Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उज्जैन येथे सिंहस्थच्या सार्वत्रिक संदेशावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

उज्जैन येथे सिंहस्थच्या  सार्वत्रिक संदेशावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधानांनी  केलेले भाषण


आपण लोकांच्या स्वभवात एक दोष आहे, एक समाज या नात्याने, आपण स्वत:ला नेहमी परिस्थितीपासून खूप दूर समजतो. आपण अशा तत्वांमध्ये वाढलो-मोठे झालो आहोत जिथे शरीर तर येत आणि जात असते. आपण आत्म्याच्या अमरत्वाशी जोडलेले लोक आहोत आणि त्यामुळे आपल्या आत्म्याचे विचार आपल्याला काळाशी बांधिल राहू देत नाही आणि काळाचा गुलाम देखील बनू देत नाहीत. मात्र त्यामुळे अशी स्थिती निर्माण झाली की आपली ही महान परंपरा, ही हजारो वर्षे जुनी प्राचीन संस्कृती, याचे अनेक पैलू, कोणत्या सामाजिक संदर्भामध्ये या परंपरा सुरु झाल्या, कोणत्या काळात सुरु झाल्या, कोणत्या विचारमंथनातून याचे बीजारोपण झाले, ते जवळ-जवळ अगम्य आहे. आणि त्यामुळे ही कुंभमेळयाची परंपरा कशी सुरु झाली, त्यासंबंधी अनेक प्रकारची विभिन्न मते प्रचलित आहेत, कालखंड देखील खूप मोठा, खूप मोठया कालावधीचा आहे.

कुणी म्हणेल हजार वर्षांपूर्वी, कुणी म्हणेल दोन हजार वर्षांपूर्वी, मात्र एवढे निश्चित आहे की ही परंपरा मनुष्ये जीवनाच्या सांस्कृतिक प्रवासाच्या प्राचीन व्यवस्थांपैकी एक आहे. मी माझ्या पध्दतीने जेव्हा विचार करतो, तेव्हा मला वाटते की, कुंभमेळा तसा 12 वर्षांतून एकदा होतो आणि नाशिक असो, उज्जैन असो, हरिद्वार असो, तिथे तीन वर्षातून एकदा होतो, प्रयागराज येथे 12 वर्षातून एकदा होतो. त्या कालखंडाकडे आपण पाहिले तर मला वाटते की एक प्रकारे हा विशाल भारत आपल्यामध्ये सामावून घेण्याचा हा प्रयत्न या कुंभमेळयाच्या माध्यमातून होत होता. मी विचाराने आणि अंदाजाने सांगू शकतो की समाजातील विचारवंत, संत, महंत, ऋषी-मुनी हे प्रत्येक क्षणी समाजाच्या सुख-दु:खाची चर्चा आणि चिंता करत होते. समाजाचे भाग्‍य आणि भविष्यासाठी नवीन-नवीन पध्दतींचा शोध लावत होते. म्हणजेच आपले ऋषी जिथे कुठे होते ते बाहेरील जगाचे देखील संशोधन करत होते आणि आंतरिक प्रवासाचा शोध घेण्याचा देखील प्रयत्न करत होते. तर ही प्रक्रिया निरंतर चालत राहिली, वर्षानुवर्षे चालत राहिली, पिढयान्‌-पिढया चालत राहिली. मात्र संस्कार संक्रमणाचे कार्य, विचारांच्या संकलनाचे कार्य, काळानुरुप विचारांना तराजूवर मापण्याची परंपरा, या सर्व बाबी या युगाच्या परंपरेत सामावलेल्या होत्या, समाविष्ट होत्या.
एकदा प्रयागराजच्या कुंभमेळयात जमायचे, एक अंतिम निर्णय घेतला जायचा सर्वानुमते की गेल्या 12 वर्षांमध्ये समाज इथे-इथे गेला, इथपर्यंत पोहोचला. आता पुढल्या 12 वर्षांसाठी समाजासाठी दिशा काय असेल, समाजाची कार्यशैली काय असेल, कोणत्या गोष्टींना प्राधान्य दयायचे आणि जेव्हा कुंभमेळयाहून परत जायचे, तेव्हा सर्वजण तो कार्यक्रम घेऊन आपापल्या ठिकाणी पोहोचायचे आणि दर तीन वर्षांनी जेव्हा कधी नाशिकमध्ये, कधी उज्जैनमध्ये, कधी हरिद्वारमध्ये कुंभमेळा व्हायचा, तेव्हा त्याचा मध्यावधी आढावा घेतला जायचा की प्रयागराज येथे जे निर्णय आपण घेतले, त्याबाबत तीन वर्षात काय अनुभव आले आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक यायचे.
30 दिवस एकाच ठिकाणी राहून समाजातील घडामोडी, समाजाच्या गरजा, बदलणारा काळ, याबात चिंतन-मनन करुन त्यामध्ये पुढील तीन वर्षांसाठीचा कृती कार्यक्रम ठरवला जायचा. मुख्य महाकुंभ प्रयागराज येथे व्हायचा आणि पुन्हा तीन वर्षांनतर जेव्हा दुसरा कुंभमेळा भरायचा, तेव्हा पुन्हा एकदा आढावा घेतला जायचा. अतिशय अद्‌भुत अशी ही सामाजिक रचना होती. मात्र हळूहळू असा अनुभव येतो की परंपरा तर कायम राहतात, पण त्यात जिवंतपणा नसतो. आपल्याकडे देखील असा अनुभव आला की परंपरा तर कायम आहेत मात्र वेळेची कमतरता आहे, 30 दिवस कोण राहणार, 45 दिवस कोण राहणार. चला, 15 मिनिटे जरा डुबकी घेऊ, पापक्षालन करु, पुण्य कमवू आणि परत जाऊ.

काही बदल होत गेले, त्यापैकी उज्जैनच्या या कुंभमेळयात संतांच्या आशिर्वादाने एक नवीन प्रयत्न सुरु झाला आहे. आणि हा नवा प्रयत्न एक प्रकारे त्या प्राचीन काळातील व्यवस्थेचीच एक आधुनिक आवृत्ती आहे, आणि यामध्ये सध्याच्या काळानुसार , जागतिक संदर्भामध्ये मानव जातिसमोर कोणती आव्हाने आहेत, मानव कल्याणाचे मार्ग कोणते असू शकतात, बदलत्या काळात कालबाहय बाबी सोडून देण्याची हिंमत कशी येईल, जुन्या गोष्टींचे ओझे बाळगून चालल्यास मनुष्य थकून जातो. त्या जुन्या कालबाहय गोष्टी सोडून एका नव्या विश्वासाने, नव्या ताजेपणाने पुढे कसे जाता येईल, त्याचा एक छोटासा प्रयत्न या विचार महाकुंभामध्ये झाला आहे.

जे 51 बिंदू, अमृत बिंदू यामधून फलित झाले आहेत, कारण हा एक दिवसाचा समारंभ नाही. जसे शिवराजजी यांनी सांगितले. देशातील आणि जगभरातील या विषयातील जाणकार मंडळींनी दोन वर्षे मंथन केले आहे, वर्षभर विचार-विनिमय केला आहे आणि गेले 3 दिवस या पवित्र कुंभानिमित्ताने ऋषी, मुनी, संतांची परंपरा चालवणाऱ्या महान संतांच्या सान्निध्यामध्ये याबाबत चिंतन-मनन झाले आहे आणि त्यामधून हे 51 अमृत बिंदू समाजासाठी सादर करण्यात आले आहेत. मला नाही वाटत की आम्हा राजकारण्यांसाठी ही गोष्ट जनतेच्या गळी उतरवणे शक्य आहे. आम्हाला नाही वाटत, मात्र आम्ही हे नक्की मानतो की, समाजासाठी नि:स्वार्थ हेतूने काम करणारे लोक, मग ते भगव्या वस्त्रांमध्ये असोत किंवा नसोत, मात्र त्याग आणि तपस्येच्या अधिष्ठानावर जीवन जगतात. भले एक वैज्ञानिक आपल्या प्रयोगशाळेत काम करत असेल. एखादा शेतकरी आपल्या शेतात कष्ट करत असेल, एखादा मजूर सर्व शक्ती, एका दिशेने चालू शकल्या तर कीती मोठे परिवर्तन घडू शकते आणि त्या दिशेने हे जे 51 अमृत बिंदू आहेत, आगामी काळात भारतातील जनतेला आणि जागतिक जनसमुदायाला भारत कशा प्रकारे विचार करु शकतो, आणि राजकीय व्यासपीठावरुन कशा प्रकारचे विचार काळाला अनुरुप असू शकतील याबाबतची चर्चा जर येणाऱ्या दिवसांमध्ये सुरु झाली, तर मला वाटते की या प्रयत्नांचे सार्थक होईल.
आपण असे लोक आहोत, जिथे आपल्या लहान-सहान गोष्टी मोठया समजण्यासारख्या आहेत. आपण त्या संस्कार सरितेतून निघालेले लोक आहोत, जिथे एक भिक्षुक देखील भिक्षा मागण्यासाठी जातो, तेव्हा देखील त्याच्या तोंडून निघते “जो देईल त्याचेही भले आणि जो देणार नाही त्याचेही भले” ही छोटी गोष्ट नाही. हा त्या संस्कार परंपरेचा परिणाम आहे की एका भिक्षुकाच्या तोंडून देखील शब्द निघतात, “देईल त्याचेही भले आणि जो देणार नाही त्याचेही भले” म्हणजेच मूळ चिंतन तत्वभाव हा आहे की सर्वांचे भले होवा, सर्वांचे कल्याण होवो. हे सर्व प्रकारे आपल्या नसानसांत भिनलेले आहे. आपणच तर लोक आहोत, ज्यांना शिकवण्यात आले आहे, “तेन तक्तेन भूंजीथा, क्या तर के ही भोगेगा”. हा अप्रतीम आनंद असतो, हे आपल्या नसानसांत भिनलेले आहे. जे आपल्या नसांमध्ये आहे. ते आपल्या जीवन आचरणातून नाहीस तर होत नाही ना. एवढी महान परंपरा आपण गमावत तर नाही ना. मात्र कधीतरी तिचा आढावा घेतो तेव्हा अनुभव येतो की नाही, आज हे दखील हे सामर्थ्य आपल्या देशात आहे.

केव्हातरी या देशाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशाला आवाहन केले होते की आठवडयातून एक दिवस रात्रीचे जेवण वर्ज्य करा. देशाला अन्नाची गरज आहे. आणि या देशाच्या कोटयावधी लोकांनी “तेन त्यक्तेन भुजीथा” हे आपल्या जीवनात आचरणात आणून दाखवले होते. आणि त्या पिढीतील काही लोक अजून हयात आहेत. लालबहादूर शास्त्री यांनी जे म्हटले होते, आठवडयात एक दिवस जेवू नका, असे लोक आज देखील आहेत. तेन त्यक्तेन भुंजिथाचा मंत्र आपल्या नसानसांत भिनला आहे. काही दिवसांपूर्वी गेल्या मार्च महिन्यात असेच बोलता-बोलता मी देशातील लोकांसमोर एक विषय मांडला होता. असाच मांडला होता. तो मांडताना मी देखील विचार केला नव्हता की माझ्या देशातील सामान्य लोकांचे मन एवढे मोठे आहे. कधी-कधी वाटते की आपण त्या उंचीपर्यंत पोहोचण्यात कमी पडतो. मी एवढेच म्हटले होते जर तुम्ही आर्थिक दृष्टया संपन्न आहात, समर्थ आहात, तर स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदानाची गरज काय, सोडून दया. हजार-पंधराशे रुपयांमध्ये काय ठेवले आहे. एवढेच म्हटले होते. आणि आज मी माझ्या देशातील एक कोटींहून अधिक कुटुंबांसमोर नतमस्तक होऊ सांगू इच्छितो आणि जगासमोर सांगू इच्छितो. एक कोटीहून अधिक कुटुंबांनी आपले गॅसवरील अनुदान सोडून दिले. तेन त्यक्तेन भुंजिथा. आणि त्याचा परिणाम शासन व्यवस्थेवर देखील थेट होतो. आमच्या मनात विचार आला की एक कोटी कुटुंबं गॅसवरील अनुदान सोडत आहेत, तर ते सरकारी तिजोरीत भरण्यासाठी नाही.

ते पुन्हा एकदा गरीबाच्या घरी जायला हवे. जी आई लाकडाची चूल पेटवून एका दिवसात चारशे सिगारेटींएवढा धूर आपल्या शरीरात घेते, त्या आईला लाकडाच्या चुलीपासून मुक्ती देऊन स्वयंपाकाचा गॅस दयायला हवा आणि त्यातूनच संकल्प निघाला की तीन वर्षांमध्ये पाच कोटी कुटुंबांना गॅस सिलेंडर देऊन त्यांना या धुराच्या चुलीपासून मुक्त करु.

येथे एका चर्चेत पर्यावरणाचा मुद्दा आहे. मला वाटते, पाच कोटी कुटुंबांमध्ये लाकडाची चूल न पेटणे यामुळे जंगलदेखील वाचतील, यामुळे कार्बनदेखील कमी होईल आणि आपल्या मातांच्या, गरीब मातांच्या आरोग्यात देखील सुधारणा होईल. येथे महिलांच्या सक्षमीकरणाबाबत चर्चा झाली, महिलांच्या प्रतिष्ठेबाबत चर्चा झाली. ही गॅसची चूल तो मानसन्मान कायम राखेल, तिच्या आरोग्याची काळजी घेईल. आणि म्हणूनच मी म्हणतो, तेन त्यक्तेन भुंजिथा. या मंत्रावर जर आपण विश्वास ठेवला, सामान्य माणसाला जर आपण याबाबत विश्वास दिला तर आपण कशा प्रकारचे परिवर्तन साध्य करु शकतो, याचा अनुभव घेत आहोत.

आपला देश, मला नाही वाटत, आपल्या शास्त्रांमध्ये अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे आपण भरकटले जाऊ. हे आपण लोक आहोत, जे आपल्या स्वार्थाच्या वस्तूा उचलत जातात आणि संपूर्णपणे त्या वस्तूंकडे पाहण्याचा स्वभाव आपण सोडून दिला आहे. आपल्याेकडे म्हटले आहे – नर करनी करे तो नारायण हो जाए, आणि हे आपल्या ऋषींनी-मुनींनी म्हटले आहे. त्यांनी कधी असे म्हटले आहे का की नर भक्ति करे तो नारायण हो जाए. नाही म्हटलंय त्यांनी कधी असे म्हटले आहे का की नर कथा करे तो नारायण हो जाए. नाही म्हटलंय. संतांनी देखील म्हटले आहे. नर करनी करे तो नारायण हो जाए आणि म्हणूनच हे 51 अमृत बिंदू आपल्या समोर आहेत. त्याचा एक संदेश हाच आहे की नर नी करे तो नारायण हो जाए आणि म्हणूनच आपण कामाशी बांधील असायला हवे आणि अर्जुनाला देखील हेच तर सांगण्यात आले होते की “योग: कर्मसु कौशलम्‌”. हाच आपला योग आहे, ज्यामध्ये कर्माच्या महानतेचा स्विकार करण्यात आला आहे आणि म्हणूनच या पवित्र कार्याच्या निमित्ताने आपण त्या विचार प्रवाहाला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करु शकतो का, तमसो मा ज्योर्तिगमय. हा विचार छोटा नाही आणि प्रकाश कोणता, कोणती ज्योती, ही ज्योती ज्ञानाची आहे, ज्योती प्रकाशाची आहे. आणि आपण तर लोक आहोत जे म्हणतात की ज्ञानाला ना पूर्व दिशा असते ना पश्चिम दिशा असते. ज्ञानाला ना भूतकाळ असतो ना ज्ञानाला भविष्यकाळ असतो. ज्ञान अजरामर असते आणि प्रत्येक युगात उपयुक्त असते. ही आपली परंपरा राहिली आहे आणि म्हणूनच जगात जे काही श्रेष्ठ आहे ते घेण्याची, मिळवण्याची, पचवण्याची, अंगीकारण्याची आपल्या लोकांची वर्षानुवर्षे ही सवय राहिली आहे.

आपण अशा समाजाचे लोक आहोत, जिथे वैविध्यदेखील आहे, आणि कधी-कधी बाहेरच्या व्यक्तीला यात तफावत आढळते. जगात संघर्ष व्यवस्थापनासंबंधी इतकी चर्चासत्रे होतात, परंतु मार्ग सापडत नाही. आपल्या लोकांना अनुवंशिक संघर्ष व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले आहेत. नाहीतर दोन टोकांकडचे आपण कधीही विचार करु शकलो नसतो. आपण भगवान रामाची पूजा करतो, ज्यांनी पित्याच्या आज्ञेचे पालन केले होते. आणि आपण ते लोक आहोत, जे प्रल्हादाची देखील पूजा करतात, ज्याने पित्याच्या आज्ञेचा अनादर केला होता. एवढी मोठी तफावत, एक ते महापुरुष ज्यांनी पित्याची आज्ञा मानली ते देखील आपल्यासाठी पूजनीय आणि एक दुसरे महापुरुष ज्यांनी पित्याच्या आज्ञेचा अनादर केला, ते देखील आपले महापुरुष.
आपण ते लोक आहोत जे माता सीतेला वंदन करतात. जी पती आणि सासऱ्याच्या इच्छेनुसार आपले जीवन जगली. आणि त्याचप्रकारे आपण त्या मीराची देखील भक्ती करतो जिने पतीच्या आज्ञेचा अनादर केला होता. म्हणजेच आपण कोणत्या प्रकारच्या संघर्ष व्यवस्थापनाला समजणारे लोक आहोत. आपल्या या स्थितीचे कारण काय आहे आणि कारण हे आहे की आपण हटवादाशी बांधलेले लोक नाही आहोत. आपण दर्शनाशी जोडलेले लोक आहोत. आणि दर्शन तावून सुलाखून निघालेली विचारांची प्रक्रिया आणि जीवनशैली यातून निघालेल्या संचित स्वरुपात असते. काळानुरुप त्याचा विस्तार होत जातो. त्याचे एक व्यापक रुप वेळेमध्ये येते. आणि म्हणूनच आपण त्या दर्शनाच्या परंपरांमधून निघालेले लोक आहेत, जे दर्शन आजही आपल्याला हे जीवन जगण्यासाठी प्रेरणा देते.

इथे विचार मंथनामध्ये एक विषय हा देखील होता-मूल्ये. मूल्ये कशी बदलतात. आज जगात जर तुमच्यापैकी कुणाचा अभ्यास करण्याचा स्वभाव असेल तर अभ्यास करुन पहा. जगातील अतिशय समृध्द देश, जेव्हा ते निवडणुकीच्या रिंगणात जातात, तेव्हा तेथील राजकीय पक्ष, तिथले राजकीय नेते त्यांच्या निवडणुकांमध्ये एका गोष्टीचा वारंवार उल्लेख करतात. आणि ते म्हणतात- आम्ही आमच्या देशामध्ये कुटुंब मूल्ये पुर्नप्रस्थापित करु. संपूर्ण जग, कुटुंब संस्था, कौटुंबिक जीवनाचे मूल्य, त्याचे महत्व खूप चांगल्या प्रकारे समजू लागले आहेत. आपण त्यामध्ये वाढलेलो आहोत. त्यामुळे कधी त्यामध्ये छोटीशी गोष्ट इथे-तिथे होते, तेव्हा समजत नाही की कीती मोठे नुकसान करत आहेत. मात्र आपल्यासमोर आव्हान आहे ते मूल्याचे आणि मूल्य म्हणजे असा विषय नाही की तुमची मान्यता आणि माझी मान्यता. जे काळाच्या कसोटीवर तावून सुलाखून खरे उतरतात, तीच तर मूल्ये असतात. त्या मूल्यांच्या प्रति आपण जागरुक कसे होऊ. सध्या मी पाहतो आहे, अज्ञानामुळे म्हणा किंवा न्यूनगंडामुळे म्हणा, जेव्हा कोणते मोठे संकट येते, मोठा वाद निर्माण होतो, तेव्हा आपण बहुतांश वेळा असे म्हणून पळ काढतो की ही तर आपली परंपरा आहे. आज जग अशा प्रकारच्या गोष्टी मानण्यासाठी नाही.

आपल्याला शास्त्रीय आधारावर आपले म्हणणे जगासमोर मांडावे लागेल आणि म्हणूनच याच कुंभमेळयाच्या काळात या विचार-विमर्शाची गरज आहे, ज्यामधून आपल्या मूल्यांची, आपल्या विचारांची धार अधिक तीक्ष्ण होईल.

आपल्याला माहित आहे, कधी-कधी ज्यांच्या तोंडून आपण परंपरेच्या गोष्टी ऐकतो. हाच देश एका मान्यतेमुळे पीडित होता की आपल्या ऋषी-मुनींनी, संतांनी समुद्र पार करु नये, परदेशात जाऊ नये. असे आपण सर्व मानत होतो. आणि एक काळ होता, जेव्हा समुद्र पार करणे हे वाईट मानले जात होते. ती देखील एक परंपरा होती, मात्र काळ बदलला. तेच संत जेव्हा आज जगभरात भ्रमंती करतात, सातासमुद्रा पार जातात, परंपरा त्यांच्यासाठी कोणताही अडथळा बनत नाही. मग अन्य गोष्टींमध्ये परंपरा अडथळा का बनाव्यात. यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणूनच परंपरांच्या नावावर बिगर शास्त्रीय पध्दतीने बदललेल्या युगाला, बदलेल्या समाजाला मूल्यांच्या स्थानी जिवंत ठेवून त्याला वळण देणे, बदलणे, दिशा देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, आपणा सर्वांची जबाबदारी आहे. आणि जर ती जबाबदारी आपण पार पाडली तर मला खात्री आहे की, आपण समस्यांवर तोडगा शोधू शकतो.

आज जगासमोर दोन संकटे आहेत. एकीकडे जागतिक तापमानवाढ आणि दुसरकीकडे दहशतवाद. यावर काय उपाय आहेत. अखेर याच्या मुळाशी कोणत्या गोष्टी आहेत. तुझ्या मार्गापेक्षा माझा मार्ग अधिक योग्य आहे. हाच तर स्वभाव आहे जो आपल्याला संघर्षाकडे ओढत नेत आहे. विस्तारवाद हा समस्यांवर तोडगा नाही. आपण आडव्या दिशेने गेले तर समस्यांचे निराकरण होणार नाही. आपल्याच्या वरच्या दिशेने जाण्याची गरज आहे. आपल्या अंतर्मनाला वर आणण्याची गरज आहे, व्यवस्था आधुनिक करण्याची गरज आहे. नवीन उंची गाठण्यासाठी ती मूल्ये स्वीकारणे आवश्यक असते आणि म्हणूनच वेळेपूर्वीच मूलभूत चिंतनाच्या प्रकाशात, काळाच्या संदर्भात गरजांच्या अनुसार नवीन कायदे तयार करावे लागतील. वेद सर्व काही आहे, मात्र तरीही आपण लोकांनी वेदांच्या प्रकाशात उपनिषदांची निर्मिती केली. उपनिषदांमध्ये खूप काही आहे. मात्र काळाच्या ओघात आपण उपनिषदांच्या प्रकाशात स्मृती आणि श्रुति निर्माण केल्या. स्मृति व श्रुती जी त्या कालखंडाला दिशा देतात, त्याच्या आधारे आपण चाललो. आज आपल्यातील कुणालाही वेदांची नावे देखील माहीत नसतील. मात्र वेदांच्या प्रकाशात उपनिषद, उपनिषदाच्या प्रकाशात श्रुति आणि स्मृती आज देखील आपल्याला दिशा दाखवतात. काळाची गरज आहे की जर 21 व्या शतकात मानव जातीचे कल्याण करायचे असेल तर भले वेदाच्या प्रकाशात उपनिषद असेल, उपनिषदाच्या प्रकाशात स्मृती आणि श्रुती असतील तर स्मृति आणि श्रुतीच्या प्रकाशात 21 व्या शतकातील मानवाच्या कल्याणासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे, हे 51 अमृत बिंदू बहुधा पूर्ण नसतील, त्यात देखील काही त्रुटी असू शकतात. आपण कुंभमेळयाच्या निमित्ताने असे अमृत बिंदू शोधू शकतो का ?

मला विश्वास आहे की आपला इतका मोठा मेळावा. कधी-कधी मला असे वाटते की, जग आपल्याला किती असंघटित आहोत म्हणून हिणवत आहे. अतिशय विचित्र प्रकारचे जीवन जगणारे बाहेरवाल्यांच्या नजरेतून आपल्याकडे पाहतात. परंतु आपल्याला आपले म्हणणे जगासमोर योग्य पध्दतीने मांडता येत नाही. आणि ज्यांच्यावर ते मांडण्याची जबाबदारी आहे आणि ज्यांनी अशा प्रकारचे काम आपला व्यवसाय म्हणून स्वीकारले आहे, ते देखील समाजाचा जसा स्वभाव बनला आहे जवळचा सोपा मार्ग निवडतात. आम्ही पाहिलंय की कुंभमेळा म्हणजे नागा साधू अशी ओळख निर्माण करण्यात आली आहे. त्यांची छायाचित्र काढणे, त्यांचा प्रचार करणे, त्यांच्या प्रदर्शनासाठी जाणे, यांच्या आसपास ते सीमित केले गेले आहे. आपण जगाला अभिमानाने सांगू शकतो का की आपल्या देशातील लोकांची कीती मोठी संघटित क्षमता आहे. या कुंभमेळयाचे कोणते पत्रक निघाले होते का ? निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आल्या होत्या का ?

भारताच्या कानाकोपऱ्यात, जगभरात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना कोणती निमंत्रण पत्रिका आली होती का ? पंचतारांकीत हॉटेलांचे आरक्षण करण्यात आले होते का ? एका क्षिप्रा नदीच्या कीनारी, तिच्या कुशीत दररोज, युरोपमधल्या छोटया देशाची जेवढी लोकसंख्या आहे, तितके लोक येत असतील, आणि कोणतेही अनुचित प्रकार घडत नसतील, ही व्यवस्थापनाच्या जगातील सर्वात मोठी घटना आहे, मात्र आपण भारताचे ब्रॅडिंग करण्यासाठी या शक्तीचा परिचय करुन दाखवत नाही.

मी कधी-कधी म्हणतो की आपल्या भारतातील निवडणूक जगासाठी एक आश्चर्य आहे की, एवढा मोठा देश, जगातील कीत्येक देशांपेक्षा जास्त मतदार आणि आपला निवडणूक आयोग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सुरळीतपणे संपूर्ण निवडणुकीचे व्यवस्थापन करतो. विषय आहे. मी तर जगातील मोठया-मोठया विद्यापीठांना म्हणेन की आमच्या या कुंभमेळयाच्या व्यवस्थापनाचा जगभरातील विद्यापीठांनी अभ्यास करायला हवा.

आपण आपल्या जागतिक स्वरुपात स्वत:ला सादर करण्यासाठी जगाला जी भाषा समजते, त्या भाषेत ते मांडण्याची सवय देखील काळाची गरज आहे, आपण आपलेच म्हणणे आपल्याच पध्दतीने सांगत राहिलो तर ते जगाच्या गळी उतरणार नाही. जगाला जी गोष्ट ज्या भाषेत समजते, त्या तर्काने समजते, ज्या आधारे समजू शकतात, ते समजावण्याचा प्रयत्न या चिंतन-मननाच्या माध्यमातून निश्चित करावा लागेल. जेव्हा आपण हे करु, तेव्हा मला खात्री आहे, या महान देशाचा हा अनेक शतकांचा प्राचीन वारसा, सामाजिक चेतनेचे कारण बनू शकतो, तरुण पिढीच्या आकर्षणाचे कारण बनू शकतो आणि मी या 51 बिंदू व्यतिरिक्त एक गोष्ट सर्व आखाडयांच्या प्रमुखांना, सर्व परंपरांच्या संत-महात्म्यांना मी आज एक निवेदन करु इच्छितो, विनंती करु इच्छितो. इकडून गेल्यानंतर आपण सर्वजण आपल्या परंपरांनुसार एका आठवडयाचा विचार कुंभ दरवर्षी आपल्या भक्तांसमवेत करु शकतो का ?
मोक्षाच्या गोष्टी करा, जरुर करा, मात्र एक आठवडा असा असावा ज्यामध्ये धरतीच्या सत्यासह झाडे का लावायला हवीत, नदीची स्वच्छता का करायला हवी, मुलीला का शिकवायचे, नारीचा सन्मान का करायचा, शास्त्रीय पध्दतीने आणि देशभरातील जनतेला विधीवत बोलावून, ज्यांचा धर्मावर विश्वास नाही. ज्यांचा देवावर विश्वास नाही, त्यांनाही बोलावून जरा सांगा तर आमचा जो भक्त समुदाय आहे, त्यांच्यासमोर विचार विनिमय प्रत्येक परंपरेमध्ये वर्षातून एकदा सात दिवस आपापल्या पध्दतीने आपापल्या ठिकाणी विद्वानांना बोलावून विचार विनिमय झाला तर तुम्ही पहाल, 3 वर्षानंतर पुढची जेव्हा कुंभमेळयाची आपली वेळ येईल आणि 12 वर्षानंतर जो महाकुंभ येतो, तो जेव्हा येईल, तुम्ही बघाल, ही आपली विचार-मंथनाची प्रक्रिया एवढी धारधार झाली असेल, जग आपले विचार स्वीकारायला तयार असेल.

आता जेव्हा पॅरिसमध्ये संपूर्ण जग हवामानासंदर्भात चिंतेत होतेते, भारताने एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आणि भारताने ती मूल्ये प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला. एक पुस्तक देखील प्रसिध्द झाले की निसर्गाप्रती प्रेमाचे धार्मिक जीवनात काय काय महत्व आहे आणि पॅरिससमोर, जगासमोर जीवनशैली बदलण्यावर भर दिला गेला, हे पहिल्यांदा घडले आहे.

आपण असे लोक आहोत, जे रोपटयामध्ये देखील परमात्मा पाहतात, आपण असे लोक आहोत जे पाण्यात देखील जीवन पाहतात. आपण ते लोक आहोत जे चंद्र आणि सूर्यामध्ये देखील आपले कुटुंब पाहतात, आपण असे लोक आहोत,ज्यांना.. आज आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिन साजरा केला जात असेल, पृथ्वी दिन साजरा केला जात असेल, मात्र पहा, आपण ते लोक आहोत, जिथे मूल सकाळी उठून जमिनीवर पाय ठेवायचे तेव्हा आई म्हणायची, की बेटा, अंथरुणावरुन जेव्हा जमिनीवर पाय ठेवतो, त्यापूर्वी या धरती मातेला नमस्कार करायचा, क्षमा मागायची, जेणेकरुन तुझ्यामुळे या धरतीमातेला त्रास होणार नाही. आज आपण वसुंधरा दिन साजरा करतो, आपण तर शतकानुशतके ही परंपरा पार पाडत आहोत.

आपण असे लोक आहोत, जिथे आई मुलाला लहानपणी सांगते की बघ, हे संपूर्ण ब्रह्‌मांड तुझे कुटुंब आहे, हा जो चंद्र आहे ना, हा चंद्र तुझा मामा आहे. हा सूर्य तुझा दादा आहे. हे निसर्गाला आपले बनवणे, हे आपले वैशिष्टय ठरले आहे.

सहजगत्या आपल्या जीवनात, निसर्गाचे प्रेम, निसर्गाबरोबर संघर्ष नाही, सहजीवनाचे संस्कार आपल्याला मिळाले आहेत आणि म्हणूनच जे बिंदू घेऊन आज आपण मार्गक्रमण करु इच्छितो, त्या बिंदूंवर विश्वास ठेवून, जे कालबाहय आहे ते सोडावे लागेल. आपण कालबाहय गोष्टींच्या ओझ्याखाली जगू शकत नाही आणि परिवर्तन हे खूप मोठे संकट आहे ही भीती मी नाही मानत, जे आपल्या सामर्थ्याची ओळख करुन देते. अरे, परिवर्तन होऊ दे, परिवर्तन हेच तर जीवन असते. मृत आयुष्यात परिवर्तन होत नाही, चिरतरुण जीवनातच तर परिवर्तन होते, परिवर्तन स्वीकारायला हवे. आपण सर्वसमावेशक लोक आहोत, आपण सगळयांना जोडणारे लोक आहोत. हे सगळयांना जोडण्याचे जे आपले सामर्थ्य आहे, ते कुठे कमकुवत तर पडत नाहीये, जर आपण कमकुवत पडतो तर आपण जोडण्याची जबाबदारी निभावू शकणार नाही आणि बहुधा आपल्याशिवाय दुसरे कोणी जोडू शकेल किंवा नाही हे सांगणे कठीण आहे. म्हणूनच ही आपली जागतिक जबाबदारी आहे की आपल्या अंतरंगात ज्या विशिष्ट गुणांची आवश्यकता आहे ते गुण आपल्याला विकसित करावे लागतील कारण संकटांनी घेरलेले जनजीवन सुकर बनवण्याची जबाबदारी आपण लोकांनी घेतली आहे. आणि आपली ही ऋषी-मुनींची परंपरा ज्ञानाचे भांडार आहे, अनुभवाची एक महान परंपरा राहिली आहे, त्याच्या आधारे जर आपण मार्गक्रमणा केली तर मला पूर्ण खात्री आहे की ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण होतील, आज या समारंभाचा समारोप होत आहे.

मी शिवराजजी यांना त्यांच्या संपूर्ण चमूला हृदयापासून खूप-खूप शुभेच्छा देतो इतक्या योजनेसाठी, मध्यंतरी निसर्गाने परीक्षा घेतली. अचानक वादळ आले, पाऊस आला, कीत्येक भक्तगणांना आपला जीव गमवावा लागला, मात्र काही तासांमध्ये सर्व व्यवस्था सामान्य करण्यात आली. मी मध्य प्रदेश सरकारचे 40 हजारांचा आसपास जे छोटे-मोठेसहकारी कार्यरत आहेत, त्यांना खासकरुन मी शुभेच्छा देऊ इच्छितो की तुमच्या प्रयत्नांमुळेच केवळ कुंभमेळा पार पडला असे नाही तर तुमच्या या उत्तम प्रयत्नांमुळेच जगात भारताची एक प्रतिमा देखील तयार झाली आहे. भारताच्या सामान्य मनुष्याच्या मनात अशा प्रकारच्या गोष्टींमुळे स्वत:वरचा विश्वास वाढत आहे आणि म्हणूनच ज्या सुमारे 40 हजार लोकांनी 30 दिवस, दिवस-रात्र मेहनत केली, त्यांचे देखील मी अभिनंदन करु इच्छितो. मी उज्जैनमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांचे देखील मनापासून अभिनंदन करु इच्छितो, त्यांनी संपूर्ण जगाचे येथे स्वागत केले, सन्मान केला, आपल्या पाहुण्यांप्रमाणे आदर केला आणि म्हणूनच उज्जैनचे, मध्य प्रदेशचे नागरिक बंधू देखील अभिनंदनाला खूप-खूप पात्र आहेत, त्यांचे देखील मी मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो आणि पुढील कुंभमेळयापर्यंत आपण पुन्हा एकदा आपला विचारांचा प्रवास पुढे नेऊ या शुभेच्छांसह तुम्हाला खूप-खूप धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व संतांना नमस्कार आणि त्यांचे आशिर्वाद, त्यांचे सामर्थ्य, त्यांच्या व्यवस्था ही बाब पुढे नेतील, या अपेक्षेसह सर्वांना नमस्कार !

S.Kane/B.Gokhale