Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांशी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांशी साधला संवाद


नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय पदकविजेत्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी गेल्या दशकभरात भारतीय क्रीडा क्षेत्रात झालेल्या स्थित्यंतराचा आढावा घेतला आणि आपल्या 12 ते 13 वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रीय खेळाडूंना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करणे ही एक नियमित आणि अभिमानास्पद परंपरा झाल्याचे अधोरेखित केले. 

त्यांनी सांगितले की देशासाठी सातत्याने विजय संपादन करण्यासाठी भारतीय खेळाडूंचे समर्पित प्रयत्न आणि सातत्यपूर्ण यश हे शालेय विद्यार्थ्यांसाठी नेहमीच्या प्रचारात्मक सल्ल्यापेक्षा अधिक प्रभावी प्रेरणास्रोत आहेत. “शाळांमधल्या  उपदेशाऐवजी तुमचे पदक त्यांना अधिक प्रेरणा देते,”असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी एका खेळाडूशी संवाद साधला, जिने आपल्या मुलींच्या क्रीडा सहभागाबाबत पूर्वी दिलेले वचन, त्यांच्या प्रगतीचा पाठपुरावा आणि आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या मुली तीन पदके मिळवून देतील असे आश्वासन मिळाल्याची आठवण सांगितली. त्यांनी तिच्या आत्मविश्वासाचे आपुलकीने कौतुक केले आणि उत्कृष्टतेसाठीच्या तिच्या वचनबद्धतेला प्रोत्साहन दिले.

पंतप्रधानांनी खेळाडूंच्या अत्यंत भावनिक प्रवासाची दखल घेतली. गुरुपौर्णिमेला मिळवलेला विजय आपल्या प्रशिक्षकाला समर्पित करणाऱ्या एका खेळाडूच्या, तसेच चार वर्षांच्या सततच्या दुखापती आणि वैयक्तिक अडचणींवर मात करून साश्रू नयनांनी राष्ट्रध्वज फडकताना पाहणाऱ्या दुसऱ्या खेळाडूच्या चिकाटीचा त्यांनी विशेष उल्लेख केला. असे राष्ट्रीय विजय वैयक्तिक कामगिरीच्या पलीकडे जाऊन भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत बनतात, असे त्यांनी नमूद केले. “तुमचा हा विजय आगामी पिढ्यांसाठी खूप मोठी प्रेरणा ठरेल,” असे मोदी म्हणाले.

आंतरराष्ट्रीय मंचावर भारतीय खेळाडूंना मिळत असलेला आदर आणि त्यांचा दरारा  वाढत असल्याच्या मुद्यावर  पंतप्रधानांनी चर्चा केली.जागतिक दर्जाच्या खेळाडूंना आता भारतीय खेळाडूंचा सामना करताना भय वाटत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. विशेषतः भारतीय मुष्टीयोद्ध्यांचा वाढता प्रभाव त्यांनी अधोरेखित केला. सरकारची खेलो इंडिया योजना आणि स्थानिक पातळीवर लागोपाठ होणाऱ्या स्पर्धा यासारख्या उपक्रमांचा विशेष फायदा झाल्याचा अभिप्राय खेळाडूंनी दिला याची पंतप्रधानांनी दखल घेतली. “जगातले खेळाडू आता या मुष्टीयोद्ध्यांना घाबरत आहेत,” असे मोदी म्हणाले.  

खेळांना प्रोत्साहन देण्यामागील विचार सांगताना पंतप्रधान म्हणाले की खेलो इंडिया उपक्रमाची प्रतिष्ठा कायम राखताना खेळाडूंनी सतत शिकत राहण्याची वृत्ती जोपासली पाहिजे. देशाचे क्रीडा क्षेत्रातील खरे यश केवळ पायाभूत सुविधांवर नाही तर देशभरात व्यापक क्रीडा संस्कृती उभारण्यावर अवलंबून आहे. “क्रीडा पायाभूत सुविधा हा एक भाग आहे परंतु, जेव्हा देशात क्रीडा संस्कृती बहरते तेव्हाच देशाला पदके मिळतात,” असे मोदी म्हणाले.

कारगील विजय दिनी पाकिस्तानच्या प्रतिस्पर्ध्याला 5-0 असे हरवून आपला विजय कारगील विजयातील  लष्कराच्या हीरोंना समर्पित करणाऱ्या भारतीय लष्करातील खेळाडूच्या देशभक्तीच्या भावनेची पंतप्रधानांनी दखल घेतली. अशी प्रखर देशभक्ती क्रीडा क्षेत्रातील विजयाला वेगळाच गौरव प्राप्त करुन देते असे मत त्यांनी नोंदवले. आपले लष्करी प्रशिक्षक नरेंद्र राणा यांच्याविषयीच्या नामसाधर्म्यासोबतच काही मजेशीर आठवणी सांगत त्यांनी खेळाडूंसोबत हास्यविनोदाचे क्षण अनुभवले. “तुम्ही पदकांच्या संख्येत भर घातलीच त्याचबरोबर  खेळाडूंची एक पिढी घडवली आहे,” असे मोदी म्हणाले. 

स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणा कडून मिळालेल्या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण सुविधांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत  या सुविधांमुळेच स्थानिक क्रीडा केंद्रांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्यापर्यंतचा प्रवास करणे शक्य झाल्याची भावना व्यक्त करणाऱ्या  खेळाडूची पंतप्रधानांनी  प्रशंसा केली. मोदी म्हणाले की, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे; तुम्ही कठोर परिश्रम केलेत आणि माझी आठवण ठेवलीत, त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे.

पंतप्रधानांनी वाराणसी आणि भोपाळसह विविध प्रादेशिक केंद्रांमधील अद्ययावत क्रीडा सुविधांविषयी चौकशी केली.  या केंद्रांवर खेळाडूंनी प्रशिक्षण घेतले  तसेच काशी विश्वनाथ आणि उज्जैनमधील महाकालेश्वर यांसारख्या आध्यात्मिक स्थळांना भेटी दिल्या. 2018 मध्ये स्थापना झाल्यापासून खेलो इंडिया  आणि क्रीडा प्राधिकरण  याद्वारे मिळणाऱ्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचे त्यांनी कौतुक केले; या पाठिंब्यामुळेच युवा प्रतिभेला उच्च-स्तरीय स्पर्धात्मक स्तरावर सहजपणे पोहोचण्यास मदत झाली आहे. निश्चिंत राहा, भविष्यातही तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि आपण पुन्हा एकदा याच ठिकाणी भेटू, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.

संवादादरम्यान ज्या खेळाडूचा वाढदिवस होता आणि जिने अनेकदा पदके जिंकली आहेत, तिला पंतप्रधानांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. त्यांनी स्वतः तिला मिठाई देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि सर्व खेळाडूंना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विजयाची ही मालिका कायम राखण्यासाठी प्रोत्साहित केले. सलग तिसऱ्यांदा पदक जिंकण्यासाठी त्यांनी खेळाडूंच्या चमूला स्मितहास्य करत आशीर्वाद दिले. जो खेळतो, तोच बहरतो, असे मोदी यांनी स्पष्ट केले.  

निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/सुरेखा जोशी/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai