Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अफगाणिस्थान संसदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

अफगाणिस्थान संसदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

अफगाणिस्थान संसदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

अफगाणिस्थान संसदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

अफगाणिस्थान संसदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण


आदरणीय राष्ट्रपती गनी

माननीय मुख्य कार्यकारी डॉ. अब्दुल्ला

वोलेरसी जीरगाचे आदरणीय स्पीकर आणि मेशरौन जीरगाचे आदरणीय अध्यक्ष,

दोन्ही सदनांचे गणमान्य सदस्य यांस,

आठ शतकांपूर्वी, बल्ख प्रांताचे प्रसिद्ध रहिवासी, मानवी इतिहासातील आदरणीय कवींपैकी एक, जलालुद्दीन रूमी यांनी लिहिले होते, “शब्दों को ऊंचाई दें, आवाज को नहीं, क्योंकि फूल बारिश में पैदा होते हैं, तूफान में नहीं।

हे इथल्या महान भूमीचे ज्ञान आहे आणि हा एक महान देश आहे.

या शतकात अफगाण नागरिकांनी साहस आणि संघर्ष, तसेच मत आणि चर्चेच्या माध्यमातून आपल्या भविष्याला आकार दिला. त्यासाठी त्यांनी बंदूक आणि हिंसेचा मार्ग स्वीकारला. जिरगावर संपूर्ण विश्वास असणाऱ्या या देशाने लोकशाहीचा मार्ग निवडला.

आपला प्राण गमावून आपल्या भविष्याचे बलिदान देणाऱ्या असंख्य, अनामिक अफगाणींना ही एक श्रद्धांजली आहे.

मी या ठिकाणी आपल्या १.२५ अब्ज भारतीय मित्रांतर्फे, आपल्या कामगिरीची प्रशंसा करण्यासाठी, आपल्या मैत्रीबद्दल आभार मानण्यासाठी आणि आपल्या भविष्याप्रती एकजूटीची भावना व्यक्त करण्यासाठी उभा आहे.

आज राष्ट्रपती गनी आणि अफगाण संसदेच्या सर्व सदस्यांसह लोकशाहीचे हे नवे निवासस्थान अफगाण देशाला समर्पित करताना मला अतिशय सन्मानित वाटत आहे.

या संसदेच्या उद्घाटनासाठी आजचा दिवस सर्वात चांगला आहे, कारण आज अटलजींचा वाढदिवस आहे, ज्यांनी ११ वर्षांपूर्वी आपले माजी राष्ट्पती हमिद करजई यांच्या सोबतीने या संसदेचे स्वप्न पाहायला सुरूवात केली होती.

अफगाण संसदेच्या एका सभागृहाचे नामकरण अटल ब्लॉक असे केल्याचे पाहून मी फारच प्रभावित झालो. हे संसद भवन आपल्या दोन्ही देशांना परस्परांच्या अधिक जवळ आणेल.

भावनात्मक दृष्ट्याही अटल ब्लॉक आम्हाला एकरूप करेल कारण पश्तु भाषेत अटलचा अर्थ “नायक” असा होतो तर हिंदी भाषेत अटलचा अर्थ “दृढ” असा आहे. यात अफगाणिस्तानची भावना आणि आमची मैत्री यांचा संगम आहे.

हे संसद भवन, एक देश म्हणून आपला विकास आणि लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या आपल्या प्रगतीबद्दल आपल्यासाठी एक भेट आहे. याद्वारे आपल्यातील विशेष संबंध अतूट राहतील.

आदरणीय सदस्य,

आपले संबंध इतिहासाइतकेच प्राचीन आहेत.

हिंदुकुश पर्वतापासून खैबर खिंडीपर्यंत, साधु, व्यापार आणि सम्राटाने आम्हाला ज्ञान, संस्कृती, वाणिज्य आणि साम्राज्यांनी जोडले आहे.

इतिहासात अनेकदा बदलणाऱ्या परिस्थितीतही आम्ही कायम एकमेकांच्या सोबत असल्याचे दिसून आले आहे. अशीही वेळ आली की आम्ही युद्धे अनुभवली. मात्र प्रत्येक टप्प्यावर आम्ही परस्परांना समृद्ध केले.

बौद्ध प्रतीकांपासून दिल्लीच्या आकर्षक स्मारकांमध्ये, आपली संस्कृती आणि कलांमध्ये, भाषा आणि साहित्य, आहार आणि उत्सव अशा अनेक बाबतीत आपले परस्पर संबंध जाणवतात.

महाभारतातील महान व्यक्तींरेखांपैकी एक ‘गांधारी’ आपल्याला प्राचीन अफगाणिस्थानातून प्राप्त झाली आहे.

मौर्य साम्राज्य अथवा शेरशाह सूरीच्या यशामध्ये आम्हाला साधर्म्य जाणवते आणि आम्ही त्या सर्वाची पुनर्निर्मिती करू इच्छितो.

प्रत्येक भारतीय आणि अफगाण नागरिकाच्या मनात परस्परांबद्दल प्रेमाची भावना आहे. आपण परस्परांच्या संस्कृती, चित्रपट, संगीत आणि कविता, आहार आणि उत्सवांचा आदर करतो. आणि आता आपण परस्परांच्या क्रिकेट खेळाचाही आनंद घेतो.

अफगाण राष्ट्रीय क्रिकेट संघाला दिल्लीजवळ आपले होम ग्राउण्ड सापडले आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी हा संघ सराव करीत आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो. अफगाणीस्तानच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या संघाने पहिल्या मालिकेत झिम्बाब्वे संघाला पराभूत केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.

अफगाणची जनता, शिक्षण तसेच आरोग्याच्या बाबतीत भारताला निसर्गत: आदर्श मानते. भारतीयांनाही आपल्या स्वातंत्र्यलढ्यात अफगाणने दिलेल्या समर्थनाचे स्मरण आहे.

आदरणीय सदस्य मंडळी,

हे आमच्या बंधुत्वाचे प्रतिक आहे.

जेव्हा आपण नव्या शतकात नवा प्रवास सुरू केला तेव्हा आपल्यासोबत ठामपणे उभे राहताना आणि सोबत चालतांना आम्हाला अभिमान वाटला.

आमच्यातील सहकार्यामुळे ग्रामीण समुदायात शाळा, सिंचन सुविधा, आरोग्य केंद्र, बाल कल्याण तसेच महिलांना नव्या संधी प्राप्त झाल्या आहेत.

आम्ही सोबत रस्ते तयार केले आणि त्यामुळे विभिन्न ठिकाणे परस्परांच्या जवळ आली. परस्पर सहकार्य करीत आम्ही उर्जा निर्मिती केंद्रे तयार केली, ज्यामुळे अफगाण मधिल घरे प्रकाशाने उजळली. उपग्रहांमुळे अफगाण नागरिकांना शिक्षण, आजारांवरील उपचाराबाबतच्या सवलती मिळाल्या. आम्ही अनेक क्षेत्रांमध्ये संरक्षण बलांनाही मदत करीत आहोत.

भारत अफगाणिस्थानातील शेती आणि खाणकाम क्षेत्रात फेरनिर्माणाच्या कामात मदत करत आहे. तसेच काबूल मध्ये अत्याधुनिक उपचार सुविधाही उपलब्ध करून देत आहे.

प्रत्येक देशासाठी मनुष्यबळ ही सर्वात महत्वाची बाब असते. आमचा शिष्यवृत्ती कार्यक्रम अफगाणिस्थानमधील युवकांना आधुनिक शिक्षण आणि रोजगारक्षम कौशल्याच्या दृष्टीने परिपूर्ण बनवित आहे, याचा मला आनंद वाटतो. अशा मनुष्यबळाच्या साहाय्यानेच अफगाण सरकार आपल्या देशाचा विकास करू शकेल. त्याचबरोबर आपल्या सुरक्षा दलांचा वापर करून आपल्या देशाचे संरक्षण करू शकेल.

लवकरच सलमा धरणातून वीज आणि पाणी प्राप्त होऊ लागेल. अफगाण विद्यार्थ्यांना दर वर्षी १००० शिष्यवृत्ती देण्याची आमची योजनाही पुढे सुरू राहिल. आमच्या विशेष कृषीविज्ञान योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आम्हाला आनंद होत आहे.

अफगाण सुरक्षा दलातील शहिदांच्या 500 मुलांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा आज मी या ठिकाणी करतो.

आपल्या देशाच्या पुनर्निर्मितीच्या प्रयत्नात आमचा देश बरोबरीने उभा आहे. आपण सुद्धा स्वत:च्या देशवासिंयांप्रमाणे आमच्या देशवासियांचेही संरक्षण केले आहे. आम्हाला रोज संकटांना सामोरे जावे लागते, मात्र तुमच्यासोबत आम्हाला सुरक्षित वाटले आहे.

आपल्या भारतीय अतिथीच्या संरक्षणासाठी स्वत:चे प्राण धोक्यात घालणाऱ्या अथवा गमावणाऱ्या प्रत्येक अफगाण नागरिकाचे मी भारतातर्फे आभार मानतो.

भारतीय राजनितीज्ञ,अधिकारी, इंजीनियर, डॉक्टर आणि अभिमानाने सेवा प्रदान करणारे तसेच भारतीय शहिदांच्या कुटुंबियांचेही मी आभार मानतो.

काही असेही लोक आहेत, ज्यांना आम्हाला येथे पाहायची इच्छा नाही. हे असे लोक आहेत, जे आमच्या उपस्थितीबाबत वाईट विचार बाळगतात. काही लोक असेही आहेत, ज्यांना आमच्या सहभागाच्या ताकतीमुळे अस्वस्थ वाटते. तर काही लोक या प्रयत्नांना असफल करण्याचा प्रयत्न करतात.

तरीही आम्ही येथे आहोत कारण आपला आमच्यावर विश्वास आहे. आपण कधीही आमची कटीबद्धता आणि भागिदारीच्या ताकतीवर अविश्वास दाखविला नाही. आणि आपण आमच्या सहकार्याचे लाभ पाहिले आहेत.

आपण जे पाहिले, त्याच आधारे आमचे मूल्यमापन केले आहे, इतरांच्या सांगण्यानुसार नाही. अगदी भारतीय वाणिज्य दूतावासाबाबतही आपली हीच भूमिका राहिली आहे.

भारत येथे योगदान करण्यासाठी आहे, प्रतिस्पर्धा करण्यासाठी नाही, भविष्यासाठी आधार द्यायला आहे, संघर्ष वाढविण्यासाठी नाही, जीवनाचे पुनर्निर्माण करण्यासाठी आहे, देश नामशेष करण्यासाठी नाही, याची आपल्याला पुरेपूर जाणीव आहे.

आपण इतिहासाच्या चौकटीवर उभे आहात आणि आपला इतिहास आम्हाला सांगतो की आपण कोणालाही स्पर्धेचा आखाडा उभारू दिला नाही.

आपला इतिहास सांगतो की आपण कधीही आपल्या देशाला स्पर्धेचे रिंगण होऊ दिलेले नाही. आणि इतर कोणालाही तसे करू देणार नाही.

देशाचा सन्मान आणि किर्तीच सर्वोच्च आहे, हे कवी कुशाल खान खट्टक यांचे विचारच आपण आचरणात आणले आहेत.

आपले उज्वल भविष्य घडविण्याचा अधिकार अफगाणच्या नागरिकांना आहे आणि त्यासाठी आपला विश्वास आणि गतीसह सुशासन, संरक्षण आणि उज्वल भविष्यासाठी अफगाणच्या क्षमता संवर्धनासाठी भारत आपले सहकार्य कायम राखेल.

आम्ही मित्रत्वाच्या जाणीवेतून हे कार्य संपूर्ण जबाबदारीने पार पाडू. मात्र आमच्या प्रदेशात शांती आणि स्थैर्य राखत आम्ही हे साध्य करू इच्छितो.

अफगाणिस्थानच्या यशासाठी त्यांना प्रत्येक शेजारी देशाचे समर्थन आणि सहकार्याची आवश्यकता राहिल, याची आम्हाला जाणीव आहे. या बाबतीत आम्ही सर्वांनीच, भारत, पाकिस्तान, इराण आणि इतर सर्वांनी विश्वास आणि सहकार्याने एकत्र आले पाहिजे आणि आपला समान उद्देश व समान नियती जाणून घेतली पाहिजे.

जेव्हा अफगाणीस्थान शांततेचा स्वर्ग, विचारांचा प्रवाह आणि वाणिज्य, उर्जा आणि गुंतवणुकीचे केंद्र बनेल, तेव्हाच आम्ही त्याद्वारे समृद्ध होऊ.

याच कारणामुळे इराणच्या चाहबहारसह सागरी तसेच जमीन मार्गाने अफगाणीस्थानसह संपर्काचे चांगले मार्ग प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

म्हणूनच मला आशा वाटते की पाकिस्तान दक्षिण आशिया आणि अफगाणिस्थान आणि त्यापुढेही सेतूप्रमाणे काम करेल.

मला आशा वाटते की, लवकरच मध्य आशियातील उर्जा आमच्या क्षेत्राला समृद्ध करू लागेल, असा दिवस लवकरच येईल. जेव्हा काबुलीवाला पुन्हा एकदा भारतीयांची मने जिंकून घेईल, जेव्हा पुन्हा एकदा आम्ही भारतात अफगाणिस्थानच्या चविष्ट फळांचा आस्वाद घेऊ शकू, जेव्हा अफगाणिस्थानच्या नागरिकांना आपल्या आवडीच्या भारतीय वस्तू विकत घेताना जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत.

सीमेपलीकडून दहशतवाद नसेल, दहशतवादाला थारा दिला जाणार नाही आणि दहशतवाद पसरवणारे या कामात मग्न राहणार नाहीत, तेव्हाच अफगाणिस्थान यशस्वी होऊ शकेल.

दहशतवाद आणि हिंसा अफगाणिस्थानच्या भविष्याला आकार देण्याचे अथवा अफगाण नागरिकांची आवड निश्चित करण्याचे माध्यम असू शकत नाही.

आपल्या शेजारी देशांसोबत शांततेने राहण्याची बुद्धिमत्ता अफगाणिस्थानकडे आहे आणि आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचे साहससुद्धा आहे.

काबूल नदीमध्ये खूप रक्त वाहून गेले आहे. पर्वतांच्या उतारांवर दु:खाच्या अनेक सावल्या उरल्या आहेत. विवेकहीन संघर्षाच्या आगीत अनेक स्वप्ने भस्मसात झाली आहेत.

आपण पख्तून, उज्बेक, ताजिक, हजारा कोणीही असू शकता. आपण मुस्लिम, हिंदू, शिख असू शकता. परंतू आपण अभिमानपूर्वक अफगाण आहात. ही एका देशाची एका व्यक्तीशी असलेली बांधिलकी आहे.

आपण यापूर्वी धर्म अथवा आपल्या ओळखीसाठी लढाई केली असेल, पण आता अफगाणिस्थानच्या नागरिकांना शांततेने राहता आले पाहिजे.

बंदूकीच्या जोरावर ज्यांना जमीन घ्यायची आहे, त्यांनी मतदानाच्या माध्यमातून सत्तेची मागणी करावी. ज्यांनी घरे उध्वस्त केली आहेत, त्यांनी आता देश घडवावा. ही आपली भूमी आहे आणि ही आपली माणसे आहेत. अफगाणिस्थानच्या सर्व नागरिकांनी, परिसरातील साऱ्यांनी आणि उर्वरित जगानेही एकत्र येण्याची हीच वेळ आहे.

ही भूमी प्रत्येक अफगाण व्यक्तीची असली पाहिजे. प्रत्येकाच्या आकांक्षांना येथे स्थान मिळाले पाहिजे. हा एक असा देश व्हावा, जेथे प्रत्येक नागरिकाचे अधिकार सुरक्षित असतील आणि तो आपल्या भवितव्याबद्दल निश्चिंत असेल.

या क्षणी संपूर्ण जगाने अफगाणीस्थानच्या सोबत उभे राहिले पाहिजे.
आम्हाला स्थळ-काळाचे भान विसरून अफगाणिस्थानचे समर्थन केले पाहिजे. कारण कट्टरपंथांचे नवे संकट दृष्टीक्षेपात आहे तर जुने संकटही डोके वर काढत आहे. अफगाणिस्थानचे नागरिक केवळ स्वत:च्या भवितव्यासाठी लढा देत नाहीत तर आपण सारेच जग सुरक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

जेव्हा आपण विविधता आणि समृद्ध वारशासह अफगाण नागरिकांच्या वास्तविक संपत्तीचा अनुभव घेऊ शकू, तेव्हाच हे जग अधिक चांगले झाले आहे, असे म्हणता येईल.

बलिदान वाया जाऊ नये, आशा मावळू नयेत, कोणत्याही मुलीला अंधारात ढकलले जाऊ नये, कोणीही संधींपासून वंचित राहू नये. कोणत्याही मुलाला बंदूक किंवा दुसऱ्या भूमीवर शरणागती पत्करणे, यापैकी एक पर्याय निवडावा लागू नये.

कोणत्याही मातेला भितीच्या छायेत आपल्या मुलांचे पालन पोषण करावे लागू नये. मशिदीत नमाज अदा करणाऱ्या कोणालाही धर्माच्या नावे मारले जाऊ नये. आपल्या तरूण मुलांना अप्रिय संघर्षात गमावण्याची वेळ कोणत्याही वयोवृद्धावर येऊ नये.

अफगाणिस्थानातील प्रत्येक युवकाने आयटी मध्ये आपले भवितव्य शोधावे. मात्र आयटी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंटरनॅशनल टेरोरिझम नाही, हे लक्षात घ्यावे.

२१ व्या शतकातील उज्वल भविष्याचे आश्वासन इतर देशांतील तरूणांप्रमाणे अफगाण तरूणांसाठीही आहे.

भारत आपल्याशी कटीबद्ध आहे. आपले दु:ख आमच्यासाठीही वेदनादायी आहे. आपले स्वप्न आमचे कर्तव्य आहे. आपली शक्ती आमचा विश्वास आहे. आपले धाडस आमची प्रेरणा आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपली मैत्री हा आमचा सन्मान आहे.

“जंजीर” या सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटात शेरखान या व्यक्तिरेखेच्या तोंडी “यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी” हे गाणे आहे. भारत अफगाणिस्तानबरोबरच्या शतकानुशतकांच्या संबंधांकडे याच दृष्टीने पाहतो.

अफगाणिस्थानच्या घरांमध्ये उमेद दिसू लागेल, शाळांमध्ये हसू परतेल, गल्ल्या पुन्हा गजबजतील, शहरे समृद्ध होतील, समाजात एकी राहील आणि अफगाणिस्थानात शांतता नांदू लागेल, असा मला विश्वास वाटतो.

आपल्या प्रवासात प्रत्येक पावलावर भारत आपल्या सोबत आहे. धन्यवाद. या सन्मान आणि दिमाखदार स्वागतासाठी आपले आभार.

M.Pange/ B.Gokhale