Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फ्रान्समधील एव्हियान येथे झालेल्या G7 शिखर परिषदेत पंतप्रधानांनी “कृत्रिम बुद्धिमत्ता- सुरक्षित, जलद आणि कार्यक्षम अंमलबजावणी सुनिश्चित करणे” या सत्राला केले संबोधित


नवी दिल्ली, 18 जून 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधील एव्हियान येथे आयोजित G7 शिखर परिषदेत,“कृत्रिम बुद्धिमत्तेची सुरक्षित, जलद आणि कार्यक्षम अंमलबजावणी सुनिश्चित करणे” या विषयावरील सत्राला संबोधित केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी संस्कृतीची दिशा बदलण्याची क्षमता असलेली एक परिवर्तनकारी शक्ती असली तरी, तिने लोकांना सक्षमही केले पाहिजे,असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. याच व्यापक विचाराने भारताने अलीकडेच ‘एआय इम्पॅक्ट समिट’चे आयोजन केले होते,असे त्यांनी नमूद केले.एआयसाठी असलेल्या भारताच्या मानवकेंद्रित किंवा ‘मानवी’ दृष्टिकोनाला अधोरेखित करत त्यांनी सांगितले की हे तंत्रज्ञान सर्वसमावेशकता, सुरक्षा आणि सार्वजनिक हिताच्या तत्त्वांवर आधारित असले पाहिजे.

भारताने सायबर स्पेसला नेहमीच एक जागतिक कल्याणकारी सार्वजनिक मालमत्ता मानले आहे असे सांगत,लोकशाही देशांना अशा एआय मॉडेल्सचा वापर करता आला पाहिजे, जे त्यांच्या महत्त्वपूर्ण माहिती पायाभूत संरचनेला सुरक्षित ठेवू शकतील आणि त्यांना सायबर धोक्यांचा सामना करण्यास मदत करतील,यावर पंतप्रधानांनी  जोर दिला.त्यांनी एआयच्या विकासासाठी एकात्मिक दृष्टिकोनाचे आवाहन केले, ज्यामध्ये सुरक्षितता, वेग आणि कार्यक्षमता यांचा एकत्रितपणे विचार केला जाईल 

या संदर्भात त्यांनी चार सूचना केल्या: एआय प्रणालीच्या रचना सुरक्षित असाव्यात; एआयच्या अंमलबजावणीसाठी समान मानके, चाचणी आराखडे आणि नियामक मार्गदर्शक तत्त्वे असणे आवश्यक आहे; डीपफेक, चुकीची माहिती आणि सायबर फसवणूक यांचा सामना करण्यासाठी प्रभावी जागतिक सहकार्य असले पाहिजे; आणि एक सर्वसमावेशक जग सुनिश्चित करण्यासाठी एआयचे लाभ ‘ग्लोबल साउथ’मधील देशांपर्यंत पोहोचले पाहिजेत.

एआयने मानवी क्षमतांची शक्ती  वाढवली पाहिजे, मानवी निवडीला सक्षम केले पाहिजे आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण केले पाहिजे,तसेच, या उद्दिष्टांना चालना देण्यासाठी भारत आपल्या भागीदारांसोबत काम करत राहील,असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

सोनाली काकडे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai