पीएम्इंडिया
नमस्कार,
मंत्री मंडळातले माझे सहकारी राधामोहन सिंह,उत्तर प्रदेशचे यशस्वी आणि उत्साहदायी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जपान सरकारचे असिस्टंट डेप्युटी मिनिस्टर तकामी नाकाडा, इस्राईलचे प्रभारी राजदूत माया काडोश,कृषी क्षेत्रातले वैज्ञानिक,इतर मान्यवर आणि उत्तर प्रदेशातल्या काना कोपऱ्यातून आलेल्या माझ्या शेतकरी बंधू-भगिनीनो,
प्रयागराजमधे अर्ध कुंभ मेळा भरण्यासाठी काही महिने बाकी आहेत. मात्र उत्तर प्रदेशच्या धरणीवर आजपासून एक आणखी कुंभ सुरु झाला आहे.उत्तर प्रदेश मधल्या वेग-वेगळ्या गावातून सुमारे 50 हजार शेतकरी,देश-विदेशातून आलेले वैज्ञानिक,उद्योगपती, लखनौ मधल्या या कृषी कुंभ मधे सहभागी झाले आहेत. मी आपणा सर्वांना अभिवादन करतो, आपले स्वागत करतो.उत्तर प्रदेशचा खासदार या नात्याने आपल्या सुख- दुखाःत आपला सहकारी बनून आपल्या विकास यात्रेसाठी प्रयत्न करत राहणे हे माझे कर्तव्य आहे.
काही महिन्यांपूर्वी कृषी उन्नती मेळ्यात मी मोठे शेतकरी मेळे आयोजित करण्याची सूचना केली होती.त्याचाच विस्तार आज आपण या कृषी कुंभ च्या रूपाने पाहत आहोत. या उत्तम प्रयत्ना बद्दल मी योगी आणि त्यांच्या चमूचे अभिनंदन करतो. या आयोजनात आमचे भागीदार असलेले इस्राईल आणि जपान सरकार यांच्या प्रती मी आभार व्यक्त करतो.भागीदार राज्य या नात्याने सहभागी होत असलेल्या हरियाणालाही या आयोजनाचा मोठा लाभ होणार आहे.
मित्रहो, एखाद्या आयोजनाशी कुंभ हा शब्द जोडला जातो तेव्हा त्याचे महत्व अधिक व्यापक होते. कुंभ एक प्रकारे,मानवतेचा, विचारांचा एक अखंड आंतर प्रवाह आहे. हीच परंपरा, हीच भावना या कृषी कुंभात साकारली जाईल आणि येत्या तीन दिवसात कृषी क्षेत्र उत्कृष्ट बनवण्यासाठी तंत्रज्ञान आणि अन्य संधींचे नवे दालन उघडेल असा मला विश्वास आहे.
मित्रहो,या मेळाव्यात सुमारे 200 स्टॉल्स लावण्यात आले असून यामध्ये शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली जात आहे, कृषी क्षेत्राशी संबंधित नवी यंत्रेयात ठेवण्यात आली आहेत अशी माहिती मला देण्यात आली आहे.जे शेतकरी इथे येतील त्यांना नक्कीच लाभ होईल आणि उत्पादन वृद्धी बरोबरच गुणवत्ताही राखण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होईल याचा मला विश्वास आहे.
मित्रहो, देशभरात खरीपाचा हंगाम जवळ-जवळ पूर्ण होत आला आहे.सगळे शेतकरी बांधव कामात व्यग्र आहेत. या वेळीही विक्रमी उत्पादन होण्याची आशा आहे.उत्तर प्रदेशातल्या मेहनती शेतकऱ्यांकडून देशातल्या सुमारे 20 % अन्नधान्याचे उत्पादन घेतले जाते.यासाठी मी आपणा सर्वांचे अभिनंदन करतो.देशभरातल्या बाजारपेठेत धान आणि डाळींसहित सर्व पिकांची खरेदी सुरु आहे.यासाठी अनेक भागात व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे,अशी माहिती मला देण्यात आली आहे. या वेळी शेतकऱ्यांना जो कृषी भाव मिळत आहे तो नव्या आधारभूत किमतीनुसार मिळत आहे.सरकारने रब्बी आणि खरीपाच्या 21 पिकांच्या आधारभूत किमतीत ऐतिहासिक वाढ केली आहे याची आपल्याला माहिती आहेच. या पिकांच्या,खर्चावर, कमीत कमी 50 % थेट लाभ शेतकऱ्यांना मिळेल हे निश्चित करण्यात आले आहे.
मित्रहो, उत्तर प्रदेशातले शेतकरी उत्पादनाचा विक्रम करत आहेत तर योगी सरकार शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचा विक्रम मोडत आहे,यासाठी मी योगी सरकारचे अभिनंदन करतो. या वेळी सुमारे 50-55 लाख मेट्रिक टन गहू खरेदी करण्यात आला.या आधीचे सरकार 7-8 लाख मेट्रिक टन खरेदी करत असे.म्हणजे शेतकऱ्यांकडून सुमारे 7-8 पट खरेदी करून त्यांना त्याचे योग्य मोल मिळावे याची चिंता भारतीय जनता पार्टीच्या योगी सरकारने केली आहे.इतकेच नव्हे तर ही खरेदी केली आहे ती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांना दिली गेली आहे, ज्यामुळे मध्यस्थ दूर करण्यासाठी मदत झाली आहे.
मित्रहो, हा बदल केवळ धान आणि गहू खरेदीतच नव्हे तर ऊस खरेदी प्रक्रियेतही हा बदल स्पष्ट दिसत आहे.या हंगामात सुमारे 27 हजार करोड पेक्षा जास्त रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.इतकेच नव्हे तर मागच्या थकीत बाकी पैकीही सुमारे 11 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.साखर कारखान्यांकडून जी देणी बाकी आहेत ती लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न, योगी सरकार करत आहे अशी माहिती मला मिळाली आहे.उत्तर प्रदेश सरकारने बटाटे खरेदी करण्याचा निर्णय प्रथमच घेतलाआहे हे जाणून मला आनंद झाला.ज्या शेतकऱ्यांना बटाट्याचा योग्य भाव मिळण्यात समस्या येत होत्या त्यांना याचा निश्चितच लाभ होणार आहे.
मित्रहो,उत्तर प्रदेशमधे सुरु असलेले हे प्रयत्न म्हणजे केंद्र सरकारच्या, कटीबद्धतेचा एक भाग आहे,ज्यामध्ये गाव आणि शेतकरी आमच्या अर्थविषयक चिंतनाचा एक भाग बनले आहेत.शेतकऱ्यांना कोणी पुढे आणत नाही तर शेतकरीच देशाला पुढे नेतो असे आमचे स्पष्ट मत आहे.म्हणूनच कृश आणि शेतकऱ्याशी संबंधित समस्यांवर तुकड्या तुकड्यात काम करण्याच्या जुन्या विचारा ऐवजी आम्ही समग्रतेने काम करत आहोत. शेतकऱ्याच्या लहान लहान समस्या दूर करण्यावरआमचे लक्ष आहे.
मित्रहो,2022 मधे देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे होतील तेव्हा देशातल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकर्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी कमी खर्च,अधिक लाभ हे धोरण राबवताना,कृषी क्षेत्रात वैज्ञानिक पद्धतींचा अभूतपूर्व समावेश करण्यात येत आहे.बियाण्यापासून ते बाजारा पर्यंत एक मजबूत व्यवस्था देशात तयार करण्यात येत आहे.मृदा आरोग्य ते बाजारपेठात सुधारणा पर्यंत अनेक पाऊले उचलण्यात येत आहेत.देशभरात सुमारे 16 कोटी पेक्षा जास्त मृदा आरोग्य कार्ड शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत ज्यामध्ये,सुमारे 3 हजार कोटी उत्तर प्रदेशात देण्यात आली आहेत.यामुळे,या मातीसाठी कोणते पिक घेणे उपयुक्त ठरेल आणि कोणते खत आणि किती प्रमाणात घालणे आवश्यक आहे हे ठरवणे शेतकऱ्याला सोपे ठरत आहे.
मित्रहो,मृदा आरोग्याबरोबरच मातीचा कस टिकवण्यासाठी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.टाकाऊ किंवा कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. मात्र देशाची गरज लक्षात घेऊन त्यानुसार उत्पादन व्हावे यासाठी युरिया सारख्या खताचा पुरेसा पुरवठाही सुनिश्चित करण्यात आला आहे.त्याच बरोबर सिंचन व्यवस्थाही मजबूत करण्यात येत आहे.मोठ्या सिंचन प्रकल्पाबरोबरच सिंचनाच्या नव्या तंत्रज्ञानालाही प्रोत्साहन देण्यात येत आहे.पर ड्रोप मोअर क्रॉप, एक एक थेंबापासून पिकाला लाभ कसा होईल याकडे लक्ष दिले जात आहे. पर ड्रोप मोअर क्रॉप साठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचन यासारख्या सिंचन पद्धतीचा वापर करून या वैज्ञानिक पद्धती आपल्या सिंचन व्यवस्थेचा भाग बनत आहेत.
इस्राईल या तंत्रज्ञानात निपुण आहे.जपानही कृषी तंत्रज्ञानात व्यापक काम करत आहे. यामुळे कृषी कुंभ मधे भागीदार या नात्याने आपणा सर्वाना,संपूर्ण देशाला या दोनही देशाच्या तंत्र निपुणतेचा लाभ मिळणार आहे.
मित्रहो,याच बरोबर वीज आणि डिझेलवर चालणाऱ्या कृषी पंपांचे,सौर पंपात रुपांतर करण्याच्या दिशेने जोमदार आगेकूच सुरु आहे.या व्यवस्था व्यतिरिक्त सिंचनाचे मोठे साधन आहे ते पंप,या दिशेनेही प्रयत्न सुरु आहेत. डिझेलवर चालणाऱ्या कृषी पंपांचे,सौर पंपात रुपांतर करण्यासाठी व्यापक अभियान चालवले जात आहे. या अंतर्गत, येत्या चार वर्षात देशभरात सुमारे 28 लाख शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंप लावले जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल आणि जी अतिरिक्त वीज निर्माण होईल ती वीज ते वीज वितरण कंपन्यांना विकूही शकतील.
मित्रहो,आपला अन्नदाता शेतकरी आता उर्जादाताही बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तो अन्नदाताही आहे आता उर्जादाताही बनेल.मित्रहो, या अभियानामुळे शेतकऱ्याच्या जीवनात केवढे परिवर्तन घडत आहे याची प्रचीती मला,काही दिवसांपूर्वी मी गुजरातला गेलो होतो तेव्हा आली. तिथे काही शेतकरी कुटुंबांनी मिळून,शेतातच सौर पॅनेल आणि सौर पंपाचे काम सुरु केले होते. सूर्य किरणांपासून वीज निर्मिती सुरु केली आणि त्यावर शेतीचे काम सुरु होते,पंप चालत होता.यातून विजेची गरज तर भागलीच त्याच बरोबर,वार्षिक सुमारे 50 हजार रुपये वीज विक्री द्वारे त्यांना मिळत होते.
मित्रहो,विज्ञानाचा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळावा यासाठी सरकार जोमदार प्रयत्न करत आहे.शेतकरी,वैज्ञानिक आणि संशोधन केंद्राशी थेट जोडला जाण्यासाठी काम करण्यात येत आहे. ज्याद्वारे, शेतीशी संबंधित नवा शोध,बियाण्याशी संबंधित नवा शोध,त्याबाबत योग्य माहिती, कमीत कमी वेळात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल.यासाठी देशभरात सुमारे 700 कृषी विज्ञान केंद्रानांही मोठी भूमिका दिली गेली आहे. शेतीशी संबंधित आधुनिक संस्था उभारण्यात येत आहेत.वाराणसी मधे निर्माण होत असलेले तांदूळ संशोधन केंद्रही याच दिशेने करण्यात येत असलेला एक मोठा प्रयत्न आहे.शेतकऱ्याला, कृषी मालाचा जास्त भाव मिळावा यासाठी मूल्य वर्धनाच्या दिशेनेही सरकारने अनेक पाऊले उचलली आहेत. अन्न प्रक्रिया क्षेत्रात शंभर टक्के थेट परकीय गुंतवणुकीचा निर्णय सरकारने घेतला आहे.
टॉमॅटो विकायला गेलो तर स्वस्तात विकले जातात मात्र टॉमॅटो सूप विकले आणि ते बाटली बंद करून विकले तर जास्त पैसे मिळतात हे आपण सगळेच जाणतो.कैरीचे पैसे कमी मिळतात मात्र कैरीचे लोणचे विकले तर जास्त पैसे मिळतात.हिरवी मिरचीचे पैसे कमी मिळतात तर मिरची पावडर केली तर त्याचे पैसे जास्त मिळतात.हे आहे मूल्यवर्धन. याशिवाय या वर्षीच्या अर्थ संकल्पात टॉमॅटो,कांदा,बटाटा पिकाशी संबंधित मूल्यवर्धनासाठी 500 कोटी रुपयांच्या निधीसह योजनेची घोषणा करण्यात आली आहे.याचाहीउत्तर प्रदेश मधल्या बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल.यामुळे कृषी क्षेत्रातल्या गुंतवणुकीचे दालन खुले झाले आहे, ज्याचा उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.उत्तर प्रदेश गुंतवणूकदार परिषदेत, अन्न प्रक्रिया क्षेत्र म्हणजे कृषी उत्पादन क्षेत्रात मूल्य वृद्धी मधे सुमारे 16 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव आल्याची माहिती मला मिळाली आहे.यापैकी साडे तीन हजार कोटीच्या 14 योजनांचे लोकार्पणही झाले आहे.
मित्रहो,शेती लाभकारी करण्यासाठी या योजना हाती घेण्यात आल्या आहेत.याशिवाय दुसऱ्या माध्यमातूनही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.हरित क्रांतीच्या सफल प्रयोगानंतर आता आपण श्वेत क्रांती,मधुर क्रांती,नील क्रांतीच्या नव्या मार्गावर वाटचाल करत आहोत.दुध उत्पादन असो,मध उत्पादन असो,मत्स्य उत्पादन असो, देश नव-नवे विक्रम करत आहे.दोन दिवसापूर्वीच भारत सरकारने, मत्स्य उत्पादक शेतकरी कुटुंबासाठी,मच्छीमार बंधू- भगिनीसाठी एकमोठा निर्णय घेतला आहे.सरकारने साडे सात हजार कोटी रुपयांच्या नव्या निधीला मंजुरी दिली आहे.
मित्रहो,या कृषी कुंभाला उपस्थित सर्व शेतकरी,शेतीशी संबंधित तज्ञ,वैज्ञानिक, भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वपूर्ण भाग आहेत.कारण आपल्या कार्याचा, आगामी काळात, वेगाने वाढणाऱ्या आपल्या आर्थिक सामर्थ्यावर मोठा प्रभाव पडणार आहे.या कृषी कुंभात, शेतकऱ्यासमवेत, शेतीशी संबंधित तंत्र ज्ञानावर अधिक गहन मंथन व्हावे अशी माझी अपेक्षा आहे. खताचा उपयोग कसा कमी राखता येईल,कमी पाण्याचा योग्य वापर कसा करता येईल,पिकाच्या साठवणुकीचे तंत्र अधिक उत्तम कसे राखता येईल,रोबोट आणि ड्रोन यासारख्या तंत्रज्ञानाचा, शेतीमध्ये प्रभावी उपयोग कसा करता येईल, असे अनेक विषय आहेत ज्यावर कार्य करण्याची गरज आहे.
याशिवाय,पिकांची धाटे, म्हणजे पिकांचे निरुपयोगी अवशेष, त्यानाही नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपत्तीत कसे बदलता येईल, कचऱ्यातून संपत्ती कशी निर्माण करता येईल,शेतात कोणतीही गोष्ट निरुपयोगी नसते.पिकाच्या आधीही नाही आणि नंतरही नाही.शेतातली प्रत्येक गोष्ट सोन्याप्रमाणे असते.एखाद्या जवाहिऱ्याप्रमाणे त्याचा उपयोग केला तर शेतातली एकही गोष्ट वाया जाणार नाही.कचरा सोने ठरू शकतो,कचऱ्यातून संपत्ती निर्माण केली जाऊ शकते.यावरही अधिक व्यापक काम करण्याची आवश्यकता आहे.शेतातले पिकांचे हे अवशेष जाळण्यापासून रोखण्यासाठी, सरकार , शेतकऱ्यांना या बाबतच्या यंत्रावर 50 ते 80 टक्के सवलत देत आहे. मात्र आपल्याला,तंत्रज्ञानावर आधारित अशा ठोस उपायांचा शोध घ्यायला हवा ज्यामुळे शेतकऱ्यांना, पिकांचे हे अवशेष जाळावे लागणार नाहीत आणि पर्यावरणाचेही रक्षण होईल.
शेती लाभकारी करण्यासाठीच्या या विषयांवर, यामध्ये मुल्यवर्धन कसे होईल यावर येत्या तीन दिवसात आपण चिंतन कराल असा मला विश्वास आहे. विशेषतः उत्तर प्रदेशातल्या वेग-वेगळ्या जिल्ह्यात, तिथल्या गरजांनुसार नव-नवे प्रयोग कसे करता येतील यावरही आपण चर्चा कराल.
हा कृषी कुंभ उत्तर प्रदेशा बरोबरच संपूर्ण देशाच्या कृषी व्यवस्थेला नवी दिशा देईल या अपेक्षेसह आपणा सर्वाना पुन्हा एकदा खूप-खूप शुभेच्छा !
खूप-खूप धन्यवाद !.
*******
B.Gokhale/ N.Chitale/ D.Rane
Addressing the Krishi Kumbh, a commendable initiative of the UP Government. Watch. https://t.co/XUXr5EPcmw
— Narendra Modi (@narendramodi) October 26, 2018