Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सरदार सरोवर धरण पंतप्रधानांतर्फे केले राष्ट्रार्पण, डभोई इथे नर्मदा महोत्सव सांगता समारंभात पंतप्रधान सहभागी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार सरोवर धरणाचे राष्ट्रार्पण केले. यावेळी केवडिया येथे धरणापाशी प्रार्थना आणि मंत्र म्हटले गेले. पंतप्रधानांनी कोनशिलेचे अनावरणही केले.

त्यानंतर पंतप्रधानांनी सरदार सरोवर धरणापासून काही अंतरावरच असलेल्या साधू बेटावर बांधकाम सुरु असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्मृतिस्थळाला भेट दिली. या कामाच्या प्रगतीबद्दल पंतप्रधानांना माहिती देण्यात आली.

डभोई इथे मोठ्या जनसभेत पंतप्रधानांनी राष्ट्रीय आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयासाठी पायाभरणी केली. नर्मदा नदीबाबत गुजरातच्या विविध जिल्ह्यात जागरुकता निर्माण करण्यासाठी आयोजित नर्मदा महोत्सवाचा सांगता समारंभ यावेळी झाला.
एवढ्या मोठ्या संख्येने जमलेला जनसमुदाय समाजात माता नर्मदे विषयी असलेला आदरभाव दर्शवत आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून आपण राष्ट्र बांधणीसाठी काम करत असलेल्या सर्वांना वंदन करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

सरदार पटेल यांचे धरणाबाबतचे विचार पंतप्रधानांनी उद्‌धृत केले. सरदार पटेल आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सिंचनावर खूप भर दिला होता, असे पंतप्रधानांनी सांगितले.

जलस्रोतांचा अभाव हा विकासातला मोठा अडथळा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पूर्वी सीमाभागात भेट देत असताना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची आठवण त्यांनी सांगितली. सीमाभागातल्या या जवानांसाठी आम्ही नर्मदेचे पाणी आणले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

सरदार सरोवर धरण उभारणीत गुजरातच्या संत आणि द्रष्टे यांनी मोठी भूमिका बजावली आहे. नर्मदा नदीच्या पाण्यामुळे नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडेल, असे ते म्हणाले.

देशाच्या पश्चिम भागात पाण्याची टंचाई आहे, तर पूर्व भागात वीज आणि गॅसचा तुटवडा आहे. यावर मात करुन देशाला विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी सरकार काम करत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

एकतेचा पुतळा सरदार पटेलांसाठी मानवंदना ठरेल आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल. वसाहतवादाविरुद्ध लढा दिलेल्या आदिवासी समुदायातल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना पंतप्रधानांनी यावेळी उजाळा दिला.

B.Gokhale/S.Kakade/D.Rane