Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिषद 2026 चे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिषद 2026 चे उद्घाटन


नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिषद 2026  चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी परिषदेला संबोधितही केले. आज दिवसभरात स्टार्टअप संस्थापकांशी झालेल्या उत्साहपूर्ण संवादाने आनंद झाल्याची भावना त्यांनी  व्यक्त केली. देशभरातील युवा वर्गाचा व्यापक दृष्टीकोन आणि धाडसी निर्धाराचे त्यांनी कौतुक केले. देशातील युवा वर्गाच्या विचारांची व्याप्ती आणि आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करत राहण्याची वृत्ती उत्साह वाढवणारी असल्याचे ते म्हणाले.

या परिषदेत गेल्या वेळच्या आपल्या सहभागाचे स्मरणही त्यांनी यानिमित्ताने केले. त्यांनी भूतकाळाची तुलना वर्तमानाशी केली. देश वर्षानुवर्षे केवळ परदेशी नवोन्मेषांचा अंगिकार करून किंवा त्यात किरकोळ बदल करून, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता असे ते म्हणाले. मात्र या पूर्वीच्या दशकांतील मानसिकतेच्या तुलनेत 21 व्या शतकातील भारताची नवी मानसिकता ही मूळ तंत्रज्ञानाची निर्मिती करणे, जगाची दिशा ठरवणे आणि जगभरातील आव्हानांवर तोडगा काढण्याची असल्याचे ते म्हणाले. देशाने आपल्या नागरिकांच्या लसीकरणासाठी आणि त्याचवेळी इतर देशांना पुरवठा करण्यासाठी  स्वदेशी कोविड 19 लसी कशा रितीने विकसित केल्या, यासोबतच पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणे आणि चंद्राच्या आजवर कुणीही स्पर्श  न केलेल्या दक्षिण ध्रुवावर भारत कशा रितीने उतरला याचा उल्लेख करून,  त्यांनी देशासाठी एक धाडसी तंत्रज्ञानविषयक दृष्टिकोन उपस्थितांसमोर मांडला. देशाने भविष्यातील तंत्रज्ञानाचा अंगीकार केला पाहिजे, धाडसाने नवोन्मेष साकारले पाहिजेत आणि त्यांची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेत जगाचे नेतृत्व केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

शून्याचा शोध तसेच संख्या पद्धतीपासून ते खगोलशास्त्रापर्यंतच्या शोधांच्या भारताच्या समृद्ध वारशाबद्दलही त्यांनी सांगितले. देश आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्याने निर्माण झालेल्या आत्मविश्वासासह हा वैज्ञानिक वारसा पुढे नेत आहे, गेल्या काही वर्षांमध्ये देशाने साध्य केलेल्या  अनेक यशस्वी टप्प्यांवरून ही बाब अधोरेखित होते, असे ते म्हणाले. येत्या 30 ऑक्टोबर रोजी देश डॉ. होमी जहांगीर भाभा यांची जयंती साजरी करणार आहे. 

विकसित भारताच्या जडणघडणीसाठी मोठ्या प्रमाणावर अणुऊर्जा क्षमतेची आवश्यकता असणार आहे, आयात केलेल्या अणू इंधनावरील अवलंबित्व हे ऊर्जा सुरक्षेसाठी एक आव्हान आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आपण आपल्या फास्ट ब्रीडर रिॲक्टर  तंत्रज्ञानाला वेगाने पुढची दिशा देत असल्याचेही त्यांनी सांगितले. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच, 500 मेगावॉट क्षमतेच्या स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टरने यशस्वीरीत्या  पहिल्या टप्प्यातील ऊर्जा निर्मितीचा टप्पा साध्य केला असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. अणुऊर्जेच्या क्षेत्रातील आपली दीर्घकालीन क्षमता मजबूत करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल ठरले असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.

देशाची आकांक्षांची व्याप्ती केवळ देशांतर्गत ऊर्जा सुरक्षा आणि तांत्रिक आत्मनिर्भरतेपुरती मर्यादित नसून अत्यावश्यक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यापर्यंत विस्तारलेली असल्याचे त्यांनी सांगितले. या अनुषंगाने या वर्षातील अंतराळ क्षेत्रातील महत्त्वाचे यशही त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. भारतीय अंतराळ स्टार्टअप संस्थेने मेड इन इंडिया रॉकेटचा वापर करून पहिल्याच प्रयत्नात आपला उपग्रह अंतराळ कक्षेत स्थापित करणे आणि देशाने सॅटेलाइट डॉकिंग क्षमतेवर  प्रभुत्व मिळवण्यासारखे यश साध्य केले असल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, तरुण शास्त्रज्ञ आणि उद्योजकांच्या वाढत्या सहभागासोबतच अनेक देशांतर्गत स्टार्टअप्स अंतराळ विज्ञानातील नवोन्मेषी उपाययोजना सादर करत आहेत.  महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानामध्ये आपली शक्ती वाढवणे हे देखील आमचे ध्येय आहे.

भारताच्या बहु-क्षेत्रीय कामगिरीची प्रचंड व्याप्ती अभूतपूर्व असल्याचे वर्णन करताना, पंतप्रधानांनी नमूद केले की, यावर्षी देशाने एआय इम्पॅक्ट समिटचे अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव शिखर परिषदेचे आयोजन केले, स्वतःचे एआय मॉडेल सादर केले आणि भारतात बनवलेल्या सेमीकंडक्टर चिप्सची जगाला निर्यात करण्यास सुरुवात केली. त्यांनी हेही निदर्शनास आणून दिले की, देश पूर्णपणे देशांतर्गत उपलब्ध कच्च्या मालावर आधारित बॅटरी स्टोरेज क्षमता सक्रियपणे तयार करत आहे. ज्या विविध क्षेत्रांमध्ये भारत यश मिळवत आहे, ते अभूतपूर्व आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी  सांगितले.

अणुऊर्जा आणि अंतराळ क्षेत्रापासून ते कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि सेमीकंडक्टरपर्यंतच्या क्षेत्रांच्या गरजा वेगवेगळ्या असल्या तरी, ती सर्व एकत्रितपणे उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये भारताची वाढती शक्ती आणि आत्मविश्वास दर्शवतात, असे निरीक्षण नोंदवत पंतप्रधानांनी सोल्यूशन अॅट स्केल  देण्याच्या देशाच्या अद्वितीय क्षमतेवर प्रकाश टाकला, जेणेकरून देशांतर्गत यश जागतिक आव्हाने सोडवू शकेल. डिजिटल स्टॅक आणि स्वदेशी 5जी तंत्रज्ञानाच्या यशाकडे लक्ष वेधत, त्यांनी सुरक्षित, पॉप्युलेशन स्केल  प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांवर भर दिला. भारत अशा सुरक्षित उपाययोजना विकसित करण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करत आहे, ज्या मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचू शकतील, असे  मोदी यांनी सांगितले.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे शस्त्र म्हणून पाहण्याच्या ऐतिहासिक प्रवृत्तीची, मानवतेच्या सेवेसाठी त्यांचा वापर करण्याच्या भारताच्या तत्त्वज्ञानाशी तुलना करताना पंतप्रधानांनी सांगितले की, प्रयोगशाळेच्या बाहेर पडून सामान्य लोकांचे जीवन सुधारणे, मोठ्या समस्या सोडवणे आणि आरोग्यसेवा, कृषी, शिक्षण, रोजगार व आपत्ती निवारण क्षमता मजबूत करणे, यातच खरे वैज्ञानिक यश आहे. भारतीय स्टार्टअप्स या क्षेत्रांना प्राधान्य देत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत, त्यांनी मेंदूच्या हालचाली समजून घेण्यासाठी वेअरेबल ईईजी तंत्रज्ञान, स्वदेशी वायरलेस आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन, विशेष पौष्टिक उत्पादने, नवीन सेमीकंडक्टर तंत्रज्ञान आणि स्टील स्लॅगसारख्या औद्योगिक कचऱ्याचा वापर करण्याच्या उपायांवर काम करणाऱ्या स्टार्टअप्स आणि देशांतर्गत कंपन्यांचा उल्लेख केला. विज्ञानाचे खरे यश तेव्हाच मिळते, जेव्हा ते प्रयोगशाळेच्या बाहेर पडून सामान्य नागरिकांचे जीवन अधिक चांगले बनवते, असे पंतप्रधान मोदी यांनी  सांगितले.

चेन्नई येथील आयआयटी मद्रासमध्ये नुकताच आलेला अनुभव सांगताना, पंतप्रधानांनी एका आधुनिक ब्रेन सेंटरचे उद्घाटन केल्याची आठवण सांगितली. या सेंटरने मानवी मेंदूच्या उच्च-रिझोल्यूशन डिजिटल 3डी प्रतिमा विकसित करण्यासाठी आणि गुंतागुंतीच्या मज्जासंस्थेच्या आजारांचा उलगडा करण्यासाठी जागतिक स्तरावर एक अनुकरणीय ब्रेन इमेजिंग तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म तयार केला आहे.  समाजासाठी विज्ञान  आणि परिवर्तनासाठी तंत्रज्ञान  हे वैज्ञानिक प्रगतीचे अंतिम निकष असायला हवेत. भारत याच निकषावर स्वतःला तपासून पुढे वाटचाल करत आहे, असे त्यांनी सांगितले. 

एखाद्या राष्ट्राची तंत्रज्ञान निर्मितीची क्षमता आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानांच्या बाबतीत आत्मनिर्भरता  हे प्रबळ संशोधनावर अवलंबून असते, यावर भर देत, हे  त्यांच्या ‘जय विज्ञान, जय अनुसंधान’ या घोषणेमागचे मूळ सूत्र आहे, असे त्यांनी सांगितले.  पंतप्रधानांनी अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या वेगवान वाटचालीचा उल्लेख केला. तसेच, गेल्या वर्षी याच व्यासपीठावरून संशोधन, विकास आणि नवोन्मेषासाठी एक लाख कोटी रुपये देण्याचे जे आश्वासन दिले होते, त्याचीही त्यांनी आठवण करून दिली. त्यांनी नमूद केले की, गेल्या वर्षभरात प्रयोगशाळेत विकसित झालेल्या आणि बाजारपेठेत उतरण्यासाठी सज्ज असलेल्या तंत्रज्ञानासाठी सरकारने 12,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती, ज्याच्या बरोबरीने खाजगी गुंतवणूकदारांकडूनही 12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, याचा अर्थ असा की, केवळ एका वर्षात संशोधन आणि विकासासाठी एकूण 24 हजार कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक निश्चित झाली आहे.

देशांतर्गत संशोधन परिसंस्थेच्या निरंतर होत असलेल्या विस्तारावर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी गेल्या दशकात बौद्धिक संपदेमध्ये झालेल्या लक्षणीय वाढीकडे लक्ष वेधले. त्यांनी नमूद केले की, दहा वर्षांपूर्वी, एका  वर्षात पेटंटसाठी अर्ज दाखल होण्याची संख्या 50,000 पेक्षा कमी होती, मात्र, गेल्या वर्षी ही संख्या वाढून जवळपास दीड लाखांवर (1.5 लाख) पोहोचली आहे. ही वाढ केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, हा देशातील एक मोठा रचनात्मक बदल दर्शवते; ज्यामध्ये संशोधन आणि नवोन्मेष ही भारतातील एक मजबूत संस्कृती बनत असल्याच्या लक्षणाचे हे द्योतक आहे,” असे मोदी म्हणाले.

21व्या शतकाच्या दुसऱ्या तिमाहीत, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात वैज्ञानिक निर्णयक्षमता कशी विकसित होईल, हा एक महत्त्वाचा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थित केला. त्यावर भाष्य करताना त्यांनी नमूद केले की, मंचावर उपस्थित असलेल्या आघाडीच्या शास्त्रज्ञांनी आणि नोबेल पारितोषिक विजेत्यांनी प्रयोगशाळेत  अनेक प्रयोग करत, त्यातील लहान-सहान समस्यांचे निराकरण करत,  अपयशातून शिकत, प्रस्थापित पद्धतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून आणि दुर्लक्षित तपशील शोधून अनेक वर्षांच्या अनुभवातून आपली बुद्धिमत्ता अधिक प्रगल्भ, अधिक धारदार केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता उत्पादकता वाढवण्यासाठी, नियमित कामे वेगाने पार पाडण्यासाठी उपयुक्त ठरू शकते,  परंतु, त्याने स्वतंत्र विचारांवर निर्बंध घालण्याऐवजी संशोधकांना अधिक बुद्धीसमृद्ध केले पाहिजे, ज्यामुळे कठीण समस्या, नवीन प्रयोग आणि कल्पनांच्या पडताळणीसाठी वाचवलेल्या वेळेचा वापर करता येईल, असा इशारा त्यांनी दिला. “कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला त्वरीत उत्तरे देऊ शकते, परंतु त्या उत्तराच्या सत्यतेची पडताळणी करण्याची जबाबदारी केवळ शास्त्रज्ञाचीच असली पाहिजे,” असे पंतप्रधान मोदींनी ठामपणे सांगितले.

सेमीकंडक्टर, क्वांटम तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, प्रगत साहित्य, रोबोटिक्स, अवकाश, स्वच्छ ऊर्जा आणि अत्याधुनिक दळणवळण यांसारख्या भविष्य घडवणाऱ्या क्षेत्रांसाठी समर्पित राष्ट्रीय मोहिमांच्या माध्यमातून शास्त्रज्ञ आणि संस्थांनी स्वतःला सतत अद्ययावत ठेवण्याचे आणि सज्ज राहण्याचे आवाहन पंतप्रधानांनी याप्रसंगी केले; जेणेकरून भारतातून नवनवीन शोध लागतील. पंतप्रधानांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, कृत्रिम जीवशास्त्र, आणि स्वायत्त प्रणालींमध्ये सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे यावर भर दिला. आर्थिक नेटवर्क आणि राष्ट्रीय सुरक्षेला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील सायबरसुरक्षेच्या वाढत्या धोक्यांचा इशारा देत, त्यांनी राष्ट्रीय प्रणालींचे संरक्षण करणारे आणि मानवतेची सेवा करणारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आणि क्वांटम सुरक्षा उपाय विकसित करण्याचे आवाहन केले. “भारताला सक्षम करणारे आणि मानवतेच्या समस्या सोडवण्यात योगदान देणारे तंत्रज्ञान विकसित करणे हे आमचे ध्येय आहे,” असे मोदी यांनी सांगितले.

या परिषदेतील प्रत्येक संशोधक, उद्योग क्षेत्रातील अग्रणी, स्टार्टअप संस्थापक आणि विद्यार्थी, कोणते तंत्रज्ञान, प्रोटोटाइप, प्रायोगिक प्रकल्प किंवा उत्पादन विकसित करण्यास मदत करतील हे हेरून, त्यांना,  तीन वर्षांचे ठोस  लक्ष्य निश्चित करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.‘विकसित भारत’ निर्माण करण्यासाठी आणि समस्यांवरील तोडग्यासाठी भारताला जागतिक केंद्र बनविणाऱ्या नवकल्पनांना चालना देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. प्रत्यक्ष परिणाम साध्य करण्यासाठी ही परिषद केवळ एका चर्चेपुरती मर्यादित न राहता, त्यातून ठोस परिणाम साधले जाणे आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला. “ही परिषद केवळ कल्पना आणि विचारांच्या  देवाणघेवाणीपुरती मर्यादित राहू नये; ही परिषद मोजता येण्याजोग्या परिणामांचे व्यासपीठ बनावी ,” असे दृढ  प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.

प्रतिभा आणि दृढनिश्चयाचे वरदान लाभलेले जगातील सर्वात तरुण राष्ट्र म्हणून भारताचे स्थान अधोरेखित करून आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये केवळ सहभागी होण्याऐवजी सक्रियपणे नेतृत्व करणाऱ्या पिढीची जोपासना करण्याच्या गरजेवर भर दिला. “आपण हे  करून दाखवू” या सामूहिक भावनेचे आणि दृढनिश्चयाचे आवाहन करून त्यांनी परिषदेच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.” आपल्याला अशी पिढी तयार करायची आहे जी उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञानात केवळ सहभागीच  होणार नाही तर त्याचे नेतृत्वही  करेल,” असे पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले. 

सोनाली काकडे/सुषमा काणे/तुषार पवार/राजेश शिरभाते/सविता म्हसकर /प्रिती मालंडकर‍

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai