Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान येत्या 30 आणि 31 ऑक्टोबरला गुजरात दौऱ्यावर


नवी दिल्‍ली, 29 ऑक्‍टोबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आणि परवा म्हणजेच, 30 आणि 31 ऑक्टोबरला गुजरातला भेट देणार आहेत.

30 ऑक्टोबर रोजी, सकाळी सुमारे 9.30 वाजता, पंतप्रधान बनासकांठा इथल्या भ्रूण हस्तांतरण तंत्रज्ञान आणि इन-व्हिट्रो फलन (ET-IVF) प्रयोगशाळेला तसेच भारत गोवंश प्रजनन आणि संशोधन केंद्राच्या गोशाळेला भेट देतील. त्यानंतर सुमारे 10.30 वाजता ते बनासकांठा इथेच, 14,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करतील. यावेळी ते पीएम-किसान योजनेचा 24 वा हप्ताही जारी करतील. या हप्त्यात, 19,000 कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे. तसेच, दोन रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.

त्यानंतर पंतप्रधान केवडिया इथे एकता नगरला जातील. संध्याकाळी पाचच्या सुमाराला, त्यांच्या हस्ते भारत पर्व 2026 चे उद्घाटन होईल. त्यानंतर पावणेआठ वाजता, ते एकता प्रकाश पर्वाचा आनंद घेतील आणि त्या पाठोपाठ, सुमारे 8.15 वाजता ते नर्मदा आरतीतही सहभागी होतील.

दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 31 ऑक्टोबरला सकाळी सुमारे 9 वाजता, पंतप्रधान स्टॅच्यू ऑफ युनिटी इथे पुष्पांजली अर्पण करतील. त्यानंतर सकाळी सुमारे 9.15  वाजता ते एकतानगर इथे 400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील.

त्यानंतर ते एकतानगर इथल्या रेन फॉरेस्ट आणि वामन वृक्ष वाटिकेला भेट देतील. सायंकाळी सुमारे साडे पाच वाजता पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या सोहळ्यात सहभागी होतील.

पंतप्रधान बनासकांठामध्ये

पंतप्रधान बनासकांठा जिल्ह्यातील भिलडी इथे भारत गोवंश प्रजनन आणि संशोधन केंद्र राष्ट्राला समर्पित करतील.

127 एकर क्षेत्रात विस्तारलेल्या या केंद्राची स्थापना अत्याधुनिक उत्कृष्टता केंद्र म्हणून करण्यात आली आहे. हे केंद्र गोवंश प्रजनन, अनुवंशिक सुधारणा आणि प्रगत प्रजनन तंत्रज्ञानाला बळकटी देईल. यामुळे गोवंशाच्या जातींमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या प्रक्रियेला 10 ते 20 पट वेग मिळेल. कांकरेज गोवंशाच्या जातीसाठी समर्पित असलेले हे देशातील अशा प्रकारचे पहिले केंद्र ठरणार आहे.

पंतप्रधान बनास डेअरीच्या थराद आणि राधनपूर येथील दोन जैव-सीएनजी प्रकल्पांचे भूमिपूजन करतील. या प्रकल्पांची क्षमता, दररोज अनुक्रमे 75 मेट्रिक टन आणि 100 मेट्रिक टन शेणावर प्रक्रिया करण्याची असेल.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद मेट्रोच्या टप्पा-2A (विमानतळ विस्तार) आणि टप्पा-2B ची (गिफ्ट सिटी विस्तार) पायाभरणी केली जाणार आहे. याअंतर्गत कोटेश्वर रोड ते विमानतळादरम्यान 6 किमीपेक्षा जास्त लांबीच्या टप्पा-2A अंतर्गत पाच स्थानके, तर गिफ्ट सिटी ते शाहपूरदरम्यान 3.3 किमीपेक्षा जास्त लांबीच्या टप्पा-2B अंतर्गत तीन स्थानकांचा समावेश आहे.

सुमारे 2,600 कोटी रुपये खर्चाच्या अहमदाबाद-महसाणा रस्त्याच्या (राज्य महामार्ग-41) चार पदरीवरून आठ पदरीकरणाच्या कामाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पामुळे अहमदाबाद आणि उत्तर गुजरातदरम्यानचा प्रवास अधिक गतिमान, सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.

यासोबतच पंतप्रधान गुजरातमधील 4,030 नवीन बालस्नेही अंगणवाडी केंद्रांची पायाभरणीही करणार आहेत. तसेच पूर्ण झालेल्या 361 बालस्नेही अंगणवाडी केंद्रांचे उद्घाटनही ते करणार आहेत. हा 800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा  उपक्रम असून, 4 लाखांपेक्षा जास्त लोकांना याचा लाभ मिळणार आहे.

कृषी पायाभूत सुविधा निधीअंतर्गत सुमारे 4,950 कोटी रुपये एकूण प्रकल्प खर्च असलेले पूर्ण झालेले 521 प्रकल्प पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये शीतगृह सुविधा, शीत साखळी, गोदामे, सायलो, पॉलीहाऊस, ग्रीनहाऊस, एकात्मिक प्राथमिक आणि द्वितीयक प्रक्रिया सुविधा आणि प्राथमिक प्रक्रिया केंद्रांचा समावेश आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते सनदार येथील बटाटा प्रक्रिया प्रकल्पाच्या विस्तार कामाचे उद्घाटन आणि पालनपूर इथल्या अति उच्च तापमानित (UHT) उत्पादनांसाठीच्या स्वयंचलित साठवणूक आणि पुनर्प्राप्ती प्रणालीचे लोकार्पण केले जाणार आहे.

यावेळी पंतप्रधान अहमदाबाद (साबरमती)-वाराणसी एक्स्प्रेस आणि महेसाणा-बेचराजी-साबरमती या मेमू रेल्वे गाड्यांच्या सेवांना हिरवा झेंडा दाखवून रवानाही करणार आहेत. रेल्वे जोडणी अधिक भक्कम करणे हा या नव्या सेवांचा उद्देश आहे.

यासोबतच प्रधानमंत्री किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याअंतर्गत 19,000 कोटी रुपये देखील पंतप्रधानांच्या हस्ते जारी केले जाणार आहेत. देशभरातील शेतकऱ्यांना सातत्याने  दिले जात असलेले हे आर्थिक साहाय्य पुढेही सुरूच राहणार आहे. यासोबतच मंजूरी मिळालेल्या 12 बागायती समूहांअंतर्गत (क्लस्टर्स) प्रत्यक्ष कामांची सुरुवातही त्यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. हे समूह सुमारे 1.46 लाख हेक्टर क्षेत्रावर विस्तारलेले असून, या समूहांचा 1.3 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. उत्तर गुजरातमधील दोन समूह हे विशेषतः बटाटा पिकासाठीचे असणार आहेत.

पंतप्रधानांची एकता नगरला भेट

30 ऑक्टोबर रोजी, राष्ट्रीय एकता दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून, पंतप्रधान एकता नगर इथे भारत पर्व 2026 चे उद्घाटन करतील. देशाचा सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय एकतेचा उत्सव म्हणून, तसेच एक भारत श्रेष्ठ भारतच्या भावनेचे प्रतीक या स्वरुपात या महोत्सवाची आखणी केली गेली आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, लोककलांची सादरीकरणे, प्रादेशिक खाद्यसंस्कृती, हस्तकला आणि पर्यटन स्थळांसंबंधीचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.  या महोत्सवामुळे एकता नगर आणि आसपासच्या परिसरातील पर्यटनाला मोठा वाव मिळण्याची शक्यता आहे. हा महोत्सव 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.

देशाची एकता, विविधता, सांस्कृतिक वारसा आणि प्रगतीचा सोहळा म्हणूून साजरा केल्या जाणाऱ्या एकता प्रकाश पर्व या दीपोत्सावालाही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. या उत्सवाअंतर्गत विविध संकल्पनांवर आधारित रोषणाईच्या माध्यमातून एकता नगरमधील रात्र पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. प्राचीन भारतापासून आधुनिक भारतापर्यंत या संकल्पनेवर आधारित 530 मीटर लांबीच्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स रस्त्यावरील रोषणाई हे या उपक्रमाअंतर्गतचे एक प्रमुख आकर्षण आहे. या रोषणाईच्या माध्यमातून देशाची राष्ट्रीय ओळख, संस्कृती, महिला सक्षमीकरण, सुरक्षा दले, तंत्रज्ञान, योग आणि लहान मुलांसाठीचे कल्पनारम्य विश्व अशा अनेक संकल्पना साकरल्या जातील. यासोबतच देशाच्या विविधतेत एकता या संकल्पनेवरील 180 मीटर लांबीचा ग्लो टनेल हा बोगदा हे या उपक्रमातील दुसरे महत्वाचे आकर्षण असेल. या बोगद्यातून जाताना देशाच्या चारही भागांमधील संस्कृती, वास्तुकला, लोकनृत्ये, हस्तकला आणि जीवनशैलीचा अनुभव घेता येणार आहे. या प्रदर्शनामध्ये देशभरातील कलाकारांनी तयार केलेल्या कलाकृतींसह 1.5 कोटींपेक्षा जास्त एलईडी दिव्यांचा वापर करण्यात आला आहे.

पंतप्रधान 31 ऑक्टोबर रोजी एकता नगरमध्ये 400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करतील. उद्घाटन होणाऱ्या प्रकल्पांमध्ये सांडपाणी आणि जलशुद्धीकरण प्रकल्प, दर्शनी भागातील रोषणाई, नर्मदा घाटाचे उन्नतीकरण, एक आयआरसीटीसी हॉटेल आणि एकता नगरमधील रेनफॉरेस्ट , युनिटी आणि इको ट्रेल यांचा समावेश आहे. पंतप्रधान गोरा-भंडरा रस्ता विकास; एकात्मिक शून्य कचरा स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प; खलवानी पर्यावरण पर्यटन विकास; कॅक्टस आणि बटरफ्लाय गार्डनचा एकात्मिक विकास यासह विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करतील.

पंतप्रधान 31 ऑक्टोबर 2026 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या सोहळ्यात सहभागी होतील.

एकता पथसंचलनामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), राज्य पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटना यांची शिस्त, व्यावसायिकता, शौर्य आणि समर्पण प्रदर्शित केले जाईल. या वर्षीच्या संचलनामध्ये नक्षलवादी कारवायांविरुद्धच्या लढ्यात सुरक्षा दलांनी मिळवलेल्या यशावर तसेच पूर्वी नक्षलग्रस्त असलेल्या भागांचे शांतता, सुरक्षा आणि विकासाच्या दिशेने झालेल्या परिवर्तनावर विशेष भर दिला जाईल.

या सोहळ्याचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) द्वारे आयोजित ‘नक्षलमुक्त भारत’वरील एक विशेष नाट्य सादरीकरण असेल. या नाटकात नक्षलग्रस्त 126 जिल्ह्यांमधील सुमारे 2,000 कलाकार सहभागी होतील. नाट्य सादरीकरणाद्वारे, कलाकार या प्रदेशांतील समुदायांसमोरील आव्हाने आणि शांतता, सुरक्षा व विकासाच्या दिशेने त्यांचा प्रवास प्रदर्शित करतील.

संचलनातील चित्ररथ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची संकल्पना ‘वंदे मातरम’वर केंद्रित असेल. यातून देशभक्ती, राष्ट्राभिमान आणि सामूहिक एकात्मतेची भावना प्रतिबिंबित होईल. या चित्ररथातून जनतेच्या आकांक्षा, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची सांस्कृतिक समृद्धी आणि विकासाचा प्रवास प्रदर्शित केला जाईल.

भारतभरातील सुमारे 5,000 कलाकारांच्या सहभागाने एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात देशाच्या विविध शास्त्रीय आणि लोक परंपरा, संगीत, नृत्य आणि कलात्मक वारशाचा उत्सव साजरा केला जाईल.

 

* * *

सुषमा काणे/राधिका अघोर/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai