यावर आमचा भर आहे. सरकारची ओळख निर्माण होवो न होवो देशाची ओळख निर्माण झाली पाहिजे. देशाचा ठसा निर्माण झाल्यास भावी काळात भावी पिढयांनाही त्याचा लाभ होणार आहे, आणि म्हणूनच आम्ही देशाची ओळख निर्माण करण्याचाला प्राधान्य दिले. आता रेल्वेमध्ये आपण पाहू शकता आमच्या कामाचा आवाका काय आहे एका बाजूला रेल्वेत आम्ही बायोटॉयलेटची चर्चा करतो तर दुसऱ्या बाजूला आम्ही बुलेट ट्रेन आणण्याचे स्वप्न पाहतो. एकीकडे शेतकऱ्यासाठी दुसरीकडे सॅटेलाईट आणि अंतराळ तंत्रज्ञानातही आगेकूच करण्याची मनिषा बाळगतो, आम्ही स्टॅन्ड अप इंडियाबात बोलतो तसेच आम्ही स्टार्ट अपसाठी पावले उचलतो. विखुरलेल्या विकासाऐवजी आम्ही एकात्मिक विकासावर भर देत आहोत. सबलीकरणावर आम्ही भर देत आहोत जेव्हा देशाचे सबलीकरण होते तेव्हा माझ्या बंधू-भगिनीनो, आपल्या देशात नव्या योजनांच्या घोषणा केल्याने सरकारची ओळख बनते पण जुन्या योजना, त्या अशा अडगळीत जाऊन पडतात, सरकार सातत्यपूर्ण असतात आधीच्या सरकारने जे काम केले आहे तर देशाचे भले यात यआहे की त्यातल्या त्रुटी जरुर दूर करा पण देशाचे भले यात आहे की त्यातल्या त्रुटी जरुर दूर करा पण देशाच्या भल्यासाठी ते कार्य पुढे न्या. हे तुमच्या सरकारचे काम आहे हे आम्ही नाही करणार हा अहंकार लोकशाहीत चालत नाही आणि म्‍हणूनच आम्ही आधीच्या सरकारची कामही शिरसावंद्य मानली आणि ही आमची कार्य संस्कृती आहे कारण देश ही अखंड, अविरत व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था आम्ही चालवू इच्छितो आणि त्याअंतर्गत मी प्रगतीचा आढावा घेण्याचा कार्यक्रम दर महिन्याला घेतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल साडेसात लाख करोड रुपयांचे सुमारे 118 प्रकल्प, कोणत्या ना कोणत्या सरकारने सुरु केले होते, प्रारंभ केला होता. योजना सुरु केल्या. हे प्रकल्प असेच अर्धवट राहिले होते, मी त्यांना पूर्णत्वाला नेण्यासाठी बाहेर काढलेत, एवढे रुपये वाया गेले, त्यात आणखी भर घालून काम पूर्णत्वाला न्या. आज हे काम पूर्ण होत आहे प्रकल्पावर देखरेख ठेवण्यासाठी मी गट स्थापन केले आणि त्यांना सांगितले तुम्ही यात लक्ष घाला कोणता प्रकल्प कधी सुरु झाला वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी, पंधरा वर्षांपूर्वी, सुरु झालेले असेच अधांतरी होते त्या भागात राहणाऱ्या लोकांना माहित आहे सुमारे दहा लाख करोड रुपयांचे 270 प्रकल्प आम्ही हुडकून काढले ज्याचा पायाभरणी समारंभ कोणत्या सरकारने केला कोणी त्यावर हजार-दोन हजार कोटी रुपयांचा त्यावर खर्च केला. मात्र त्यानंतर तो खर्च मातीमोल ठरला. त्यावर आम्‍ही काम केले. प्रकल्प अडकून पडणे, निधीची नासाडी होणे हा एक प्रकारचा क्रिमीनल हलगर्जीपणा आहे आणि त्यावर मात करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

बंधू-भगिनींनो,

रेल्वे प्रकल्पांच्या मंजूऱ्या, दोन-दोन वर्ष लागत होती रेल्वे जात आहे वरती पूल तयार करायचा आहे दोन्ही बाजूला रस्ता होता रेल्वे जात आहे वरती पूल तयार करायचा आहे दोन्ही बाजूला रस्ता झाला आहे, दोन-दोन वर्ष लागत होती. बंधू-भगिनींनो हे काय आम्ही दोन, महिने, तीन महिने, जास्तीत जास्त सहा महिन्यात प्रकल्पांना मंजूरी देण्याची गती आम्‍ही घेऊन आलो आहोत, बंधू-भगिनींनो, आम्‍ही कितीही काम करु दे, कितीही योजना तयार करु दे, मात्र त्याचा समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंतच्या माणसाला त्याचा लाभ कसा मिळेल यावर लक्ष दयायचे आहे. बंधू-भगिनींनो जेव्हा धोरण स्पष्ट आहे. नियत स्वच्छ आहे स्वच्छ धोरण, स्पष्ट धोरण, स्वच्छ नियत स्पष्ट नियत असते तेव्हा निर्णय करण्याच्या भावना वेगळया असतात. निर्णय स्पष्ट असतात, स्पष्ट धोरण, नियत स्वच्छ असल्यामुळे ठामपणे निर्णय घेऊन प्रकिया पुढे नेत आणि समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यत तो पोहोचण्यावर भर देत आहे. उत्तर प्रदेशातील वर्तमानपत्र पहाल तर प्रत्येक वर्षी ऊस उतपादक शेतकऱ्यांची थकबाकी, दर वेळेला हा मुद्दा चर्चेत असतो. साखर कारखाने हे करत नाहीत, राज्य सरकार ते करत नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ही समस्या आहे. हजारो कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यासाठी आम्ही ही योजना बनवली. बंधु-भगिनींनो मी आज मोठया आनंदाने सांगू इच्छितो की 99.5 टक्के थकबाकी देण्यात आली आहे. अनेक वर्षानंतर हे प्रथमच घडले आहे. यावर्षी जो ऊसाचा व्यापार झाला, ऊस खरेदी झाली त्याबद्दल मी समाधानाने सांगू इच्छितो की, आतापर्यंत 95 टक्के शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे देण्यात आले आहेत. आणि उरलेले जे पाच टक्के आहे त्यांना येत्या काही दिवसात पैसे चुकते केले जातील असा मला विश्वास आहे.

बंधू-भगिनींनो, गरीब कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसच्या जोडण्या देण्याचा आम्ही निश्चिय केला आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गंत माझ्या गरीब मातांना चुलीच्या धुरापासून मुक्ती देण्याचे अभियान वेगाने सुरु आहे. येत्या तीन वर्षात पाच कोटी गरीब कुटुंबांपर्यंत स्वयंपाकाचा गॅस पोहोचविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत जवळपास 50 लाख कुटुंबांना आम्ही स्वयंपाकाचा गॅस दिला आहे. केवळ 100 दिवसात हे काम पूर्ण केले आहे. यावरुन आपण कल्पना करु शकता की, शक्य झाल्यास 3 वर्षांच्या आतच आम्ही हे काम पूर्ण करु.

माहिती तंत्रज्ञान, व्हॉटस ॲप, ऑनलाईन ई-मेल यामुळे आमची टपाल कार्यालये हळूहळू कालबाहय होऊ लागली होती. ती आपली एक ओळख आहे. अशा टपाल कार्यालयांना पुनरुज्जीवीत करण्याचा निश्चिय आम्ही केला आहे. टपाल कार्यालय गरीब व्यक्तींशी जोडले गेले आहे. सरकारचा प्रतिनिधी या माध्यमातून सामान्य माणसांशी जोडला गेला आहे आणि तो प्रतिनिधी म्हणजे पोस्टमन त्याला जनतेचे प्रेम मिळते मात्र त्याच्याकडे आपले कधीही लक्ष जात नाही आम्ही आपली टपाल कार्यालये पेमेंट बँकमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या पेमेंट बँकमुळे एकाचवेळी देशातल्या गावागावांमध्ये बँकेचे जाळे निर्माण होईल. जनधन खात्याचा लाभ जनतेला मिळेल. सर्वसामान्य माणसाची मनरेगाची मजूरी आता आधार कार्डावर थेट त्याच्या खात्यात जमा होते आहे. यामुळे भ्रष्टाचार कमी झाला आहे.

बंधू-भगिनींनो, आपण देशात जे सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम सुरु केले आहे ते सगळे जणू बुडीत खात्यात जाण्यासाठी बनवले गेले आहेत. मग इतर असे उपक्रम बंद करावे लागतात किंवा त्यांना विकावे लागते. हा आजवरचा इतिहास आहे. आम्ही एक नवी कार्य संस्कृती आणण्याचा प्रयत्न केला आहे. एअर इंडिया ही सरकारी विमान सेवा आतापर्यंत बदनाम होती मात्र गेल्यावर्षी आम्ही एअर इंडियाला त्याच्या कार्यक्षमतेला किमान ऑपरेशनल प्रॉफीटमध्ये आणण्यास यशस्वी झाले. जगातल्या सगळया दूरसंचार कंपन्या नफा मिळवत असतांना भारतातली सार्वजनिक दूरसंचार कंपनी बीएसएनएल मात्र नुकसानीत होती. यावेळी पहिल्यांदाच बीएसएनएलला ऑपरेशनल प्रॉफीट मिळवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. तीच गोष्ट भारतीय नौवहन महामंडळाची हे महामंडळ कधी फायद्यात राहील यावर कोणी विश्वास ठेवला नसता. मात्र आज हे महामंडळी फायद्यात आहे.

एक काळ असा होता वीज निर्मितीचा कारखाना पुढच्या आठवडयात चालेल की नाही त्यासाठी कोळसा मिळेल की नाही अशी परिस्थिती होती. कितीतरी वीज कारखाने कोळशाअभावी बंद पडल्याच्या बातम्या आपण ऐकायचो. आज कोळसा वीज कारखान्याच्या दाराशी तयार आहे. पुढच्या कित्‍येक महिन्यांपर्यंत एवढा कोळशाचा साठा आहे. हे काम आम्ही केल्याचे तुम्ही पाहिले असेल.

कधी-कधी आपल्या देशात भ्रष्टाचाराच्या मोठ मोठया प्रकरणांची चर्चा तर होते. मात्र हा भ्रष्टाचार समाजातल्या तळागाळातल्या गरीब लोकांना कशाप्रकारे लुटतो त्यांचे पैसे कसे लुटले जातात हे मी पाहिले आहे. आता आम्ही आधार कार्ड आणि आधार क्रमांकाला सरकारी योजनांशी जोडले आहे. याआधी सरकारच्या योजना असतील अनुदान असेल त्याचे पैसे सरकारी तिजोरीतून वळते होत. लाभार्थ्यांची यादीही येत असे मात्र जेव्हा या यादीचा सखोल अभ्यास केला तेव्हा असे लक्षात आले की, ज्याचा जन्मही झालेला नाही. अशा लोकांची नांवे या यादीत असत. अशा प्रकारे या योजनांचा लाभ भलत्याच लोकांना मिळत असे हे दलाल अब्जावधी रुपयांचा गैरव्यवहार करत असत आणि त्याकडे कोणाचेही लक्षही जात नसे. आधार व्यवस्थेतून आम्ही अशा दलालांना पूर्ण बाहेर काढले. जेव्हा थेट पैसा मिळू लागला तेव्हा असे कोटयावधी लोक मिळाले की जे अस्तिवातच नाही मात्र त्यांच्या नावांनी पैसे जात होते. आणि त्यामुळे खरोखर गरजू लाभार्थी मात्र वंचित राहात होते. यामुळे अशा वंचितांना शोधून त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजनांचे लाभ पोहोचवण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत.

कोळशाच्या भ्रष्टाचाराविषयी सगळयांना माहितच आहे. आज कोळशाच्या लिलावात कुठलाही भ्रष्टाचार नाही, कुठलाही आरोप नाही. येत्या काळात राज्यांमधून जसजसे कोळशाचे उत्खन्न होईल तसतशी राज्यांना लाखो रुपयांची कमाई होत राहील. स्पेक्ट्रमचे लिलावही आक्षेपांनी घेरलेले असत. आम्ही हे लिलाव ऑनलाईन केले. त्यामुळे एक स्पर्धाही झाली आणि देशाच्या तिजोरीतही भर पडली. देशाला याचा फायदा मिळाला.

बंधू-भगिनींनो, आज जग एका वैश्वीक अर्थव्यवस्थेच्या युगात वाटचाल करीत आहे. प्रत्येक देश अंतर्गंत दृष्टया जोडलेला आहे. परस्परांवर अवलंबून आहे. आर्थिक बाबींनी संपूर्ण जगच एकमेकांशी जोडले गेले आहे. आपण आपल्या देशाची कितीही प्रगती केली तरी त्यासोबतच आपल्याला जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार करावाच लागतो. स्पर्धेच्या युगात आपल्या देशालाही जागतिक प्रमाणकांवर स्वत:ला सिध्द करावे लागते. त्यांच्याशी बरोबरी करावी लागते. तेव्हाच आपण या स्पर्धेत टिकून राहू, आपले योगदान देऊ शकू आणि गरज पडल्यास जागतिक अर्थव्यवस्थेचे नेतृत्वही करु शकू. मात्र यासाठी स्वत:ला प्रत्येक क्षणी सजग ठेवायला हवे. आणि स्वत:ला सज्ज ठेवायचे असेल तर आपल्याला वैश्विक परिमाणांनुसार काम करावे लागेल. गेल्या काही काळात आपण पाहिले असेल जागतिक बँक असो, जागतिक नाणेनिधी असो, किंवा जागतिक-आर्थिक मंच असो, अथवा पतमानांकन संस्था जगात जेवढया म्हणून वित्तीय संस्था आहेत त्या सर्वांनी भारताच्या आर्थिक प्रगतीची प्रशंसा केली आहे. सरकारच्या अनेक निर्णयामुळे कायद्यात सुधारणा, व्यवस्थेत सुधारणा दृष्टिकोनात होणार बदल या सर्व गोष्टींकडे जगाचे सातत्याने लक्ष आहे. व्यवसाय सुलभतेच्या क्रमवारीत भारताने जलद गतीने प्रगती केली आहे. थेट परदेशी गुंतवणूकीच्या क्षेत्रात तर आज भारत जगाचा सर्वाधिक पसंतीचा देश ठरला आहे. विकास दरात आपण जगातल्या मोठमोठया अर्थव्यवस्थांना मागे टाकले आहे.

बंधू-भगिनींनो, संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका संस्थेने नुकताच अंदाज वर्तवला आहे की, येत्या दोन वर्षात भारतात काय परिस्थिती असेल या संस्थेच्या अंदाजानुसार अर्थव्यवस्थेच्या जागतिक क्रमवारीत आज दहाव्या क्रमाकांवर असलेला भारत येत्या दोन वर्षात तिसऱ्या क्रमाकांवर येईल. बंधु-भगिनींनो, जागतिक प्रमाणकांमध्ये देशातील पायाभूत सुविधांचा आणि इतर सर्व व्यवस्थांचा लेखाजोखा बघून ही क्रमवारी ठरवली जाते. जगातल्या समृध्द देशांशी तुलना केली जाते. या पायाभूत सुविधा आणि इतर व्यवस्थांच्या क्रमवारीत भारत 19 अंकांनी वर गेल्याचे या जागतिक आर्थिक मंचाच्या अहवालात म्हटले आहे.

बंधू-भगिनींनो, वैश्विक संदर्भातही एक गतीशील आणि निश्चित अर्थव्यवस्था घेऊन आपण पुढे जातो आहोत. नुकताच आपण वस्तू आणि सेवा करविषयक कायदा संमत केला. हा कायदाही अर्थव्यवस्थेला एक मोठी ताकद देणारा ठरेल. आणि हा कायदा संमत करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व पक्ष अभिनंदनास पात्र आहे.

बंधू-भगिनींनो एका अभियानासंदर्भात मी इथूनच चर्चा सुरु केली होती. ते अभियान म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ. आम्ही कुठलेच काम तुकडयांमध्ये करत नाही. आमचा एक सर्वसमावेशक दृष्टिकोन असतो. बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गंत आम्ही जे उपक्रम हाती घेतले आहेत त्यात मला समाजाच्या सहकार्याची गरज आहे. पहिल्यांदा पालकांनी सजग होण्याची गरज आहे. आपण मुलींचा सन्मान केला पाहिजे. त्यांना सुरक्षितता दिली पाहिजे. त्यांना सरकारच्या योजनांचा लाभ दिला पाहिजे. सुकन्या समृध्दी योजनेशी कोटयवधी कुटुंबांना जोडले आहे. जी कन्या मोठी होईल तेव्हा तिला या योजनेचे लाभ मिळेल. ज्या योजनांचा महिलांना सर्वाधिक लाभ मिळेल अशा बिमा योजनाही आम्ही सुरु केल्या आहेत. आर्थिक सशक्तीकरणासोबतच महिलांचे आरोग्यही उत्तम राहावे याकडे आम्ही लक्ष दिले आहे. त्यासाठी आम्ही इंद्रधनुष लसीकरण योजना सुरु केली आहे. एक स्त्री शिक्षित असेल, शारिरीक आणि आर्थिक दृष्टया सुदृढ असेल तर ती एकटी स्त्री आपल्या कुटुंबाला दारिद्रयातून बाहेर काढू शकते आणि म्हणूनच दारिद्रयाविरोधात लढतांना स्त्रीला सक्षम बनवणे तिचे आरोग्य आर्थिक शारिरीक संपन्नतेवर आम्ही भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून मुद्रा योजना सुरु केली आहे. मी आनंदाने सांगू इच्छितो की, मुद्रा योजनेचा लाभ साडेतीन कोटीपेक्षा अधिक कुटुंबांनी घेतला आहे. यात सर्वाधिक अशा व्यक्ती आहे. जे पहिल्यांदा बँकेत गेले. त्यातही 80 टक्के लोक अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय आहेत. आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे यातल्या 80 टक्के महिला आहेत. या महिला आता देशाच्या आर्थिक विकासात कसे योगदान देतील, हे तुम्हाला बघता येईल.

बंधु-भगिनींनो, देशाच्या विकास प्रवाहात बरोबरीची जबाबदारी उचलणाऱ्या माता भगिनींना प्रसूती रजा मिळावी यासाठी आम्ही गेल्या आठवडयात एक निर्णय घेतला. ही प्रसूती रजा आता 26 आठवडे केली आहे. या निर्णयामुळे आई आपल्या मुलांचे संगोपन नीट करु शकेल.

आपल्याकडे वस्त्रोद्योग क्षेत्रात विणकर आहेत. ते जो धागा बनवतात त्यासाठी त्यांना आधी 100 रुपये मिळत असत आम्ही ते वाढवून 190 रुपये केले आहेत. यामुळे ज्या महिला हे धागे बनवण्याचे काम करतात त्यांना ताकद मिळेल. रेशीम धागे बनवणाऱ्या ज्या महिल्या आहेत. जे विणकर आहेत, त्यांच्या धाग्यांच्या किंमती प्रति मीटर 50 रुपयांची वाढविल्या आहेत. आणि हा निर्णय घेतला आहे की, हे पैसे व्यापाराला किंवा दलाला मिळणार नाही तर थेट विणकराच्या खात्यात जमा होतील यामुळे आमचे विणकर सशक्त बनतील.

माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आपण जेव्हा रेल्वे बघतो, टपाल कार्यालये बघतो तेव्हा आपल्याला देशाची एकता दृ्ष्टीस पडते. देशाला जोडणाऱ्या प्रकल्पांना पूर्ण करत आपण जितकी प्रगती करु आणि आपल्या अर्थव्यवस्थेत बदल घडवू, तितका आपल्या देशाची एकता दृढ होईल.

आणि म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांसाठी मंडी इ नाम हि योजना आखली आहे. शेतकरी आता आपला शेतमाल देशातल्या कोणत्याही बाजारपेठेत ऑनलाईन विकू शकतो. आपल्या शेतापासून दहा किलो मीटर वरच्या बाजारात शेतमाल विकणे त्याला आता भाग पडणार नाही. आता देशभरात इ-नाम द्वारा बाजारपेठेचे जाळे निर्माण होत आहे.

वस्तू आणि सेवाकरामुळे करप्रणालीत समानता आणि समान व्यवस्थेचा परिणाम दिसून येणार आहे. यामुळे भारत जोडला जाण्याचे कामही होणार आहे. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल एका भागात वीज आहे पण घ्यायला कोणी नाही तर दुसरा भाग अंधारात राहून विजेच्या प्रतिक्षेत होता. कारखाने बंद होत असत. यामध्ये बदल घडवण्यासाठी एक राष्ट्र – एक ग्रीड -एक दर आणण्यात आम्ही यशस्वी झालो. आणि उन्हाळ्याच्या काळात दहा रुपये युनिट या दराने पैसे द्यावे लागत असत. काही दिवसांपूर्वी मी तेलंगणामध्ये गेलो होतो, त्यावेळी एक रुपये दहा पैसे असा दर होता, जो याआधी दहा रुपये होता. एक समान दराचा हा परिणाम देश जोडण्याचेही काम करत आहे.

आपल्या देशातला मजूर एका ठिकाणी काम करतो, एक दोन वर्षानंतर नोकरी बदलतो, इ पी एफ साठी त्याचे पैसे कापले जातात मात्र हे पैसे ट्रान्सफर होत नसत. आपल्याला आश्चर्य वाटेल आमचे सरकार आले त्यावेळी आपल्या देशातल्या मजुरांचे सत्तावीस हजार कोटी रुपये इ पी एफ मध्ये पडले होते. कोणी गरीब मजूर ते घेतही नव्हता कारण त्यासाठी पद्धतच नव्हती. ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही सार्वत्रिक खाते क्रमांक दिला. आता हा कामगार कोणत्याही ठिकाणी गेला तरी त्या ठिकाणी त्याचा इ पी एफ चा निधी ट्रान्सफर होईल. हा कामगार निवृत्त होईल तेव्हा त्याचा हाती हे पैसे येतील. सरकारी खात्यात हे पैसे पडून राहणार नाही.

भारतमाला असुदे, सेतुभारतम असुदे, भारत नेट असुदे, अशा अनेक प्रकल्पांना बळ दिले आहे. भारताच्या आर्थिक विकासाच्या दिशेने या साऱ्या प्रकल्पांचा हेतू असून त्याच दिशेने आम्ही पावले टाकत आहोत.

बंधू भगिनींनो हे वर्ष अनेक बाजूंनी महत्वाचे आहे. दक्षिणेकडचे संत रामानुजाचार्य यांची एक हजारावी जयंती देश साजरी करत आहे, महात्मा गांधींचे गुरु श्रीमद राजचंद्र यांची १५० वी जयंती, गुरुगोविंद सिंग यांची ३५० वी जयंती, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची शताब्दी साजरी केली जात आहे. रामानुजाचार्य यांचे स्मरण करताना मी एक गोष्ट नमूद करतो, हजार वर्षांपूर्वी, या संत पुरुषाने देशाला काय संदेश दिला होता, त्यांनी शिकवण दिली भगवानाच्या सर्व भक्तांची कोणताही भेदभाव न करता सेवा करा. वय, जात या कारणास्तव किंवा इतर कोणत्याही कारणाने कोणाचाही अनादर करू नका. प्रत्येकाचा सन्मान करा. गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही रामानुजाचार्य यांनी सांगितलेलीच शिकवण दिली. भगवान बुद्ध तसेच आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या आचार्य आणि महंतांनी, गुरूने आणि शिक्षकांनी या सर्वानी सामाजिक एकतेचीच शिकवण दिली.

समाजात उच्च नीच, स्पृश्य अस्पृश्य, असा भेदभाव असल्यास असा समाज टिकू शकत नाही. तो विखुरला जातो. अनेक वर्षांपासूनच्या वाईट चालीरीती आहेत मात्र या चालीरीती खूप जुन्या असतील तर त्या नष्ट करण्यासाठी उपायही जास्त कठोरपणे, जास्त सवेंदनशीलतेने करावे लागतील… असेच चालायचे … हा दृष्टिकोन या सामाजिक समस्यांवरचा तोडगा असू शकत नाहि आणि याबाबत सव्वाशे कोटी भारतीयांची जबाबदारी आहे. सरकार आणि समाज यांनी एकत्र येऊन समाजातल्या तणावाच्या स्थितीवर उपाय करायला हवा.

बंधू भगिनींनो, या सामाजिक वाईट चालीरीतींविरोधात आपल्या सर्वाना लढा द्यावा लागेल. आपल्या आचरणाने यावर मात करावी लागेल. प्रत्येक नागरिकाला हि मात करावी लागेल तेंव्हाच आपण सशक्त हिंदुस्थान घडवू शकतो. सशक्त समाजाशिवाय सशक्त हिंदुस्थान निर्माण होऊ शकत नाही. केवळ आर्थिक प्रगती नव्हे तर सशक्त समाज त्यासाठी आवश्यक आहे. सशक्त समाजासाठी सामाजिक न्यायाचे अधिष्ठान आवश्यक आहे. आणि म्हणूनच सामाजिक न्यायावर भर देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. दलित, पीडित, शोषित, वंचित, माझे आदिवासी बांधव, ग्रामवासी, शहरवासी, शिक्षित, अशिक्षित, लहान, मोठा असुदे, सव्वाशे कोटी देशवासीय आपले कुटुंब आहे. आपण सर्वानी मिळून देशाला प्रगतीपथावर न्यायाचे आहे आणि त्याच दिशेने आपल्याला काम करायचे आहे.

बंधू भगिनींनो, भारत हा युवा देश आहे. हि बाब संपूर्ण जगाच्या ध्यानात आहे. ज्या देशाकडे ८०० दशलक्ष अशी ३५ वर्षापेक्षा कमी वयोमानाची ६५ टक्के लोकसंख्या आहे तो देश आपल्या युवाशक्तीच्या बळावर काय करू शकत नाही? आणि म्हणूनच माझ्या बंधू भगिनींनो युवकांना संधी मिळावी, त्यांना रोजगार मिळावा ही काळाची गरज आहे.

आज आपण पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. त्यावेळी त्यांच्या समाजातल्या तळागाळातल्या जनतेचेही कल्याण या विचारांचे स्मरण करूया. महात्मा गांधीजिंचेही हेच विचार आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदय हा विचार मांडला. तळागाळातल्या जनतेचेही कल्याण ही दीनदयाळ उपाध्याय यांच्या राजकीय विचारधारेची मध्यवर्ती कल्पना होती. प्रत्येक युवकाला शिक्षण मिळायला हवे, प्रत्येक युवकाच्या हाती लौशल्य यायला हवे, प्रत्येक युवकाला आपली स्वप्न साकार करण्याची संधी मिळायला हवी. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, देशातल्या ८०० दशलक्ष युवकांच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी आम्ही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. ज्या पद्धतीने देशात रस्त्यांचे जाळे वाढत आहे, गाड्यांचे उत्पादन होत आहे, सर्वात जास्त सॉफ्टवेअरची निर्यात होत आहे, ५० हुन अधिक मोबाईलचे नवे कारखाने सुरु झाले आहेत त्यामुळे युवकांना संधी उपलब्ध होत आहे. दोन कोटी स्वच्छतागृह तयार होत असतील तर कोणाला ना कोणाला रोजगार उपलब्ध होईल. एकाकडून सिमेंट घेतले, एकाकडून लोखंड घेतले तर कोणाकडून लाकूड खरेदी केली. कामाचा व्याप जितका वाढेल तेवढ्या रोजगाराच्या शक्यता वाढतील याच बाबीवर आम्ही भर दिला आहे.

करोडो युवकांना कौशल्य प्राप्त व्हायला हवे यासाठी कौशल्य विकास हे अभियान म्हणून आम्ही राबत आहोत, आम्ही एक असा कायदा बदलला जो दिसायला किरकोळ आहे. आदर्श दुकान आणि आस्थापना कायदा. राज्यांसाठी आम्ही मार्गदर्शक सूचना पाठवल्या. मोठं मोठे मॉल ३६५ दिवस सुरु, रात्री १२ वाजेपर्यंत सुरु मात्र गावातील छोटेसे दुकान संध्याकाळनंतर बंद करायचे? गरिबातील गरीब व्यक्ती जी दुकान चालवते तिलाही ३६५ दिवस संधी द्यायला हवी. आपल्या भगिनींना रात्री काम करण्याची संधी न देण्याचे काय कारण आहे? आमच्या भगिनी रात्रीही कामावर जाऊ शकतात अशी आम्ही कायदेशीर व्यवस्था केली आहे, त्यांच्या सुरक्षेची व्यवस्थ व्हायला हवी मात्र कामाची संधी मिळायला हवी. या बाबींमुळे रोजगाराला चालना मिळते. बंधू भगिनींनो याच दिशेने आमचे प्रयत्न सुरु आहेत.

बंधू भगिनींनो आमचे सरकार गोष्टी टाळण्यावर विश्वास ठेवत नाही तर प्रश्नांचा मुकाबला करणे आम्हाला माहित आहे. आपल्या देशासाठी प्राणाची बाजी लावणारे आपले जवान, आज आपण स्वातंत्र्य उत्सव साजरा करत असताना, आपला जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देत असे, कोणी बंकर मध्ये असेल, रक्षाबंधनाच्या दिवशी कोणी आपल्या बहिणीला भेटू शकत नसेल. आपल्या सैन्यात कितीतरी जवान भर्ती आहेत. स्वातंत्र्यानंतर तेहतीस हजारहून अधिक पोलीस जवानांनी बलिदान दिले. त्यांना आपण कसे विसरू शकतो. त्यांच्यामुळेच आपण सुखाने जगू शकतो. यामुळेच त्यांना नमन करण्याचे हे पर्व आहे. गेली अनेक वर्ष वन रँक वन पेन्शनचा मुद्दा प्रलंबित होता आम्ही हे काम पुन्हा केले प्रत्येक जवानाच्या घरात आनंद आणला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा संदर्भातील दस्तावेज जनतेसाठी खुले व्हावेत अशी लोकभावना होती. मी आज नम्रपणे सांगू इच्छितो कि जी बाब अशक्य होती , टाळली जात होती कोणतेही कारण असो आम्ही हे दस्तावेज खुले करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांना बोलावून दस्तावेज दिले. आजही हि प्रक्रिया सुरू आहे. जगभरातल्या इतर देशानाही त्यांच्याकडे असणाऱ्या दस्तावेज खुले करण्यासाठी, देण्यासाठी मी आवाहन केले आहे. सुभाषबाबू आणि भारताचा इतिहास जाणून घेण्याचा हा हक्क हिंदुस्थानलाआहे. त्याच दिशेने आम्ही काम केले. बांगलादेशच्या निर्मितीपासून आपल्याबरोबर सीमावाद सुरु आहे. अनेक दशके चाललेला हा वाद सर्व पक्षांनी एकत्र येऊन सोडवला.

बंधू भगिनींनो, मध्यमवर्गीयांमधील प्रत्येक व्यक्तीला आपले घर हवे असते, फ्लॅट हवा असतो, बांधकाम व्यावसायिकांनी दाखवलेल्या पुस्तिका बघून तोही भुलतो, त्याला तांत्रिक माहिती नसते. पैसे दिल्यानंतर ठरलेल्या वेळेत घर मिळत नाही. माध्यम वर्गात घर एकदाच खरेदी केले जाते यासाठी तो आयष्याची मिळकत खर्च करतो. म्हणूनच स्थावर मालमत्ता विधेयक आणून आम्ही अंकुश ठेवला ज्यामुळे माध्यम वर्गाला घर घेताना कोणतीही अडचण येणार नाही. श्रीमद राजाचंद्र यांची १५० वी जयंती आहे. महात्मा गांधी त्यांना गुरु मानत असत. गांधीजी दक्षिण आफ्रिकेत असताना ते त्यांच्या समवेत पत्रव्यवहार करत असत. एका पत्रात राजचंद्र यांनी गांधीजींसमवेत हिंसा आणि अहिंसेबाबत चर्चा केली होती. ज्यावेळी हिंसेचे अस्तित्व आले त्याचवेळी अहिंसेचा सिद्धांत आला, आपण कोणाला महत्व देतो किंवा यापैकी मानवहितासाठी कोणाचा उपयोग होत आहे हे महत्वाचे असल्याचे राजचंद्र यांनी म्हटले होते.

बंधू-भगिनींनो, हिंसा-अहिंसेबाबतची चर्चा आपल्या देशात स्वाभाविकच आहे. मानवतेचे बाळकडू आपल्याला मिळालेले आहे. एका महान संस्कृतीचे आपण वारसदार आहोत. विविधतेने, विविध रंगरुपाने हा देश नटलेला आहे. भारत माता म्हणजे प्रत्येक सुगंध, प्रत्येक रंग आणि प्रत्येक स्वप्नांचा गुच्छच आहे. विविधतेतली एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. एकतेच्या मंत्रांना आपण मुळापासून जोडले गेलो आहोत. ज्या देशात शंभराहून अधिक भाषा आहेत, शेकडो बोली आहेत, अगणित जीवन पद्धती आहेत आणि तरीही हा देश एक आहे, याचे कारण आपला सांस्कृतिक वारसा आहे. आपण सन्मान देणे जाणतो, सत्कार करणे जाणतो, समावेश करणे जाणतो, ही महान परंपरा आपण पुढे चालवत आहोत आणि म्हणूनच हिंसा आणि अत्याचाराला आपल्या देशात थारा नाही. देशाची लोकशाही मजबूत ठेवायची असेल, देशाची स्वप्नपूर्ती करायची असेल, तर हिंसेचा मार्ग कधीही यशस्वी ठरणार नाही.

आज कुठे जंगलांमधे नक्षलवादाच्या नावाखाली, सीमेवर दहशतवादाच्या नावाखाली, निष्पापांची हत्या केली जात आहे. रक्ताचा सडा पडूनही, दहशतवादाच्या मार्गावरुन जाणाऱ्यांना हाती काहीही लागल नाही. हा देश हिंसाचार, दहशतवाद कधीही सहन करणार नाही. दहशतवाद, नक्षलवादासमोर झुकणार नाही. मी या युवकांना सांगू इच्छितो. अजूनही वेळ गेलेली नाही, माघारी या आपल्या आई-वडिलांची स्वप्न आशा-आकांक्षाकडे पाहा, समाजाच्या मुख्य प्रवाहात या, सुखाचे आयुष्य जगा. हिंसेचा मार्ग कोणाचेही भले करत नाही.

बंधू-भगिनींनो, परराष्ट्र व्यवहार धोरणाबाबत बोलतांना मी सांगू इच्छितो, की ज्या दिवशी आमच्या सरकारचा शपथविधी झाला, त्यावेळी सार्क देशांच्या नेत्यांना आम्ही आमंत्रित केले होते. आजूबाजूचे सर्व शेजारी देश आपल्या सर्वांची एक सामाईक समस्या आहे, ती म्हणजे गरीबी आपण सर्व एकत्र येऊन गरीबीच्या विरोधात लढा देऊ या. आपापसात लढाई करुन नुकसान झाले आहे. मात्र, गरीबीविरोधात लढा दिल्यास समृद्धीच्या दिशेने वाटचाल सुरु होईल. प्रत्येक देशातल्या नागरिकाला गरीबीपासून मुक्तता देण्यापेक्षा मोठे स्वातंत्र्य असू शकत नाही.

बंधू-भगिनींनो, मानवतेची प्रेरणा समोर ठेऊन पालन-पोषण झालेले लोक आणि दहशतवादाला पुरस्कार देणारे लोक कसे असतात. जगासमोर मी दोन चित्र ठेऊ इच्छितो, दोन घटना मांडू इच्छितो. पेशावरमधे दहशतवाद्यांनी निष्पाप मुलांची हत्या केली होती, घटना पेशावरमधे घडली, ज्ञानमंदिराला रक्तरंजित केले गेले, निर्दोष मुलांना मारले गेले, त्यावेळी भारताच्या संसदेत अश्रू होते. भारतातील प्रत्येक शाळा रडत होती. भारतातील प्रत्येक बालक पेशावरच्या विद्यार्थ्यांच्या हत्येचा शोक अनुभवू शकत होता, त्यांच्याही डोळयात अश्रू होते. दहशतवादामुळे बळी पडणारा पेशावरचा विद्यार्थीसुध्दा आमच्या मनाला दु:ख देतो. त्यांच्या यातना आम्हाला जाणवतात. ही आपली मानवतेची संस्कृती आहे. हीच आपली मानवता आहे आणि दुसऱ्या बाजूला बघा जिथे दहशवाद्यांचे उदात्तीकरण करण्याचे काम सुरु आहे. जिथे दहशतवादी घटनांमध्ये निर्दोषांचा बळी गेला तर त्याचा आनंद साजरा केला जातो. हे कसे दहशतवादाने प्रेरीत झालेले आयुष्य आहे. दहशतवादांना प्रेरीत झालेले सरकार आहे. या दोन संस्कृतीमधला, व्यवस्थामधला बदल जग समजून घेत आहे. हे माझ्यासाठी पुरेसे आहे.

आज लाल किल्ल्यावरुन मी काही लोकांचे विशेष अभिनंदन करतो. आणि त्यांच्याविषयी आभार व्यक्त करतो. गेल्या काही दिवसांपासून बलुचीस्तानच्या लोकांनी, गिलगीटच्या लोकांनी पाकव्याप्त काश्मीरमधल्या नागरिकांनी ज्या प्रकारे मला धन्यवाद दिले आहे. माझ्याविषयी सद्‌भावना व्यक्त करत आभार मानले आहेत खरेतर दूर दूर असलेल्या या लोकांना मी कधी भेटलेलो नाही. ही भूमीही मी पाहिलेली नाही. मात्र अशा दूरवरच्या लोकांनी भारताच्या पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे. हा माझ्या सव्वाशे कोटी देशवासियांप्रती व्यक्‍त केलेला आदर आहे, सन्मान आहे आणि यासाठी मी या सर्व प्रदेशातल्या नागरिकांचे आभार मानतो.

बंधू-भगिनींनो, आज आपण स्वातंत्र्याचे 70 वे वर्ष साजरे करतो आहोत. या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी मोठे योगदान दिले आहे. हे लक्षात घेऊन मी सर्व स्वातंत्र्य सैनिकांना किंवा त्यांच्या कुटुंबांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनात 20 टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा करत आहोत. ज्या स्वातंत्र्य सैनिकांना याआधी 25,000 रुपये मिळत असत त्यांना आत 30,000 रुपये मिळतील. स्वातंत्र्य सैनिकांच्या त्‍याग आणि बलिदानाला वंदन करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.

बंधू-भगिनींनो देशाच्या स्वातंत्र्य इतिहासाची जेव्हा चर्चा होते तेव्हा काही लोकांविषयीच अधिक बोलले जाते. काही लोकांविषयी तर गरजेपेक्षाही जास्त बोलले जाते. मात्र स्वातंत्र्याच्या या लढयात वनात राहणाऱ्या आदिवासींचेही मोठे योगदान होते. त्यातल्या विरसा मुंडाचे नाव आपण कधीतरी ऐकले असते मात्र कदाचित असा एकही आदिवासी जिल्हा नसेल ज्यातून 1857 पासून ते स्वातंत्र्याच्या लढाईपर्यंत या लढयात सहभाग घेतला गेला नसेल किंवा बलिदान दिले नसेल. गुलामगिरीविरुध्द लढा काय असतो ते त्यांनी आपल्या बलिदानातून दाखवून दिले. मात्र आपल्या येणाऱ्या पिढयांना या इतिहासाची माहिती नाही. त्यामुळे आमच्या सरकारची अशी इच्छा आहे की आगामी काळात ज्या राज्यांमध्ये आदिवासी लोकांनी इंग्रजाविरुध्दच्या लढयात सहभाग घेतला त्यांच्याविषयीची माहिती त्यांचा इतिहास वर्णन करणारे एक वास्तू संग्रहालय बनवले जावे. अशा विविध राज्यांमध्ये वास्तू संग्रहालय बनविण्यासाठी सरकार काम करणार आहे, ज्यामुळे येणाऱ्या पिढयांना आदिवासींच्या लढयाची कल्पना येईल.

बंधू-भगिनींनो, महागाईमधे काही बाबींची चर्चा तर खूप होते, मात्र, गरीबाच्या कुटुंबात आजारपण आले, तर त्याचे आर्थिक गणितच चुकते, हे आम्ही जाणतो. मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण थांबते, जेवणही एक वेळचेच मिळते. आरोग्य सेवा महागत आहे म्हणूनच आज लाल किल्ल्यावरुन बोलातांना दारिद्रय रेषेखालच्या कुटुंबांच्या आरोग्यासाठी सरकार एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत असल्याचे मी सांगत आहे. येत्या काळात या गरीब कुटुंबांना आरोग्य सेवेचा लाभ घ्यायचा असेल, तर वर्षात एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकार सोसणार आहे. ज्यामुळे माझ्या गरीब बंधू-भगिनींना आरोग्यसेवांपासून वंचित रहावे लागू नये.

प्रिय बंधू-भगिनींनो, स्वातंत्र्याच्या या पवित्र पर्वात एक नवा संकल्प नवी ऊर्जा घेऊन आपण वाटचाल करु या. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या आपल्या शूर वीरांपासून प्रेरणा घेऊन, देशासाठी प्राणांचे बलिदान करण्याची संधी मिळत नाही, मात्र देशासाठी जीवन जगण्याची संधी नक्कीच मिळते आहे. देशासाठी आपल्या जबाबदाऱ्या निभाऊ या, इतरांनाही आपल्या जबाबदाऱ्या निभावण्यासाठी प्रेरित करु या. एक समाज, एक स्वप्न, एक संकल्प, एक दिशा, एक लक्ष्य घेऊन वाटचाल करु या, याच भावनेने मी पुन्हा एकदा राष्ट्रपुरुषांना नमन करतो, आपल्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या, 33 हजार पोलिस जवान शहीदांना नमन करत देशाचे भविष्य आणि स्वप्नपूर्तीसाठी स्वत:ला वाहून घेत आज लाल किल्ल्यावरुन आपल्या सर्वांना आवाहन करतो, की पूर्ण जोशाने माझ्या बरोबर म्हणा : “भारत माता की जय”……..

आपला आवाज जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचायला हवा.

“भारत माता की जय, भारत की जय,

वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम,

जय हिंद, जय हिंद, जय हिंद!

अनेक अनेक धन्यवाद!”

NS/ST/RA/NC/AK/DR