Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अर्थसंकल्प 2016-17 वरील पंतप्रधानांची प्रतिक्रिया


या अर्थसंकल्पासाठी वित्तमंत्री अरुण जेटली यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. गाव, गरीब, शेतकरी, महिला आणि युवक या अर्थसंकल्‍पाचा केंद्रबिंदू आहेत. या सर्वांच्या आयुष्यात गुणवत्तापूर्ण बदल घडवण्यासाठी आम्ही या अर्थसंकल्पात अनेक योजना आखल्या आहेत.

गरीबीपासून मुक्ती देण्यासाठी कालबध्द आणि व्यापक आराखडा हा अर्थसंकल्प सादर करतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने या अर्थसंकल्‍पात अनेक महत्त्वूपर्ण पावले उचलण्यात आली आहेत. यापैकी एक महत्वपूर्ण पाऊल आहे – पंतप्रधान कृषी सिंचन योजना. या योजनेअंतर्गत गुंतवणूकीत अभूतपूर्व वाढ करण्यात आली आहे आणि प्रत्येक शेतात पाणी पोहचवण्यासाठी एक मोठा प्रयत्न करण्यात आला आहे.

गावाच्या विकासात वीज आणि रस्ते यांचे असलेले महत्त्व मी आणि तुम्ही, आपण सर्वच जाणतो. या अर्थसंकल्पात 2019 पर्यंत देशाच्या प्रत्येक गावाला रस्त्यांनी जोडण्याचा एक मोठा महत्वपूर्ण संकल्प करण्यात आला आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत आतापर्यंत सर्वाधिक निधी वितरित करण्यात आला आहे. याबरोबरच 2018 पर्यंत सर्व गावांमध्ये वीजेची सोय उपलबध करुन देण्याची व्यवस्था या अर्थसंकल्पात ठळकपणे करण्यात आली आहे.

यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा मिळेल, गती मिळेल, आणि सर्वसामान्यांच्‍या आयुष्यात मोठा बदल घडून येईल. गरीबातल्या गरीबाला, सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला विचारा, स्वत:च्या घराचे त्याचे स्वप्न असते, हे आम्ही जाणतो. मध्यम वर्ग असो, नवमध्यम वर्ग असो त्यांचे स्वप्न कसे पूर्ण करणार. सरकारच्या मदतीशिवाय हे शक्य नाही आणि म्हणून या अर्थसंकल्‍पात त्या सर्व तरतूदी करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला बळकटी मिळेल आणि सामान्यातील सामान्य व्यक्तीला घर मिळेल.

याशिवाय भाडयाच्या घरात राहणाऱ्या लोकांना भाडयाच्या रकमेवरील प्राप्‍तीकर सवलतीत वाढ करण्यात आली आहे. पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्न असलेल्या व्यक्तींच्या प्राप्तीकरात घट झाली आहे.

आपल्या देशात गरीबांच्या नावावर राजकारण फार झाले. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आपल्या मुलांसाठी जेवण तयार करण्यासाठी एक गरीब आई जेव्हा चूल पेटवते त्यामुळे तिच्या आणि मुलांच्याही आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. चुलीमुळे, त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे त्या गरीब महिलेच्या शरीरात 400 सिगरेटच्या धुराइतका, धुर एका दिवसात जातो असे या विषयातल्या तज्ञांचे, जाणकारांचे मत आहे. दारिद्रय रेषेखाली राहणाऱ्या कोटयावधी कुटुंबांना यातून सोडविण्यासाठी, यातून मुक्त करण्यासाठी अशा गरीब कुटुंबांना मोफत गॅस जोडणी देण्याचा महत्वाचा निर्णय आम्ही घेतला आहे.

5 कोटी गरीब परिवार जे आज चूल पेटवतात त्यांना धुरापासून सुटका मिळेल.

गरीबाच्या आरोग्यासाठी ते हितकारक ठरेल आणि पर्यावरणाचे रक्षणही होईल. आरोग्य क्षेत्रात आमचे सरकार महत्वपूर्ण उपाययोजना आखत आहे.

कधी कधी एखादा आजार, मध्यमवर्गीय, नव मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबाचे जीवन उध्वस्त करतो आणि म्हणूनच अशा आजारपणात त्या कुटुंबासमवेत उभे राहण्याचा या सरकारने निर्णय घेतला आहे. विशेषकरुन वरिष्ठ नागरिक, ज्यांना याची सर्वात जास्त आवश्यकता असते, त्यांच्यासाठीही आम्ही योजना सादर केल्या आहेत.

आपला देश सुरक्षित राहावा, प्रत्येक नागरिकामध्ये सुरक्षिततेची भावना राहावी या बाबी लक्षात घेऊन सुरक्षा क्षेत्रात आपले सैन्य सक्षम राहावे, सैनिक सबल राहावेत, आधुनिक साधनसामग्रीने युक्त राहावेत त्यांना एक पद श्रेणी एक समान निवृत्तीवेतन मिळावे. भारतात संरक्षण उत्पादनाला अधिक चालना मिळावी आणि सैन्यदलाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने या अर्थसंकल्पात महत्वपूर्ण कार्य करण्यात आले आहे.

या अर्थसंकल्पात आपण पाहिले असेल की, पायाभूत सुविधा क्षेत्रात सुमारे दोन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक तरतूद करण्यात आली आहे. त्याचा लाभ सीमावर्ती भागात तैनात असणाऱ्या सैन्याला नक्कीच होईल. भारतातला युवक आगेकूच करत आहे. त्याच्यासाठी रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी फॉर्मलायझिंग द इनफॉर्मल आणि एम्प्लॉईंग द अनएम्ल्पॉईड हे दोन नवे उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. त्याच्या बरोबरच स्टार्ट अप साठी माझा मंत्र आहे स्टार्ट अप इंडिया-स्टँड अप इंडिया. स्टार्ट अपसाठी अनुकूल आर्थिक वातावरण निर्माण करण्यासाठी करामधे तरतूद करण्यात आली आहे. आपल्या देशातला दलित, आदिवासी, आता उद्योजक बनू इच्छितो. रोजगार मिळवणारा नव्हे तर रोजगार निर्माता बनण्याचे त्याचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी सरकारने एक विशेष उद्योजकता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या देशातील तरुणांनी जागतिक आव्हानांचा सामना करावा आणि त्यांना शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवरील संधी मिळाव्यात यासाठी जुन्या कायद्यातील नियम आणि बंधनाच्या ओझ्याखाली आमचे शिक्षण क्षेत्र आले आहे, या क्षेत्राला त्यातून बाहेर काढून सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील 10-10 संस्थांना जागतिक पातळीवर आणण्यासाठी निवडण्यात येईल. शिक्षण आणि उच्च शिक्षण क्षेत्रात ही खूप मोठी सुधारणा आहे. त्यांना आर्थिक मदतही दिली जाईल आणि एकदा उच्च शिक्षण संस्थांमधे स्पर्धात्मक वातावरण तयार झाले की किती मोठे परिवर्तन घडेल, याची तुम्ही कल्पना करु शकता.

मात्र, त्याबरोबरच प्राथमिक शिक्षणालाही तेवढेच महत्व आहे. एवढी वर्ष बहुतेक सरकारांनी प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर लक्ष केंद्रीत केले, जे आवश्यकही होते. मात्र आजच्या आव्हानांना सामोरे जायचे असेल, तर शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच शिक्षणात गुणात्मक परिवर्तन आणणेही आवश्यक आहे. दुर्गम गावात राहणाऱ्या मुलांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, यावर आम्ही भर देत आहेात आणि यासाठी या अर्थसंकल्पात गुणवत्तेवर भर देणाऱ्या विषयांना प्राधान्य देण्यात आले आहे. आमचे सरकार नेहमीच आपल्या देशातील जनतेवर विश्वास ठेवण्याच्या बाजूने आहे. आपण देशातल्या नागरीकांवर अविश्वास दाखवता कामा नये. प्राप्तीकर विभागातल्या लोकांनी जनतेप्रती आदरभाव ठेवला पाहिजे आणि यासाठी प्राप्तीकर विभागातल्या गुंतागुंतीच्या प्रक्रियांतून सामान्य नागरीकांना जावे लागते, त्यातून त्यांना मुक्ती मिळाली पाहिजे. व्यापारी आणि व्यावसायिक यांना जो त्रास होत आहे, त्यातून आम्हाला त्यांना मुक्त करायचे आहे.

या अर्थसंकल्पात सामान्य उत्पन्न असणाऱ्या या वर्गाची उलाढालीवर लागणाऱ्या पूर्वानुमानित कर भरण्याच्या या प्रक्रियांमधून सुटका होईल. या अर्थसंकल्पातील हे एक मोठे सुलभीकरण आहे.

मी पुन्हा एकदा अरुण जेटलींचे अभिनंदन करतो. आणि हा अर्थसंकल्प तुमच्या स्वप्नांच्या जवळ पोहोचणारा आहे, असा विश्वास देशवासियांना देऊ इच्छितो. तुमची स्वप्न साकार करण्यासाठी सरकारने आपल्या कटिबध्दतेला पूर्ण ताकदीनिशी, योजनांसहित मांडले आहे. खूप खूप धन्यवाद.

N. Chitale/ J. Patankar/ S.Tupe/M.Desai