Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली प्रगतीची 54 वी बैठक


नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी सेवा तीर्थ इथे प्रगतीची  (PRAGATI) ची 54 वी बैठक झाली. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानावर आधारित या बहुआयामी व्यासपीठाचा उद्देश, तत्पर प्रशासन आणि प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी करण्याला चालना देणे हा आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारे एकत्र येऊन प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्यास आणि प्रकल्प तसेच कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यास प्रयत्नशील असतात.

या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी रेल्वे, एकता मॉल आणि ड्रग पार्कशी संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या या प्रकल्पांचा एकूण खर्च 16 हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. आर्थिक विकास आणि लोककल्याणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पांचा आढावा घेताना, निश्चित वेळेत काम पूर्ण करणे, विविध संस्थांमधील समन्वय आणि अडचणींचे वेळेवर निराकरण यांवर विशेष भर देण्यात आला.

पीएम एकता मॉल्स स्थानिक उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देतील, कारागिरांच्या उपजीविकेला मजबूत करतील आणि त्यांना त्यांचे व्यवसाय वाढवण्यास मदत करतील, यावर पंतप्रधानांनी भर दिला. या मॉल्सना पर्यटन आणि स्थानिक व्यवसायांशी जोडण्याचे आवाहन त्यांनी केले. मागणी वाढल्यामुळे ग्रामीण भागातील उत्पादन, पॅकेजिंग, साठवणूक आणि वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी या प्रकल्पांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यास आणि मॉल्सचे काम वेळेत पूर्ण होईल याची खात्री करण्यास  मुख्य सचिवांना सांगितले.

आंध्र प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील ‘बल्क ड्रग पार्क्स’ चा आढावा घेताना, पंतप्रधानांनी आत्मनिर्भरता बळकट करण्यासाठी सक्रिय औषधी घटक आणि आवश्यक कच्च्या मालाच्या देशांतर्गत उत्पादनाला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली.

अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ वेळेवर पोहोचतील याची खात्री करण्यासाठी, पंतप्रधानांनी मुख्य सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांसोबत दरमहा योजनांचा आढावा घेण्यास सांगितले. शासनाने खर्चापेक्षा परिणामांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि सार्वजनिक खर्चाचे रूपांतर लोकांच्या जीवनात ठोस सुधारणांमध्ये होईल याची खात्री केली पाहिजे, त्यांनी यावर भर दिला. महत्त्वाकांक्षी जिल्हे आणि महत्त्वाकांक्षी तालुके या कार्यक्रमांचा संदर्भ देत, त्यांनी वंचित भागांमध्ये विकासाला गती देण्यासाठी, नियमित देखरेख आणि स्थानिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. शासन मजबूत करण्यासाठी आणि कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी सुधारण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सुमारे 25 कोटी जनतेला गरिबीतून बाहेर पडण्यास मदत झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

अहमदाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाच्या आढावा बैठकीदरम्यान, प्रवाशांची सोय आणि प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा वेग वाढवण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. पुनर्विकसित रेल्वे स्थानके ही मेट्रो आणि इतर वाहतूक सेवांशी जोडलेली एकात्मिक बहु-वाहतूक (मल्टीमॉडल) केंद्रे म्हणून विकसित केली जावीत, यावर त्यांनी भर दिला.

संबंधित मंत्रालये आणि राज्य सरकारांनी मिशन मोडमध्ये एकत्र येत प्रकल्पातील अडथळे दूर करावेत, केंद्र-राज्य तसेच विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक मजबूत करावा आणि वरिष्ठ स्तरावरून या कामांवर बारीक लक्ष ठेवावे, असे निर्देश त्यांनी दिले. कामाच्या ठिकाणी प्रत्येक स्तरावर मालकीची भावना आणि तत्परतेने काम करण्याची संस्कृती निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले. अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणींचा आधीच अंदाज बांधावा, योग्य वेळी निर्णय घ्यावेत आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी स्पष्ट उत्तरदायित्व निश्चित करावे, असेही पंतप्रधान  मोदी यांनी सांगितले.

 

* * *

निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/पर्णिका हेदवकर/वैभवी जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai