Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 5 जून रोजी सूरत आणि दमणला भेट देणार


नवी दिल्‍ली, 4 जून 2026

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी 5 जून, 2026 रोजी गुजरात आणि दमणला भेट देतील. दुपारी सुमारे 2:30 वाजता, पंतप्रधान सूरत जिल्ह्यातील हझिरा येथे भेट देतील आणि तेथील सुरू असलेल्या औद्योगिक कामकाजाचा तसेच पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतील. त्यानंतर, संध्याकाळी  4:15 वाजण्याच्या सुमारास, पंतप्रधान सूरतमध्ये सुमारे 18,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.

त्यानंतर पंतप्रधान दमणला रवाना होतील. या ठिकाणी संध्याकाळी  6:15 च्या सुमारास ते दमणमधील ‘नमो विमानतळाच्या’  नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील. यानंतर दमणमधील ‘नमो रुग्णालय’  राष्ट्राला समर्पित केले जाईल. त्यानंतर, संध्याकाळी  7:15 च्या सुमारास, पंतप्रधान दमणमध्ये सुमारे 02,970 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. ते लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशासाठी सुमारे 885 कोटी रुपये खर्चाच्या चार महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी देखील करतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.

पंतप्रधान सूरतमध्ये

पंतप्रधान सूरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील 18,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचे पॅकेजेस VI आणि VII राष्ट्राला समर्पित करतील, ज्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्र दरम्यान हाय-स्पीड वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळण अधिक बळकट होईल.

आदिवासी भागांमधील दळणवळण सुधारण्यासाठी आणि ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पर्यंतचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी पंतप्रधान NH-56 वरील महत्त्वपूर्ण टप्प्यांच्या चौपदरीकरणासह इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी करतील.

पंतप्रधान सूरतमध्ये 220 खाटांच्या ईएसआयसी रुग्णालयाचे उद्घाटन करतील, ज्यामध्ये केंद्रीय प्रयोगशाळा आणि आवश्यक पूरक सेवांच्या मदतीने प्रमुख वैशिष्ट्यांसह आधुनिक द्वितीयक आरोग्य सेवा उपलब्ध असतील. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या जखमा आणि वैद्यकीय आणीबाणीचे वेळेवर व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी यामध्ये 24/7 आपत्कालीन आणि ट्रॉमा केअर सुविधा देखील उपलब्ध आहे.

पंतप्रधान महत्त्वपूर्ण सुविधा आणि औद्योगिक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करतील, ज्यामध्ये आंतर-राज्य पारेषण प्रणाली अंतर्गत वीज वहन क्षमता वाढवण्यासाठी गुजरात मधील ‘पारेषण जाळ्याच्या विस्ताराचा’  समावेश आहे.

पंतप्रधान गुजरात सरकारचे अनेक महत्त्वाचे उपक्रम देखील सुरू करतील, ज्यामध्ये वलसाड मधील पुनर्रचित सुधारणा-आधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत आधुनिक वीज वितरण सुधारणा, दहेज पेट्रोलियम, केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल इन्व्हेस्टमेंट रिजन (PCPIR) आणि सरीगाम गुजरात औद्योगिक विकास महामंडळ (GIDC) येथील प्रगत सांडपाणी विल्हेवाट आणि प्रक्रिया पायाभूत सुविधा आणि जंबुसर बल्क ड्रग पार्क येथील आवश्यक लेआउट सुविधांचा समावेश आहे.

पंतप्रधान दमणमध्ये

पंतप्रधान दमणमध्ये आरोग्यसेवा, नागरी हवाई वाहतूक, पर्यटन, पायाभूत सुविधा, दळणवळण आणि जनकल्याण अशा विविध क्षेत्रांतील सुमारे 2,970 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. या प्रकल्पांमुळे दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा आहे.

पंतप्रधान दमणमध्ये ‘नमो विमानतळाच्या’  नवीन टर्मिनल इमारतीसह आणि ‘नमो रुग्णालया’ सह सुमारे 1,340 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील. नवीन विमानतळ टर्मिनलमुळे प्रादेशिक हवाई दळणवळण लक्षणीयरित्या सुधारेल आणि या भागातील आर्थिक विकासाला गती मिळेल. दमण जिल्ह्यातील नमो रुग्णालय हे जिल्हा रुग्णालय दररोज सुमारे 1,500 बाह्यरुग्ण विभाग रुग्णांवर उपचार करण्यासाठी विकसित करण्यात आले असून यामुळे लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे अधिक सुलभ होईल.

सुमारे 1,630 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी देखील  पंतप्रधान करतील. यामध्ये प्रामुख्याने आयकॉनिक ब्रिज, दमण कन्व्हेन्शन सेंटर  आणि दमण येथील एनआयएफटी कॅम्पस यांसारख्या प्रमुख प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प आधुनिक पायाभूत सुविधा बळकट करतील, पर्यटनाला गती देतील, गुंतवणुकीला प्रोत्साहन देतील, रोजगाराच्या संधी निर्माण करतील आणि लोकांचे जीवनमान सुधारतील अशी अपेक्षा आहे.

पंतप्रधान लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशासाठी सुमारे 885 कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी देखील करतील. या प्रकल्पांमध्ये कल्पेनी बेट आणि कादमत बेट या दोन्ही बेटांच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंना बंदर सुविधांचा विकास करण्याचा समावेश आहे. या बहुउद्देशीय जेट्टींच्या विकासामुळे 300 मीटरपर्यंत लांबी असलेल्या क्रूझ जहाजांसह मोठ्या प्रवासी जहाजांना वर्षभर नांगरण्याची  सुविधा मिळेल. हे प्रकल्प सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवासी व मालवाहू वाहतुकीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करतील. तसेच मत्स्य हाताळणी, इंधन वितरण, बर्फ पुरवठा आणि बोट दुरुस्तीसाठी एकात्मिक सुविधा उपलब्ध करतील. हे उपक्रम सागरी दळणवळणाला बळकटी देतील.  स्थानिक मच्छिमारांच्या उपजीविकेला हातभार लावतील, पर्यटनाला चालना देतील आणि या बेटांच्या सामाजिक-आर्थिक विकासात योगदान देतील.

 

* * *

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai