पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर 2015 ला आयर्लंडला भेट दिली आणि आयर्लंडचे पंतप्रधान एन्डा केनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. डब्लिन विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यानंतर आयर्लंडचे आरोग्य मंत्री लिओ वराडकर यांनी त्यांचे स्वागत केले.
डब्लिन इथे “गव्हर्नमेंट बिल्डिंग्स” मध्ये केनी यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
थॉमस ओल्डहॅम आणि सर जॉर्ज अब्राहम गिअर्सन यांनी भारतासाठी दिलेल्या योगदानासंदर्भातल्या दस्ताऐवज आणि कागदपत्रांच्या निवडक प्रती पंतप्रधानांनी केनी यांना भेट दिल्या.
तर आयर्लंडच्या पंतप्रधानांनी मोदी यांना आयर्लंड क्रिकेट संघाची जर्सी आणि “हेर्लिंग”चा एक संच भेट दिला. हर्लिंग हा आयर्लंडमधला एक महत्त्वाचा खेळ आहे. आयरिश पंतप्रधान कार्यालयातील अतिथींच्या वहीतही पंतप्रधान मोदी यांनी स्वाक्षरी केली.
भारतीय पंतप्रधान आयर्लंडला तब्बल 60 वर्षानंतर भेट देत असल्याचा उल्लेख दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी केला. दोन्ही देशांमधल्या समान मूल्यांचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी केला. रवींद्रनाथ टागोर आणि डब्ल्यू.बी. यीटस यांच्यातल्या मैत्रीबद्दल ते बोलले.
दोन्ही देशांमधले संबंध आणि सहकार्य अधिक दृढ व्हावेत असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. दहशतवाद, जहालवाद यांसारख्या आंतरराष्ट्रीय आव्हानांबद्दल, युरोप व आशियातल्या स्थितीबद्दल उभयपक्षी विस्तृत चर्चा झाली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत निश्चित कालावधीत सुधारणा व्हावी यासाठी पंतप्रधानांनी आयर्लंडचा पाठिंबा मागितला. आण्विक पुरवठादार गट आणि इतर आंतरराष्ट्रीय निर्यात नियंत्रण व्यवस्थेत भारताला सदस्यत्व मिळावे यासाठीही पंतप्रधान मोदी यांनी आयर्लंडचा पाठिंबा मागितला.
त्यानंतर आयर्लंडमधल्या भारतीय समुदायाशी पंतप्रधानांनी संवाद साधला. संस्कृत शिकवणाऱ्या “जॉन स्कॉटस स्कूल” या स्थानिक शाळेतल्या 20 आयरिश विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोक म्हणून पंतप्रधानांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्तम पठनाबद्दल पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या शिक्षकांचे खूप कौतुक केले.
दोन्ही देशांच्या स्वातंत्र्य लढयासह, दोन्ही देशांमधल्या समान वारशाबद्दल आणि मूल्यांबद्दल पंतप्रधान बोलले. आयर्लंड 2016 मध्ये स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करत आहे. या महोत्सवात भारताच्या सहभागाची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
भारतात होत असलेल्या बदलांबाबतही पंतप्रधान बोलले. भारत ही जगातील सर्वात वेगाने वृध्दिंगत होत असलेली महत्त्वाची अर्थव्यवस्था आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. ब्रिक्स देशांच्या समूहातला सर्वात बळकट घटक आज भारत असल्याचे ते म्हणाले.
संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिन जाहिर केल्यापासून जगभरात योग कसा स्वीकारला गेला आहे याचा उल्लेखही पंतप्रधान मोदी यांनी केला. भारत बळकट असेल तरच जग भारताकडे लक्ष देईल. 21 वे शतक आशियाचे शतक असेल हे तर जगाने मान्य केले आहेच मात्र प्रथमच हे शतक भारताचे शतक असण्याची शक्यता निर्माण होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. प्रगतीचा सध्याचा स्तर 30 वर्षे कायम राहिला तर भारत गरिबीचे समूळ उच्चाटन करु शकतो, असे त्यांनी सांगितले. भारताची 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांखालच्या वयोगटातील आहे. तरुण राष्ट्र हे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सक्षम असल्याचे आपल्याला वाटत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
S.Kulkarni/S.Tupe
Had a fruitful meeting with Mr. @EndaKennyTD. India & Ireland can form productive partnerships in trade, economy, technology & other areas.
— Narendra Modi (@narendramodi) September 23, 2015
India can be Ireland's anchor in Asia & Ireland can be India's vital gateway to Europe & bridge across the Atlantic. http://t.co/Dkjc9Kt5Nb
— Narendra Modi (@narendramodi) September 23, 2015
Overwhelmed by the community programme in Dublin. Recital of Shlokas in Sanskrit by children was very touching. pic.twitter.com/H9xUTmTupu
— Narendra Modi (@narendramodi) September 23, 2015
Spoke about growing global optimism towards India & how India's youth will take India to newer heights of progress. http://t.co/IvCe9bWzni
— Narendra Modi (@narendramodi) September 23, 2015