Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी घेतली भारत सरकारच्या सचिवांची दुसरी उच्चस्तरीय बैठक


नवी दिल्‍ली, 28 जुलै 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7,लोक कल्याण मार्ग  येथील आपल्या निवासस्थानी केंद्र सरकारच्या सचिवांसोबत दुसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यांनी वित्त आणि अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि उद्योग, आणि तंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित मंत्रालये आणि विभागांच्या भविष्यातील कार्यसूचीचा आढावा घेतला. विकसित भारत उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतीला गती देण्यावर या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आले.

पंतप्रधानांनी मंत्रालये आणि विभागांमध्ये संघ भावनेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आणि अधिकाऱ्यांना समान उद्देशाने काम करण्याचे आवाहन केले. सरकारी विभागांनी आपापल्या विभागापुरते मर्यादित न राहता यासंदर्भातील भिंती दूर करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला, जेणेकरून विभाग समन्वयाने काम करतील आणि एकात्मिक परिणाम साध्य करतील.

नागरिकाभिमुख शासनाचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, की देशातील जनता प्रशासनाच्या केंद्रस्थानी राहिली पाहिजे. प्रत्येक निर्णय आणि धोरण हे सामान्य नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने आणि आकांक्षांनी प्रेरित असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

भारत पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करत असतानाच, स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यालाही तितकेच प्राधान्य दिले पाहिजे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्वावलंबन आणि महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये देशांतर्गत क्षमता उभारण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

ऊर्जा सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक स्थैर्य आणि नागरिकांचे कल्याण यांच्याशी घट्ट जोडलेली आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. ते म्हणाले, की अभिनव उपक्रम, विविधता आणि जलद गतीने क्षमता बांधणी यांद्वारे भारताने ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबन साध्य केले पाहिजे.

‘सुधारणा’ हा केवळ एक फॅशनेबल शब्द नसून प्रभावी प्रशासनासाठी ती निरंतर गरज आहे, यावर भर देत कार्यपद्धतीत सुधारणा करणे, कार्य  पद्धती सुधारणे आणि संस्थात्मक कार्यक्षमता बळकट करणे या गोष्टींच्या आवश्यकतेवर पंतप्रधानांनी जोर दिला.

तंत्रज्ञानाचा वाढता वापर होत असतानाच डिजिटल प्रणाली आणि पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी सायबर सुरक्षेवरही विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यांनी नव्याने उद्भवणाऱ्या सायबर धोक्यांविरुद्ध सतत सतर्क राहण्याची नितांत गरज व्यक्त केली. सायबर सुरक्षा परिसंस्थेमध्ये तरुण आणि उद्योजकांचा सहभाग वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले आणि ही एक देशव्यापी चळवळ बनावी, यावर जोर दिला.

देश ज्या धोरणात्मक क्षेत्रांमध्ये मोठे उपक्रम राबवत आहे, त्याबाबत चुकीची माहिती आणि निराधार भीती यांचा सामना करण्यासाठी सक्रिय संवाद साधणे किती महत्त्वाचे आहे, यावरही पंतप्रधानांनी भर दिला.

उदयोन्मुख आणि भविष्यातील उद्योगांना आवश्यक असलेले कौशल्यपूर्ण मनुष्यबळ विकसित करण्यासाठी, नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमांचे नियोजन उद्योगांच्या भागीदारीतून केले जावे, असे त्यांनी नमूद केले. सरकारने सदैव तरुण, गतिमान आणि दूरदर्शी राहिले पाहिजे; तसेच नाविन्यपूर्णतेच्या जोरावर नवीन आव्हाने व संधींशी सातत्याने जुळवून घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीत विविध विभागांच्या सचिवांनी आपापल्या क्षेत्रांमधील प्रगती, प्राधान्यक्रम आणि अंमलबजावणीशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. कॅबिनेट सचिव, प्रमुख मंत्रालये व विभागांचे सचिव आणि पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

* * *

शैलेश पाटील/निलिमा चितळे/जाई वैशंपायन/पर्णिका हेदवकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai