Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लोकशाही मार्गाने निवडून आलेले आणि सलग सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरातील नेत्यांकडून अभिनंदन


नवी दिल्‍ली, 10 जून 2026

 

लोकशाही मार्गाने निवडून आलेले आणि सलग सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान बनल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातील अनेक देशांच्या आणि सरकारांच्या प्रमुखांकडून अभिनंदनाचे संदेश प्राप्त झाले आहेत.

भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे आणि त्यांचा ‘एक मित्र, भाऊ आणि मार्गदर्शक’ असा गौरव केला आहे.

“पंतप्रधान @narendramodi , हे माझे मित्र, भाऊ आणि मार्गदर्शक आहेत.”

 

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे आणि दोन्ही देशांमधील चिरस्थायी संबंध अधिक दृढ करण्याबाबत  श्रीलंकेची वचनबद्धता नमूद केली आहे. भारतातील श्रीलंकेच्या उच्चायुक्तालयानेही अध्यक्ष दिसानायके यांचा संदेश पोहोचवला असून, भारत आणि श्रीलंका यांच्यातील घनिष्ठ आणि चिरस्थायी भागीदारीचा पुनरुच्चार केला आहे.

“भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहिलेले, लोकांनी निवडून दिलेले पंतप्रधान बनल्याबद्दल मी पंतप्रधान @narendramodi यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. श्रीलंका परस्परांबरोबरच्या घनिष्ठ भागीदारीला महत्त्व देत असून, दोन्ही देशांमधील दीर्घकालीन संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहे.”

 

“राष्ट्राध्यक्ष @anuradisanayake यांनी पंतप्रधान @narendramodi यांचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले आणि सलग सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान बनल्याबद्दल अभिनंदन केले आहे. हा संदेश 🇱🇰🤝🇮🇳 यांच्यातील घनिष्ट आणि दीर्घकालीन भागीदारी आणखी मजबूत करण्याबाबत 🇱🇰 ची वाचनाबद्धता अधोरेखित करतो.”

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी अभिनंदन केले आहे, आणि त्यांची अनेक वर्षांची समर्पित सार्वजनिक सेवा आणि नेतृत्वाचा हा दाखला असल्याचे नमूद केले आहे. परस्परांमधील द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या आणि उभय  देशांमधील नागरिकांसाठी संधींचा विस्तार करण्याच्या मलेशियाच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे.

“भारतातील लोकांनी निवडून दिलेले आणि सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले पंतप्रधान बनण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. ही कामगिरी त्यांच्या अनेक वर्षांच्या समर्पित जनसेवेची आणि भारताचा विकास, समृद्धी आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा उंचावण्यामधील त्यांच्या नेतृत्वाचा दाखला आहे. मलेशिया भारताबरोबरच्या आपल्या घनिष्ठ आणि दीर्घकालीन मैत्रीला महत्त्व देतो, परस्परांमधील  द्विपक्षीय संबंध मजबूत करण्‍यासाठी , आणि दोन्ही देशातील जनतेसाठी संधींचा विस्तार करण्यासाठी असेच  सहकार्य कायम राखण्‍यास  मी  उत्सुक आहे. पंतप्रधान मोदी यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि भारताच्या जनतेसाठी  निरंतर शांतता, प्रगती आणि समृद्धीची कामना करतो.

#MalaysiaMADANI

#MADANIbekerja

#YakinMADANI”

 

सलग तीन निवडणुकांमध्ये भारतीय जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद  टीनुबू यांनी पंतप्रधान मोदी यांचे  अभिनंदन केले आहे. राष्ट्राध्यक्ष टीनुबू यांनी भारत-नायजेरिया संबंध दृढ करण्यामधील पंतप्रधान मोदी यांच्या योगदानावर प्रकाश टाकला आणि त्यांना उत्तम  आरोग्य, विवेक आणि निरंतर यश मिळावे यासाठी  शुभेच्छा दिल्या आहेत.

“भारतातील लोकांनी निवडून दिलेले आणि सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले पंतप्रधान बनण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधान मोदी @narendramodi यांचे मनःपूर्वक अभिनंदन.”

हे उल्लेखनीय यश त्यांच्या नेतृत्वावर भारतातील जनतेने दाखवलेला विश्वास दर्शवते. जनसेवेविषयी त्यांचे समर्पण, राष्ट्रीय विकासाच्याबाबत त्यांची वचनबद्धता आणि जागतिक व्यासपीठावरील प्रभावी नेतृत्व जगभरातील लाखो लोकांना  प्रेरणा देते.

नायजेरियाचे एक चांगले मित्र असण्यापलीकडे, पंतप्रधान मोदी हे माझे वैयक्तिक मित्र आणि  विश्वासू सहकारी आहेत, त्यांच्यावर मी नेहमीच विश्वास ठेवू शकतो. त्यांच्यातील विवेकशीलता, धैर्य आणि राष्ट्राची प्रगती आणि समृद्धीविषयी  असलेली वचनबद्धता याचा मी नेहमीच गौरव केला आहे.

नायजेरियाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर’ (जीसीओएन) या सन्मानाचे मानकरी म्हणूनही त्यांनी भारत आणि नायजेरिया या दोन देशांमधील मैत्री आणि  सहकार्याचे संबंध दृढ करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

नायजेरिया सरकार आणि तेथील जनतेच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम आरोग्य, दूरदृष्टी आणि भारताला अधिक उंचीवर नेण्यासाठी यशस्वी नेतृत्वासाठी शुभेच्छा देतो.

— बोला अहमद टिनुबू, जीसीएफआर

राष्ट्रपती, नायजेरिया संघीय प्रजासत्ताक

राष्ट्रपती भवन, अबुजा

9 जून 2026

 

मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइज्जू यांनी सलग कार्यकाळाच्या दिवसांच्या संख्येनुसार भारताचे सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले, निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन केले. परस्पर आदर, सार्वभौम समानता आणि सामायिक हितसंबंधांच्या आधारावर भारताबरोबरचे सहकार्य अधिक दृढ करण्याची मालदीवची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

“सलग कार्यकाळाच्या दिवसांच्या संख्येनुसार भारताचे सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

परस्पर आदर, सार्वभौम समानता आणि सामायिक हितसंबंधांच्या मार्गदर्शनाखाली भारतासोबतचे सहकार्य आणखी बळकट करण्यास मालदीव उत्सुक आहे.”

 

केनियाचे राष्ट्रपती विल्यम सामोई रुटो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या ऐतिहासिक टप्प्याबद्दल अभिनंदन करताना, ही कामगिरी  भारतातील जनतेने त्यांच्या नेतृत्वावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे म्हटले. दोन्ही देशांच्या परस्पर हितासाठी भारतासोबतचे सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याची केनियाची बांधिलकीही त्यांनी व्यक्त केली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सार्वजनिक जीवनामध्‍ये गाठलेल्या  या ऐतिहासिक टप्प्याबद्दल त्यांना  मनःपूर्वक शुभेच्छा. आज आपण भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान ठरले आहात.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेतील जनतेने आपल्या नेतृत्वावर व्यक्त केलेल्या विश्वासाचे आणि आत्मविश्वासाचे हे प्रतिबिंब आहे.

सामान्य पार्श्वभूमीतून या सर्वोच्च स्थानापर्यंतचा आपला प्रवास म्हणजे  समर्पण, चिकाटी आणि लोकसेवेचा आदर्श आहे.

भारताबरोबरच्या दृढ आणि दीर्घकालीन भागीदारीला केनिया  मोठे महत्त्व देतो आणि आपल्या उभय देशांतील जनतेच्या परस्पर हितासाठी हे सहकार्य आणखी विस्तारण्यास आपण उत्सुक आहे.

भारताच्या जनतेच्या सेवेसाठी आणि आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.”

 

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे-म्युंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले पंतप्रधान बनल्याबद्दल अभिनंदन केले आहे. भारताच्या विकास आणि प्रगतीतील त्यांच्या नेतृत्वाची दखल घेत त्यांनी कोरिया-भारत विशेष सामरिक भागीदारी आणखी बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

“이재명 @Jaemyung_Lee (President of South Korea)

“पंतप्रधान नरेंद्र मोदी, @narendramodi

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे – भारताचे सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले पंतप्रधान बनल्याबद्दल मी आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो.

आपण अनेक वर्षे भारताच्या विकास आणि प्रगतीचे नेतृत्व केले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ही कामगिरी  भारताच्या जनतेने आपल्या नेतृत्वावर दाखवलेल्या विश्वासाचे द्योतक आहे, असा मला विश्वास आहे.

एप्रिल महिन्यात आपण कोरिया-भारत विशेष सामरिक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी तसेच विकास आणि नवोपक्रमांनी समृद्ध भविष्य घडविण्यासाठी एकत्रित कार्य करण्याचे ठरविले होते. आपल्यासोबत विश्वास आणि मैत्री अधिक दृढ करून दोन्ही देशांच्या जनतेसाठी लाभदायक ठोस परिणाम साध्य करण्याची मी अपेक्षा करतो.

आपल्याला  उत्तम आरोग्य लाभावे  आणि भारताच्या जनतेच्या सुख, समृद्धी तसेच कल्याणासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो.”

 

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल अभिनंदन केले. रोम येथे नुकत्याच झालेल्या त्यांच्या भेटीची आठवण करून देत, भारत-इटली विशेष सामरिक भागीदारीला अधिक बळकटी देण्यासाठी आणि दोन्ही देश तसेच  त्यांच्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण करण्यासाठी एकत्र काम करण्याची आपली बांधिलकी त्यांनी व्यक्त केली.

Giorgia Meloni@GiorgiaMeloni

Translated from Italian

Congratulations to

@narendramodi

आज भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान बनलेले  नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन.

अलीकडच्या काही आठवड्यांत रोममध्ये पुन्हा एकदा आपली भेट होणे आणि आपल्या दोन्ही राष्ट्रे तसेच जनतेसाठी भविष्यातील नव्या संधी निर्माण करणाऱ्या विशेष सामरिक भागीदारीचा प्रारंभ एकत्रित करणे, हा अत्यंत आनंददायी अनुभव होता.”

 

* * *

सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे