Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागतिक स्तरावर स्पर्धात्मक क्रीडा साहित्य उत्पादन परिसंस्था उभारण्यासाठी ‘खेलो इंडिया क्रीडा साहित्य उत्पादन योजने’ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2026 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2026 ते 2033-34 या कालावधीसाठी 1,856.67 कोटी रुपये खर्चाच्या खेलो इंडिया क्रीडा साहित्य उत्पादन योजने’ला मंजुरी देण्यात आली. जागतिक क्रीडा साहित्य क्षेत्रात भारताचे स्थान मजबूत करण्याच्या उद्देशाने गुंतवणूक, उत्पादन, नवोन्मेष आणि निर्यातीला चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

वर्ष 2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती, या माध्यमातून गुंतवणूक, तंत्रज्ञानाचा अंगीकार, संशोधन आणि नवोन्मेष, कौशल्य विकास, गुणवत्ता प्रमाणपत्र आणि बाजारपेठ विकास यांसारख्या क्षेत्रांत लक्ष्यित पाठबळ देऊन भारतातील क्रीडा साहित्याच्या निर्मिती क्षेत्राला बळकट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही योजना जागतिक पातळीवरील स्पर्धात्मक क्रीडा साहित्य निर्मिती उद्योगाच्या विकासाला पाठबळ देईल आणि जागतिक मूल्य साखळीतील भारताचे स्थान मजबूत करेल.

खेलो भारत नीती 2025, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असलेल्या या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक आकर्षित होईल, रोजगार निर्मिती होईल, देशांतर्गत उत्पादकता अधिक बळकट होईल आणि भारतीय क्रीडा साहित्याची जागतिक पातळीवरील स्पर्धात्मकता वाढीला लागेल, अशी अपेक्षा आहे. 

एकात्मिक क्रीडा साहित्य उत्पादन परिसंस्थांची उभारणी:

या योजनेअंतर्गत समूह-आधारित उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित क्रीडा साहित्य उत्पादन क्षेत्रांचा  विकास करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. या माध्यमातून उत्पादक, पुरवठादार, चाचणी सुविधा, डिझाइन आणि  नमुना निर्मिती केंद्र तसेच पूरक उद्योग यांना एकाच ठिकाणी एकत्र आणून एकात्मिक औद्योगिक परिसंस्था निर्माण केली जाणार आहे. या उत्पादन क्षेत्रांचा विकास भारत औद्योगिक विकास योजना आणि राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळ औद्योगिक पार्क्स यांच्या अंतर्गत उपलब्ध असलेल्या औद्योगिक पायाभूत सुविधांशी समन्वय साधून करण्यात येणार आहे. यामुळे कार्यक्षम उत्पादन प्रक्रिया, उद्योगांमधील अधिक मजबूत परस्परसंबंध आणि क्रीडा साहित्याच्या संपूर्ण मूल्यसाखळीतील स्पर्धात्मकता वाढवण्यास मदत होईल.

या उत्पादन क्षेत्रांमुळे एकात्मिक उत्पादन सुविधा निर्माण होण्यास, उद्योगांमधील परस्परसंबंध अधिक मजबूत होण्यास आणि कार्यप्रणालीची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. या उपक्रमांमुळे गुंतवणुकीला चालना, उत्पादन क्षमता वृद्धी  आणि देशात क्रीडा साहित्य उत्पादनाचा भक्कम पाया विकसित होणे अपेक्षित आहे.

गुंतवणूक आकर्षित करणे आणि देशांतर्गत उत्पादकतेचा विस्तार करणे:

क्रीडा साहित्य क्षेत्रात नवीन गुंतवणूक आकर्षित करणे आणि देशांतर्गत उत्पादकता क्षमता मजबूत करणे यावर या योजनेचे लक्ष केंद्रित आहे.  प्रमुख गुंतवणूकदारांना सहाय्य  या घटकांतर्गत देशातील आघाडीचे तसेच जागतिक उत्पादक, ब्रँड्स आणि किरकोळ विक्री साखळ्यांना निर्धारित क्रीडा साहित्य उत्पादन क्षेत्रांमध्ये उत्पादन सुविधा उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामुळे सक्षम पुरवठादारांचे जाळे विकसित होण्यास आणि पूरक उद्योगांची भक्कम परिसंस्था निर्माण होण्यास चालना मिळेल. यालाच पूरक म्हणून उलाढालीशी निगडित सहाय्य घटकामुळे अधिक उत्पादन, क्षमता विस्तार आणि शाश्वत उत्पादन विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून एकूण 1,130 कोटी रुपयांचे पाठबळ असलेली ही योजना देशांतर्गत उत्पादकतेत वृद्धी, आयातीवरील अवलंबित्व कमी करेल, देशांतर्गत मूल्यवृद्धीत सुधारणा, महत्त्वपूर्ण खाजगी गुंतवणुकीला चालना , संपूर्ण मूल्य साखळीत रोजगार निर्मिती आणि जागतिक बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मकता वाढवेल अशी अपेक्षा आहे.

सूक्ष्म, लघु आणि  मध्यम उद्योग आणि विद्यमान उत्पादन समूहांचे बळकटीकरण:

क्रीडा साहित्य क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि  मध्यम उद्योगांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन या योजनेअंतर्गत विद्यमान उत्पादन समूह बळकट करण्यावर आणि  लघु उद्योजकांच्या वृद्धीसाठी सहाय्य करण्यावर भर देण्यात आला आहे. 

विद्यमान क्रीडा साहित्य उत्पादन समूहांच्या आधुनिकीकरणासाठी आणि दर्जावाढीसाठी सहाय्य पुरविण्यात येणार आहे. यामध्ये सामायिक सुविधा केंद्रे आणि सामूहिक पायाभूत सुविधांचा विकास करण्याचाही समावेश असेल.

गुणवत्ता आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रांना प्रोत्साहन:

भारतीय क्रीडा साहित्याची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त गुणवत्ता आणि कार्यक्षमतेच्या मानकांचे महत्त्व ही योजना अधोरेखित करते. या योजनेंतर्गत 105 कोटी रुपयांच्या तरतुदीसह, उत्पादकांना आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघांकडून प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी आणि त्यांचे नूतनीकरण करण्यासाठी सहाय्य  दिले जाईल.

या उपायांमुळे उत्पादनांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश सुलभ होईल आणि भारतीय बनावटीच्या क्रीडा साहित्यावरील विश्वास अधिक दृढ होईल.

संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमात गुंतवणूक:

क्रीडा साहित्य क्षेत्रात संशोधन, डिझाइन आणि नवोपक्रम यांना बळकट करण्यावर या योजनेत विशेष भर देण्यात आला आहे. क्रीडा उपकरणे, पदार्थ विज्ञान आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील नामवंत शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये ‘उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यासाठी साहाय्य केले जाईल. ‘अनुसंधान नॅशनल रिसर्च फाऊंडेशन’ यांच्याशी समन्वय साधून संशोधन आणि विकास उपक्रमांनाही प्रोत्साहन दिले जाईल.
‘स्टार्टअप इंडिया’ मोहिमेनुसार स्टार्टअप्सना विशेष सहकार्य दिले जाईल, ज्यामुळे क्रीडा साहित्य उत्पादन परिसंस्थेमध्ये नवीन तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि उत्पादनांचे विकास, चाचणी, पडताळणी आणि व्यावसायिकरण सुलभ होईल तसेच नवोपक्रमांना चालना मिळेल.

भविष्यासाठी कुशल मनुष्यबळ विकसित करणे:

क्रीडा साहित्य उत्पादन क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी आहेत हे लक्षात घेऊन, ही योजना उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य विकास उपक्रमांना पाठबळ देईल. उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार हे उपक्रम असावेत यासाठी ‘कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय’ आणि संबंधित औद्योगिक क्षेत्रातील भागधारकांच्या सहकार्याने हे कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जातील. या प्रयत्नांमुळे कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी पूर्ण होण्यास मदत होईल आणि क्रीडा साहित्य उत्पादन क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासाला मोठा आधार मिळेल.

भारतीय क्रीडा साहित्याला जागतिक बाजारपेठेत पोहोचवणे:

विशेष ब्रँडिंग, प्रचार-प्रसार आणि बाजारपेठ विकास उपक्रमांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रीडा साहित्याच्या बाजारपेठेत भारताची उपस्थिती वाढवण्याचा या योजनेचा मानस आहे. ‘निर्यात प्रोत्साहन मिशन’चा लाभ घेऊन राबवल्या जाणाऱ्या या प्रयत्नांमुळे भारतीय क्रीडा साहित्याची ओळख अधिक ठळक होईल, बाजारपेठेतील प्रवेश सुलभ होईल आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची पकड अधिक मजबूत होण्यास मदत होईल.

भारताच्या जागतिक क्रीडा महत्वाकांक्षी उद्दिष्टांना पाठबळ:

उच्च दर्जाची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित क्रीडा साहित्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन देऊन, ही योजना भारतातील क्रीडा क्षेत्राच्या आणि खेळाडू विकास कार्यक्रमांच्या बदलत्या गरजांना पूर्ण सहकार्य करेल. या योजनेअंतर्गत वाढलेला नवोपक्रम, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि उत्पादक क्षमता यामुळे ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’ यांसारख्या उपक्रमांना अधिक बळ मिळेल.

या योजनेमुळे भारताला क्रीडा साहित्याची रचना, विकास आणि उत्पादनासाठी एक जागतिक स्तरावर स्पर्धात्मक केंद्र म्हणून स्थान मिळणे अपेक्षित आहे. उत्पादन क्षमता बळकट करणे, नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि जागतिक बाजारपेठेत सुलभ प्रवेश मिळवून देणे यांद्वारे ही योजना विकास, रोजगार आणि निर्यातीसाठी नवीन संधी निर्माण करेल. तसेच, भारत एक अग्रेसर क्रीडा राष्ट्र म्हणून पुढे यावे  या महत्त्वाकांक्षेला आणि ‘आत्मनिर्भर भारत’ व ‘विकसित भारत 2047’ च्या दृष्टीकोनाला  बळ देईल.

 

* * *

निलिमा चितळे/भक्‍ती सोनटक्‍के/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai