नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी, लडाखमधील सुमारे 3,350 कोटी रुपये खर्चाच्या पाच प्रमुख विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण, 15 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12:30 च्या सुमारास, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करतील. हे पाच प्रकल्प कनेक्टिव्हिटी बळकट करतील, ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करतील, सांस्कृतिक वारशाचे जतन करतील आणि जलसुरक्षा वृद्धिंगत करतील.
पंतप्रधान लेह इथल्या कुशोक बकुला रिम्पोची विमानतळाच्या नव्या प्रवासी टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. या इमारतीची उभारणी 640 कोटी रुपये खर्चून करण्यात आली आहे. दरवर्षी 35 लाख प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असलेले हे आधुनिक टर्मिनल 23,800 चौरस मीटर क्षेत्रावर विस्तारलेले आहे. ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी यात भू-औष्णिक ऊर्जेचा वापर करण्यात आला असून, लडाखच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसरासाठी शाश्वत पायाभूत सुविधांचे महत्त्व ही वास्तू अधोरेखित करते. प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा आणि लडाखचा समृद्ध सांस्कृतिक वारसा यांचा संगम असलेले हे टर्मिनल प्रवाशांच्या सोयीत वाढ करेल आणि देशाच्या इतर भागांशी असलेली हवाई संपर्क व्यवस्था अधिक बळकट करेल.
पंतप्रधान, बीआरओ अर्थात सीमा रस्ते संघटनेने बांधलेल्या 298 किमी लांबीच्या निम्मू-पदुम-दारचा रस्त्याचे राष्ट्रार्पणही करणार आहेत. दुर्गम झांस्कर खोऱ्यातून लेहमधल्या निम्मू आणि हिमाचल प्रदेशातल्या दारचा यांना हा रस्ता जोडणारा असून लडाखसाठी एक पर्यायी संपर्क मार्ग यामुळे उपलब्ध होणार आहे. यामुळे श्रीनगर-लेह आणि मनाली-लेह महामार्गांवरील भार हलका होण्यास मदत होईल. अतिउंचीवरील ‘शिनकुन ला’ या खिंडीसह हिमालयातील आव्हानात्मक भूप्रदेशातून जाणारा हा रस्ता अभियांत्रिकी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण कामगिरी ठरला आहे. सशस्त्र दलांची परिचालनात्मक गतिशीलता वाढवण्यासोबतच त्यांच्यासाठी आवश्यक रसद पुरवठा बळकट करणे, या दृष्टीने हा रस्ता सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. तसेच, आरोग्यसेवा, शिक्षण, बाजारपेठा आणि अत्यावश्यक सेवांपर्यंतची पोहोच सुधारल्यामुळे झांस्करमधील रहिवाशांनाही याचा लाभ होणार आहे.
ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याच्या आणि लडाखमधील अक्षय ऊर्जेच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, पंतप्रधान 9 मेगावॅट क्षमतेच्या हनू लघु जलविद्युत प्रकल्पाचे आणि 66 केव्ही दुहेरी-सर्किट दाह-हनू-खालत्सी पारेषण वाहिनीचे उदघाटन करतील. हे प्रकल्प वीज पारेषण पायाभूत सुविधा बळकट करतील आणि लडाखच्या वीज वितरण जाळ्याची विश्वासार्हता सुधारतील. या प्रदेशातील जलविद्युत संसाधनांचा वापर करण्याच्या आणि तेथील ऊर्जा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
लडाखच्या प्राचीन पुरातत्त्व वारशाच्या संवर्धनाचे महत्त्व ओळखून पंतप्रधान लेहमधल्या सिंधू घाट येथे भारताच्या पहिल्या पेट्रोग्लिफ अर्थात कातळचित्र संवर्धन उद्यानाचे उद्घाटन करणार आहेत. लडाखमध्ये शेकडो प्रागैतिहासिक कातळचित्रे असून त्यात कैक वर्षांच्या मानवी इतिहासाबद्दल मौल्यवान माहिती देणारी प्रतीकात्मक चित्रे, वन्यजीव, मानवी आकृत्या आहेत. ही कातळचित्रे या प्रदेशाच्या संस्कृती आणि सभ्यता यांच्या भूतकाळाची एक अमूल्य नोंद आहे. हे संवर्धन उद्यान या मौल्यवान पुरातत्वीय अवशेषांचे संरक्षण करण्यासाठी, त्यांच्याविषयी जनजागृती करण्यासाठी आणि वारसास्थळांच्या जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक समर्पित जागा उपलब्ध करून देईल.
हिम सरोवर प्रकल्पाअंतर्गत 40 गावांमध्ये विकसित 40 जलस्रोतांचे उदघाटनही पंतप्रधान करणार आहेत. मिशन अमृत सरोवरच्या उद्दिष्टांनुरूप, लडाखच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक आणि हवामानविषयक आव्हानांवर उपाययोजना करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आखण्यात आला आहे. लडाखमधील शेतीमध्ये पाण्याची उपलब्धता आणि मागणी यांच्यात हंगामानुसार तफावत आढळते. बर्फ वितळणे आणि हिमनद्यांचे प्रवाह यामुळे इतर काळात पाण्याचे मुबलक स्रोत उपलब्ध असतात, तर पेरणीच्या अत्यंत महत्त्वाच्या हंगामात शेतकऱ्यांना अनेकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. उपलब्ध असलेल्या काळात पाण्याचे संवर्धन करून गरजेच्या वेळी त्याची उपलब्धता सुनिश्चित करणे, हे हिम सरोवर प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. यामुळे सिंचनासाठी साहाय्य होईल, शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांच्या उपजीविकेला आधार मिळेल आणि प्रदेशातील दीर्घकालीन जलसुरक्षा अधिक बळकट होईल.
सुषमा काणे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai