पीएम्इंडिया
आज वडोदरा आपल्याच खुशीत आहे. मी इथे वेळेवर आलो, पण विमानतळापासून ते इथपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वडोदऱ्याची जनता उभी होती. वडोदऱ्याच्या जनतेच्या दर्शनाची संधी मला लाभली. आपण मोठ्या संख्येने आलात, आपले आशीर्वाद मला लाभले याबद्दल मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.
आज, दोन सरकारी कामांसाठी वडोदऱ्यात यायची संधी मला लाभली. एक म्हणजे अतिशय आधुनिक अशा विमानतळाचे लोकार्पण. हा विमानतळ साधासुधा विमानतळ नव्हे. पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या संसाधनांचा वापर करणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून हा विमानतळ उभारण्यात आला आहे. हिंदुस्थानात असा एक विमानतळ केरळमध्ये आहे आणि दुसऱ्या विमानतळाचे आज लोकार्पण झाले. दुसरा अतिशय महत्वाचा कार्यक्रम दिव्यांगांसाठीचा. माझ्यासमोर पाच-सात कार्यक्रमाचे प्रस्ताव होते आणि माझ्या स्वभावाला अनुसरून मी दिव्यांगांच्या कार्यक्रमाला प्राधान्य दिले. निष्पाप मुलांना भेटणे, या मुलांच्या कुटुंबांनी ईश्वराचा प्रसाद मानून या मुलांचे संगोपन केले आहे ही एक तपस्याच आहे. म्हणूनच या दिव्यांगांच्या मातापित्यांनाही प्रणाम करण्याची संधी मला मिळाली. या मातापित्यांनी आपल्या मुलांसाठी आपल्या जीवनाची, आपल्या स्वप्नांची आहुती दिली. आई-वडील कुठे जाऊ शकत नाहीत, मुलाला एकट्याला ठेवू शकत नाहीत. या कुटुंबांकडे पाहिले की कळते की ही कुटुंबे किती तपस्या करतात. हे पाहिल्यानंतर समाज म्हणून, सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे की या कुटुंबाला या कामात आपणही मदत करू या, थोडी जबाबदारी आपणही उचलू या. या पवित्र भावनेने या दिव्यांगांमध्ये मी मिसळतो, माझे सरकार यासाठीच्या कार्यक्रमात सहभागी होते आणि सेवा करण्याची संधी मिळते. यामागे माझ्या मनात विचार आहे. ही मदतीची अथवा साधन सहाय्यतेची संधी नव्हे, हा त्याचा अल्प भाग झाला. या कार्यक्रमाद्वारे सव्वाशे कोटी भारतीयांच्या मनात दिव्यांगाप्रती जबाबदारीची जाणीव करून देणे. ज्याच्या घरात दिव्यांग व्यक्ती आहे केवळ त्याची जबाबदारी नाही तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे, संपूर्ण राष्ट्राची जबाबदारी आहे. असे वातावरण निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे. या मुद्द्यावर एक देश म्हणून कळत-नकळत आपण उदासीन आहोत.
सरकारी इमारतीत दिव्यांगांना यायचे असेल तर त्यांनाही सामान्य व्यक्तींसाठी असलेल्या व्यवस्थेनुसार जावे लागते. दिव्यांग त्या मार्गावरून कसे जाऊ शकतील? आम्ही सुगम्य योजना तयार केली. सरकारी इमारतीसाठी रातोरात पैसे येऊ शकत नाही हे समजू शकतो, पण आता ज्या इमारती निर्माण होतील, जे रेल्वे फलाट तयार होतील त्यामध्ये अशी व्यवस्था हवी की, दिव्यांगजन तिथे सहज पोहचू शकतील. माझा अनुभव सांगतो की लोकांचा विरोध नसतो, त्यांची हरकत नसते, ते म्हणतात साहेब आधी कोणी सांगितले नव्हते, आता आपण सांगितलेत आता आम्ही करू. हळू-हळू हे वातावरण आपण सगळीकडे निर्माण करू, शाळा असू दे, रुग्णालय असू दे, सरकारी कार्यालय असू दे, जी व्यवस्था असेल तिथे दिव्यांगांसाठी आपण विचार केला पाहिजे. स्थापत्यशास्त्र महाविद्यालयांनाही माहित हवे की इथून जे नवे वास्तुरचनाकार तयार होतील त्यांच्या आराखड्यात ही व्यवस्था असेल. हे एक जनआंदोलन उभे करायला हवे, आपण जर जनआंदोलन उभे केले तर व्यवस्था विकसित होईल. एकदा समाजाचा दिव्यांगांकडे बघण्याच्या दृष्टीकोनात बदल झाला. दिव्यांग जात असेल आणि चार -पाच युवकांनी त्याला उभे राहून रस्ता ओलांडून द्यायला मदत केली तर त्यांच्यामध्ये सन्मानाचा भाव येतो. हा देश, हा समाज आणि माझ्या आसपासचे लोक माझ्यासाठी जागृत आहेत.
सरकारमध्ये ही व्यवस्था आहे, मागच्या सरकारांनीही या दिशेने काम केले आहे, तुम्हाला ऐकून आश्यर्य वाटेल की 1992 पासून या प्रकारच्या कामांना सुरुवात झाली. 1992 ते 2004 पर्यंत दिव्यांगांना मदत पोहोचवणारे फक्त 56 कार्यक्रम झाले. हे सरकार आल्यापासून दोन वर्षात साडेचार हजार असे कार्यक्रम झाले आणि देशभरात आतापर्यंत साडेपाच लाख दिव्यांगांना सहायता करण्यात आली आहे. केवळ योजना तयार करणे नव्हे तर सरकारची सर्व खाती संवेदनशील असावी योजना गरिबांपर्यंत, दलितांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी सरकार आग्रही आहे.
आपल्या दिव्यांगजनासाठी जी साधने लागतात ती तयार करताना त्यात कल्पकता आणणे हे सरकारचे काम आहे. आपल्याला आश्यर्य वाटेल की हे फक्त नावालाच राहिले होते. या सरकारने त्याला पुनरुज्जीवीत केले. नवनव्या अभियंत्यांना बोलावले, ज्या संस्था बंद पडल्या होत्या त्यात नव्या कल्पना आणल्या, नवनव्या गोष्टी तयार होऊ लागल्या आणि माफक दरात खरेदी करता येईल अशी व्यवस्था करण्यात आली. एक सरकार म्हणून समाजाच्या या वर्गाचीही चिंता, त्यांनाही प्राधान्य. याचा परिणाम म्हणजे सगळे विभाग परिघावर आहेत. दलित, वंचित, पीडित, दिव्यांगजनासाठी सर्व विभाग सचेतन बनवण्याचा निश्चय सरकारने केला आहे, आणि दोन वर्षापेक्षा कमी काळात हे काम करण्यात आम्ही सफल झालो आहोत.
सरकारमध्ये दिव्यांगांना नोकरी मिळेल असा नियम सरकारने केल्यावर सरकारची वाहवा होते, सगळीकडून प्रशंसा होते, सगळ्यांना चांगले वाटते. पंतप्रधान झाल्यावर मी दिल्लीला गेलो, पदभार स्वीकारला तेव्हा सगळ्यात आधी मी विचारले की भारत सरकारमध्ये दिव्यांगजनासाठी पदे आहेत, त्यापैकी किती पदे रिक्त आहेत? वरवर नजर टाकली, बारकाईने पाहिले नव्हते. मी सुरवातीची गोष्ट सांगतो आहे, बडोद्याहून आपल्या इथून खासदार होऊन दिल्लीला गेलो आणि पंतप्रधानपद स्वीकारले तेव्हाची गोष्ट सांगतो आहे. दिव्यांगांसाठीची सुमारे 16500 पदे रिक्त होती. मंत्रिमंडळातले माझे सहकारी, खात्यातले अधिकारी या सर्वाना सांगितले की सर्वप्रथम ही रिक्त पदे भरा. मला हे सांगताना आनंद होत आहे की, सुमारे 14500 पदांसाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्या स्थानांवर आज दिव्यांग कार्यरत आहेत. आम्ही फक्त कृत्रिम अवयव आणि साहित्याचे वाटप करत नाही तर त्यांच्यासाठी कामही करून दाखवतो.
जे दिव्यांग ऐकू शकत नाहीत, त्यांच्यासाठी दोन भगिनी त्यांच्यासाठीच्या सांकेतिक भाषेत माझे भाषण त्यांना समजावून सांगत आहेत. मात्र आपला देश विशाल आहे. राजकोटमध्ये भगिनी वेगळ्या सांकेतिक भाषेत समजावून सांगेल तर मुंबईमध्ये दुसऱ्या तर दिल्लीमध्ये तिसऱ्या, कोलकात्यात चौथ्या, थोडक्यात सांगायचे झाले तर प्रत्येक राज्याने आपापली सांकेतिक भाषा विकसित केली आहे. थोडक्यात सांगायचे तर अहमदाबादचा दिव्यांग दिल्लीला गेला तर त्याला समजत नाही की हे काय म्हणतात, कारण सांकेतिक खुणाचे अर्थ बदलतात. आता तुम्हीच मला सांगा की एवढ्या विशाल देशात दिव्यांगांसाठी सांकेतिक खुणा एकसमान असल्या पाहिजेत की नाही? हिंदुस्तानच्या कोणत्याही भागात दिव्यांग बंधू भगिनी गेले आणि सांकेतिक भाषेप्रमाणे हाताच्या खुणा करून बोलू लागले तर समोरच्याला समजायला हवे की नको? मला सांगायला नको वाटते, मला माफ करा पण हे कामही आजपर्यंत देशात झाले नाही. आमच्या सरकारने सर्व दिव्यांगजनांसाठी एकसमान भाषा तयार करण्याचे ठरवले, त्यासाठी कायदा करण्याचे ठरवले. त्यासाठी व्यवस्था केली. एखाद्या विषयावर सखोल विचार केला तर समस्येचे निराकरण कसे होते हे आपण पाहिले.
बंधू-भगिनींनो,
आज संपुर्ण जगात एका गोष्टीची प्रशंसा होत आहे. चहुबाजूनी गौरव होत आहे. कोणत्या गोष्टीची प्रशंसा होत आहे? मला ऐकू येईल एवढ्या आवाजात बोला. संपुर्ण जगात कोणत्या गोष्टीची प्रशंसा होत आहे? मित्रहो, सगळे जग आज म्हणत आहे की, जगात ज्या मोठ्या मोठ्या अर्थव्यवस्था आहेत त्यात वेगाने विकास करणारी कोणती व्यवस्था आहे तर ती म्हणजे हिंदुस्थानची आहे. मित्रहो, सगळ्या जगात वेगाने विकास होणारी अर्थव्यवस्था आपल्या भारताची आहे. आपल्या देशात सलग दोन वर्ष दुष्काळ पडूनही, जागतिक बँक असू दे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असू दे, पतमानांकन संस्था असू दे, सर्वजण एकमुखाने सांगत आहेत की भारताचा विकास मोठ्या वेगाने होत आहे. सगळ्या समस्यांचे उत्तर म्हणजे विकास आहे. विकासाच्या मार्गानेच निरक्षरता दूर होईल, रोगराई दूर होईल, गरिबी दूर होईल आणि जगातल्या समृद्ध राष्ट्रांच्या बरोबरीने भारतही ताठ मानेने उभा राहील.
जरा 2014 आठवा. 2014, 2013 मधले दिवस आठवा. विसरला असाल तर वर्तमानपत्रे काढून पहा. ठळक बातम्या काय असायच्या, तर इतक्या कोटींचा घोटाळा, कोळसा खाणवाटपात इतक्या कोटींचा घोटाळा, स्पेक्ट्रममध्ये इतक्या कोटींचा घोटाळा ह्याच ठळक बातम्या होत्या , बरोबर ना? आपण माझ्याकडे जबाबदारी सुपूर्द केली त्याला जवळपास अडीच वर्षे होत आली. आता बातमी येते ती दिव्यांगांसाठी काही चांगले काम केले असेल त्याची. आज जगभरात भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या बातम्या येतात. आज प्रगतीच्या बातम्या येतात. भ्रष्टाचाराविरोधात मी एक अभियान सुरु केले. एक लढा छेडण्याचे आवाहन केले. मोठ्या-मोठ्या नव्हे तर छोटया- छोट्या गोष्टी सांगतो. आधारच्या माध्यमातून, जनधन खात्याच्या माध्यमातून, सरकारी अनुदान थेट लाभार्थींच्या खात्यात जमा करायला सुरुवात केली. ज्यांना मदत मिळायला हवी, त्यांनाच कोणत्याही दलालाशिवाय, मध्यस्थाशिवाय मदत मिळते. खऱ्याखुऱ्या लाभार्थीना अनुदान मिळते. बोगस लाभार्थीना थारा नाही राहिला.
याचा काय परिणाम झाला आपल्याला माहित आहे? आता राज्यांना यासाठी सज्ज करत आहे. शुभारंभ झाला आहे. खऱ्या लाभार्थीला त्याचा हक्क मिळायला हवा, बोगस लाभार्थीने त्याचा गैरफायदा घेऊ नये याकडे लक्ष ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही हे लक्ष दिले. आपण जाणता की 36000 कोटी रुपयांची बचत झाली. स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर, पेन्शनमध्ये, विद्यार्थ्यांसाठीच्या स्कॉलरशिपमध्ये कदाचित हा पैसा खऱ्या लाभार्थीपर्यंत न पोहोचता बरबाद होत होता. कोणी विचारणारे नव्हते.
आमच्या आधी जे कोणते सरकार असेल त्याने घोटाळे केले असतील. आता गाडी पुन्हा रुळावर आणायची असेल तर आम्ही थोडा वेळ द्यायला हवा. म्हणून आम्ही थोडा वेळ दिला. मात्र माफी नाही दिली. पूर्ण कर घेतला, पूर्ण दंड घेतला, करप्रदानाचे गाडे रुळावर यावे यासाठी. आपल्याला आनंद होईल की हिंदुस्तानमध्ये अशा प्रकारची योजना पहिल्यांदा सादर केली गेली. आमच्या सरकारच्या विश्वासार्हतेमुळे 65000 कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर आला, देशाच्या मुख्य प्रवाहात आला.
36000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत होता, तुम्ही विचार करा. अनुचित व्यक्तीला अनुदान मिळत होते, ते योग्य व्यक्तीला मिळायला सुरवात झाली . 65000 कोटींचा काळा पैसा, दोन्ही मिळून सुमारे एक लाख कोटी आणि हे एक लाख कोटी सर्जिकल स्ट्राईक करून मिळवले नाही तर बिना सर्जिकल स्ट्राईक मिळवले. ज्या दिवशी सर्जिकल स्ट्राईक करू त्या दिवशी किती पैसा मिळेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता.
एक सच्चे सरकार, एक प्रामाणिक सरकार, एक परिणामकारक सरकार, जनताजनार्दनाच्या सुखाप्रती समर्पित सरकार असेल तर कोणताही अडसर येत नाही आणि हिंमतीने, धाडसाने जनहिताची कामे पूर्णत्वाला नेता येऊ शकतात, हे दिल्लीमध्ये आमच्या सरकारने दाखवून दिले आहे. त्याचा लाभ हिंदुस्तानच्या प्रत्येक कानाकोपऱ्याला मिळत आहे. काही दिवसांपासून गरिबांसाठी गॅस सिलेंडरची तरतूद करत आहे. याआधी कोणाच्या घरात गॅस सिलेंडर असेल तर ते कुटुंब प्रभावशाली समजले जात असे. त्याची मोठी ओळख आहे असे मानले जात असे. गरीब माणूस तर सिलेंडरचा विचारही करू शकत नव्हता. सिलेंडरसाठी लोक खासदाराकडे जाऊन चिठ्ठी आणत असत. बडोद्याच्या लोकांना हा प्रश्न नाही कारण इथे पाईप गॅस आहे. गॅस सिलेंडर मिळत नसत. गरीब मातांना चुलीवर धुराच्या त्रासात स्वयंपाक करावा लागत असे. 400 सिगारेटच्या धुराएवढा धूर या माता एका दिवसात झेलतात असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. या गरीब मातांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार?
दिल्लीमध्ये आमच्या सरकारने निश्चय केला की ज्या कुटुंबांकडे गॅस जोडणी नाही अशा गरीब कुटुंबाना सरकार गॅस जोडणी देईल आणि या गरीब मातांना धुरापासून मुक्ती देईल. त्यासाठी अभियान सुरु आहे. सरकारने दाहोद मधे प्रारंभ केला होता आता संपुर्ण हिंदुस्थानमधे हे अभियान सुरु आहे. या देशातला गरीब, पीडित, शोषित, वंचित, आदिवासी बांधव यांच्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी काम करणारे हे सरकार आहे.
आज सुमारे 10000 दिव्यांगांना या सहाय्यतेचा लाभ मिळणार आहे आणि आमच्या गेहलोतजी यांनी सांगितले की याबाबतची संपूर्ण माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लोक पाहू शकतात की आमच्या गावातल्या दिव्यांगांचे नाव आहे पण त्याला खरेच मदत मिळत आहे ना? संपूर्ण पारदर्शकतेला आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. व्यापक समाजहिताच्या कार्याला बळ मिळेल अशी कार्ये आम्ही करत आहोत. आपल्या सर्वाना भेटण्याची संधी मला मिळाली, बडोद्याला आल्यावर मला घरी आल्याचा आनंद लाभतो. जीवनातला महत्वपूर्ण काळ मी इथे व्यतीत केला. शास्त्री पोल मध्ये राहत होतो. अनेक जुने ओळखीचे परिवार माझ्यासमोर आहेत.अनेक वर्षे आपल्यामध्ये राहिलो आहे. अनेक वर्ष आपणा सर्वांबरोबर राहिलो आहे, आपणाबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. अनेक वर्ष या संस्कार नगरीने मला खूप शिकविले. हे सर्व आज देशाच्या सेवेसाठी उपयोगी आहे. मी या नगराचा, या राज्याचा ऋणी आहे. गुजरातच्या करोडो बांधवांचा ऋणी आहे, कारण त्यांच्या संस्कारामुळे भारतमातेची उत्तम पद्धतीने सेवा करण्याची संधी मला मिळाली. मी या भूमीला नमन करतो, या संस्कार सरितेला वंदन करतो, इथल्या महान परंपरेला वंदन करतो.
माझ्यासमवेत एकमुखाने बोला
भारत माता की
जय
बुलंद आवाजात म्हणा
भारत माता की
जय
भारत माता की
जय
अनेक अनेक धन्यवाद.
B.Gokhale/N.Chitale/Anagha
Always special to spend time with my Divyang sisters and brothers. Meeting their families was also very humbling & inspiring. pic.twitter.com/J14scFRCgq
— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2016
Be it timely distribution of equipment, job opportunities & focus on accessibility, talked about initiatives of NDA Govt for Divyang welfare
— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2016
Let us ensure that every infrastructure we create is sensitive to the requirements of Divyang sisters & brothers. https://t.co/VJv6ZBnWaU
— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2016