पीएम्इंडिया
महामहीम, अध्यक्ष फिलिपे न्युसी
स्त्री-पुरुषहो,
महामहीम, तुमच्या सौहार्दपूर्ण शब्दांनी मी हेलावून गेलो आहे. मोझांबिक-भारत संबंधांच्या ताकदीबद्दल तुम्ही व्यक्त केलेल्या विचारांबद्दलही मी तुमचे आभार मानतो. मी तुमच्याबरोबरच सरकारचे आणि मोझांबिकच्या जनतेचे त्यांनी अतिशय आपुलकीने केलेले स्वागत आणि त्यांच्या उदार पाहुणचाराबद्दल आभार मानतो.
महामहीम, आपल्या या दोन देशांमधील संबंध नवे नाहीत. भारतीय वंशाचे हजारो लोक मोझांबिकला त्यांच्या घराप्रमाणे मानतात. मला असे सांगण्यात आले की भारताच्या काही भागात राहणा-या सिद्दी समुदायाच्या लोकांचे पूर्वज मोझांबिकमध्ये होते. हे समुदाय म्हणजे आपल्या या दोन देशांमधील लोकांचे एकमेकांशी असलेल्या पूर्वापार संबंधांचे, त्यांच्या कल्पनांचे व परंपरांचे आणि संस्कृती व व्यापार यांचे दाखले आहेत.
महामहीम, आपल्या दोन्ही देशांनी वसाहतवादी राजवटीचे दुष्परिणाम भोगले आहेत. त्यातही मोझांबिकचा विचार करायचा झाला तर त्यांना खूपच जास्त काळ संघर्ष करावा लागला. वसाहतवादी राजवटीच्या गुलामगिरीतून मोझांबिकला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा आग्रह धरणा-या आघाडीच्या देशांमध्ये स्वतंत्र भारताचा समावेश होता. 1975 मध्ये स्वतंत्र देशांच्या पंगतीत मोझांबिक दाखल झाल्याचा आम्हाला अभिमान वाटला.
आणि आता अलीकडील दशकात अतिशय झपाट्याने विकास करणा-या अर्थव्यवस्थांपैकी एक अशी ओळख निर्माण करणा-या मोझांबिकची मी प्रशंसा करतो. महामहीम. दोन विकसनशील देश म्हणून आपल्याला सारख्याच समस्यांना तोंड दयावे लागते. त्यामुळेच आपला विकास आणि आर्थिक भागीदारी आपल्या संबंधांचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
अलीकडच्या काही वर्षात आपल्या देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक यात लक्षणीय वाढ झाली आहे. तुमच्या प्राधान्यक्रमानुसार आपला अनुभव, तंत्रज्ञान, क्षमता आणि सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्याची भारताची तयारी आहे आणि भारत त्यासाठी वचनबद्ध आहे.
गेल्या वर्षी मोझांबिकच्या स्वातंत्र्याला आणि आपल्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याच्या प्रक्रियेला 40 वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे दोन्ही देशांदरम्यान यापूर्वी कधीही न अनुभवलेली परस्पर देवाणघेवाणीची वाढीव पातळी पाहायला मिळाली. त्याचा परमोच्च बिंदू म्हणजे ऑगस्ट 2015 मध्ये तुमच्या सरकारची भारत भेट. भारत- आफ्रिका तिसऱ्या शिखर परिषदेच्या निमित्ताने तुमच्या पंतप्रधानांनी भारताला भेट देऊन आमचा सन्मान केला. महामहीम, मोझांबिकला 34 वर्षांनंतर भेट देणारा मी पहिला भारतीय पंतप्रधान आहे याची मला पुरेपूर कल्पना आहे. इतका मोठा काळ मध्ये जायला नको होता आणि भविष्यात असे होणार नाही, असा मला विश्वास आहे.
या शब्दांच्या साथीने, महामहीम, स्त्री-पुरुषहो या मेजवानीची सुरुवात करण्यामध्ये सहभागी व्हा. महामहीम, अध्यक्ष फिलिपे जसिंतो न्युसी यांचे आरोग्य, आनंद आणि भरभराटीसाठी
मोझांबिकच्या जनतेमध्ये शांततेचे, प्रगतीचे व समृद्धीचे वातावरण अखंड निर्माण व्हावे यासाठी
भारत व मोझांबिक यांच्यातील मैत्री व सहकार्याचे वातावरण वृद्धिंगत व्हावे यासाठी
(Release ID :146891)
S.Patil/B.Gokhale