पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉलद्वारे कॅप्टन स्मित मच्छार यांच्याशी संवाद साधला. संवादाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. कॅप्टन यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी अवघ्या काही क्षणांत महत्त्वाचे निर्णय घेताना कॅप्टन मच्छार यांनी दाखवलेले धैर्य, संयम आणि प्रसंगावधान यांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. जीवन-मृत्यूशी संघर्ष करत असतानाही आणि गंभीर दुखापत झालेली असतानाही कॅप्टन यांनी स्वतःच्या जीवापेक्षा प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. त्यामुळे १४० कोटी देशवासीयांचा मान अधिक उंचावला आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
“आज संपूर्ण देश अभिमानाने सांगू शकतो की, आम्ही भारतीय प्राण घेणारे नाही, तर प्राण वाचवणारे लोक आहोत,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी कॅप्टन मच्छार यांच्या कुटुंबीयांशी झालेल्या संवादाचीही आठवण केली. यामध्ये भूपेंद्रभाई, गीताबहन आणि सोनलबहन यांचा समावेश होता. आपल्या मुलामध्ये खोलवर रुजलेली सांस्कृतिक मूल्ये घडवल्याबद्दल त्यांनी गीताबहन यांचे कौतुक केले. भगवद्गीतेतील शिकवण त्यांनी पूर्णपणे आत्मसात करून ती आपल्या आचरणातून जगली असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
कॅप्टन स्मित मच्छार यांनी पंतप्रधानांना आपला सर्वात मोठा आदर्श संबोधत, विमान कोसळत असल्याचे आपल्या लक्षात कसे आले, याबद्दल सांगितले. विमान उड्डाणाचा 17 वर्षांचा अनुभव या प्रसंगी त्यांच्या उपयोगी पडल्याचे त्यांनी सांगितले. कॅप्टनने एवढ्या मोठ्या संघर्षानंतर भावूक होणे ही पूर्णपणे स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचे त्यांनी मान्य केले. “तुमच्या धाडसी कृतींमुळे संपूर्ण जग तुमच्याशी संवाद साधण्यासाठी उत्सुक झाले आहे आणि तुमच्या कुटुंबाने देशाची खऱ्या अर्थाने मान उंचावली आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधानांनी देशभरात व्यक्त होत असलेल्या भावनिक एकजुटीचा उल्लेख केला. वैमानिकाच्या दीर्घायुष्यासाठी सावरकुंडलापासून वढवाणपर्यंत विशेष प्रार्थना आणि आरत्या केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या प्रकृतीत सुधारणा ही रुग्ण म्हणून संयमाने पार पाडण्याचा प्रवास आहे, या कॅप्टनच्या दृष्टिकोनाचे त्यांनी कौतुक केले. भारतीय संस्कृतीशी जोडलेले राहण्यासाठी कॅप्टन दररोज आपल्या दोन वर्षांच्या मुलासोबत हनुमान चालिसाचे पठण करतात, हे ऐकूनही त्यांनी आनंद व्यक्त केला. उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारांचे मनःपूर्वक आभार मानले. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या अपार प्रेमाबाबत कॅप्टनने व्यक्त केलेल्या भावनांचाही त्यांनी उल्लेख केला. कॅप्टनच्या कृतींमुळे जगभरातील सर्व भारतीय वैमानिकांची प्रतिष्ठा आणि मान-सन्मान अबाधित राहिला, असे त्यांनी सांगितले. “आज गांधी जयंती आहे; अहिंसेचा खरा अर्थ काय आहे, हे तुम्ही ते आचरणातून दाखवून दिले आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधानांनी गुजराती भाषेत आपुलकीने संवाद साधत कॅप्टनच्या लहान मुलांची, बॉबी आणि जीवा यांची विचारपूस केली. कॅप्टनचे आई-वडील आणि त्यांच्या पत्नी सोनलबहेन यांनी अलीकडील संवादांदरम्यान कोणतीही तक्रार न करता अत्यंत संयम आणि विश्वास कायम राखल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांच्याबद्दल मनापासून आदर व्यक्त केला. आपण केवळ एका फोनच्या अंतरावर असल्याचे त्यांनी कॅप्टनला सांगितले आणि प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर या घटनेमागील सविस्तर माहिती त्यांच्याकडून ऐकण्याचे आश्वासन दिले. संपूर्ण आणि जलद प्रकृतीसुधारणेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि संपूर्ण देश ठामपणे त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. “लवकरात लवकर बरे व्हा, जेणेकरून आपण भेटू शकू; देव तुमचे कल्याण करो, जय हिंद,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
An unforgettable conversation with Captain Smit, filled with pride and emotions. https://t.co/CCf46PKOWR
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2026
***
शैलेश पाटील/हेमांगी कुलकर्णी/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
An unforgettable conversation with Captain Smit, filled with pride and emotions. pic.twitter.com/CCf46PKOWR
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2026