Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अखिल भारतीय प्राचार्य संमेलनात पंतप्रधानांचे वक्तव्य

अखिल भारतीय प्राचार्य संमेलनात पंतप्रधानांचे वक्तव्य


काही काळापूर्वी भाईजी आले होते तेंव्हा त्यांचे म्हणणे होते की सगळ्यांबरोबर बातचीत करण्याचा कार्यक्रम ठेवा. बातचीत करण्याचा कार्यक्रम ठरला नाही मात्र भाषणाचे ठरले. आचार्य असेपर्यंत विद्यार्थ्यांशी संबंध येतो मात्र प्राचार्य बनल्यानंतर जास्त संबंध येतो तो कारकूनांशी. कागद आणि फाईलींमधे जास्त वेळ जातो. या दोन्ही व्यवस्था भिन्न आहेत. मात्र आपल्याकडे गेली अनेक वर्ष ही परंपरा आहे की सर्वात ज्येष्ठ आचार्य असतात ते प्राचार्य बनतात. त्यांच्याकडे व्यवस्थापन क्षमता आहे की नाही, व्यवस्थापकीय कामात त्यांना रुची आहे की नाही याला महत्त्व दिले जात नाही, तर स्वाभाविकपणे ही जबाबदारी सोपवली जाते. म्हणूनच विद्यार्थ्यांचे काय होणार यापेक्षा विद्यालयाचे काय होणार हे काम तुमच्यासमोर अधिक राहते. याचाच अर्थ असा की आज शिक्षणाचे, ज्ञानाचे इतके मार्ग उपलब्ध आहेत, माहिती मिळविण्याचे इतके मार्ग उपलब्ध आहेत, ते इतके सरळ सोपे आहेत, अशा स्थितीत विद्या भारतीकडे लोकांचे लक्ष कसे वेधून घ्यायचे हे आव्हान तुमच्यासमोर राहते.

“विद्या भारतीचे विद्यालय” याची प्रतिमा काय आहे? एका शहरात 100 शाळा आहेत त्यात आमची पण एक आहे. या 100 शाळांत आम्ही कुठे आहोत? आमची एक शाळा होती त्या आता दोन झाल्या आहेत. पहिल्यांदा 800 विद्यार्थी होते आता 1600 झाले हा मापदंड आहे का? हा मापदंड असला तर समाजात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना, शिक्षण आणि संस्कार दोन्हींची सांगड घालून एकमेकांसमवेत ते रहावेत अशी ज्यांची इच्छा आहे, त्यांची जबाबदारी जास्त वाढते.

आज हिंदुस्तानात कोणत्याही व्यक्तीला आपण विचारले, मग ती व्यक्ती कितीही श्रीमंत असो, कितीही गरीब असो, त्याला आपण विचारले की तुझी इच्छा काय? महत्त्वपूर्ण इच्छा काय आहे? तर अगदी श्रीमंतातली श्रीमंत व्यक्ती असो किंवा गरीबातली गरीब व्यक्ती असो, ती व्यक्ती हेच उत्तर देईल की माझ्या मुलांना चांगले शिक्षण मिळू दे. तुम्ही ड्रायव्हरलाही विचारलेत तरी तो म्हणेल की मुलांना चांगले शिक्षण द्यायचे आहे, माझे आयुष्य यातच चालले आहे मात्र मुलाला यातुन बाहेर काढायचे आहे. प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते ती म्हणजे मुलांना शिक्षण मिळू दे. करोडो-करोडो लोकांच्या मनात ही इच्छा असते. चांगले शिक्षण याचा अर्थ असा नाही की त्यांना चांगल्या शाळा उपलब्ध नाहीत. चांगले शिक्षण याचा अर्थ असा नाही फी देऊन त्यांना दुसरी चांगली शाळा मिळत नाही, चांगले शिक्षण याचा अर्थ त्यांची संकल्पना स्पष्ट आहे की उत्तम शिक्षक कुठे आहेत. माझ्या मुलाच्या जीवनात बदल घडविण्यासाठी रुची असणारी व्यवस्था कुठे आहे? कुटुंबातून मी त्याला देऊ शकतो, त्यापेक्षा जास्त देणारी व्यवस्था कुठे असेल याचा शोध असतो. काही ठिकाणी पैसा असेल तर कोणत्या ना कोणत्यातरी शाळेत नाईलाजास्तव भर्ती करतात आणि मग घरी शिक्षकाची शिकवणी लावतात. तो येतो मुलांना शिकवतो, त्याच्या करियरसाठी जे काम करायला हवे ते करतो. अशा स्थितीत एका संस्थेच्या 12 हजार शाळा खूप आहेत मात्र या देशासाठी अशा 12 हजार शाळा खूपच कमी आहेत. अशा लाखो शाळा असल्या तरी त्याही कमी पडतील एवढी आवश्यकता आहे. 32 लाख विद्यार्थ्यांचं जीवन एकमेकांसमवेत गुंफले गेले आहे. मी या व्यवस्थेशी अगदी जवळून परिचित आहे. अनेक वर्ष मी ही व्यवस्था जाणतो, समजतो. या व्यवस्थेबरोबर मी जगलो आहे आणि म्हणूनच मी अनेक गोष्टी जाणतो. आपण हे आव्हान स्वीकारायला तयार नाही, की या साऱ्या व्यवस्थेच्या शिखरावर आम्ही असू. आम्ही विस्तार तर करत आहोत, काही ठिकाणी तो आपणहूनच होत आहे. मात्र दर्जाच्या दृष्टीने यात देशभक्ती हा सर्वात मोठा मुख्य मुद्दा राहतो. विद्या भारतीच्या शाळांमधे, देशासाठी ऑलिंपिक पदक आणणे, देशभक्ती आहे की नाही? ऑलिंपिक पदक आणणे देशभक्ती असेल तर इतक्या मोठ्या क्रीडा स्पर्धा चालल्या आहेत आणि तुम्ही सांगितले की राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी चालली आहे. आपल्या 12 हजार शाळांमधून 2 हजार अशा शाळा निघतील की, ज्या या कामावर भर देतील आणि निश्चित करतील 2020 मध्ये जेव्हा ऑलिंपिक स्पर्धा असतील तेंव्हा विद्याभारतीचे हे विद्यार्थी आपल्या देशासाठी नक्कीच मानसन्मान प्राप्त करतील, सुवर्ण पदकांची कमाई करतील. आपल्याला आपले लक्ष्य बदलण्याची गरज आहे, असे मला वाटते. आपण देशाला, प्रत्येक क्षेत्राला असे नेतृत्व देऊ शकतो की जे अभिमान बाळगू शकेल की या अशा परंपरेनं मला घडवलेय, या संस्कारांनी मला सजवलंय आणि आज मी इथे बसून देशाची सेवा करतोय. याचे गौरवगान करण्याची वेळ कशी येईल?

जर 77 मध्ये विद्या भारतीचा एक संघटना म्हणून उदय झाला. 50 वर्ष साजरी करण्याबाबत तुम्ही चर्चा करतच असाल, तुमच्या कार्यक्रमांमध्ये ही अशी चर्चा चालत असेल. मग जर का आपण 50 वर्ष साजरी करत असू, सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असू, तर आपण असे लक्ष्य निश्चित करायला हवं, जे या आधी कधीच झाले नव्हते. जे कधी विद्या भारतीच्या दृष्टीक्षेपात नव्हते, असे लक्ष्य निश्चित करु शकतो. जे प्राचार्य आहेत, त्यांच्यावर अशा प्रकारच्या कामाची जबाबदारी आहे, एका प्रकारे आपल्या शाळेचं “ब्रँडीग” करण्याची मोठी संधी कोणाकडे असेल तर ती प्राचार्यांकडे असते. आपण असे लोक आहोत जे चारही बाजूंनी ज्ञान येऊ द्या ही गोष्ट मानतो. आम्ही कधी ज्ञानाची दारे बंद केली नाहीत, आम्ही कोणत्याही ज्ञानाच्या प्रवाहामुहे भयभीत झालो नाही, विचलित झालो नाही. आज आपण आपल्याला विचारु शकतो का? मी जगाच्या कोणत्याही काना-कोपऱ्यातील उत्तमातील उत्तम गोष्टी आहेत, त्या ऐकण्याएवढे समजून घेण्याएवढे आमचे मन खुले आहे का? आम्ही त्याचाशी मेळ साधून आपलं ज्ञान अधिक धारदार करु शकतो का? कारण आपल्याला वेदकाळापासून हे तत्त्वज्ञान मिळालं आहे की चारी बाजूंनी येणारे विचार येऊ द्या, ज्ञानाला येऊ द्या हे वेदकाळापासून आम्ही म्हणतो आहोत. आम्ही “वसुधैव कुटुंबकम्” असे म्हणणारे लोक आहोत. वेदकाळापासून हे म्हणतोय. जर हे संपूर्ण जग माझे कुटुंब असेल तर “कोण”, “का”, “कुठे राहतो”, “कसा राहतो”, “कुठल्या स्थितीत राहतो”, “कुठल्या वर्णाचा आहे” ह्या सर्वांशी माझे काही देणं-घेणं नाही, कारण मी संपूर्ण जगाला माझे कुटुंब मानतो. मी याच प्रकारे सर्व विश्वाच्या जीवनाच्या विकासात काही भूमिका पार पाडू शकलो, तर मला त्या कुटुंबाचे वातावरण त्याच प्रकारे तयार करायला हवे.

हल्ली आपल्या देशात आणि सर्व जगात एकच चर्चा सुरु आहे “वातावरण बदल, जागतिक तापमान वाढ” आपण आपल्या मुलांसाठी वृक्षारोपण, झाडे लावण्याचा कार्यक्रम वर्षातून एखादा करतो. पण 12 हजार शाळांसाठी हे एक ध्येय बनू शकत नाही का? ज्यामध्ये स्थानिक प्रशासनाला सांगू शकू की आम्हाला, आमच्या शाळेला 100 झाडे दत्तक घ्यायची आहेत, आम्हाला जागा द्या, आम्ही या शहराला 100 झाडे देतो- 5 वर्षात देतो, हेच आमचे योगदान असेल. याचा फायदा असा होईल, की आमच्या सर्व मुलांना पर्यावरणाचे शिक्षण आपोआप मिळेल आणि समाजासोबत जोडले जाणे सहज साध्य होईल. आपण समाजजीवनात कशा प्रकारे बदल घडवून आणू शकतो? हल्ली सरकारकडून आता एक मोहीम राबवली जात आहे. “वीज वाचवा” आपले 32 लाख विद्यार्थी ऊर्जा बचतीचे सर्वात मोठे दूत बनू शकतात का? ते 32 लाख विद्यार्थी कमीत कमी 10 कुटुंबांना भेटून ऊर्जा बचतीबद्दल माहिती देऊ शकतील. प्रत्येक विद्यार्थी त्या 10 कुटुंबांचा नेता बनू शकतात आणि ते ही लहान वयात. आपण त्याला असे काय देऊ शकतो की त्याच्यावर तुला या देशाचे भले करायचे आहे, तर त्याची सुरुवात कुठून तरी करायलाच लागेल हे संस्कार होऊ शकतील. LED बल्ब… देशातील 100 मोठी शहरे… जर त्यांनी आपल्या पदपथावरील दिवे LED केले आणि या शहरातील घरांमध्ये जे दिवे आहेत, ते LED बल्ब केले तर केवळ या 100 शहरांमध्येच 20 हजार मेगावॅट वीजेची बचत होऊ शकते. 20 हजार मेगावॅट वीजेची बचत या पेक्षा आणखी मोठी देशभक्ती काय असू शकेल? लाखो करोडो खर्चून 20 हजार मेगावॅट वीजेची निर्मिती होईल आणि त्यासाठी 4 वर्ष-6 वर्ष लागतील आणि आपण 20 हजार मेगावॅट वीज निर्मिती केली, तर गरीबाच्या घरात वीज पोहोचवण्याचे एक खूप पुण्यकर्म आमच्या हातून होऊ शकेल. आपल्या विद्या भारतीच्या 12 हजार शाळांमध्ये LED बल्ब आहेत का? LED बल्ब नाहीत कारण तो सरकारचा कार्यक्रम आहे. LED बल्ब यासाठी पाहिजेत की जर आज तुमचे वीजेचे बील 300 रुपये येत असेल, तर ते आता कदाचित 200 रुपये यायला लागेल. म्हणजे विद्या भारतीचे 100 रुपये तर वाचणार आहेत. मी कधी विद्या भारतीला देणगी नाही दिली, पण मी हे देऊ शकतो. माझ्या सांगण्याचे तात्पर्य हे आहे की, मी जसे आत्ता पाहिले… तुम्ही चित्रपटात सांगितलं की मुलांवर संस्कार होत आहेत, ते केर-कचरा गोळा करत आहेत, स्वच्छतेचे काम करत आहेत. स्वच्छता हे स्वभावाचे अंग बनले पाहिजे. आरोग्य अहवाल असे सांगतात की, अनेक देश असे आहेत, विशेषत: हे विकसनशील देश, जिथे जे बालमृत्यू होतात, त्यापैकी 40 टक्के बालकांचा मृत्यू हात न धुता अन्न खाण्याच्या सवयीमुळे होतात. आमचे 32 लाख विद्यार्थी आपल्या आजू-बाजूला, शेजारी, मोहल्ल्यात जाऊन या बाबतीत पुढाकार घेऊ शकतात, नेतृत्व करु शकतात, सांगू शकतात की हात धुतल्याशिवाय अन्न खाणारं असे एकही मूल असता कामा नये, ते स्वत: प्रतिनिधी बनू शकतात.

आणि म्हणूनच विद्या भारतीने जे हे इतकं मोठं आंदोलन सुरु केलं आहे ज्यामध्ये संस्कार सर्वश्रेष्ठ आहेत. ज्यामध्ये देशभक्ती ओतप्रोत भरली आहे. ज्यांच्या वाणीत, वर्तनात, उपदेशात, सिद्धांतांमध्ये साधेपणा आहे. या सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या सहजरित्या प्राप्त होत नाहीत. ज्या तुम्ही 50 वर्षाच्या तपस्येनं प्राप्त केल्या आहेत. परंतु ही तुमची संपत्ती नाही ही संपूर्ण देशाची संपत्ती आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या चाकोरी बाहेर पडून याचा प्रसार करायला सुरुवात करता तेव्हा ही संपत्ती देशाची बनते.

आज काळाची गरज आहे; वातावरण पण असे आहे की देशातला प्रत्येक व्यक्ती या बदलांची अपेक्षा करत आहे; आणि आता विद्या भारतीने हा निश्चय केला आहे की 12 हजार पैकी प्रत्येक राज्यामध्ये अशी शाळा निर्माण करणार जी त्या राज्यातील सर्वोत्तम शाळा असेल. 12 हजारच्या 15 हजार नाही झाल्या तरी चालतील; परंतु 12 हजारांमध्ये प्रत्येक राज्याची एक शाळा त्या राज्यातील मानांकीत शाळा बनेल. तुम्ही बघालच या संस्कारुपी व्यक्तिची ताकद किती होईल ते.

मी जेव्हा गुजरात मध्ये होतो तेव्हा आय एस अधिकारी यायचे, आयपीएस अधिकारी यायचे तेव्हा त्या नवीन लोकांच्या बोलण्या चालण्याच्या पद्धतीत काम करण्याच्या पद्धतीत मोठा फरक दिसून यायचा. तेव्हा माझ्या मनात चलबिचल व्हायची आणि मी हळूच कधीतरी त्यांना विचारायचो की तुमचे शिक्षण कुठे झाले? आणि तेव्हा माझ्या लक्षात यायचे की अधिकाऱ्यांपैकी अधिकाधिक विद्या भारतीचे विद्यार्थी आहेत. तो आयएस झाला, आयपीएस झाला परंतु मी हे पाहिले आहे की त्याचे प्राधान्य हे सामान्य मानवाच्या समस्या आहेत. त्यांच्या प्रती त्याला ओढ वाटायची तो सावध रहायचा कारण ज्या शाळेत तो शिकला तिथे त्याने दिवस रात्र हेच ऐकले आहे. आता ही लहान सेवा राहिलेली नाही. ही खूप मोठी सेवा आहे की ती अशा व्यक्ति घडवत आहेत ज्या गरिबांच्या प्रती इतक्या संवेदनशील आहेत. समाजाप्रती इतक्या संवेदनशील आहेत. आपल्याला ह्या गोष्टीचा कधी गर्व होतो का?

जेव्हा आपण 50 वर्षांचा महोत्सव साजरा करु तेव्हा आपण विद्या भारतीच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्रित बोलवू शकू का? तुमचे विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात कुठ पर्यंत पोहचले असतील, काही तर निवृत्त देखील झाले असतील. त्या सर्वांचा एक डिजिटल रेकॉर्ड तयार करायला हवा आणि मला असेही वाटते की विद्या भारतीचे स्वत:चे डिजिटल नेटवर्क असले पाहिजे. 50 वर्षात तुमच्या इथून जितकी मुलं उत्तीर्ण होऊन गेली आहेत त्या सर्वांचा डिजिटल रेकॉर्ड तयार करायला हवा आणि हे आजच्या युगात खूप आवश्यक आहे. भाईजींनी जर एक संदेश पाठवला तर तुमच्या दिड लाख शिक्षकांच्या मोबाईल फोन मध्ये सकाळी तो संदेश का पोहचू नये? इथे कोणीही शिक्षक असा नसेल ज्याच्याकडे मोबाईल फोन नाही.

सांगण्याचे तात्पर्य हे आहे की तंत्रज्ञान… मला हे माहित आहे की विद्या भारतीने यावर अनेक वर्ष खर्ची केले परंतु आता आपण तंत्रज्ञानाचे महत्त्व स्विकारले आहे. तुम्ही यापासून दूर पळू नाही शकत. आता जे आहे त्याचे रुपांतर संधींमध्ये कसे करु शकतो? तंत्रज्ञानाची स्वत:ची एक ताकद आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान पासून जर आपण लांब राहिलो तर त्यामुळे आपल्या विकासाची गती मंदावते. आपण बदलांना स्विकारले पाहिजे. आपण तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भाषणातून तुम्ही अर्धा तास विद्या भारतीच्या कार्याची माहिती मला सांगितली असेल परंतु तुम्ही 3 मिनीटांची फिल्म दाखवली. दोघांमध्ये इतके अंतर आहे; या फिल्म मधून मला लगेच कळले की विद्या भारतीचे कार्य काय आहे; परंतु तुम्ही जर अर्धा तास भाषण दिले असेल तर मला नसते समजले.

हे एक उदाहरण आहे, हे तंत्रज्ञानामुळे शक्य झाले. हे खूप गरजेचे आहे कारण विद्या भारती सारख्या संस्थेच्या अशा ताकदीमुळे प्रत्येक शाळेत प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांमुळे, शिक्षकांमुळे, पालकांमुळे अशा सकारात्मक घटना घडत असतील ज्याचा समाजाला अभिमान आहे. आपण हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमच्या सर्व 12 हजार शाळांमध्ये तासाभरात पोहचवू शकतो का? हो नक्कीच….

सकारात्मक वातावरणाचा प्रसार करण्यासाठी सध्या तंत्रज्ञानापेक्षा चांगले माध्यम नाही. नकारात्मकतेसाठी सर्व जग आहे; परंतु कोणीतरी असावे जे सकारात्मकतेसाठी आपले सर्वस्व पणाला लावेल आणि हे तुमच्यामुळे शक्य होईल.

मला हे मुळीच वाटत नाही शिक्षण आणि संस्कार हा पालकांचा विषय आहे; आणि संस्काराची माझी सोपी व्याख्या आहे… प्रयत्नपूर्वक विकसीत केलेली चांगली सवय हेच संस्कार आहेत आणि अजून काय? आणि म्हणूनच तुमच्याकडे त्या वयोगटातले विद्यार्थी असतात ज्यांच्यात अशा सवयी विकसित होतात आणि पुढे जाऊन त्या संस्कार होतात. सामुहिकतेला महत्त्व दिले जाते. सध्याच्या युगात ही खूप मोठी गरजेची गोष्ट आहे नाहीतर प्रत्येक जण एक स्वतंत्र “बेट” बनत चाललय. जर मनुष्य बेट बनला तर काय होईल? सामूहिकपणा खूप गरजेचा आहे. सध्या सर्वसाधारणपणे लोकांना सामूहिकतेपासून दूर जाण्याची सवय जडत आहे. आधी बस मधून जायचा, मेट्रो ने जायचा मग हळू हळू कार ने जाणं आवडू लागलं. याचं एकच कारण आहे गर्दी नको एकांत हवा. विद्या भारतीने नेहमीच हे सांगायचा प्रयत्न केला आहे की, गर्दीत रहा, गर्दीबरोबर चाला बघा आयुष्य जगण्याचा आनंद काय असतो. हा खूप मोठा संस्कार आहे. याला आपण आपली ताकद कशी बनवू शकतो?

जगाच्या कुठच्याही कानाकोपऱ्याविषयी बोलून संस्कार देऊ शकतो, त्याचे स्वत:चे सामर्थ्य आहे. तेव्हाच आपला व्यवहार-वागणूक व्यापक होईल. आपला जो व्यवहार शब्दकोष आहे तो हजार बाराशे शब्दांचा आहे. आपण आपल्या या शब्दकोषाला एक लाख शब्द असलेले कसे बनवू शकतो? आपला व्यवहार शब्दकोष जर वाढत गेला विस्तृत होत गेला तर समाजातले अन्य लोग ज्यांना ही भाषा समजते त्यांच्यापर्यंत आपण हे पोहचवू शकतो. त्यांच्या गोष्टी आपण समझू शकतो.

एकल विद्यालय अभियानाबाबत खूप कमी लोकांना माहिती असेल की एकूण 50-52 हजार एकल विद्यालये विद्या भारती शिवाय अन्य लोकांकडून चालवण्यात येत आहेत. दूर लांब जिथे शिक्षक जायला तयार नसतात, जिथे सरकार पोहोचायला तयार नाही तिथे विद्यालय काम करत आहे. सामाजिक जीवनात बदल घडवून आणत आहेत. खूप लोकं असतात जी आयुष्यात केवळ एक संधी शोधत असतात, काही तरी हवं असतं. ही संधी देण्याचे काम आणि प्रामुख्याने विद्या भारतीचे काम गरीब वस्त्यांमध्ये सुरु झाले आहे, समाजातील शोषित वंचित लोकांमध्ये सुरु झाले आहे. मात्र शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचे प्रयत्न झाले आहेत. आणि त्या अर्थाने विद्या भारतीने खूप मोठी सेवा केली आहे. तुम्हा सर्वांकडून देशाच्या अपेक्षा देखील खूप आहेत. तुम्ही सर्व प्राचार्य, तुमच्या इथे शिक्षण उत्तम चालत असेल कारण त्याची एक व्यवस्थित यंत्रणा तयार असेल, मात्र तुमची स्वत:ची शाळा, जी तुम्ही सांभाळत आहात, ती अव्वल क्रमांकावर कशी येईल? यावर तुम्ही लक्ष केंद्रीत करा, एवढीच माझी अपेक्षा आहे.

खूप-खूप धन्यवाद!

N. Chitale / J.Patankar / S.Mhatre/ S.Kane/S.Tupe / M. Desai