Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिका भारत व्यापार परिषदेच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत पंतप्रधानांनी केलेले प्रमुख भाषण

अमेरिका भारत व्यापार परिषदेच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत पंतप्रधानांनी केलेले प्रमुख भाषण


स्त्री आणि पुरुषगण ,

1. राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांच्या या मोठ्या आणि प्रतिष्ठित समुदायामध्ये पुन्हा उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होत आहे. याआधी आज मी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना भेटलो आणि आम्ही दोन्ही देशांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर आमचे विचार व्यक्त केले. अमेरिकेबरोबरचे भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाले आहेत आणि भविष्य अधिक उज्वल असेल याबाबत आम्ही दोघे सहमत आहोत.

2. जागतिक अर्थव्यवस्था अजूनही मंदीच्या छायेत असताना मी तुमच्याशी संवाद साधत आहे . जगातील अनेक भाग अजूनही कठीण परिस्थितीला सामोरे जात आहेत . अशावेळी जगाला विकासाच्या नवीन इंजिनची गरज आहे . जगातील सर्वात जुन्या लोकशाहीच्या दृष्टीने नवीन इंजिने लोकशाही इंजिने असणे योग्य ठरेल. तुम्हाला हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे कि आज जागतिक विकासाचे नवे इंजिन म्हणून योगदान देण्यासाठी भारत सज्ज आहे.

3. मोठी भारतीय अर्थव्यवस्था जगासाठी अनेक दृष्टीने लाभदायक आहे. त्यामुळे भारत ही मोठी आणि वाढणारी बाजारपेठ आहे . परंतु भारत निव्वळ बाजारपेठ नाही तर त्याहून अधिक आहे. भारत आहे –

• एक विश्वासू भागीदार

• उच्च दर्जाच्या वैज्ञानिक , अभियांत्रिकी आणि व्यवस्थापकीय बुद्धिमत्तेचा स्रोत

• विकास कल्पना आणि प्रयोगांची मूस

• उच्च दर्जाच्या संशोधन आणि विकासाचा प्रभावी स्रोत

• आणि लोकशाही आणि जलद विकास एकत्रित शक्य असल्याची साक्ष

४ . भारत विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत असताना त्याला अमेरिकेच्या उद्यमशीलता आणि अभिनवतेच्या परंपरेतून खूप काही शिकण्यासारखे आहे . विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्णतेच्या बाबतीत अमेरिका आघाडीवर आहे.

हवाई वाहतूक नियंत्रण ते हवेची गुणवत्ता सुधारणे

ड्रग्स पासून ड्रोन्स पर्यंत

हायब्रीड गाड्यांपासून हायड्रो फ्राकिंग पर्यंत

खरंच , माझ्यासाठी अमेरिका हा केवळ महान भूतकाळ असलेला देश नाही तर उत्साहवर्धक भविष्य असलेला देश आहे . म्हणूनच मला खात्री आहे की आमच्या भागीदारीचा दोन्ही देशांना फायदा होईल.

५. भारत-अमेरिका संबंधांचे एक आगळे वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकन अर्थव्यवस्थेत भारतीय -अमेरिकन समुदायाची महत्वपूर्ण भूमिका . एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतरित झालेल्याना दोन्ही देशांमध्ये अशा प्रकारचा आदर आणि प्रतिष्ठा मिळणे ही दुर्मिळ गोष्ट आहे . आमच्या वाढत्या आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधांमध्ये भारतीय -अमेरिकन ही अजोड शक्ती आहे.

६ पंतप्रधान म्हणून मी नुकतीच दोन वर्षे पूर्ण केली . २०१४ मध्ये जेव्हा मी तुम्हाला संबोधित केले तेव्हा मी नुकताच सरकारचा कार्यभार स्वीकारला होता . आम्ही आव्हानात्मक अशा देशांतर्गत तसेच बाह्य स्थितीचा सामना केला . गुंतवणूकदारांचा विश्वास गमावलेला होता . भारतीय अर्थव्यवस्थेच्या भवितव्याबाबत संशय व्यक्त केला जात होता

. व्यवस्थेतील शैथिल्य आणि साचलेपण यामुळे उद्योग समुदाय नाराज होता . जुनी धोरणे आणि लाल फितीचा कारभार यामुळे नैराश्येचे वातावरण होते . दोन वर्षात या समस्यांवर आम्ही मात करू शकलो आणि उत्तम आर्थिक कामगिरी नोंदवली .

७. या निमित्ताने मी तुम्हाला आमच्या धोरणांच्या प्रमुख घटकांबाबत माहिती देऊ इच्छितो . मी अनेकदा म्हटले आहे कि परिवर्तन घडवून आणण्यासाठी सुधारणा करणे हे माझे ध्येय आहे. माझ्यासाठी, सुधारणा म्हणजे अशी धोरणे ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात परिवर्तन होईल. गेल्या दोन वर्षात , आम्ही सर्वसमावेशक सुधारणा केल्या ज्या आर्थिक सुधारणांच्या पलीकडे जाणाऱ्या होत्या .

मी त्यांचे चार भागात वर्गीकरण करेन .

एक , मजबूत पाया निर्माण करण्यासाठी मायक्रो -आर्थिक धोरणे

दोन , गुंतवणूक आणि व्यापाराच्या माध्यमातून विकास आणि रोजगाराला उत्तेजन देण्यासाठी आणि कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी धोरणे

तीन , महिला आणि शेतकरी यांच्यासह समाजातील दुर्बल घटकांना आणि गरीबाना विकासाचा लाभ मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी धोरणे

चार , भ्रष्टाचारावर घाला .

८. मी मायक्रो अर्थव्यवस्थेपासून सुरुवात करतो .

९. आम्ही कार्यभार स्वीकारल्यापासून चलनवाढ , वित्तीय तूट आणि चालू खात्यातील तूट या सर्वांमध्ये घट झाली आहे . स्थूल राष्ट्रीय उत्पादन , परकीय गंगाजळीचा साठा ,शेअर बाजारातील मूल्यांकन आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे . हे यश आमच्या सुनियोजित धोरणांच्या मालिकांचा परिणाम आहे . चलनवाढ आटोक्यात आणण्यासाठी आम्ही स्वतंत्र वित्तीय धोरण आणि चलनवाढ उद्दिष्टासह वित्तीय आराखडा तयार केला . आम्ही आर्थिक एकत्रीकरणाच्या मार्गावर आहोत आणि आत्तापर्यंतच्या तीनही अर्थसंकल्पांमध्ये आमच्या वित्तीय तुटीत लक्षणीय घट झाली आहे . वित्तीय तूट कमी करताना आम्ही सार्वजनिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे .

१०. हे दोन मार्गांमुळे शक्य झाले . एक, आम्ही जीवाश्म इंधनावर कार्बन कर लावला . डिझेलच्या किमतीं नियंत्रण मुक्त करण्याचे धाडसी पाऊल आम्ही उचलले आणि त्याद्वारे उर्जा अनुदान बंद केले . त्याऐवजी आम्ही कर लादला . स्वच्छ पर्यावरण अधिभार आठ टक्क्यांनी वाढवून तो ५० रुपये प्रति टन वरून ४०० रुपये प्रति टन केला . जागतिक स्तरावर कार्बन कराबाबत फक्त मोठ मोठ्या गप्पा मारल्या जातात , मात्र त्या गप्पापुरत्या मर्यादित असतात . आम्ही प्रत्यक्ष कृती केली आहे . दुसरे म्हणजे , आम्ही अभिनव पद्धती आणि तंत्रज्ञानाच्या वापराच्या माध्यमातून वायफळ खर्च कमी केला . पूर्णपणे सुरक्षित अशा बायो-मेट्रिक ओळखपत्राच्या मदतीने पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात आम्ही अनुदानाची रक्कम थेट जमा केली .

११. आता मी विकास आणि रोजगाराला प्रोत्साहन देणाऱ्या आमच्या धोरणांकडे वळतो . इथे उपस्थित श्रोत्यांना कदाचित व्यापक उदारीकरणाबाबत माहिती असेल जे आम्ही परकीय थेट गुंतवणुकीबाबत अवलंबले आहे . आम्ही बहुतांश क्षेत्रे स्वयंचलित मंजुरीच्या कक्षेत आणली आहेत आणि संरक्षण आणि रेल्वे सारखी क्षेत्रे परदेशी गुंतवणुकीसाठी खुली केली आहेत . दीर्घ काळ प्रलंबित विमा कायदा सुधारणा यशस्वीपणे मंजूर झाल्या . अमेरिकन कंपन्यांसह अनेक विमा कंपन्यांनी विमा क्षेत्रातील त्यांची गुंतवणूक वाढवली आहे. व्यापार करण्यातील सुलभता वाढवण्यासाठी आम्ही प्रमुख पावले उचलली आणि जागतिक मानांकनात आमची आगेकूच सुरु आहे. देशी आणि परदेशी गुंतवणूकदाराना उच्च दर्जाच्या आणि कार्यक्षम निर्माण सुविधा उभारण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करत आहोत . दळणवळण सुधारण्यासाठी आम्ही रस्ते, रेल्वे, बंदरे आणि जलमार्ग यामधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवली आहे . बंदरांमध्ये माल जहाजांचा येण्या-जाण्याचा वेळ कमी करण्यासाठी आम्ही आमच्या बंदरांमध्ये प्रमुख प्रक्रिया सुधारणा केली आहे . तुमच्या देशातील स्टार्ट -अप परिसंस्थेची आम्ही प्रशंसा करतो . त्याची इथे अंमलबजावणी करण्यास आम्ही प्रारंभ करत आहोत . आमच्या स्टार्ट -अप भारत कार्यक्रमाने नवउद्यमिंच्या नव्या प्रजातीला उत्तेजित केले आहे . २०१६ मध्ये नाविन्यपूर्ण केंद्रांसाठी बंगळूरू हे पाचवे सर्वाधिक प्राधान्य असलेले ठिकाण बनले आहे . २०१५ मध्ये ते अव्वल दहामध्येही नव्हते ..

१२. आमची अर्थव्यवस्था सक्षम होण्यासाठी आम्हाला एका मजबूत बँकिंग व्यवस्थेची गरज आहे . आम्हाला अशी व्यवस्था वारशाने लाभली आहे ज्यात बँकिंग निर्णयांमध्ये तसेच सार्वजनिक बँकांमधील नियुक्त्यांमध्ये पक्षपात आणि भ्रष्टाचार सर्रास आढळतात . मी प्रथमच बँक प्रमुखांशी पंतप्रधानांचा संवाद घडवून आणला . आम्ही स्वच्छ कामगिरी पध्दती आणि उत्तरदायित्व यंत्रणा उभारली . पुरेसे भांडवल सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत . बँकिंग निर्णयांमधील हस्तक्षेप संपुष्टात आला . बँक बोर्ड ब्युरो अंतर्गत नियुक्तीसाठी नवी प्रक्रिया आणली. बँकांच्या प्रमुखपदी विश्वासार्ह आणि सक्षम बँकरची नियुक्ती केली . ४७ वर्षांपूर्वी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर प्रथमच खासगी क्षेत्रातील व्यावसायिकांची प्रमुख पदांवर नियुक्ती करण्यात आली .

१३. विकास सर्वसमावेशक असावा यासाठी आम्ही आखलेल्या धोरणांकडे मी आता वळतो . जन धन योजनेच्या माध्यमातून आम्ही २० कोटी लोकांना बँकिंग व्यवस्थेत आणले . जगातील बहुतांश देशांच्या लोकसंख्येपेक्षा हा आकडा अधिक आहे. आता हे कोट्यावधी लोक आमच्या बँकिंग व्यवस्थेचा भाग आहेत . आणि ‘व्याजदरा ‘ सारखे शब्द त्यांच्यासाठी अर्थपूर्ण आहेत . या लोकांनी दाखवून दिले कि पिरामिडच्या तळाशी अधिक सामर्थ्य असते . विश्वास ठेवा किंवा ठेवू नका , जन धन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांमध्ये आज जवळपास सहा अब्ज डॉलर्स इतकी एकूण शिल्लक आहे .

१४. जन-धन योजनेने गरीबांना इलेक्ट्रॉनिक देयके भरण्याची व मिळवण्याची क्षमता मिळवून दिली आहे . प्रत्येक जन धन खातेधारक डेबिट कार्ड साठी पात्र आहे . भारतीय बँका आणि टपाल कार्यालयांना ‘मोबाईल एटीएम ‘चे परिचालन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे . मोबाईल एटीएम हे हातात मावणारे उपकरण आहे ज्याच्या माध्यमातून रोख रक्कम काढता येते आणि साधी बँक कामे देखील करता येतात .

१५. नवीन सामाजिक सुरक्षा योजनांच्या माध्यमातून आम्ही सुरक्षेचे जाळे पुरवले आहे . आम्ही तीन विना-अनुदानित मात्र कमी खर्चाच्या योजना सुरु केल्या आहेत ज्यामध्ये अपघात विमा,जीवन विमा आणि निवृत्तीवेतन समाविष्ट आहे . त्यांच्या विशाल व्याप्तीमुळे हप्त्याची रक्कम कमी आहे . याचे आता सुमारे १२० कोटी नोंदणी धारक आहेत .

१६. महिलांचे सशक्तीकरण आणि लिंगसमानता यावर आम्ही विशेष लक्ष दिले आहे . मुलींच्या शिक्षणावरील खर्चासाठी आम्ही खास उच्च व्याजदराचा नवीन बचत कार्यक्रम सुरु केला आहे. लाकूड फाटा जाळून स्वयंपाक करण्याच्या आरोग्याला हानिकारक अशा त्रासातून ग्रामीण महिलांना मुक्त करण्यासाठी आम्ही गरीब ग्रामीण भागात ५ कोटी नवीन गैस जोडणी देत आहोत. आमच्या नवीन स्वयं-रोजगार अर्थसहाय्य कार्यक्रमांतर्गत (मुद्रा), ७० %हून अधिक महिला आहेत. महिला अध्यक्ष असलेल्या २७ दशलक्ष हून अधिक उद्योगांना मदत पुरवण्यात आली आहे. सशस्त्र दलांमध्ये लढाऊ भूमिकांमध्ये महिलांना परवानगी मिळावी म्हणून आम्ही आमच्या धोरणांमध्ये बदल केले. नवीन नियमांमुळे कॉर्पोरेट संचालक मंडळांमधील महिलांचे प्रतिनिधित्व वाढत आहे .

१७. उपजीविका पुरवण्यामध्ये शेती हा भारताचा आधार राहिला आहे . अनुदानित खतांचा वापर रसायनांच्या उत्पादनात करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यापासून वंचित ठेवले जात होते. यावर अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे खताला कडूनिंबाचे आच्छादन करणे, ज्यामुळे त्याचा अन्यत्र वापर होऊ शकणार नाही. आम्ही युरियाच्या सार्वत्रिक कडुनिंब आच्छादनाकडे वळले आहोत. यामुळे अन्यत्र वळवण्यात येणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या कृषी अनुदानाची बचत झाली असून शेतकऱ्यांनाही खतांचा पुरवठा वाढला आहे. सा ध्या सुधारणा किती प्रभावी ठरू शकतात त्याचे हे उदाहरण आहे.

१८. आम्ही राष्ट्रीय स्तरावर मृदा आरोग्य पत्रिका सुरु केले आहे जी प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या किंवा तिच्या मातीची माहिती देते. यामुळे शेतकऱ्याला सर्वोत्तम पिकाची आणि योग्य प्रमाणाची निवड करता येते . यामुळे अन्य सामुग्रीचा अनावश्यक वापर कमी होतो आणि पीक उत्पादन वाढते तसेच मातीचे संरक्षण होते. अनावश्यक रसायनाचा वापर कमी झाल्यामुळे ती ग्राहकांच्या आरोग्याला चांगली असतात. यामुळे खर्चात बचत होते, उत्पादन वाढते ,पर्यावरण सुधारते आणि ग्राहकांच्या आरोग्याचे रक्षण होते. १४ कोटी मृदा आरोग्य पत्रिका दिल्या जाणार असून यासाठी अडीच कोटीहून अधिक मातीचे नमुने गोळा करावे लागणार आहेत. त्यांचे देशभरातील सुमारे १५०० प्रयोगशाळांमध्ये परीक्षण केले जाणार आहे .

१९. आता मी तुम्हाला अशी एक कामगिरी सांगतो ज्याबाबत आमचे टीकाकार वाद घालू शकणार नाहीत . ते आहे भ्रष्टाचाराच्या पातळीत बदल. अनेक वर्षे,अर्थतज्ञ आणि अन्य तज्ञांनी कोणत्याही विकसनशील अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये भ्रष्टाचार एक प्रमुख अडथळा मानला आहे. भ्रष्टाचार संपवण्यासाठी आम्ही ठोस पावले उचलली. मी याआधीच सांगितले आहे आम्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये काय केले ते आम्ही प्रमुख साधनसंपत्तीच्या वाटपातील भेदभाव नष्ट केला आणि खाण , स्पेक्ट्रम आणि एफएम रेडिओ च्या परवान्यांच्या पारदर्शक लिलावाकडे वळलो . आणि थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून आम्ही गळती कमी केली . आम्ही आमच्या कर्मचारी व्यवस्थापनाची पुनर्रचना केली जेणेकरून वरिष्ठ पदांवर प्रामाणिक व्यक्ती राहतील . सध्या आम्ही कर चुकवेगिरी आणि काळ्या पैशाविरोधात मोहीम सुरु केली आहे. भ्रष्टाचार कमी झाल्याचा सर्वाधिक लाभ गरीबांना मिळणार आहे.

२०. भविष्याकडे पाहताना आगामी काळात आम्ही ज्या मार्गावरून जाऊ त्याची रूपरेषा मी तुम्हाला सांगतो .

२१. एक, आम्ही शिस्तबद्ध आणि विवेकी व्यापक आर्थिक धोरणे बनवण्याचा क्रम पुढेही सुरूच ठेवू. माझे हे स्पष्ट मत आहे कि दीर्घकालीन शाश्वत विकासासाठी मजबूत व्यापक आर्थिक मूलभूत तत्वे हा आवश्यक पाया आहे.

२२. दुसरे, याच बरोबर आम्ही समावेशकता आणि समानतेवर भर देणे सुरूच ठेवू . हे अशासाठी जेणेकरून विकासाचा लाभ केवळ काही लोकांना किंवा काही अधिक लोकांपुरता मर्यादित न राहता सर्व भारतीयांना मिळेल. याचा अर्थ असाही असेल कि आम्ही भ्रष्टाचारावर यापुढेही प्रहार करत राहू.

२३. तिसरे, आम्ही गुंतवणुकीचे वातावरण उत्तम बनवण्याबरोबरच व्यापार सुलभ करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच ठेवू. आम्ही भारताला असे केंद्र बनवू इच्छितो जे केवळ व्यापाऱ्यांचे स्वागत करणार नाही तर इथे व्यापार करणे देखील सोपे असेल . आम्ही आमची थेट परदेशी गुंतवणूक धोरणे बऱ्याच प्रमाणात उदार बनवून पहिले उद्दिष्ट जवळपास साध्य केले आहे . दुसरे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चांगली सुरुवात केली आहे आणि या दिशेने आम्ही यापुढेही सुधारणा करत राहू .

२४. आम्ही ‘मेक इन इंडिया’ अभियान मजबूत करणे सुरूच ठेवू. हे केवळ देशांतर्गत बाजारपेठेसाठी निर्मिती किंवा आयात पर्यायापुरते सीमित नाही . संपूर्ण जगासाठी जागतिक दर्जाच्या उत्पादनांची निर्मिती आणि सेवांसाठी देखील आहे . म्हणूनच आमच्यासाठी मुक्त व्यापारात सुधारणा करणे महत्वपूर्ण आहे. आमच्यासाठी हे अतिशय महत्वाचे आहे कि विकसित देशांनी भारतासारख्या देशातून वस्तूंसाठीच नाही तर सेवांसाठी देखील आपली बाजारपेठ खुली करावी. मी याकडे अमेरिका आणि भारत दोघांसाठी हि फायद्याची स्थिती मानतो . भारतात तरुण आणि कठोर परिश्रम करणाऱ्यांची संख्या अधिक असून तो भविष्यातील जगातील मनुष्यबळ महाशक्ती आहे . माझ्या दृष्टीने ,अमेरिकेचे भांडवल आणि अभिनवता तसेच भारताचे मनुष्यबळ आणि उद्यमशीलता यामध्ये भागीदारी अतिशय सामर्थ्यवान ठरू शकेल. माझी खात्री आहे कि अशा भागीदारीच्या माध्यमातून आपण दोघेही आपापल्या अर्थव्यवस्था मजबूत करू शकतो .

२५. आम्ही आमची कर विषयक धोरणे अधिक अनुमान वर्तवण्याजोगी बनवणे सुरूच ठेवू . आम्ही अमेरिकेबरोबर अनेक प्रगत मूल्य निर्धारण करारांवर स्वाक्षऱ्या करून या दिशेने पावले उचली आहेत. हे पुढे सुरु ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. याच बरोबर अमेरिकेप्रमाणे आम्ही कर चुकवेगिरी आणि अनुचित कर टाळण्या विरोधात कडक पावले उचलत आहोत.

२६. आम्ही आमचे संरक्षण क्षेत्र खुले करणे सुरु ठेवू . मला माहित आहे कि परवान्यांशी निगडीत धोरणे कधी-कधी भारताच्या संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीची प्रक्रिया मंदावू शकतात . आम्ही संरक्षण क्षेत्रासाठी अधिक सोपी आणि प्रभावी परवाना पद्धतीचा शोध घेत आहोत . अणु उर्जा क्षेत्रात आम्ही वेस्टिंगहाउस कडून ६ अणुभट्ट्या खरेदी करणार आहोत जे आपल्या आण्विक आणि वैज्ञानिक सहकार्यातील एक नवे युग ठरेल . मला त्यावेळी अतिशय आनंद झाला जेव्हा जीई हि नव्याने उदारीकरण झालेल्या रेल्वे क्षेत्रात प्रमुख गुंतवणूक करणाऱ्या कंपनी पैकी एक बनली . हि कंपनी बिहार सारख्या गरीब राज्यात एक रेल्वे इंजिन निर्मितीचा कारखाना उभारणार आहे . मला अशा प्रकारच्या अनेक गुंतवणुकीची अपेक्षा आहे .

२७. भारतासाठी गंगा नदीचे विशेष महत्व आहे . गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी सुरु करण्यात आलेला ‘नमामि गंगे’ कार्यक्रम वेग घेत आहे . आगामी काळात याला सर्वोच्च प्राधान्य असेल . पर्यावरणीय अभियांत्रिकी , जल आणि सांडपाणी व्यवस्थापनासारख्या क्षेत्रात मोठा अनुभव असलेल्या अमेरिकन कंपन्यांसाठी हा प्रकल्प अनेक संधी देणारा आहे . या प्रकल्पाला माझ्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि गंगा नदीचे प्राचीन वैभव पुनर्स्थापित करणे हे आमचे ध्येय आहे.

२८. स्त्री आणि पुरुष गण , आम्ही बदलणाऱ्या भारताच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे . जागतिक लोकसंख्येच्या एक षष्ठश हिस्सा असलेला भारत जेव्हा बदलेल तेव्हा जग देखील बदलेल. हा प्रवास लांबचा असेल . मात्र आम्ही आतापर्यंत जी प्रगती केली आहे त्यावरून माझी खात्री पटली आहे कि आम्ही आमचे उद्दिष्ट नक्की साध्य करू . या प्रवासात आमच्याबरोबरीने सहभागी होण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करतो . हा एक असा प्रवास आहे जो केवळ तुमच्या कंपनीचा ताळेबंद उत्तम बनवणार नाही तर एक चांगला भारत बनवण्याच्या ,एक चांगली अमेरिका बनवण्याच्या आणि एक चांगले जग बनवण्याच्या रोमांचकारी संधी प्रदान करणारा आहे .

धन्यवाद !