पीएम्इंडिया
माझ्या प्रिय देशवासीयांनो, नमस्कार.
‘मन की बात’मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. हा मार्च महिना जागतिक पातळीवर खूपच उलथापालथींचा होता. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे, की भूतकाळात कोविडमुळे साऱ्या जगाला दीर्घकाळ अनेक अडचणींमधून जावं लागलं. आपल्या सगळ्यांनाच अपेक्षा होती की, कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर जग नव्या दमानं प्रगतीच्या वाटेवर पुढे जात राहील. पण जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सतत युद्ध आणि संघर्षाची परिस्थिती उत्पन्न होत राहिली. सध्या आपल्या शेजारी एक महिन्यापासून भीषण युद्ध चालू आहे. आपल्या लक्षावधी कुटुंबांचे सगे-सोयरे या देशांमध्ये राहतात, विशेषतः आखाती देशांमध्ये काम करतात. अशा एक कोटींहून अधिक भारतीयांना सर्वतोपरी मदत करण्याबद्दल, मी आखाती देशांना विशेष धन्यवाद देतो.
मित्रहो,
ज्या भागात आत्ता युद्ध चालू आहे, तो भाग आपल्या ऊर्जा- गरजा भागवणारं खूप मोठं केंद्र आहे. त्यामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत संकटाची परिस्थिती निर्माण होत आहे. आपले जागतिक संबंध, निरनिराळ्या देशांकडून मिळत असलेला सहयोग, आणि गेल्या दशकभरात उभं राहिलेलं देशाचं सामर्थ्य, यांच्या बळावर भारत या परिस्थितीचा नेटानं सामना करत आहे.
मित्रांनो,
हा निश्चितच आह्वानात्मक काळ आहे. ‘मन की बात’च्या माध्यमातून मी आज सर्व देशवासीयांना पुन्हा एकदा आग्रह करेन, की आपल्याला एकजुटीनं या आह्वानात्मक स्थितीतून बाहेर पडायचं आहे. जे लोक याही बाबतीत राजकारण करत आहेत, त्यांनी राजकारण करू नये. हा देशाच्या 140 कोटी देशवासीयांच्या हिताशी संबंधित विषय आहे, आणि यामध्ये स्वार्थाने बरबटलेल्या राजकारणाला अजिबात थारा नाही. अशा स्थितीत जे लोक अफवा पसरवत आहेत, ते देशाचं खूप मोठं नुकसान करत आहेत. मी सर्व देशवासीयांना आवाहन करेन की त्यांनी जागरूक राहावं, अफवांना बळी पडू नये. सरकारकडून आपल्याला सातत्याने जी माहिती दिली जात आहे तिच्यावर विश्वास ठेवा आणि तिच्यावरच विश्वास ठेवून कोणतंही पाऊल उचला. मला दर वेळेप्रमाणेच याही वेळी खात्री आहे, की जसा आपल्या देशाने 140 कोटी देशवासीयांच्या सामर्थ्यावर जुन्या संकटांचा पाडाव केला होता, तसं यावेळीही आपण सर्व मिळून या अवघड परिस्थितीतून अतिशय चांगल्या पद्धतीने बाहेर पडू.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
भारताची खरी शक्ती इथल्या कोटी-कोटी लोकांमध्ये सामावलेली आहे. आज ‘मन की बात’मध्ये मी अशा एका प्रयत्नाबद्दल सांगू इच्छितो, जो देशवासीयांच्या जनभागीदारीच्या भावनेचं प्रतीक आहे. हा प्रयत्न म्हणजे- ज्ञानभारतम् सर्वेक्षण- याचा संबंध आपल्या महान संस्कृतीशी आणि समृद्ध वारशाशी आहे. देशभरात अस्तित्वात असलेल्या मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखितांबद्दल माहिती गोळा करण्याचा याचा उद्देश आहे. ज्ञानभारतम ऍप हे या सर्वेक्षणाशी जोडून घेण्याचं एक माध्यम आहे. तुमच्याकडे जर एखादं मॅन्युस्क्रिप्ट असेल, हस्तलिखित असेल, किंवा त्याबद्दल काही माहिती असेल तर त्याचा फोटो ज्ञानभारतम् ऍपवरून जरूर सर्वांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक नोंदीशी संबंधित माहिती भरण्यापूर्वी तिची खातरजमा केली जात आहे. मला आनंद वाटतो की आतापर्यंत लोकांनी हजारो मॅन्युस्क्रिप्ट, हस्तलिखितं शेअर केली आहेत. उदाहरणार्थ अरुणाचल प्रदेशात नामसाई इथल्या चाओ नंतिसिन्ध लोकांग जी यांनी ‘ताई’ लिपीतली हस्तलिखितं पाठवली आहेत. अमृतसरचे भाई अमित सिंह राणा यांनी गुरुमुखी लिपी हस्तलिखित शेअर केलं आहे. आपल्या महान शीख परंपरेशी आणि पंजाबी भाषेशी संबंधित अशी ही लिपी आहे. काही संस्थांनी पाम लिफ म्हणजे तालवृक्षांच्या पानांवर लिहिलेली मॅन्युस्क्रिप्ट दिली आहेत. राजस्थानच्या अभय जैन ग्रंथालयानं कॉपर प्लेट्स वर म्हणजे ताम्रपटांवर लिहिलेली खूप जुनी हस्तलिखितं पाठवली आहेत. तर लदाखच्या हमीस मोनास्ट्रीनं तिब्बतीमध्ये बहुमोल हस्तलिखितांबद्दल माहिती दिली आहे. मी इथे मोजकीच उदाहरणं दिली आहेत. हे सर्वेक्षण जून महिन्याच्या मध्यापर्यंत चालू राहणार आहे. आपणा सर्वांना माझा आग्रह आहे की आपल्या संस्कृतीशी संबंधित पैलू जगासमोर आणा आणि शेअर करा.
प्रिय देशबांधवांनो,
भारत हा जगातला सर्वात तरुण देश आहे. देशाच्या तरुणांची शक्ती जेव्हा राष्ट्रनिर्माणाशी जोडली जाते, तेव्हा खूप मोठी मदत मिळते. राष्ट्रनिर्माणाचं हे दायित्व पेलण्यात मोठी भूमिका निभावत आहे- माझा युवा भारत – म्हणजे माय भारत संघटना. ही संघटना देशाच्या तरुणांना वेगवेगळ्या सकारात्मक घडामोडींशी जोडत आहे. नुकतंच, माय भारतद्वारे बजेट क्वेस्टचं आयोजन करण्यात आलं. देशभरच्या तरुणांना अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेशी आणि धोरणनिर्मितीशी जोडणं हा याचा उद्देश होता. याच्यातल्या प्रश्नमंजूषेत देशातून जवळपास 12 लाख तरुणांनी भाग घेतला. प्रश्नमंजूषेनंतर जवळजवळ एक लाख साठ हजार सहभागींना निबंध स्पर्धेसाठी निवडलं गेलं. यातले काही निबंध वाचण्याची संधीही मला मिळाली. या निबंधांवरून लक्षात येतं की माझे युवा साथीदार देशाच्या विकासात आपलं योगदान देण्यासाठी किती तत्पर आहेत! तेलंगणाच्या सूर्यापेटमधून कोटला रघुवीर रेड्डी, उत्तरप्रदेशच्या बाराबंकीमधून सौरभ बैस्वार, आणि बिहारच्या गोपालगंजमधून सुमित कुमार यांनी शेतकरी- कल्याणाशी संबंधित विषयांवर लेखन केलं आहे. पंजाबचा मोहालीमधून आंचल आणि ओडिशाच्या केंद्रपाडामधून ओमप्रकाश रथ यांनी- स्त्रियांच्या नेतृत्वात विकास- ही संकल्पना पुढे नेण्याच्या पद्धतींवर आपले विचार प्रकट केले आहेत. हरियाणाच्या यमुनानगरमधून प्रथम बरारने लिहिलं आहे की – हरित आणि स्वच्छ भारत हाच समृद्ध भारताचा मार्ग आहे. यावरून त्यांच्या सखोल विचारांचा अंदाज बांधता येतो. दिल्लीच्या शंख गुप्तानं सुचवलं आहे की ग्रामीण क्षेत्रात खेळातल्या प्रतिभा ओळखण्यासाठी आणखी प्रयत्न झाले पाहिजेत. आपल्या तरुण सोबत्यांनी कौशल्य विकास आणि व्यापारसुलभता यावरही आपले विचार मांडले आहेत. आपल्या कल्पना सर्वांसमोर मांडणाऱ्या सर्व तरुणांचं मी कौतुक करतो. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी हे विचार अतिशय महत्त्वाचे आहेत.
प्रिय देशबांधवांनो,
देशभरच्या क्रिकेटच्या चाहत्यांसाठी हा महिना एकदम जोशपूर्ण आणि उत्साही राहिला आहे. भारतानं जेव्हा टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला तेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यात आनंदाच्या लाटा उसळल्या. आपल्या संघाच्या या शानदार यशाचा आपल्या सर्वांना खूप अभिमान वाटतो. गेल्या महिन्याअखेरीस कर्नाटकात हुबळीमध्ये एक खूपच रोमहर्षक सामना बघायला मिळाला. हा सामना जिंकून जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट टीमनं रणजी करंडकावर आपलं नाव कोरलं. सर्वाधिक आनंदाची गोष्ट ही की जवळपास सात दशकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर या टीमनं पहिल्यांदा रणजी करंडक जिंकला. हे अभूतपूर्व यश म्हणजे, खेळाडूंनी अनेक वर्षं सातत्याने केलेल्या कष्टांचं फळ आहे. संघाचा कर्णधार पारस डोगरा यानं अद्भुत कौशल्य दाखवलं. आपल्या नेतृत्वाने त्यानं या विजयात अभूतपूर्व योगदान दिलं. रणजीच्या सीझनमध्ये 60 गडी बाद करणारा काश्मीरचा तरुण गोलंदाज आकिब नबी याच्याही कामगिरीचा आज देशात बोलबाला आहे. या विजयामुळे संघाचे खेळाडू आणि प्रशिक्षक वर्गाबरोबरच जम्मू-काश्मीरची जनताही अतिशय रोमांचित झाली आहे. क्रिकेटच्या मैदानातल्या या शानदार कामगिरीमुळे तिथल्या तरुणांमध्ये खेळांप्रती उत्साह अधिकच वाढला आहे. यामुळे येत्या काळात अनेक तरुणांना क्रीडाक्षेत्र आपलंसं करण्यासाठी प्रेरणा मिळेल. जम्मू-काश्मीरच्या लोकांमध्ये खेळांविषयी कमालीची जोशभावना आहे. आता हे मोठमोठ्या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचं केंद्रही होत चाललं आहे याचा मला आनंद आहे. खेलो इंडिया हिवाळी खेळांसाठी गुलमर्गनं तर आधीच आपली ओळख निर्माण केली आहे. फुटबॉलसारखे खेळही इथल्या तरुणांमध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय आहेत. येत्या काळातही जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंच्या विजयपताका अशाच फडकत राहतील अशी मला आशा वाटते.
प्रिय देशबांधवांनो,
मी नेहमी म्हणतो – जो खेळेल तो फुलेल. पूर्वी फारशा लोकप्रिय नसलेल्या खेळांनाही आता आपल्या देशाचे तरुण आपलंसं करत आहेत, हे बघून मला आनंद वाटतो. गुलवीर सिंह या उत्तर प्रदेशच्या प्रतिभाशाली अॅथलीटने अशाच एका खेळात कमाल करून दाखवली आहे. अगदी काही आठवड्यांपूर्वीच न्यूयॉर्क सिटी हाफ मॅरेथॉनमध्ये तिसरा क्रमांक पटकावून त्यानं इतिहास घडवला आहे. एका तासापेक्षाही कमी वेळात हाफ मॅरेथॉन पूर्ण करणारे ते पहिले भारतीय ॲथलीट ठरले आहेत. आपली स्क्वाश खेळाडू कन्या अनाहत सिंह हिनं स्क्वाश ऑन फायर ओपनच्या मोठ्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपदावर नाव कोरलं. अवघ्या सतरा वर्षांच्या वयातच तिनं हे यश मिळवलं. याबरोबरच पीएसए जागतिक क्रमवारीत अव्वल 20 मध्ये स्थान मिळवणारी ती सर्वात कमी वयाची आशियाई महिला खेळाडू ठरली आहे. मला अस्मिता अॅथलॅटिक्स लीग बद्दलही कळलं आहे. यात 8 मार्चला महिला दिनानिमित्त अनेक स्पोर्टिंग इव्हेंट आयोजित करण्यात आले होते. लीग मध्ये जवळपास दोन लाख मुलींनी भाग घेतला. देशात होत असलेल्या या क्रीडाक्रांतीमध्ये भारताची स्त्रीशक्ती महत्त्वाची भूमिका निभावत आहे, हे बघून छान वाटतं.
मित्रहो,
आपण सर्वांनी आपल्या फिटनेस म्हणजे तंदुरुस्तीकडे अवश्य लक्ष द्यावं, असा माझा नेहमीच आग्रह असतो. आंतरराष्ट्रीय योग दिनाला आता शंभरापेक्षाही कमी दिवस राहिले आहेत. जगभरात योगाविषयी आकर्षणही सातत्यानं वाढत आहे. आफ्रिकेत जिबूतीमध्ये अल्मीस जी आपल्या अरविंद योग केंद्राच्या माध्यमातून योगाला प्रोत्साहन देत आहेत. ते इथल्या आणखी कित्येक ठिकाणी लोकांना योग शिकवत असतात. आपल्यापैकी अनेक लोकांनी इंस्टाग्राम कंटेंट क्रिएटर युवराज दुआ यांच्या पोस्टवरच्या माझ्या रिप्लायवरून कमेंट केल्या आहेत. मी त्यांच्या वडिलांना शुगर इनटेक कमी करायला सांगावं, याचा आग्रह त्यांनी मला केला होता. माझ्या विनंतीचा त्यांच्या वडिलांवर सकारात्मक प्रभाव पडला आहे याचा मला आनंद वाटतो. आपण सर्वांनीच शुगर इनटेक कमी करावा, असा आग्रह मी आपल्याला करेन. आणि मी पूर्वीही म्हटल्याप्रमाणे आपल्याला खाद्यतेलात 10 टक्के कपातही करायची आहे. या छोट्या छोट्या प्रयत्नांनी आपण लठ्ठपणा आणि जीवनशैलीशी संबंधित विकारांपासून दूर राहाल.
प्रिय देशबांधवांनो,
एक जुनी म्हण आहे, ‘करत करत अभ्यास के, जडमत होत सुजान’- म्हणजे आपण जेव्हा सतत अभ्यास करत राहतो, तेव्हा आपल्याला तेवढीच बुद्धिमत्ता मिळत राहते. जेव्हा लोकांचा सक्रिय सहभाग असतो, तेव्हा ते अधिक चांगल्या प्रकारे शिकतात. बंगळुरूमध्ये शिक्षणाशी संबंधित एका आगळ्यावेगळ्या प्रयत्नाची माहिती मला मिळाली आहे. इथे एक टीम- ‘प्रयोग’, इंस्टिट्युट ऑफ एज्युकेशन रिसर्च चालवते. संशोधन प्रकल्पांवर या टीमचा विशेष भर आहे. शालेय पातळीवर विज्ञान शिक्षण लोकप्रिय करण्यासाठी ही टीम जोरदार प्रयत्न करते.
त्यांनी ‘अन्वेषण’ नावाचा एक प्रयोग केला आहे ज्याच्या माध्यमातून 9वी ते 12वी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र, भूविज्ञान आणि स्वास्थ्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन करण्याची संधी मिळते- यातून विद्यार्थ्यांना संशोधनाचा अत्यंत उत्तम अनुभव मिळतो आणि त्यासोबतच स्वतःच्या प्रकल्पांना प्रकाशित करण्यासाठी मंच देखील उपलब्ध होतो.
मित्रांनो, ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थ्यांनी मला सांगितलं होतं की ते विज्ञानाचा अभ्यास करू इच्छितात पण त्यांना या विषयाची भीती देखील वाटते. या दृष्टीने ‘प्रयोग’च्या पथकाचा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे, हा उपक्रम विद्यार्थ्यांना विज्ञानाशी जुळवून घेण्याचा आणि व्यावहारिकदृष्ट्या काहीतरी करून दाखवण्याची संधी देतो. जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वतः करून बघतो तेव्हा आपल्याला त्याविषयी उत्सुकता आणि आवड निर्माण होते. कोणास ठाऊक, माझ्या या तरुण सहकाऱ्यांमधूनच एखादा भविष्यातील उत्तम वैज्ञानिक असेल.
मित्रांनो,
शिक्षणाच्या माध्यमातून भूतकाळाचे संरक्षण करण्याचा आणि भविष्याची तयारी करण्याचा एक प्रयत्न नागा समाज देखील करत आहे. या समाजातील लोक त्यांच्या आदिवासी परंपरांचा खूप सन्मान करतात. ते या परंपरांचा अभिमान तर बाळगतातच पण त्याचसोबत स्वतःचे दृष्टीकोन आधुनिक करतात. नागा जमातीत मोरुंग शिक्षणाची एक पारंपरिक पद्धत होती, यामध्ये ज्येष्ठ व्यक्ती स्वतःच्या अनुभवांच्या माध्यमातून तरुण पिढीला पारंपरिक ज्ञान, इतिहास आणि जीवन कौशल्यांबाबत माहिती देत असत. काळानुरूप या पद्धतीला आता मोरुंग शैक्षणिक संकल्पना म्हटले जाते. या संकल्पनेच्या माध्यमातून मुलांमध्ये गणित आणि विज्ञान यांसारख्या विषयांची आवड निर्माण केली जाते. यामध्ये समाजातील ज्येष्ठ, वयस्कर लोक मुलांना कथा, लोकगीत आणि पारंपरिक खेळांसह जीवन कौशल्ये देखील शिकवतात. या पद्धतीनं आपला नागालँड स्वतःच्या सांस्कृतिक वारशाला सुरक्षित ठेवून, शिक्षण क्षेत्रात मुलांना पुढे घेऊन जात आहे. तुम्हाला तुमच्या भागातील अशा एखाद्या उपक्रमाची माहिती समजली तर ती तुम्ही मला अवश्य कळवा.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
देशाच्या अनेक भागांमध्ये उन्हाळा सुरु झाला आहे, म्हणजेच हा काळ जल संरक्षणाच्या आपल्या निश्चयाचा पुनरुच्चार करण्याचा आहे. गेल्या 11 वर्षांमध्ये ‘जल संचय अभियाना’ने लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली आहे. या अभियानाच्या अंतर्गत देशभरात सुमारे 50 लाख कृत्रिम जल संधारण संरचना उभारण्यात आल्या आहेत. आता पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावागावात सामुदायिक पातळीवर प्रयत्न होऊ लागले आहेत हे पाहून मला फार आनंद होत आहे. एकीकडे जुन्या तलावांची स्वच्छता होत आहे तर दुसरीकडे पर्जन्यजलाचे संधारण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अमृत सरोवर अभियानाच्या अंतर्गत देखील देशभरात सुमारे 70 हजार अमृत सरोवरे निर्माण करण्यात आली. पावसाळा येण्यापूर्वी या सरोवरांची स्वच्छता देखील सुरु करण्यात आली आहे. आज मी तुम्हाला यातली काही प्रेरणादायक उदाहरणं देऊ इच्छितो. लोक सहभागामुळे जल संरक्षणाच्या कामाची व्याप्ती किती वाढते ते आपल्याला या उदाहरणांवरुन दिसून येतं.
मित्रांनो,
त्रिपुरामध्ये जंपुई डोंगरांमध्ये असलेलं वांगमून गाव समुद्रसपाटीपासून 300 फुट उंचीवर आहे. या गावात पाणीटंचाईच्या समस्येने गंभीर रूप धारण केलं होतं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गावातले लोक पाणी मिळवण्यासाठी लांब अंतरावर जात असत. शेवटी गावातल्या लोकांनी पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याचा निर्णय घेतला. आज वांगमून गावातल्या बहुतेक घरांमध्ये छतावरील पर्जन्य जल संधारण प्रणाली बसवण्यात आली आहे. जे गाव एकेकाळी पाणी टंचाईचा सामना करत होतं तेच गाव जल संरक्षणाचं एक प्रेरणादायक उदाहरण बनलं आहे.
मित्रांनो,
याच प्रकारे छत्तीसगड मधील कोरिया जिल्ह्यात देखील एक अनोखा उपक्रम बघायला मिळाला. तिथल्या शेतकऱ्यांनी एका सोप्या पण प्रभावी संकल्पनेवर काम केलं आहे. येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतांमध्ये लहान लहान पुनर्भरण तलाव आणि शोषखड्डे तयार केले ज्यामुळे पावसाचे पाणी शेतातच अडून थांबायला लागलं आणि हळूहळू ते जमिनीत झिरपायला लागलं. आज या भागात 1200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी ही पद्धत स्वीकारली आहे आणि गावाच्या भूजल पातळीमध्ये मोठी सुधारणा झाली आहे.याच पद्धतीनं तेलंगणाच्या मंचेरीयाल जिल्ह्यातील मुधिगुंटा गावात देखील लोकांनी एकत्र येऊन पाण्याच्या समस्येवर मात केली आहे. गावातील 400 कुटुंबांनी स्वतःच्या घरापाशी शोषखड्डे तयार केले आणि जल संवर्धनाला लोक चळवळीत रुपांतरीत केलं. यामुळे गावाची भूजल पातळी सुधारली, आणि त्याचबरोबर प्रदूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण देखील खूप कमी झाले.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपले मच्छिमार बंधू-भगिनी केवळ सागरातील योद्धे नव्हेत, तर ते आत्मनिर्भर भारताचा सशक्त पाया देखील आहेत. सकाळ होण्यापूर्वीच ते समुद्राच्या लाटांशी झुंजत, स्वतःच्या कुटुंबासह देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात गर्क होतात. अशा मच्छिमारांचं जीवन आज अनेक पद्धतींनी सुलभ बनवण्यात येत आहे. बंदरांचा विकास असो किंवा मच्छिमारांसाठी विमा कवच, असे अनेक उपक्रम त्यांच्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. आपल्याला माहित आहे की समुद्रातील त्यांच्या कामांवर हवामानाची स्थिती परिणाम करते. हे लक्षात घेऊन तंत्रज्ञानाच्या मदतीने देखील त्यांना बरीच मदत करण्यात येत आहे. अशा प्रयत्नांमुळे आपला मत्स्योद्योग समृद्ध होण्यासोबतच या क्षेत्रात नवीन काहीतरी करून दाखवण्याची इच्छा देखील निर्माण होत आहे. आज मत्स्यपालन आणि सिवीड च्या क्षेत्रात नवनवे नवोन्मेष होऊ लागले आहेत आणि त्यातून आपले मच्छिमार बंधू-भगिनी आत्मनिर्भर होत आहेत.
ओदिशामध्ये संबलपुर येथील सुजाता भूयान एक गृहिणी होत्या मात्र काहीतरी नवा उपक्रम करून त्या स्वतःच्या कुटुंबाला मदत करू इच्छित होत्या. म्हणून त्यांनी काही वर्षांपूर्वी हिराकुंड जलाशयात मत्स्यशेती सुरु केली. त्यांच्यासाठी सुरुवातीचे दिवस परीक्षेचे होते. हवामानात होणारा बदल, माशांच्या खाद्याची व्यवस्था आणि घरातील जबाबदाऱ्या यांच्यात समतोल साधण्यासारखी अनेक आव्हाने त्यांच्यासमोर होती, मात्र त्यांचं धैर्य अविचल होतं. फक्त दोन-तीन वर्षांच्या आतच त्यांनी या उपक्रमाचे एका भरभराटीला येणाऱ्या व्यवसायात रुपांतर केलं. त्यांना मिळालेलं यश आज समाजातील महिलांसाठी आशेचा नवा किरण बनलं आहे.
मित्रांनो,
लक्षद्वीप मधील मिनिकॉय येथील हाव्वा गुलजारजी यांची कहाणी आपल्या माता-भगिनींच्या अद्भुत निर्धार-शक्तीची कहाणी मांडते. खरं तर त्या मासळी प्रक्रिया केंद्र चालवत असत. मात्र त्यांना असं वाटलं की त्यांच्याकडे जर चांगले शीत साठवण एकक असेल तर त्या अधिक चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतील. म्हणून त्यांनी शीत साठवण एकक सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज हेच एकक त्यांचं सामर्थ्य बनलं आहे. आता त्या अधिक उत्तम नियोजनासह व्यवसाय करू शकत आहेत. मित्रांनो, देशात आज सर्वत्र प्रेरणादायक प्रयत्न सुरु आहेत. बेळगावीमधील शिवलिंग सतप्पा हुद्दार यांनी पारंपारिक शेती करण्यापेक्षा वेगळा मार्ग निवडला. यासाठी त्यांनी एक तलाव शेत तयार केलं. या व्यवसायासाठी त्यांना प्रशिक्षण देखील मिळालं. आता स्वतःच्या तलावातून मासे विकून ते उत्तम उत्पन्न मिळवत आहेत. तसेच सीविडला असलेली मागणी लक्षात घेऊन अनेकांनी सिवीड संवर्धन देखील सुरु केलं आहे आणि त्यांना त्याचा लाभही मिळतो आहे. मी पुन्हा एकदा मत्स्योद्योग क्षेत्राशी संबंधित सर्व लोकांची प्रशंसा करतो. आपल्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी त्यांनी हाती घेतलेले प्रयास अत्यंत कौतुकास्पद आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
जेव्हा समाज स्वतःहून पुढे सरसावतो तेव्हा लहान लहान प्रयत्न देखील मोठ्या बदलाचा पाया रचतात. आपल्या देशाच्या विविध भागांतून अशी अनेक उदाहरणं समोर येत आहेत ज्यांच्याकडून आपल्याला ही शिकवण मिळते. नुकताच, उत्तर प्रदेशात वाराणसी येथे एक प्रेरणादायक प्रयत्न बघायला मिळाला. तिथे एका तासात 2 लाख 52 हजारपेक्षा जास्त झाडं लावण्यात आली आणि एक नवा गिनीज जागतिक विक्रम झाला. यामध्ये सर्वात विशेष बाब अशी की, यामध्ये हजारो लोक एकत्र आले. विद्यार्थी, सैनिक, स्वयंसेवी संघटना, विविध संस्था सह सर्वांनी मिळून हे कार्य शक्य करून दाखवलं. लोक सहभागाचं हेच स्वरूप, ‘एक पेड माँ के नाम’ अभियानाच्या दरम्यान देखील दिसतं. या अभियानांतर्गत देशभरात कोट्यवधी झाडं लावण्यात आली.
मित्रांनो,
नागालँडमधील चिजामी गावामध्ये देखील एक प्रेरक प्रयत्न सुरु आहे. चिजामी गावातल्या महिला एकत्र येऊन दीडशेहून अधिक वाणांचे पारंपरिक बियाणे सुरक्षित ठेवत आहेत. हे बियाणे एका समुदाय बीज बँकेत सुरक्षित ठेवण्यात आले असून गावातील महिलाच ही बँक चालवतात. यामध्ये तांदूळ, बाजरी, मका, डाळी, भाज्या आणि अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींचा समावेश आहे. हा एक असा प्रयत्न आहे ज्यामध्ये ज्ञान देखील सुरक्षित आहे, परंपरा देखील जिवंत राखण्यात आली आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी मजबूत पाया देखील तयार होत आहे.
मित्रांनो,
आज जेव्हा जग हवामान बदलासारख्या समस्यांना तोंड देत आहे तेव्हा असे प्रयत्न आपल्याला सांगतात की या समस्यांचं निराकरण नेहमीच फार लांबवर नसतं. अनेकदा आपलं स्वतःचं पारंपरिक ज्ञान आणि सामुदायिक प्रयत्नच आपल्याला सर्वात बळकट रस्ता दाखवतात.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
तुम्ही आज देशातल्या कोणत्याही लहानमोठ्या शहरात जाल तेव्हा एक बदल तुमच्या नक्कीच लक्षात येईल. तुम्हाला मोठ्या प्रमाणात तिथल्या घरांच्या छतांवर सौर पॅनल बसवलेले दिसतील. काही वर्षांपूर्वीपर्यंत तर अगदी एकदोन घरांवर ते बघायला मिळत. मात्र आज पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेचा प्रभाव देशातील कानाकोपऱ्यात दिसू लागला आहे. या योजनेमुळे, गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील पायल मुंजपाराच्या जीवनात फार मोठा बदल झाला आहे. त्यांनी सूर्य उपक्रमाच्या माध्यमातून सौर उर्जा तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले आणि 4 महिन्यांचा सौर पीव्ही तंत्रज्ञाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आता त्या कुशल सौर तंत्रज्ञ झाल्या आहेत. पायल एका सौर उद्योजकाच्या रुपात स्वतःची ओळख निर्माण करत आहे. त्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये घरांच्या छतांवर सौर उर्जा संयंत्र बसवण्याचे काम करतात आणि त्यातून त्यांना दर महिन्याला हजारो रुपयांचे उत्पन्न मिळतं.
मित्रांनो,
मेरठचे अरुण कुमार सुद्धा आता त्यांच्या भागात उर्जा दाते बनले आहेत. नुकत्याच दिल्लीत पर पडलेल्या कार्यक्रमात अरुण कुमार यांनी भाग घेतला आणि स्वतःचे अनुभव सर्वांना सांगितले होते. ते म्हणाले होते की, ते त्यांच्या वीजबिलात बचत करण्यासोबतच स्वतः निर्माण केलेल्या अतिरिक्त विजेची विक्री देखील करत आहेत.
मित्रांनो,
जयपूर येथील मुरलीधर यांना देखील असंच यश मिळाले आहे. आधी त्यांची शेती डिझेल पंपावर अवलंबून होती, आणि त्यासाठी हजारो रुपये खर्च होत होते.जेव्हा त्यांनी सौर पंप बसवला तेव्हा त्यांच्या शेतीची पद्धतच बदलून गेली. आता त्यांना इंधनाची चिंता करण्याची गरज उरली नाही. पिकांना वेळेवर सिंचन होतं आणि त्याचं वार्षिक उत्पन्न देखील वाढलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता त्यांचं कुटुंब स्वच्छ उर्जेसह, अधिक चांगलं जीवन जगत आहे.
मित्रांनो,
‘पंतप्रधान सुर्यघर मोफत वीज योजने’चा लाभ देशाच्या ईशान्येकडील भागांना देखील मिळत आहे. त्रिपुरा येथे रियांग आदिवासींची अनेक गावे अशी होती जिथे विजेची समस्या होती. आता सौर मिनी-ग्रीड च्या माध्यमातून तिथल्या घरांमध्ये प्रकाश पसरला आहे. तिथे लहान मुलं संध्याकाळनंतर देखील अभ्यास करू शकत आहेत. लोक त्यांचे मोबाईल चार्ज करू शकत आहेत आणि गावातील सामाजिक जीवन देखील बदलून गेलं आहेत.
मित्रांनो,
देशात सौर उर्जा क्रांतीची अशी कितीतरी उदाहरणे आहेत. तुम्ही देखील या क्रांतीमध्ये सहभागी व्हा आणि इतरांना देखील सहभागी करून घ्या.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
‘मन की बात’ साठी मला दर महिन्याला देशाच्या वेगवेगळ्या भागांतून अनेक संदेश मिळत असतात. या संदेशांतून हे देखील समजतं की देशाच्या दुर्गम भागांमध्ये असलेले लोक किती आवडीने हा कार्यक्रम ऐकतात. जेव्हा मी तुमच्या सूचना वाचतो, तेव्हा मला असं वाटतं की हा केवळ एक कार्यक्रम नव्हे, हा आपल्या सर्वांचा एक सामुदायिक संवाद बनला आहे. तुमचे विचार, तुमचे अनुभव, या कार्यक्रमाला अधिक उत्तम बनवण्याची प्रेरणा देतात. तुम्ही तुमच्या जवळपासच्या प्रेरणादायक कथा अशाच सामायिक करत रहा. असंही होऊ शकेल की, तुमचा एक छोटासा प्रयत्न दुसऱ्या कोणाच्या तरी जीवनात मोठा बदल घडवून आणू शकेल, एखाद्याला पुढे जाण्यासाठी नवा धीर देऊ शकेल- हीच तर रेडिओची खरी ताकद आहे. हा देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातील लोकांना एक विचार, एक भावना आणि एका उद्दिष्टाने जोडतो. पुढच्या महिन्यात पुन्हा भेटूया, आपल्याला पुढे जाण्याची नवी उर्जा देणाऱ्या काही नव्या प्रेरक व्यक्तीमत्त्वांना, अशाच काही प्रयत्नांना सोबत घेऊन. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या- निरोगी रहा, आनंदी रहा. खूप खूप धन्यवाद.
***
नेहा कुलकर्णी/आकाशवाणी मुंबई/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
#MannKiBaat has begun. Do listen. https://t.co/uGQRfbExDE
— PMO India (@PMOIndia) March 29, 2026
Amid the West Asia conflict, PM @narendramodi's appeal to 140 crore Indians.#MannKiBaat pic.twitter.com/wwp8gMV3qY
— PMO India (@PMOIndia) March 29, 2026
Gyan Bharatam survey aims to document and preserve manuscripts from across the country. If you have a manuscript or information about it, do share its image on the Gyan Bharatam App. #MannKiBaat pic.twitter.com/ujcoPuNJvL
— PMO India (@PMOIndia) March 29, 2026
From Team India's victory in the ICC Men's T20 World Cup to Jammu and Kashmir's maiden Ranji Trophy win, the nation has witnessed moments of sporting excellence.#MannKiBaat pic.twitter.com/tFAex6tQlj
— PMO India (@PMOIndia) March 29, 2026
India's growing sporting culture.#MannKiBaat pic.twitter.com/vMxDmA0DZY
— PMO India (@PMOIndia) March 29, 2026
Adopt healthier habits like regular exercise, yoga and mindful eating to prevent lifestyle diseases.#MannKiBaat pic.twitter.com/dSiUA8IRrD
— PMO India (@PMOIndia) March 29, 2026
An innovative initiative in Bengaluru is making learning science more engaging.#MannKiBaat pic.twitter.com/K2cuLOdyiD
— PMO India (@PMOIndia) March 29, 2026
The Naga community is blending tradition with modern education through the Morung system.#MannKiBaat pic.twitter.com/Sx8ccWHLOQ
— PMO India (@PMOIndia) March 29, 2026
With the onset of summer, communities across India are coming together to conserve water through initiatives like rainwater harvesting, rejuvenation of ponds, creation of soak pits and more.#MannKiBaat pic.twitter.com/gBApKeFBF9
— PMO India (@PMOIndia) March 29, 2026
Efforts are being made to improve the quality of life for fishermen.#MannKiBaat pic.twitter.com/AtYBkCaON1
— PMO India (@PMOIndia) March 29, 2026
Innovations in fisheries and seaweed are helping fishermen become self-reliant.#MannKiBaat pic.twitter.com/lvVTNU138U
— PMO India (@PMOIndia) March 29, 2026
Across India, community efforts are creating big change. Here are examples from Varanasi and Nagaland. #MannKiBaat pic.twitter.com/gCkZimxb8l
— PMO India (@PMOIndia) March 29, 2026
The PM Surya Ghar Muft Bijli Yojana is transforming lives across India.#MannKiBaat pic.twitter.com/YzjV5sfnWe
— PMO India (@PMOIndia) March 29, 2026