नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता भारत मंडपम, नवी दिल्ली येथे ‘इमर्जिंग सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह 2026’ या परिषदेचे उद्घाटन करतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.
27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय परिषदेत उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या प्राधान्यक्रमांवर चर्चा होणार असून त्यामध्ये प्रमुख शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते, उद्योग प्रमुख, स्टार्ट-अप्स आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ एका व्यासपीठावर एकत्र येतील.
या परिषदेतील चर्चा कृत्रिम बुद्धिमत्ता , जैवतंत्रज्ञान , प्रगत साहित्य, उत्पादन , आरोग्य सेवा, ऊर्जा, हवामान आणि महासागर विज्ञानासह 12 संकल्पनाधारित क्षेत्रांशी संबंधित असेल. संशोधनाचे प्राधान्यक्रम, राष्ट्रीय क्षमता आणि वैज्ञानिक प्रगतीचे व्यावहारिक उपयोगांमध्ये रूपांतर करण्यावर चर्चेत भर दिला जाईल.
या परिषदेत स्वदेशी वैज्ञानिकांची कामगिरी आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान प्रदर्शित करणारे एक विस्तृत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष प्रदर्शन देखील आयोजित केले जाईल. यामध्ये सुमारे 150 डीप-टेक स्टार्ट-अप स्टॉल्सचा समावेश असेल आणि त्यामध्ये तांत्रिक घडामोडी आणि विविध क्षेत्रांमधील त्यांचे संभाव्य उपयोग अधोरेखित करण्यात येतील.
वैज्ञानिक घडामोडी आणि त्यांचा वास्तव जगातील उपयोग यामध्ये परस्परसंबध निर्माण करण्यासाठी संकल्पनाधारित व्हिडिओ, तंत्रज्ञान प्रात्यक्षिके, माहितीपट, माहिती कियोस्क आणि ऑगमेंटेड व व्हर्च्युअल रिॲलिटी (AR/VR) अनुभवांचा देखील वापर असेल.
‘ग्लोबल कनेक्ट नेटवर्किंग इव्हेंट’ या एका नवीन उपक्रमात भारतातील आणि परदेशातील शिक्षण, संशोधन संस्था आणि उद्योगांमधील 300 हून अधिक आमंत्रित अभ्यागत एकत्र येतील. हे आंतरराष्ट्रीय संशोधन भागीदारी, उद्योग- शैक्षणिक संस्थादरम्यान सहकार्य आणि नवोन्मेष प्रयोगशाळांमधून बाजारात आणण्याच्या मार्गांचा शोध घेण्यासाठी एक मंच उपलब्ध करेल.
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai