पीएम्इंडिया
मित्रांनो, २०१४ मध्ये सरकार स्थापन झाल्यावर मी लगेचच श्रीहरीकोटा येथे गेलो होतो, कारण या विभागाचा मी मंत्री देखील आहे; त्यामुळे मंत्री या नात्याने मला या विभागाचे काम समजून घ्यायचे होते. तेव्हा सर्व शास्त्रज्ञांनी माझ्यासमोर विस्तारित सादरीकरण केले होते. त्यावेळी मी एक विषय मांडला होता, अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग सामान्य मानवासाठी कसा होऊ शकतो? आपले सर्व विभाग त्यादृष्टीने काय करू शकतात? त्यातूनच हे ठरले होते की कोणत्या विभागात काय होत आहे, याचा आढावा घेतला जावा. ज्या राज्यांमध्ये या दिशेने काहीना काही पुढाकार घेतले गेले आहेत त्यांचीही माहिती गोळा केली जावी. माझ्या मनात सुरुवातीपासूनच विचार होता की सरकारचा स्वभाव हा साहसी नसतो. नवीन गोष्ट करणे, नवीन गोष्टी स्वीकारणे यांसाठी ते खूप वेळ लावतात. जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम होतात, पुढाकार घेतले जातात ते एखाद्या उत्साही अधिकाऱ्याच्या भरवशावर होतात. व्यवस्थेअंतर्गत बदल, व्यवस्थेअंतर्गत नवे पुढाकार व्हायला हवेत. ही रचना जेव्हा आपण उभी करत नाही, तेव्हा बदलणाऱ्या युगात आपण असंबद्ध बनत जातो. ही गोष्ट आपण स्वीकारायला हवी की या पिढीत तंत्रज्ञान एक प्रेरक शक्ती आहे, तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे आणि तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर उपायकारक देखील आहे. त्यामुळे आपल्यासाठी गरजेचे होते की आपण या गोष्टींना समजावे आणि आपल्या गरजेनुसार याचा उपयोग करावा.
आज संपूर्ण विश्वात अंतराळ क्षेत्रात भारताने आपले गौरवपूर्ण स्थान निर्माण केले आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी, प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगावा अशी कामगिरी केली आहे. परंतु जेव्हापासून भारताने अंतराळ विज्ञानात पाऊल ठेवले आहे, तेव्हापासून एक वाद सुरु आहे की भारतासारख्या गरीब देशाने या भानगडीत पडायला हवे का, आपण अंतराळात नाही गेलो तर काय फरक पडणार आहे, आपण उपग्रहासाठी पैसा खर्च नाही केला तर काय फरक पडणार आहे, हे प्रश्न आजही उपस्थित केले जातात. डॉ. विक्रम साराभाई यांनी सुरुवातीलाच याबाबत एक गोष्ट खूप छान सांगितली होती; ते म्हणाले होते की हा प्रश्न उपस्थित होणे खूप स्वाभाविक आहे की भारतासारख्या गरीब देशाने या स्पर्धेत उतरायला हवे का, यावर ते म्हणाले होते की आम्ही स्पर्धेसाठी या क्षेत्रात नाही जात आहोत. पण आमच्या देशातील सामान्य माणसाच्या गरजेच्या पूर्ततेसाठी आम्ही आमच्या प्रयत्नात कमी नाही पडलो पाहिजे. जितक्या पद्धती आहेत, जितकी माध्यमे आहेत, जितक्या व्यवस्था आहेत, जितके नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत, हे सर्व भारताच्या सामान्य नागरिकाच्या जीवनात बदल आणू शकतात का? त्यात आपण मागे नाही राहिले पाहिजे. विक्रम साराभाई यांनी त्यावेळी जे मार्गदशन केले होते, आज आपण पाहत आहोत की आपण अंतराळाच्या माध्यमातून, आपल्या विज्ञानाच्या माध्यमातून, आपल्या इस्रोच्या माध्यमातून, जे काही कमावले आहे, आज आपण देशाच्या विकासात कुठे न कुठे याला जोडायचा कमी-अधिक प्रमाणात यशस्वी प्रयत्न झाला आहे.
जेव्हा मी हे सादरीकरण पाहत होतो, मला इतका आनंद होत होता की सर्व विभाग आता या विषयाशी जोडले गेले आहेत, काही विभागांनी सुरुवात केली आहे, काही विभाग वेगाने पुढे जात आहेत आणि कित्येक विभाग या नवनवीन गोष्टींचा कसा उपयोग करावा, याचा विचार करत आहेत. काही दिवसांपूर्वी मी बनारस मध्ये जी ‘लोको-शेड’ आहे, तिथे एका हाय पॉवर जिनच्या लोकार्पणासाठी गेलो होतो; तिथे आतल्या भागात त्यांच्या ज्या नवनवीन व्यवस्था होत्या, त्या पाहत होतो, तेव्हा मी त्यांना एक प्रश्न विचारला, विमानात चालकासमोर एक मॉनिटर असतो आणि त्याला माहित असते की इतक्या वेळानंतर ढग येणार आहे, ढगाची इतकी घनता असेल, ज्यामुळे विमानात धक्का जाणवू शकतो, त्यावरून तो विमानातील प्रवाशांना सावधही करतो; मी म्हटलं, हे तंत्रज्ञान वापरून आपण या इंजिन चालकाला अशाप्रकारचा मॉनिटर देऊ शकतो का? ज्याला उपग्रह संपर्क मिळेल आणि जिथे कुठे मानवरहित रेल्वे क्रॉसिंग असेल त्यांना आधीच या मॉनिटरवर सूचना मिळेल, वेगळे दिवे लागतील, भोंगा वाजेल आणि २-४ किलोमीटर आधीच हे व्हावे, असे होऊ शकते का? तिथे असेच बघता बघता हे सगळे विचार माझ्या मनात आले होते. तिथे जे इंजिनिअर वैगेरे होते त्यांच्या समोर मी हा विषय ठेवला. मग आपले शास्त्रज्ञ भेटले तेव्हा मी त्यांच्या समोरही हा विषय ठेवला की बघा या विषयात काय होऊ शकते; आणि मला आनंद आहे की या ३-४ महिन्यात त्यांनी हे काम पूर्ण केले आणि मला सांगत होते की येणाऱ्या काही दिवसात आम्ही याला कार्यान्वित करू. मानवरहित क्रॉसिंगची समस्या सोडविण्यासाठी बरेच मार्ग असू शकतात; पण उपग्रह देखील मानवरहित रेल्वे क्रॉसिंगच्या सुरक्षेसाठी कामास येऊ शकतो का? आपल्या शास्त्रज्ञांना काम देण्यात आले आणि मी पाहत आहे की ३-४ महिन्यात ते उत्तर घेऊन आले.
माझी विभागातील मित्रांना विनंती आहे की तुम्ही देखील छोटासा विभाग बनवा, आपल्या विभागात, जे असा विचार करत राहतात, ज्याच्या तंत्रज्ञानाचा स्वभाव असेल की त्याचा काय काय उपयोग होऊ शकतो, कसा उपयोग होऊ शकतो, जर त्यांनी ही गोष्ट समजून घेतली आणि त्यावर चर्चा केली, वास्तव काय आहे, ते पाहावे आणि मग आपण इस्रोला सांगू की आमच्यासमोर हे कोडे आहे, आम्हाला वाटते की यातून मार्ग काढायला हवा, अशी-अशी व्यवस्था हवी; तुम्ही पहाल, त्यांचा चमू कामास लागलेला दिसेल. तंत्रज्ञान कोणत्या मर्यादेपर्यंत कामास येऊ शकते… माहिती गोळा करण्याचे काम तुमचे आहे आणि कोणत्याप्रकारे त्याचे परिणाम निघू शकतात… कित्येक उपक्रम आपण घेऊ शकतो.
जून २०१४ला मी इस्रोमध्ये गेलो होतो तेव्हा श्रीहरीकोटा येथे मी बोललो होतो, आता किरणजींनी सांगितल्याप्रमाणे २० विभागात कमी-अधिक प्रमाणात काम होत होते. आज ६० विभागात अंतराळ तंत्रज्ञानाच्या उपयोगावर कृतीशील काम होत आहे. थोडे प्रयत्न झाले, विभागाच्या छोट्या छोट्या बैठका झाल्या; मी मानतो भारताच्या आणि सरकारच्या इतिहासात ही पहिली मोठी घटना असेल की केंद्र आणि राज्याचे सुमारे १६०० अधिकारी संपूर्ण दिवस एकाच विषयावर विचारमंथन करत होते, कार्यशाळा घेत होते आणि ज्याच्याकडे माहिती होती तो दुसऱ्याला देत होता; ज्याला जिज्ञासा होती तो शंका विचारात होता. कदाचित भारतीय सरकारच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच विषयावर उत्तर शोधण्यासाठी पहिलाच कार्यक्रम झाला असेल. पण ही एक दिवसाची कार्यशाळा, एकच दिवसाची नव्हती; याआधी मागील ६-८ महिन्यांपासून सतत प्रत्येक विभाग, प्रत्येक राज्यांबरोबर, शास्त्रज्ञ यांसोबत भेटी, चर्चा, विषय ठरवणे, अडचणी शोधणे, त्याचे निवारण शोधणे, या सर्व गोष्टी सतत चालू होत्या. याचाच परिणाम आहे की अडचणींचे निवारण आपण करू शकतो या एका विश्वासाने आज आपण इथे जमलो आहोत.
तंत्रज्ञानाचा सर्वाधिक फायदा कमीत कमी खर्चात, शक्यतो सोप्या रीतीने, गरीबापर्यंत कसा पोहचेल, हेच आपल्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. तुम्ही पाहिले असेल, जशी ही हरियाणाची घटना सांगितली गेली, की त्यांनी त्यांचे निवडणूक ओळखपत्र उपग्रहाच्या मदतीने जमिनीच्या कागदपत्रांशी जोडले आहे. आता पहिले तर या गोष्टी आधीपासूनच होत्या पण कोणीतरी डोकं लावून हे जोडायचा प्रयत्न केला तर एक नवीन व्यवस्था उभी राहिली.
आपल्या समोर नवीन काहीही झाले नाही, समजा, आपण ठरवलं याबाबतीत नवीन काही होऊ शकत नाही, पण काही उपलब्ध माहिती, तंत्रज्ञान आहे त्यानुसार आपल्या गरजांनुसार कशाप्रकारे रुपांतरीत केले जाऊ शकते, यावरही आपण विचार केला तर आपण खूप मोठ्या प्रमाणात नवे पर्याय देऊ शकतो आणि सहज वितरण व्यवस्था विकसित करू शकतो.
आपल्या टपाल खात्याचे इतके मोठे संपर्क जाळे आहे. त्याचा उपयोग आपण उपग्रह व्यवस्थेशी जोडून कुठे कुठे करू शकतो? देशामधील सामन्यातील सामान्य नागरिक इतर व्यवस्थांशी जोडला जातो अथवा नाही, पण तो टपाल खात्याशी नक्की जोडला जातो. वर्षातून एकदातरी त्याचा टपाल खात्याशी संबंध येतोच. याचा अर्थ असा की सरकारकडे एक विभाग असा आहे जो शेवटच्या बाकापर्यंत जोडलेला आहे; आणि टपाल खाते एक अशी व्यवस्था आहे की आजही सामान्य माणसाला त्यावर बराच विश्वास आहे. ज्याला सवय झालेली आहे तो वाट पाहत राहतो पोस्टमन कधी येईल ते. भले महिन्यातून एकदा पत्र येवो; पण मुला, बाहेर आई तर पोस्टमनची वाट पाहत राहते. हा जो विश्वास आहे, या विश्वासासोबत तंत्रज्ञान जोडणे, नवनवीन गोष्टी जोडणे किती मोठा परिणाम देऊ शकतो.
जेव्हा मी राज्यात काम करत होतो, किरणजी देखील आमच्या इथेच होते, आमची चांगली मैत्री होती, त्यांच्याकडून मी खूप काही जाणून घ्यायचो. नवीन काय होतंय, काय करताय, जगाला काय देताय? त्यातून कोळ्यांसाठी आमचा एक उपक्रम तयार झाला, कोळ्यांना आम्ही मोबाईलवर माहिती द्यायचो की इतक्या अक्षांशावर, रेखांशावर पकड संधी आहे आणि माशांचा एक स्वभाव असतो की जेथे जमाव असतो तिथे कमीतकमी २४ तास तर ते तिथेच राहतात. पहिले ते मासेमारीला जायचे तर तासनतास ते बोट घेऊन जायचे, वाट पाहत राहायचे, जाळे फेकायचे मग मिळाले तर ठीक नाहीतर पुढे जायचे; तासनतास ही प्रक्रिया करावी लागायची. ही व्यवस्था दिल्यानंतर ते निश्चित ठिकाणी पोहचतात, कमी वेळात पोहचतात, डीझेल-बिझेलचा खर्च वाचतो आणि मोठ्या प्रमाणात मासे मिळतात, काम करून परत येतात, वेळ आणि शक्ती वाचते. तंत्रज्ञान तेच होते, पण त्याचा वापर गरिबासाठी कसा होतो.
आज सांगितलं तसं मध्यप्रदेशनी आदिवासींना जमिनी देण्यासाठी याचा उपयोग केला. कितीतरी लोक, आदिवासी दावा करतात की इथे आम्ही शेती करतो, ही आमची जमीन आहे, हे आम्हाला मिळायला हवे. गावातील लोक म्हणतात की हे खोटे बोलत आहेत, शेती नव्हता करत, उगीच जमीन हडप करू बघतोय; त्याची वडिलोपार्जित जमीन तिकडे आहे, तिथे करत होता, आता मुले वेगळी झाली; अशी भांडणे चालत राहतात. पण आता उपग्रहाद्वारे जुन्या छायाचित्रांच्या आधारे त्याला फोटोग्राफिक रचनेतून तुलनेने त्यांना सांगू शकतो की इथे पहिले जंगल होते की शेती होत होती की दुसरे काही काम चालत होते; सर्व गोष्टी काढून आपण पुरावे सादर करू शकतो. उपग्रहाच्या मदतीने एक आदिवासी हब आपण उभे करू शकतो. ज्या कोणत्या शास्त्रज्ञाने उपग्रहासाठी काम केले होते तेव्हा त्यालाही माहित नसेल की दूरवर वसलेला आदिवासी त्याच्या हक्काची लढाई उपग्रहाच्या आधाराने लढत आहे आणि त्याला त्याचा हक्क मिळवून देत आहे; ही तंत्रज्ञानाची ताकद आहे.
ज्या शास्त्रज्ञाने हे काम केले असेल, त्याला जेव्हा माहित होईल, अरे वा! मी तर अमुक कामासाठी हे केले होते, आता आदिवासींचा हक्क मिळवून देण्यात यशस्वी होत आहे, त्याचे आयुष्य धन्य होते. आपले काम हे आहे की आपण या गोष्टी उपयोगात कशा आणायच्या. आपल्याला मोठ्या प्रमाणात लोकांना सहभागी करून घेतले पाहिजे. काय प्रत्येक विभाग नव्या कल्पनांसाठी तरुणाईला आमंत्रित करू शकतो की आमच्यासमोर हा प्रश्न आहे, आपल्याला तंत्रज्ञान, उपग्रह किंवा अंतराळ व्यवस्थेसाठी कसा मार्ग काढला पाहिजे, तुम्ही विद्यार्थ्यांसमोर प्रश्न मांडा. तुम्ही पहा ते अभ्यास करतील, ऑनलाईन ते तुमच्याशी जोडून घेतील आणि नवनवीन कल्पना सुचवतील. आपले काम हे आहे की आपण या गोष्टींना कसे उपयोगात आणू. आपल्या विभागात मोठ्या प्रमाणात एक वेगळा भाग बनवा आणि तरुणाई तर आजकाल खूप टेक्नो-सॅव्ही असते, त्यांना घेऊन बनवा, त्यांना सांगा तुमचे डोके लावा, तुम्हाला नक्की नवीन नवीन कल्पना मिळतील आणि त्याचे परिणाम देखील मिळतील.
आपल्या देशात गरीबातील गरीब व्यक्ती देखील काहीना काही डोकं लावण्याच्या स्वभावाचा आहे. जर नाविन्यपूर्ण भारत, याविषयावर काम केले गेले तर मी नाही मानत की आपण पिछाडीवर राहू. कित्येक वर्तमानपत्रात आपण वाचतो की एखादा शेतकरी आपल्या शेतातील पाण्याचा पंप घरी बसून ऑपरेट करतो; ते कसे काय? मोबाईल फोनद्वारे करतो, त्यांनी स्वत: तंत्रज्ञान विकसित केले. घरात बसून त्याला कळते, वीज आली, की तो घरात बसून पंप सुरु करतो आणि पाण्याचे काम सुरु होते. त्यानंतर तो शेतावर जातो.
मला एकदा कोणीतरी सांगितले होते, सामन्य व्यक्तीचे डोके कसे काम करते, गावाकडे ज्या शेतकऱ्याने आपल्या घरात बायो-गॅस संयंत्र लावले होते आणि आपल्याकडच्या प्राण्यांचे शेण वैगेरे त्यात टाकत होता, आपल्या स्वयंपाक घरातील गॅस त्यातून निर्माण करत होता. गरजेपेक्षा जास्त गॅस तयार होऊ लागला. त्याने बुद्धीचा वापर कसा केला, त्याने ट्रक्टरच्या चाकाच्या ट्यूब मध्ये, जी केवढी मोठी असते, आपल्याला अंदाज आहे, त्यात तो गॅस भरत होता आणि गाडीवर त्याला घेऊन, आता दुचाकीवर एवढी मोठी ट्यूब पाहून घाबरायला होते की आता काय होईल, गॅस आपल्या दुचाकीवर घेऊन शेतावर नेत होता आणि आपल्या हुशारीने त्या गॅसच्या मदतीने स्वत: सुधारित केलेले डीझेल इंजिन चालवत होता आणि पाणी काढत होता. आता पहा, की सामान्य लोकांनाही मुलभूत सिद्धांत समजतात, त्यातून ते आपला मार्ग काढतात आणि गोष्टी कार्यान्वित करतात. आपण यावर कोणत्याप्रकारे विचार करू शकतो, नाहीतर हे सर्व ज्ञान-विज्ञानाचे भांडार वाढतच जाईल, पण सामान्य माणसासाठी आपला विभाग काय करतो?
आज आपल्याला आपली शिक्षण पद्धती ठिक करायची आहे, हे ठीक आहे, कोणी म्हणेल इतक्या गावात वीज नाही तर कसे कराल? इतक्या गावात ब्रॉडबँड संपर्क नाही तर कसे कराल? इतक्या गावात ऑप्टिकल फायबर नेटवर्क नाही तर कुठे कराल? ज्याला हा विचार करायचा आहे तो असा करेल, पण हा पण विचार करा की इतक्या गावात आणि शहारात आधीपासून आहेच की. कमीतकमी तिथे दूरस्थ शिक्षण द्वारे सर्वात चांगले शिक्षक आणि भारतातील मोठ्या शहरांत स्टुडिओमध्ये बसून मुलांना शिकवतील. मी समजतो की त्या शिक्षकालाही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे धडे मिळतील. तो दूरस्थ शिक्षण करेल आणि दूरवर वसलेल्या जंगलात, गावात आपण चांगले शिक्षण देऊ शकतो हे सिद्ध करू शकू.
आता मला किरणजी सांगत होते, आपल्या आरोग्य सचिवांनी जे सांगितले की त्यांना ब्रॉडबँड क्षमतेबाबत काही अडचण आहे, मी त्यांना विचारात होतो की आरोग्याची बाब लक्षात घेता आपल्याकडे पुरेशी क्षमता आहे. जर आपण याचा उपयोग करायचे ठरवले तर सीमेवरील जवानांसाठी, त्यांच्या गरजांसाठी आपण या तंत्रज्ञानाला कसे जोडू शकतो? सीमेवरील सुरक्षेचे मोठे काम आपण या तंत्रज्ञानाने करू शकतो.
कधीतरी आपण खूप मोठा कार्यक्रम हातात घेतला, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, या योजनेच्या यशाचे सर्वात पहिले पाऊल जर कोणते असेल तर आपल्या अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेणे आहे. आपण छान रूपरेषा तयार करू शकतो, गावाची रूपरेषा करू शकतो आणि त्या आधारावर पाणी कुठे आहे हे ठरवू शकतात, पाण्याचे प्रमाण, पावसाचे प्रमाण याचा अंदाज घेऊन भविष्यातील संपूर्ण रचना आपण तंत्रज्ञानाच्या आधारे करू शकतो. एकप्रकारे विज्ञान उत्तम प्रशासनासाठी एक महत्वपूर्ण भूमिका तयार करू शकतो. पहिले आपण नियोजन अनुभवाच्या आधारे करायचो. आज उपग्रहाच्या माध्यमातून आपण ते नियोजन करू शकतो. ज्यामुळे आपला खर्चही वाचू शकतो, वेळही वाचू शकतो आणि मार्ग बनवायचे आहेत. आज तुम्ही पहा, दशरथ मांझी इतका प्रसिद्ध झालाय, पण कारण काय होते, सरकारनी जो रस्ता बनवला होता तो एका गावातून दुसऱ्या गावात जायचे तर डोंगरांच्या कडेने जायचा, शिवाय ५०-६० किलोमीटर रस्ता होता.
दशरथ मांझीचा कच्चा दृष्टीकोन सांगतो, जन्मत:च जीआयएस सिस्टिम घेऊन आला असेल तो, त्याला वाटायचे इथून सरळ गेलो तर दोन किलोमीटरमध्ये पोहोचेन. आणि आपल्या हातोड्याने त्याने तो रस्ता बनवला. आज तंत्रज्ञान इतके उपलब्ध आहे की कोण्या दशरथ मांझीला आपले जीवन व्यर्थ घालवावे लागणार नाही. छोट्या मार्गातून तुम्ही आपला रस्ता शोधू शकता, बनवू शकता.
आपण या तंत्रज्ञाचा वापर कसा करू शकतो? आपल्याकडे कालवे पण बनतात. विमानातून जातो तेव्हा खूप वाईट वाटते की हा कालवा असा सापासारखा का जातोय? तर बनवताना पाहिले असेल की चला या मार्गांनी घेऊ किंवा निर्णय घेताना काही दबाव आला असेल की अरे याचे शेत वाचवायचे आहे, जरा तिकडून घ्या. तर आपण सापाच्या चालीप्रमाणे वाकडेतिकडे कालवे बनविले. पण तेव्हा आपण तंत्रज्ञानाचा वापर केला असता तर बरोबर मापात काम करू शकलो असतो.
आपल्या महामार्गांवर जितकेही अतिक्रमण आपल्याला दिसतात, जो चिंतेचा विषय बनला आहे, अशा अतिक्रमणांची नियमित तपासणी-टेळहणी आपण सॅटेलाइटच्या माध्यमातून करू शकतो. तिथे काय हालचाली चालत आहेत, ते आपण आरामात बघु शकतो, या समस्येचे समाधान आपण काढु शकतो.
आपण वन्यजीवांची गणना दर पाच वर्षांनी एकदा करत असतो. पण त्या वन्यजीवांच्या गणनेमध्ये सुद्धा अनेक अडचणी येतात. कोणी कॅमेरा लावते, कोणी त्यांच्या पाऊलांचे माप घेतात. माझ्या मते आपण सॅटेलाइटच्या-उपग्रहाच्या माध्यमातून जर या गोष्टींचे निरक्षण केले, तर आपण या प्रकारच्या वन्यजीवांच्या हालचालीचे क्षेत्र शोधू शकतो.
तंत्रज्ञानाचा उपयोग इतक्या सहजपणे, सोप्यापध्द्तीने होऊ शकतो आणि आपल्या सर्व विभागांनी यावर काम करायला हवे, असे मला वाटते. आपल्याकडे पडीक जमीन मोठया प्रमाणात आहे. एक-एक इंच जमीनाच्या तुकडयाचा सदुपयोग होण्याच्या दिशेने आपण काम करू शकतो.
आपल्या वनांची कटाई झाली, असे आपण ऐकत असतो. जेथे लाल-चंदन असते तेथे खूप कटाई-वृक्षतोड होते. आपल्याजवळ असणारे उच्च प्रतीचे कॅमेरे आपल्याला नियमितपणे अशा लाल चंदनाच्या क्षेत्रात घडणाऱ्या हालचालीची माहिती आपणास देऊ शकत नाही का ? येथे घडणारी प्रत्येक हालचाल आपल्याला माहित पडेल.
खाणकाम विशेषता काय असते ? आपल्या कडे सर्व यंत्रणा कागदावर तर परिपूर्ण असते, ज्याला हा खाणकामाचे कंत्राट मिळते, तो त्याला मिळणाऱ्या दोन चौरस कि.मी. ते दोन चौरस किमीच्या क्षेत्राऐवजी त्याच्या जवळच्या दुसऱ्यांच क्षेत्रात खाणकामास सुरूवात करतो. आता कोणी तेथे जाऊन तर मोजणार नाही याने किती फूट खाणकाम केले आहे. तो तर असाच विचार करणार की याला कंत्राट मिळालेले आहे. परंतु, हेच मोजमाप जर उपग्रहाच्या माध्यमातून आपण बघितले, तर तो त्याला ठरवून दिलेल्या जागीच खाणकाम करेल आपण त्याच्या वाहनाला ट्रॅक करू शकतो त्यावर नजर ठेऊ शकतो, हे काम आरामात होऊ शकते.
आपण रोड टॅक्स (पथ कर) वसूल करत असतो. यातील करचुकवेगीरीला आळा घालण्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. केवळ तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण पुष्कळ प्रणालींना विकसित करू शकतो. हे सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की, आपल्या जवळ एक अशी व्यवस्था आहे, जिला अनेक वर्षापासून आपल्या वैज्ञानिकांनी आपल्या कतृत्वाने बनवले आहे. आपले हे कर्तव्य बनते की, आपण या व्यवस्थेला आपल्याकडे कसे अंमलबजाणीत आणू ?
आणि नंतर लक्षात येईल की, या व्यवस्थेत आपण सहभागी होत जातो. ज्यांना दोन वर्षानंतर निवृत्त व्हायचे असते, ते असे म्हणतात जाऊ दया, हे तुम्ही करून घ्या. जे आपली उर्जा गमवतात, ते निवृत्त झाल्यानंतरही जीवनाचा आनंद घेऊ शकत नाहीत, त्यासाठीच आपण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत, आपली एक छाप सोडून जावी, ज्यामुळे येणाऱ्या पिढयांना कार्य करण्याची प्रेरणा मिळत राहील.
आज मी हा प्रयत्न करून, तीन पीढयांना एकत्र आणले आहे. जे नुकतेच मसुरीमधून बाहेर पडले, ते नव-युवक तेथे बसलेले आहे, जे पुढच्या 30 तारखेला निवृत्त व्हायचे आहेत, असा विचार करणारे सुध्दा येथे बसलेले आहेत. अशा त-हेने, तीन पीढया येथे एकत्र बसलेल्या आहेत. या सर्वांना एकत्र करण्याचा हेतू हाच होता की, जास्तीत जास्त नव्या लोकांना येथे बसवून, ही परंपरा/वारसा पुढे न्यावा. त्यांना अशी चिंता वाटायला नको, की आता जुने लोक तर गेलेत किंवा जुन्या लोकांना असे वाटायला नको की आता काय करावे, एकदा चालवून घेऊ.
प्रत्येक विभागाने एक-एक छोटे कार्य या 2015 मध्ये राहलेल्या तीन-चार महिन्यांमध्ये हाती घेणे, आपल्या दृष्टीने आवश्यक आहे. एक तरी गोष्ट अशी आपण ओळखली पाहिजे, जी आपल्याला वाटते सॅटेलाइट प्रणालीव्दारे आपण उपयोगात आणू शकतो. यासाठी जर, बाहेरून काही मदत बोलवावी लागेल, किंवा काही युवकांची गरज भासली तरी आपण ते करू शकतो. याच प्रकारे, या पूर्ण देशाची कार्यशाळा होणार आहे. राज्यांना माझा असा आग्रह आहे, की त्यांनी सुध्दा अश्याच प्रकारे दोन-तीन पिढयांना एकत्र करून त्यांना एक पूर्ण दिवस विचार मंथन करावयास सांगितले पाहिजे. भारत सरकारचा कोणता ना कोणता अधिकारी येऊन तेथे जाउून एक योजना आखेल.
तिसरी महत्वाची बाब म्हणजे, हे सर्व झाल्यानंतर जे लोक यासंबंधी निर्णय घेतात त्यांना याप्रती संवेदनशील करणे आवश्यक आहे. त्यांना या सर्वांशी परिचित करून देणे गरजेचे आहे. गावामधील सरपंचापसून ते आमदारापर्यंत जितकेही निवडून आलेले प्रतिनिधी असतील, त्यांना अशा संस्थाना भेट देण्याचे कार्यक्रम आयोजित करायला पाहिजे त्यांना, त्यांच्या गावातील पुष्कळ गोष्टींचे व्यवस्थापन सॅटेलाइट-उपग्रहामार्फत करण्यासंबंधी माहिती देता येईल. यामुळे, त्यांना याबद्दल एक विश्वास निर्माण होईल व ते हया गोष्टी करतील एकदा आपण गावातील लोक आणि सरपंचाने येथे बोलवावे तसेच तेथील पटवारी लोकांना सुध्दा येथे जरूर बोलवावे. अशा प्रकारे, एका गावातील पाच-सात प्रमुख लोकांची एक टीम तयार होईल, जी सरकारला जबाबदार असेल, ती याबद्दल संवेदनशील बनेल. आपल्याला अशा गोष्टींना खालच्या स्तरापर्यंत पोहचवायच्या आहेत, तर आपल्याला असे करणे आवश्यक आहे, आपल्याला ही गोष्ट मान्यच करायला हवी की, सु-प्रशासनासाठी, वेळेच्या आत प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी, प्रत्यक्ष निरिक्षणासाठी, तंत्रज्ञान हे एक सामर्थ्यवान माध्यम आहे. जेव्हा आपण सु-प्रशासनासंबधी बोलतो, तेव्हा सुरूवात होते अचूक योजनेच्या आखणीने या अचूक योजनेच्या (परिपूर्ण योजनेच्या) आखणीमध्ये जर आपल्याला इतका चांगला माहितीचा संग्रह किंवा आराखडा, 3 डी रिसोल्युशन्स मिळाले तर या योजनेमध्ये काही कमतरता राहणार नाही. जर आपल्याजवळ परिपूर्ण अशी योजना आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी एक योग्य आराखडा असेल, एका विशिष्ट कालावधीच्या चौकटीत आण ध्येय निश्चत केले असेल, तर माझ्या मते, आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेळेचा कालावधी कमी करून, गुणवत्तापूर्वक सुधार करून आपणास हवे असलेले परिणाम घडवु शकतो.
मागील काही दिवसांमध्ये आपण बघितले असेल की, अशा दोन घटना घडल्या ज्या जास्त प्रमाणात आपल्या लक्षात आल्या नाहीत. पण त्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले, लाखो-करोडो रूपयांची हानी टाळली. मागच्या वर्षी, नेपाळमध्ये पहाडामध्ये बर्फाच्यादरी कोसळल्या आणि यामुळे वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह गोठून गेला. आता आमच्यासमोर असे आव्हान उभे ठाकले की, जर उन्हाळयात या बर्फाचे जे पर्वत येथे पडलेले आहे ते एकदम तुटुन पाण्याचा प्रवाह असा वाहणार की खाली काहीच नाही वाचणार.मोठे-मोठे पर्वत खाली घसरत येतील व सर्व गाव उध्दवस्त करून टाकतील. आपल्या येथून NDRF ची टीम तेथे गेली, सैन्यदल गेले, नेपाळ सरकारच्या मदतीने अजून बंबार्डिग करावी लागली आमच्या जवानांनी इतक्या दुर्गमक्षेत्रात बंबार्डिग करून त्या पर्वताच्या, बर्फाच्या पर्वतांच्या शिला तोडून पाण्याचा प्रवाह पुर्ववत सुरू केला. गोठण्यामुळे प्रवाहास बाधा निर्माण झाली, ही बाब उपग्रहाच्या माध्यमातून घेतलेल्या छायाचित्राव्दारे लक्षात आली व यावर मार्ग शोधले गेले.
अशीच एक समस्या कोसी नदीच्या बाबतीत पण होती. नेपाळमधील कोसी नदीच्या भागात जेथे भू-स्खलन झाले होते, त्या भागात पाण्याचा प्रवाहबंद झाला. तिकडे पाणी गोठणे चालु झाले. आपण कल्पना करू शकतो की, मातीचे धरण बांधल्यानंतर त्यात पाणी भरले आणि ज्या दिवशी ते उघडेल तर काय घडेल ? सर्वप्रथम NDRF च्या टीमला येथून बिहारला पाठवण्यात आले. कोसीच्या मार्गात जितके पण गावे होती ते सर्व खाली करण्यात आले. लोकांनी पण संताप व्यक्त केला, पाणी तर पडत नाही, मग का हे लोक गाव खाली करायला सांगत आहेत ? त्यांना आम्ही कसे-बसे समजावले, प्रसंगी दबाव पण टाकला व त्यांना तेथून दूर करून त्या पाण्याच्या प्रवाहाला दिशा देण्यासाठी रस्ता शोधायला सुरूवात केली.कशा प्रकारे या समस्येचे निरसन करता येईल, या विचाराने रस्ते शोधले गेले आणि हळू-हळू पाण्याचा प्रवाह सुरू झाला.आम्ही एका मोठया संकटातून वाचलो. हे तेव्हाच शक्य झाले जेव्हा या उपग्रहाच्या निरिक्षणामधून अशा संकटाची चाहूल लागल्याचे आम्हाला कळाले.
काही दिवसांपूर्वी विशाखापट्टणमध्ये (विजाग मध्ये) हुडहुड वादळ आले होते. आमच्या विभागाचे, राठोड येथे बसलेले आहेत, त्यांनी इतकी परिपूर्ण-अचूक माहिती दिली की, वादळ किती दूर आहे, किती तीव्रतेचे आहे, कोणत्या दिशेने येत आहे आणि ते केव्हा विजागला धडकणार माझ्या मते हया अचूक माहितीच्या आधारे आणि उपग्रह तंत्रज्ञानाच्या आधारे इतकया मोठया प्रमाणात आलेल्या हुडहुड वादळाचा परिणाम विजागमध्ये जास्त जाणवला नाही, कमीत-कमी नुकसान झाले. आपण आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने, शीघ्र चेतावनीच्या दृष्टीने, सज्जतेच्या दृष्टीने, आपण मानव जातीच्या कल्याणासाठी एक खूप मोठे कार्य करू शकतो. याकारणास्तव, आपण याविषयी जितके संवेदनशील होऊ, त्याच प्रमाणात आपल्या विभागातील सर्वजण त्यादिशेने विचार करायला लागतील की येथील तरूण टीम-मधील दोन-चार जणांना आपण या कार्यात सामावून घेऊ.
मलासुध्दा असेच वाटते की, ISRO ज्या प्रकारे येथे वेग-वेगळे कार्यक्रम घेते, त्याव्दारे आपले अंतराळ तंत्रज्ञान नक्की आहे काय ? याविषयी आपण विद्यार्थ्यांना अवगत करून दिले पाहिजे. विद्यार्थ्यांना भाषणे देण्यास, स्लाइड-शो करवुन, एक व्हिडीओ बनवून लोकांना या गोष्टी समजावून सांगणे आवश्यक आहे.एक लोक-शिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात ISRO ने पुढाकार घेतला पाहिजे. मनुष्यबळविकास मंत्रालय आणि इतर मंत्रालयांनी, राज्यशासनांनी यांची मदत घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना तयार केले पाहिजे. त्यांचा 1 – 2 आठवडयाचा वेळ मागून, 10 शाळा किंवा कॉलेजमध्ये जाऊन शिकवण्यास सांगितले पाहिजे. यामुळे आपली एक पीढीच तयार होईल, या गोष्टींचा परिचय त्यांना होईल व त्यांना त्यांच्या योग्य कार्य करण्यास प्रेरणा मिळेल.
मी आताच 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून म्हटले होते की, ‘स्टार्ट अप इंडिया-स्टँड अप इंडिया’, आताच सांगितले गेलेल्या माहितीपटात, जवळपास 3 हजार लहान-मोठे खाजगी उपक्रम आपल्या या गतीविधीसोबत संबंधित आहेत. माझ्या मते, आता मी तर वैज्ञानिक नाही, पण या क्षेत्राच्या विकासासाठी आकाश हीच मर्यादा आहे. आपण अशा प्रकारे वैज्ञानिक वृत्तीच्या आपल्या युवकांना स्टार्ट अप साठी प्रोत्साहन देऊ शकतो का ? त्यांना आपण एक आराखडा (ब्लु प्रिंट) देऊ शकतो का ? आपल्याकडील 400 प्रकारच्या कामात काही नाविन्य आणून, काही नवनिर्मितीकरून आपल्या अंतराळ विज्ञानाला उपयोगी पडतील अशा कामासाठी आपले युवक पुढे येतील का ? आपण अंतराळ विज्ञानाच्या उपयोगीतेसाठी त्याची उच्चतेच्या दृष्टीने व त्यांच्या संभाव्य अवनतीच्या दृष्टीने आपण दोन्ही मार्गांने कसे कार्य करू शकु ? आपण अशा व्यवस्थेला विकसीत करू शकलो तर, ‘स्टार्ट अप इंडिया-स्टॅड अप इंडिया’ हे जे स्वप्न आहे त्यात आपण नवनिर्मिती-नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करू शकतो. वित्तीय संस्थानीसुध्दा या स्टार्ट अप मध्ये शिरणाऱ्या लोकांसाठी जे अंतराळ विज्ञानात योगदान देणारे आहेत, त्यांच्याकरिता विशेष व्यवस्था इस्त्रोसोबत मिळून केली पाहिजे, आपणास याचा खूप मोठा फायदा मिळू शकतो. प्रत्येक विभागाची मुख्य चिंता असते, क्षमता निर्मितीची. आपणास या गोष्टींचा स्वीकार करण्याची सवय नसल्याने, याकडे फारसे लक्ष देत नाही. आपण जेव्हा रोजगार भरती करू, तेव्हा अशा प्रकारे विज्ञानाशी निगडीत लोकांना जास्तीत जास्त सामवून घेतले पाहिजे. यामुळे क्षमतानिर्मितीला सहाय्य मिळेल. आपल्या विभागात कीती लोकांना अशा गोष्टींमध्ये आवड आहे,हे विचारल्यास त्यानंतर त्यांना 7-10 दिवसांचे एक प्रशिक्षण दिले जाऊ शकते.या व्यवस्थेच्या मानवी संसाधनाचा विकास झाला तर संस्थात्मक क्षमतेची निर्मिती आपोआपच होईल. केवळ वित्तीय संसधनामधून संस्थात्मक क्षमता अस्तित्वात येत नाही, संस्थात्मक क्षमतेचा आधार तेथील संरचना नसते, इमारत, साधने, वित्तीय व्यवस्थापनावर पण ती अवलंबून नसते, त्याचा मूळ आधार असतो, मानव संसाधन कशा प्रकारचे आहे ? या संदर्भात माझ्या मते एखादा माहीतीपट दाखवायला हवा होता. भारत अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये शिरला आणि आज ज्याचे इतके नाव आहे. प्रथमत: आपण अंतराळात झेप घेतली, त्याचे छायाचित्रात (उपकरण) एका सायकलवर कामगार उचलून घेऊन जात आहे, असे दिसते. भारताच्या अंतराळ विज्ञानाचा प्रयोग प्रथमच झाला, तो एका गॅरेजमध्ये चाचणी घेऊन झाला. एकंदरित त्याच्यासंबंधी कार्य त्या गॅरेजमध्ये झाले, त्याची ने-आण सायकलवरच झाली. याचाच अर्थ, व्यवस्था जरी कमकुवत असली तरी मानवसंसाधनाची ताकद ही जास्त असते, ज्याने आपल्याला आभाळांची उंची आणि त्याची सफर घडवून आणवली, त्याला मात्र जमीनीवर एका सायकलवर नेल्या गेले. हया दोनच गोष्टी अशा आहेत की, ते सर्वात मोठे उदाहरण बनू शकते, आपल्या विज्ञानातील सामर्थ्यामध्ये आंतरिक शक्तीच्या योगदानाचे. अशा सर्व अपेक्षा आमच्या आहेत.
चांगल्या योजना आखण्यासाठी, वेळेच्या आत त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आपण याचा पुष्कळ उपयोग केला पाहिजे. मला हा विश्वास आहे की, आज दिवसभर जी चर्चा येथे झाली त्यामध्ये सहभागी होणारे जवळपास 1600 अधिकारी आणि महत्वाची जबाबदारी सांभाळणारे अधिकारी यांच्या विचारमंथनाच्या माध्यमातून अंतराळ विज्ञान आणि सामान्य माणुस यामध्ये अंतर राहता कामा नये, यासाठी आपण कार्यरत असले पाहिजे. हे स्वप्न पुर्ण करा, खूप-खूप शुभेच्छा, धन्यवाद !
S.Pophale/D.Wankhede/N.Sapre
There has always been a question- should a poor nation like India develop a space programme. This question is raised time and again: PM
— PMO India (@PMOIndia) September 7, 2015
Dr. Vikram Sarabhai used to say- we are doing it for the people. We have to think of what will help the people of India: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 7, 2015
We should keep thinking about innovation and of doing new things: PM @narendramodi https://t.co/byUefDIIOj
— PMO India (@PMOIndia) September 7, 2015
India has made a mark in space. Our scientists have made India very proud: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 7, 2015
How to make maximum use of technology, and ensure it reaches the poorest of the poor...this is our main challenge: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 7, 2015
Let us involve the younger generation and take their ideas. The generation is very techno-savvy & we will get lot of ideas: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 7, 2015
Space science has an important role in achieving good governance: PM @narendramodi https://t.co/byUefDIIOj
— PMO India (@PMOIndia) September 7, 2015
At today's Meet on Space Technology based Tools & Apps in Governance, was given a series of insightful presentations by officials.
— Narendra Modi (@narendramodi) September 7, 2015
Emphasised on new initiatives in areas of governance using space technology apps & called for seeking ideas from tech-savvy young generation
— NarendraModi(@narendramodi) September 7, 2015
Space science has a vital role in achieving good governance. Our space programme must benefit the common citizens. http://t.co/4jsav0Y5LO
— NarendraModi(@narendramodi) September 7, 2015