नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 नोव्हेंबर 2026 रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. सकाळी सुमारे 9:45 वाजता पंतप्रधान आयआयटी खरगपूरच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात सहभागी होतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील. त्यानंतर ते बिहारला रवाना होतील आणि वैशाली येथे विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण करतील. यानंतर पंतप्रधान उत्तर प्रदेशला जातील. संध्याकाळी सुमारे 5:30 वाजता पंतप्रधान लखनौमधील गोमती नगर येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे आयोजित 5 व्या ‘कौशल दीक्षांत समारंभात’ सहभागी होतील. या कार्यक्रमातही ते उपस्थितांना संबोधित करतील.
खरगपूरमधील पंतप्रधानांचा कार्यक्रम
पंतप्रधान आयआयटी खरगपूरच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात सहभागी होतील. तसेच, संस्थेच्या 75 वर्षांच्या प्रवासाचे प्रतीक म्हणून ते आयआयटी खरगपूरच्या 75 विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. 1951 मध्ये स्थापन झालेली आयआयटी खरगपूर ही देशात स्थापन झालेली पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) होती. ‘राष्ट्रीय महत्त्वाची संस्था’ म्हणून मान्यताप्राप्त असलेल्या या संस्थेने भारतातील तांत्रिक शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यात अग्रणी भूमिका बजावली आहे.
लखनौमधील पंतप्रधानांचा कार्यक्रम
पंतप्रधान 5 व्या ‘कौशल दीक्षांत समारंभात’ सहभागी होतील. 2021-22 या शैक्षणिक सत्रात सुरू झालेला ‘कौशल दीक्षांत समारंभ’ हा कौशल्य विकासातील उत्कृष्टतेचा गौरव करणारे आणि प्रशिक्षित तरुणांच्या प्रशिक्षणापासून ते प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील प्रवेशाचा उत्सव साजरा करणारे एक वार्षिक राष्ट्रीय व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. स्थापनेपासून या समारंभात कौशल्य विकास परिसंस्थेतील अखिल भारतीय स्तरावरील प्रथम क्रमांक मिळवणारे विद्यार्थी आणि उच्च कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार केला जात आहे, ज्यामुळे व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्याधारित करिअरबद्दल अभिमान, यश आणि आकांक्षेची संस्कृती रुजण्यास मदत होत आहे.
यंदा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था आणि प्रशिक्षक प्रशिक्षण संस्थांमधील राष्ट्रीय स्तरावरील 52 गुणवंतांचा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार केला जाणार आहे.
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai