नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, दिनांक 21 नोव्हेंबर 2026 रोजी बिहारला भेट देणार आहेत. उद्या दुपारी सव्वा वाजता पंतप्रधान वैशाली जिल्ह्यातील नितीश सेतूला भेट देतील. त्यानंतर 2 वाजता ते वैशाली येथे सुमारे 34,470 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी तसेच लोकार्पण करतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणारे हे प्रकल्प रस्ते जोडणी, उर्जा, शहरी पायाभूत सुविधा, जल संसाधन, शिक्षण, आरोग्यसुविधा, वाहतूक तसेच इतर महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित असून राज्यभरातील पायाभूत सुविधा बळकट करणे आणि सार्वजनिक सेवा सुधारणे हा या प्रकल्पांचा उद्देश आहे.
या बिहार दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नितीश सेतूचे लोकार्पण करण्यात येईल. सुमारे 4,280 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा भक्कम केबल-स्टेड प्रकारचा पूल आहे.गंगा नदीवर बांधलेला हा 19.7 किमी लांबीचा पूल पाटणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-22 वर असलेल्या कच्ची दर्गाह या ठिकाणाला वैशाली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-322 वर स्थित बिदूपूरला जोडतो.यामध्ये 9.7 किलोमीटरचा मुख्य पूल आणि 10 किमीचा संपर्क रस्ता यांचा समावेश आहे.
या पुलामुळे गंगा नदी ओलांडण्यासाठी एक महत्त्वाचा अतिरिक्त मार्ग उपलब्ध होऊन, सध्याच्या महात्मा गांधी सेतु आणि जेपी सेतू यांच्यावरील वाहतुकीचा ताण कमी व्हायला मदत होईल तसेच बिहारच्या उत्तर आणि दक्षिण भागांमधील प्रवासाचा वेळ कमी होईल. हा पूल विशेषत्वाने राघोपूर दियाराच्या रहिवाशांसाठी अधिक लाभदायक ठरेल कारण या पुलामुळे त्यांना पाटणाला जाणे तसेच आरोग्यसुविधा आणि शिक्षण यांसारख्या अत्यावश्यक सेवा मिळवणे अधिक सोयीस्कर होईल. हा प्रकल्प कृषी उत्पादने आणि औद्योगिक वस्तूंची वाहतूक सुलभतेने करणे शक्य करेल, बाजारपेठांपर्यंतची पोहोच सुधारेल आणि या भागातील व्यापार तसेच वाणिज्य यांना चालना देऊन बिहारच्या आर्थिक विकासात योगदान देईल.
पंतप्रधानांच्या हस्ते 15 हजार 600 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रमुख रस्ते प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 19 वरील औरंगाबाद-चोरदाहा मार्गाचे सहापदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 227 एफ वरील चोरमा-बैरगनिया मार्गाचे तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 327 वरील उमगाव-सहरसा मार्गाचे रुंदीकरण यांसह अन्य प्रकल्पांचा समावेश आहे.
ऊर्जा क्षेत्रात पंतप्रधान 1 हजार 320 मेगावॅट क्षमतेच्या बक्सर औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील 660 मेगावॅट क्षमतेच्या दुसऱ्या संचाचे उद्घाटन करतील. याशिवाय ऊर्जा विभागांतर्गत वीज वितरण आणि पारेषण पायाभूत सुविधा प्रकल्पांचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. यामध्ये 1 हजार 130 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या वितरण क्षेत्र सुधारणा योजना (RDSS) अंतर्गत वीजहानी कमी करण्याच्या कामांचा समावेश आहे.
उद्घाटन करण्यात येणाऱ्या अन्य प्रकल्पांमध्ये कालवे आणि तटबंद्यांचे पुनरुज्जीवन आणि बळकटीकरण, नवादा येथील फुलवरिया धरणावरील तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आणि कहलगाव येथील मलनिस्सारण पायाभूत सुविधांचा समावेश आहे. तसेच शैक्षणिक संस्था, निवासी शाळा, आरोग्य सेवा, कृषी, क्रीडा आणि सार्वजनिक प्रशासनाशी संबंधित इमारती आणि सुविधांचेही उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पांमुळे सिंचन, नागरी सुविधा आणि अत्यावश्यक सेवांपर्यंतची नागरिकांची पोहोच अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
पंतप्रधान सुमारे 14 हजार 450 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणीही करणार आहेत. यामध्ये 3 हजार 800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाने विकसित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 139 डब्ल्यू वरील साहेबगंज-अरेराज-बेतिया मार्गाच्या चौपदरीकरणाचा आणि सुमारे 3 हजार 350 कोटी रुपये खर्चाच्या पीरपैंती सुपर औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी (3 x 800 मेगावॅट) वीज वहन प्रकल्पाचा प्रामुख्याने समावेश आहे.
याशिवाय बेगुसराय, बिहारशरीफ, पूर्णिया, हाजीपूर, मोतिहारी, दानापूर, खगडिया, समस्तीपूर, बोधगया, सीतामढी, सहरसा आणि अन्य शहरी भागांतील मलनिस्सारण व पाणीपुरवठा प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. अन्य प्रकल्पांमध्ये कालवा प्रणालीचे आधुनिकीकरण, डॉ. भीमराव आंबेडकर निवासी शाळा, आयआयटी पाटणा संशोधन उद्यान आणि वसतिगृह, अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक संस्था तसेच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि पोलीस डेटा सेंटरशी संबंधित पायाभूत सुविधांचा समावेश आहे.
राज्यातील स्वच्छ सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आणखी चालना देण्यासाठी पंतप्रधान 100 पीएम-ई-बसना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 26 हजार 900 हून अधिक लाभार्थ्यांचा गृहप्रवेश सोहळाही आयोजित करण्यात येणार आहे.शहरी कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
निलीमा चितळे/संजना चिटणीस/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai