पंतप्रधान रिसर्च फेलो,पी एम आर एफ च्या अंमलबजावणीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. 2018-19 या वर्षापासून सुरु होऊन सात वर्षासाठी ही योजना लागू राहणार असून त्यासाठी 1650 कोटी रुपयांचा एकूण खर्च अपेक्षित आहे.
देशाच्या प्रगती आणि विकासासाठी पंतप्रधानांनी नाविन्यता आणि तंत्रज्ञानावर भर दिला आहे. कल्पकता आणि नाविन्यता यांच्या माध्यमातून विकास हा त्यांचा दृष्टीकोन साकारण्यासाठी ही योजना आहे.
2018-19 च्या अर्थ संकल्पात याबाबतची घोषणा करण्यात आली आहे.
या योजने अंतर्गत आय आय एस सी / आय आय टी / एन आय टी/ आय आय एस ई आर/ आय आय आय टी च्या विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेच्या बी टेक किंवा एकात्मिक एम टेक अथवा एम एस सी अंतिम वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्वोत्तम विद्यार्थ्याला आय आय टी/ आय आय एस सी च्या पी एचडी साठी थेट प्रवेश देऊ केला जाईल.
या योजनेसाठीच्या मार्गदर्शक तत्वानुसार निवड झालेल्यांच्या यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्याला पहिली दोन वर्षे दर महा 70000 रुपये तर तिसऱ्या वर्षासाठी 75000 प्रती महिना आणि चौथ्या आणि पाचव्या वर्षासाठी दरमहा 80000 रुपये फेलोशिप देण्यात येणार आहे. या शिवाय पाच वर्षाच्या काळासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला, संशोधन पेपर आंतर राष्ट्रीय परिषद आणि चर्चा सत्रात सादर करण्यासाठी दोन लाख रुपयांचे संशोधन अनुदानही दिले जाणार आहे. 2018-19 पासून सुरु होणाऱ्या तीन वर्षासाठी जास्तीत जास्त 3000 विद्यार्थ्यांची निवड करता येणार आहे.
या योजने अंतर्गत राष्ट्रीय प्राधान्य असलेल्या बाबीवर संशोधन केले जाईल.
BG/NC