Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा 2A ला (कोटेश्वर रोड ते विमानतळ कॉरिडोअर) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


नवी दिल्‍ली, 10 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा 2(A) ला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत 5 स्थानकांचा (4 उन्नत आणि 1 भूमिगत) समावेश असलेला 6.032 किलोमीटर लांबीचा कॉरिडोअर बांधला जाणार आहे. टप्पा 2(A) कार्यान्वित झाल्यानंतर, अहमदाबाद-गांधीनगर दरम्यान एकूण 77.63 किलोमीटरचे सक्रिय मेट्रो रेल्वेचे जाळे स्थापित होणार आहे. आश्रम रोड, कोटेश्वर प्राचीन मंदिर, साबरमती रिव्हर, सरदार नगर आणि एअरपोर्ट अशी या टप्पा 2(A) कॉरिडोअरअंतर्गतच्या पाच स्थानकांची नावे आहेत.

बांधकाम कालावधीतील व्याजासह (IDC) या प्रकल्पासाठी येणारा एकूण खर्च 2,169.04 कोटी रुपये इतका असणार आहे.

प्रकल्पाचे फायदे आणि विकासाला मिळणारी चालना:

अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा टप्पा 2(A) हा शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. टप्पा 2(A) हा अहमदाबाद शहरातील मेट्रो रेल्वे जाळ्याअंतर्गतच्या विस्ताराचा एक प्रमुख टप्पा असणार आहे.

विस्तारित दळणवळणीय जोडणी:

अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाच्या टप्पा 2(A) अंतर्गत सुमारे 6.032 किलोमीटरचा नवीन मेट्रो कॉरिडॉर विकासित केला जाणार आहे. सध्या कार्यक्षम दळणवळणाची सुविधा नसलेल्या प्रमुख निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रांना जोडणे, तसेच विमानतळापर्यंत सुरळीत दळणवळणीय जोडणी उपलब्ध करून देत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा घडवून आणणे हा यामागचा उद्देश आहे.

या टप्प्याअंतर्गत निवासी आणि व्यावसायिक केंद्रांसह प्रमुख परिसरांना सध्याच्या अहमदाबाद-गांधीनगर कॉरिडॉरशी सुरळीतपणे जोडण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. यासोबतच जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा 2029 आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 च्या अनुषंगाने या परिसरात क्रीडा सुविधाही विकसित केली जाण्याची शक्यताही याअंतर्गत गृहीत धरली गेली आहे.

या प्रदेशातले महत्त्वाचे असलेले हे दोन्ही भाग मेट्रो रेल्वे सेवेच्या जाळ्याशी जोडल्यामुळे, या भागातली दळणवळणीय सुविधा विस्तारण्यासोबतच, आर्थिक उलाढाल आणि पर्यटनालाही चालना मिळू शकणार आहे. त्याच बरोबरीने स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांच्या दृष्टीने शहरी दळणवळणीय व्यवस्थेत अधिक सुलभता येऊ शकणार आहे.

वाहतूक कोंडीत घट:

मेट्रो रेल्वे हा रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीला एक कार्यक्षम पर्यायी मार्ग ठरणार आहे. आता त्याला टप्पा 2(A)ची जोड मिळाल्याने मेट्रो रेल्वेचे जाळे थेट विमानतळापर्यंत विस्तारेल. यामुळे अहमदाबाद शहरांतर्गतच्या वाहतुकीवरही सकारात्मक परिणाम घडून येईल. रस्त्यावरील वर्दळीचे प्रमाण कमी होणार असल्याने वाहनांची सुलभ ये-जा शक्य होईल, प्रवासाच्या वेळेत बचत होईल आणि एकंदर रस्ते सुरक्षेतही वाढ घडून येईल.

पर्यावरणीय लाभ:

अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा 2(A) च्या अंतर्भावामुळे तसेच अहमदाबाद आणि गांधीनगर शहरांमधील एकूण मेट्रो रेल्वे जाळ्याचा विस्तार होणार असल्यामुळे, पारंपरिक जीवाश्म इंधनावर आधारित वाहतुकीच्या तुलनेत कार्बन उत्सर्जनातही लक्षणीय घट साध्य करता येणार आहे.

आर्थिक विकास:

प्रवासाच्या वेळेत होणारी बचत, तसेच विमानतळ, रेल्वे स्थानके आणि बस आगार यांसारख्या शहराच्या विविध भागांपर्यंत सुलभतेने ये-जा करता येणार आहे. यामुळे नागरिकांना आपल्या कामाच्या ठिकाणी आणि इच्छित स्थळी अधिक कार्यक्षमतेने पोहोचता येईल, परिणामी त्यांच्या उत्पादकतेत वाढ होण्यास मदत होईल. यासोबतच दळणवळणीय जोडणीत सुधारणा घडून आल्याने स्थानिक विशेषतः नवीन मेट्रो स्थानकांजवळच्या भागांमधील उद्योग व्यवसायांना मोठी चालना मिळेल. यामुळे यापूर्वी सुलभतेने पोहचता येणे शक्य नसलेल्या भागांमध्येही गुंतवणूक येईल आणि पर्यायाने विकास होईल.

सामाजिक प्रभाव:

अहमदाबादमधील मेट्रो रेल्वे सेवेअंतर्गतच्या टप्पा 2(A) च्या विस्तारामुळे नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीसाठीची अधिक समान पर्याय उपलब्ध होतील. याचा विविध सामाजिक-आर्थिक घटकांना लाभ होईल आणि पर्यायाने वाहतुकीसुविधेच्या पर्यायांमधील असमानता कमी होईल. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असल्याने तसेच, अत्यावश्यक सेवांसुविधा सुलभतेने मिळवता येणार असल्याने नागरिकांच्या जीवनमानाची गुणवत्ताही वाढू शकणार आहे.

अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा टप्पा 2(A) हा अहमदाबाद शहरासाठी एक परिवर्तनकारी विकासाचा टप्पा ठरणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुधारीत दळणवळणीय जोडणी, वाहतूक कोंडीत घट, पर्यावरणीय लाभ, आर्थिक विकास आणि सुधारीत गुणवत्तेच्या जीवनमानाची सुनिश्चिती होणार आहे. या  टप्पा 2(A) च्या माध्यमातून अहमदाबाब शहराशी संबंधीत अनेक प्रमुख समस्या सुटणार आहेत तसेच, भविष्यातील विस्ताराचा पायाही रचला जाणार आहे. त्यामुळे हा टप्पा शहराच्या विकासाची दिशा आणि शाश्वततेला नवा आयाम देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

अहमदाबाद मेट्रो टप्पा 2A च्या बांधकामाच्या मुख्य कालावधीत सुमारे 2,000 व्यक्तींसाठी रोजगार निर्मिती होईल, तर या टप्प्याच्या कार्यान्वयन आणि देखभालीपोटी सुमारे 500 व्यक्तींना रोजगार मिळू शकणार आहे.

मार्गाचा नकाशा:

PM India

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai