Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

एका वर्षात 1 कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

एका वर्षात 1 कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा


 

80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, शिक्षण, क्रीडा, नागरी संरक्षण, अर्धसंवाहक निर्मिती, अणुऊर्जा आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास या क्षेत्रांशी संबंधित अनेक उपक्रम आणि उद्दिष्टांची घोषणा केली.

पंतप्रधानांच्या भाषणातील प्रमुख घोषणा पुढीलप्रमाणे :

1. एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण

पंतप्रधानांनी येत्या वर्षात 1 कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेची कौशल्ये शिकविण्याची घोषणा केली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेगाने होत असलेला विस्तार लक्षात घेऊन हा उपक्रम भारतातल्या युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक क्षमता प्राप्त करून देण्यास मदत करेल, असे त्यांनी सांगितले.

2. विविध परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन मार्गदर्शन

विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी मोफत ऑनलाइन मार्गदर्शनाची घोषणा पंतप्रधानांनी केली. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर खासगी मार्गदर्शन वर्गांचा पडणारा आर्थिक भार लक्षात घेऊन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, उपलब्ध तज्ज्ञ मनुष्यबळ आणि शिक्षक यांना एकत्र आणून देशातल्या युवकांना मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देणारे संपूर्ण जाळे उभारले जाईल, असे त्यांनी सांगितले.

3. 5 ते 15 वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी देशव्यापी क्रीडा गुणवत्ता शोध मोहीम

गावे, शहरे आणि शाळांमध्ये देशव्यापी गुणवत्ता शोध मोहीम राबवून 5 ते 15 वर्षे वयोगटातल्या मुलांमध्ये असलेल्या क्रीडा गुणवत्तेचा शोध घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. निवड झालेल्या मुलांना विशेष प्रशिक्षण देऊन देशाचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम खेळाडू म्हणून विकसित केले जाईल.

भारत सध्या ज्या ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत नाही किंवा पात्र ठरत नाही, त्यांचा संदर्भ देत अशा क्रीडा प्रकारांमध्ये क्षमता निर्माण करण्यावर अधिक भर दिला जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

4. आधुनिक आव्हानांसाठी सक्षम नागरी संरक्षणाचे जाळे

युद्धाचे बदलते स्वरूप अधोरेखित करताना पंतप्रधानांनी देशात सक्षम आणि गतिशील नागरी संरक्षणाचे जाळे उभारण्याची घोषणा केली. युद्ध आता केवळ सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाही; त्याचा परिणाम तेल शुद्धीकरण प्रकल्प, बँकिंग क्षेत्र, माहिती केंद्रे, कारखाने आणि इतर पायाभूत सुविधांवरही होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

मागील शतकातील युद्धांच्या स्वरूपानुसार विकसित करण्यात आलेल्या नागरी संरक्षण व्यवस्था आता कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आधुनिक यंत्रणांची माहिती करून दिली जाईल आणि आधुनिक आव्हानांचा सामना करण्यास सक्षम असलेले मोठे स्वयंसेवी नागरी संरक्षण दल विकसित केले जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

5. आत्मनिर्भरता बळकट करण्यासाठी आणखी अर्धसंवाहक निर्मिती प्रकल्प

डिजिटल आणि तंत्रज्ञानाच्या जगात अर्धसंवाहक चिप्सची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करताना पंतप्रधानांनी या क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगितले.

देशात 3 अर्धसंवाहक निर्मिती प्रकल्प सुरू झाले असून या प्रकल्पांमधून उत्पादनाची निर्यातही सुरू झाली आहे, असे त्यांनी सांगितले. आगामी 7-8 वर्षांत आणखी 5, 7 किंवा 8 अर्धसंवाहक निर्मिती प्रकल्प उभारले जातील, असे पंतप्रधानांनी नमूद केले. अर्धसंवाहक क्षेत्रातील आत्मनिर्भरता हा विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

6. 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता

अर्धसंवाहक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती केंद्रांसाठी वाढत्या ऊर्जेच्या गरजेचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी ऊर्जा सुरक्षा आणि अणुऊर्जेचे महत्त्व अधोरेखित केले.

2047 सालापर्यंत भारताची अणुऊर्जा क्षमता 100 गिगावॅट पर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवून भारत पुढे जात आहे. तसेच या दशकात 5 नवीन अणुभट्ट्या सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

यावर्षी भारताने जलद प्रजनक अणुभट्टी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला असून, अणुइंधनाच्या क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले.

7. 6 कोटी ‘लखपती दीदी’ घडविण्याचे लक्ष्य

राष्ट्रनिर्माणातील महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी यापूर्वी निश्चित केलेले 3 कोटी ‘लखपती दीदी’ घडविण्याचे लक्ष्य साध्य झाल्याचे सांगितले.

आता भारत 6 कोटी ‘लखपती दीदी’ घडविण्याच्या नव्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आणखी 3 कोटी ‘लखपती दीदी’ निर्माण झाल्यास महिलांच्या सामर्थ्याच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठे परिवर्तन घडून येईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

***

माधुरी पांगे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai