Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

काबूलमध्ये नूतनीकरण करण्यात आलेल्या स्टोर पॅलेसचे व्हिडिओ कॉन्फरन्सीगद्वारे उदघाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

काबूलमध्ये नूतनीकरण करण्यात आलेल्या स्टोर पॅलेसचे व्हिडिओ कॉन्फरन्सीगद्वारे उदघाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य


महामहिम राष्ट्राध्यक्ष महंमद अशरफ घनी,

परराष्ट्र व्यवहार मंत्री रब्बानी,

माझ्या प्रिय अफगाणी मित्र, आणि बंधू-भगिनींनो,

आज पुन्हा एकदा मी आपल्याबरोबर आहे याचा मला आनंद आहे. अफगाणिस्तान हा भारताचा जवळचा शेजारी आहे. आमच्या मनात, हृदयात तुम्हाला स्थान आहे.. भारतीय आणि अफगाणी हे कायमच एकमेकांचे मित्र राहिले आहेत.

आज आपण पुन्हा एकदा आपल्या मैत्रीचा, आणखी एका संधीचा आनंद घ्यायला एकत्र आलो आहोत. आपल्या सहकार्याच्या लाभदायक प्रवासाच्या दिशेने पुढे पावले टाकत आहोत.

महामहिम घनी,

काही गोष्टी मनाला मोठा आनंद देतात. संयुक्त प्रकल्पांची यशस्वी पूर्तता, चांगल्या मित्राबरोबर आपण एकत्र साजरी करत आहोत. आपण भाग्यवान आहोत की गेल्या काही महिन्यात असे महत्वपूर्ण प्रसंग आपल्याला लाभले.
गेल्या डिसेंबरमध्ये मी, आपण आणि अफगाणी जनता अफगाणिस्तानच्या संसदेच्या उदघाटनासाठी एकत्र आलो होतो.

हे उदघाटन म्हणजे आधुनिक अफगाणिस्तानचा पाया मजबूत करण्याच्या दिशेने आमच्या संयुक्त पुढाकाराचे प्रतीक आहे. भारत, अफगाणिस्तान, इराण यांच्यात वाहतुकीसंदर्भात मे महिन्यात स्वाक्षऱ्या झाल्या. आपल्या भागीदारीतील हा एक महत्वाचा टप्पा आहे.

अफगाणिस्तानच्या आर्थिक प्रगती आणि समृद्धीसाठी नवे मार्ग निर्माण करण्याचा आमचा स्पष्ट निर्धार यातून दिसून येतो. या जूनमध्ये आम्ही एकत्र आलो आणि अफगाण -भारत मैत्री धरणाचे उदघाटन केले. सलमा धरणामुळे अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतातल्या अर्थव्यवस्था आणि कृषी क्षेत्राला पुनर्जिवन मिळण्याबरोबरच अफगाणिस्तानच्या सर्वांगिण विकास आणि प्रगतीसाठी एक सशक्त आणि चिरकालीन स्तंभही निर्माण करेल.
महामहिम,

आज स्टोर पॅलेसचे उदघाटन अनेक अर्थाने आगळे आहे. सर्वार्थाने हे जास्त मौल्यवान आणि आपल्या दृढ बंधाच्या परिमाणांचे द्योतक आहे. अफगाणिस्तानचा सांस्कृतिक वारसा सचेत करण्याची ही अमूल्य संधी आहे.
स्टोर पॅलेस अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. अफगाणिस्तानमध्ये जे लोक केवळ हिंसेची छाया पाहतात अशा लोकांसाठी स्टोर पॅलेसचा जीर्णोद्धार अफगाणिस्तानच्या समृद्ध परंपरेचे स्मरण करून देईल.
त्याचबरोबर आमच्या अफगाणी बंधू-भगिनींसाठी, अफगाण समाजाच्या लुप्त झालेल्या स्मृती, सौन्दर्य, गौरव, वैभवाचे पुनरुज्जीवन करेल.

हे काम पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या सर्व कलाकार, सल्लागारांची मी प्रशंसा करतो.

मित्रहो,

अफगाणिस्तान आपला घनिष्ट मित्र आहे. उभय देशातला समाज आणि जनता यांच्यात प्राचीन संबंध आहेत.
बाह्यशक्ती पुरस्कृत हिंसा आणि दहशतवाद यामुळे या गौरवशाली राष्ट्रापुढे सातत्याने आव्हाने ठाकत आहेत हे पाहणे दुःखदायी आहे.

मी अफगाणिस्तानच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की आमचा संकल्प:

समृद्ध अफगाणिस्तान निर्माण करणे;

समाजात शांतता, सुरक्षितता आणि स्थेर्य बहाल करणे हा आहे. भारताची 125 कोटी जनता सदैव तुमच्यासोबत राहील.

अफगाणिस्तानबरोबर भागीदारीसाठीची कटिबद्धता आणि मैत्रीचे बळ अतूट आहे.

आजचा हा समारंभ आपल्या संकल्प आणि सहकार्याचे प्रतीक आहे.

प्रत्येक अफगाणी नागरिकांची भरभराट होवो आणि समाजाला त्याचा आर्थिक लाभ होवो.

कितीही अडचणी आल्या तरी अफगाणिस्तानच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारत आपल्याबरोबर सदैव काम करत राहील.

महामहिम,

अफगाणिस्तानमधल्या भारतीय दूतावासात तसेच तिथे काम करणाऱ्या तज्ञांच्या सुरक्षिततेची काळजी घेत असल्याबद्दल तुमचे आणि तुमच्या सरकारचे मी आभार मानतो.

आपल्या अफगाणी बंधूनी केलेले बलिदान सदैव स्मरणात राहील.

आज आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी आपले पुन्हा आभार मानतो.

आपली प्रत्यक्ष भेट लवकरच होईल अशी अपेक्षा करतो.

नूतनीकरण केलेल्या स्टोर पॅलेसला भेट देण्याची संधी लवकरच प्राप्त होईल अशी आशा बाळगतो.

धन्यवाद,खूप खूप आभार.

B.Gokhale/N.Chitale/Anagha